Quackwatch
1969 मध्ये डॉ.स्टीफन बॅरेट या मानसोपचारतज्ञानं ‘लेहाय व्हॅली कमिटी अगेन्स्ट हेल्थ फ्रॉड’ ही आरोग्य क्षेत्रातील घोटाळ्यांविरोधी लढा देणारी संस्था अमेरिकेतील पेनिसिल्व्हॅनिया इथं स्थापन केली. 1996 पासून या संस्थेनं पर्यायी वैद्यकीय उपचारांवर नजर ठेवणारी ‘क्वॅकवॉच डॉट आर्ग’ ही अधिकृत वेबसाईट सुरू केली. आरोग्यासंबंधीचे घोटाळे, मिथकं, फॅडस, भ्रम आणि गैरवर्तणूक याविरूद्ध लोकजागृती करणं, आणि वैद्यकक्षेत्रातील भोंदूगिरीबद्दल इतरत्र सहज न मिळणारी माहिती पुरवणं, हा या मागचा मूळ उद्देश होता. ही साईट लोकप्रिय होऊ लागताच संस्थेनंही ‘क्वॅकवॉच’ हे नाव धारण केलं. 2008 मध्ये ही संस्था बंद झाली तरी वेबसाईटचं काम चालूच राहिलं. जगभर पसरलेलं वैद्यकीय व्यावसायिकांचं स्वयंसेवी जाळं आणि दीडशेहून अधिक तज्ञ सल्लागार यांच्या सहाय्यानं ही साईट विकसित करण्यात आली आहे. सत्यशोधक लोकांकडून प्रशंसा आणि भोंदू वैदूंकडून टीका या दोन गोष्टी या साईटच्या यशस्वीतेच्या गमक आहेत.
“संशयास्पद दावे तपासणे, उत्पादन आणि सेवांबाबतच्या शंकांची उत्तरं देणं, भोंदूगिरीला बळी पडलेल्यांना सल्ला देणं, विश्वासार्ह प्रकाशनांचं वितरण करणे, भ्रामक वैज्ञानिक दाव्यांचा भांडाफोड करणे, बेकायदेशीर मार्केटिंग निदर्शनास आणणे, इंटरनेटवरील आरोग्याविषयक माहितीचा दर्जा सुधारणे, ग्राहक संरक्षक खटले दाखल करणे किंवा त्यांना सहाय्य करणे आणि इंटरनेटवरील दिशाभूल करणार्या जाहिरातींवर हल्लाबोल करणे” ही या वेबसाईटची ध्येयं आणि उद्दिष्टं आहेत.
या साईटसाठी कोणीही पगारी नोकर नाहीत आणि ‘क्वॅकवॉच’ आणि इतर संबंधित 21 वेबसाईटस यांचा एकूण खर्च वर्षाला अवघा 7000 डॉलर्स(साडेतीन लाख रूपये) आहे. छोट्या व्यक्तीगत देणग्या, इतर साईटसकडून माहितीच्या मोबदल्यात मिळणारं कमिशन, प्रकाशनांच्या विक्रीतून होणारा फायदा आणि डॉ.बॅरेट यांनी दिलेला निधी यातून हा कारभार चालतो. या वेबसाईटवर डॉ.बॅरेट, सल्लागार मंडळ आणि इतर लेखकांनी सामान्य ग्राहकांसाठी लिहिलेले अनेक लेख आणि श्वेतपत्रिका पहायला मिळतात. या लेखांमध्ये आरोग्यविषयक उत्पादनं, उपचार, भ्रामक किंवा परिणामशून्य(पर्यायी) उपचारपद्धती या विषयी चर्चा असते. यामध्ये विशेषत: अॅक्युपंक्चर, अल्गी बेस्ड उपचार, दातात भरलेले अॅमाल्गम(चांदी) काढणे, कायनेसिऑलॉजी, आयुर्वेदिक उपचार, दृष्टी सुधारण्यासाठीचे ‘नैसर्गिक’ उपचार, बुरशीजन्य आजार, चीनी व इतर हर्बल उपचार, कायरोप्रॅक्टिक, कोलॉईडल सिल्व्हर, कोलॉनिक उपचार, क्रेनिओसॅक्रल उपचार, डाएटरी सप्लिमेन्टस (पूरक आहार), एम्ब्रिऑनिक स्टेम सेल क्लिनिक, अर्गोसेन्ट्रिक उपचार, जनुकीय निदान, ग्लुकोसामाईन, ह्यूमन ग्रोथ हॉर्मोन उपचार, केसांचे विश्लेषण, होमिओपथी, आयरिडॉलॉजी, चुंबकीय उपचार, चयापचय उपचार, मल्टिपल केमिकल सेन्सिटिव्हीटी, निसर्गोपचार, ऑरगॅनिक फूड, ऑर्थोमोलेक्युलर वैद्यक, ऑस्टिओपथी, न्यूमॅटिक ट्रॅबेक्युलोपथी, रिफ्लेक्सॉलॉजी, थेरॅप्युटिक टच, अम्बिलिकल कॉर्ड(नाळ) रक्तपेढी यांचा समावेश असतो.
शंकास्पद दावे करणारे तथाकथित शास्त्रज्ञ, गट किंवा संस्था यांची यादीही आपल्याला ‘क्वॅकवॉच’वर पहायला मिळते. आरोग्यक्षेत्रात भोंदूगिरी करणारे लोक आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले खटले यांच्याबद्दलचीही माहिती असते. पण या साईटवर उपचार पद्धतींबद्दल फक्त नकारात्मक टीकाच नसते तर काही चांगले उपचार अधिकाधिक लोकांपर्यंत सुलभतेनं कसे पोचतील किंवा काहींच्या बाबत अजून संशोधनाला कसा वाव आहे याचीही साधक-बाधक चर्चा असते. ज्यांना एखाद्या विषयाचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करायचा असतो त्यांच्यासाठी क्वॅकवॉच गटातल्या आणि इतरही संबंधित साईटसच्या लिंक्स दिलेल्या असतात.
‘क्वॅकवॉच’शी संबंधित इतर साईट्समध्ये होमिओवॉच(होमिओपथी), कायरोबेस(कायरोप्रॅक्टिक), एमएलएम वॉच(मल्टिलेव्हल मार्केटिंग), क्रिडेन्शियल वॉच(पदव्यांचे कारखाने!) अशा विशिष्ट विषयांना वाहिलेल्या साईटस्चा समावेश आहे. शंकास्पद किंवा घातक अशी आरोग्याविषयक गृहितकं, भ्रामक उत्पादनं आणि सेवा याबाबतीत विशेष चिकित्सा हे या सगळ्या साईटस्चं समान वैशिष्ट्य आहे. जगभरातील आरोग्यक्षेत्रात काम करणार्या अनेक शासकीय आणि अशासकीय संस्था आणि नियतकालिकांनी ‘आरोग्यविषयक माहितीचा विश्वासार्ह स्त्रोत’ म्हणून ‘क्वॅकवॉच’ चा वारंवार गौरव केला आहे. ‘क्वॅकवॉच’ ही वेबसाईट इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषांमध्ये आणि ‘क्वॅकवॉच डॉट कॉम’ या ‘मिरर’ द्वारेही बघता येते.
– प्रा. अदिती मुळ्ये