Categories
अभिवादन

आठवणी दाटतात

ऑक्टोबर - २०१४

प्रिय नरेंद्र,

दिनांक 5 ऑगस्ट 2013 रोजी दुपारी दोन वाजता मुंबईतील मंत्रालयाच्या परिसरात असलेल्या भोजनगृहामध्ये आपली भेट झाली होती. आजचं जेवणाचं बील मी देणार असं म्हणताच डॉक्टर तुम्ही किती आढेवेढे घेतले. अखेर माझी गांधीगिरी मान्य करून तुम्ही मला बील देऊ दिले पण गडहिंग्लजला आल्यावर मला तुम्ही जेवण देणार ही अट घालूनच!

डॉक्टर! “खरे सांगू, मी गेले चार दिवस तुम्हाला या परिसरात पाहत होतो. सकाळी डेक्कन क्वीनने पुण्याहून येत होता आणि संध्याकाळी मिळेल त्या गाडीने वेळी अवेळी परत जाता. दुसरे दिवशी पुन्हा हजर. आमदार, नामदारांचे हुंबरे झिजवता आहात. ज्यांची तुमच्या समोरच नव्हे तर वार्‍याला देखील उभे राहण्याची लायकी नाही अशा अनेकजणांच्या समोर जाऊन त्यांना आपले विचार पटवून देण्याचा, समजून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करता. उरात ध्येयवाद बाळगून उर फुटेपर्यंत राबता आहात. सत्तेसमोर शहाणपणा हात जोडून उभारलेला पाहतो आणि आमच्या सारख्याचा जीव तुमच्याकडे पाहून कासावीस होतो! पण काय करणार? तुम्हाला आणि तुमच्या उदात्त कार्याला मनातल्या मनात शुभेच्छा देण्याइतकीच कुवत आमच्यासारख्या सामान्य बुद्धीजीवींच्याकडे निसर्गाने दिलेली आहे. त्याला तुम्ही तरी काय करणार? आणि आम्ही तरी काय करणार? विषय काढलात आणि वेळ आहे म्हणूनच सांगतो या सगळ्या माणसांच्या कळपामध्ये तुम्ही एकटे सोडला तर असे किती निघतील हो जे स्वत:साठी नव्हे तर दुसर्‍यासाठी पायाला भिंगरी बांधून आलेत?

“दाभोलकर सर, बोलल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात म्हणजे 12 ते 14 ऑगस्ट 2013 च्या दरम्यान तुम्ही खरोखरच गावी आलात, गडहिंग्लजमध्ये पोचल्याबरोबर डॉ. भोईटे जे माझ्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, अंनिस संघटनेच्या त्या भागातले अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे चौकशी केलीत. आपल्या दोघांमध्ये जेवण व त्याचे बिल देण्याबाबत ठरलेला करारदेखील सांगितलात. त्या मित्राने फोन करून मला सांगितले, पण माझ्या दुर्दैवाने मी त्या दिवशी माझ्या शिक्षण संस्थेच्या कामासाठी मुंबईला गेलो होतो. फोनवर आपल्याशी झालेल्या बोलण्यामध्ये आपण म्हणालात- “मी ठरल्याप्रमाणे तुझ्या गावी तुझा हिशोब चुकता करायला आलोय, पण तू तुझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मला चकवा दिलास. कोल्हापुरी भाषेत टांग मारलीस, पण लक्षात ठेव मी देखील सातारचा आहे. अजिंक्यतार्‍याच्या कड्यावर वाढलोय. तुला सहजासहजी सोडणार नाही. जिथे भेटशील तिथे तुला पोटभर खायला घालून त्याचं बील दिल्याशिवाय सोडणार नाही. दोन दिवसांत 15 ऑगस्ट असल्यामुळे मला माझ्या संस्थांचा कार्यक्रम चुकवता येत नव्हता म्हणून आणि 20 ऑगस्ट रोजी माझा 69 वा जन्मदिन असल्याने माझ्या मित्रांनी ठरविलेला कार्यक्रम चुकविता येणार नव्हता. 20 तारखेच्या सकाळी आठ वाजता मी आमच्या शिक्षण संकुलात नियोजित केलेल्या वाढदिवसांच्या कार्यक्रमासाठी पोहोचलो. पाच दहा मिनिटे माझ्या कार्यक्रमात बसतो न बसतो तोपर्यंत माझ्या एका सहकार्याने धावतच येऊन कसे बसे वाक्य उच्चारले.

“सर, नरेंद्र दाभोलकरांना कोणी तरी गोळ्या घातल्या!”

“काय? गोळ्या घातल्या? कुठे, केव्हा? कशा?”

“आज सकाळीच पहाटे फिरायला गेल्यावेळी कोणीतरी जवळून गोळ्या झाडल्या. त्या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झाला! अशी बातमी टी.व्ही.वर दाखवण्यात येत आहे!”

“अरेरेऽऽ फार वाईट झाले! एक मोठा माणूस गेला! खरोखरच मोठा माणूस गेला! महाराष्ट्र बदनाम झाला! पुरोगामी समजणार्‍या महाराष्ट्राला आणखी एक कलंक लागला! दिवसा ढवळ्या रस्त्यावर दाभोलकरांसारख्या महात्म्यावर गोळ्या घालून अठ्ठेचाळीस सालची पुनरावृत्ती झाली! खूपच वाईट झाले!!”

अश्रू पुसत मी काय बोलत होतो हे मलाही कळत नव्हते! हे स्वगत बोलत असतानाच माझ्या भोवती माझे बरेच सहकारी जमले आणि स्वत:बरोबर माझेही सांत्वन करू लागले. परस्परांचे सांत्वन करण्याशिवाय आमच्या हातात काहीच नव्हते! नियतीने आमच्यावर असह्य आघात केलेला होता. सर्व आटोपले होते!”

थोडेसे स्वत:ला सावरून सहकार्यांना म्हणालो-

“आता आयोजित कार्यक्रम रद्द करा. ताबडतोब कॉलेजची बेल द्या आणि सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र बोलवा.”

त्या दिवशी त्या वाईट सकाळी आयोजित केलेला वाढदिवसाच्या समारंभाचे रूपांतर शोकसभेत करावे लागेल! याला दुर्दैवविलास नाही तर काय म्हणायचे?

गेले वर्षभर हे दु:ख भोगतोय. अश्रू आतल्या आत घोटतोय. दि.5 ऑगस्ट रोजी अगदी असह्य झाले. आमच्या मुंबईतील भेटीला एक वर्ष झाले! त्यामुळे तुमच्या आठवणींनी मला ओढून कोल्हापूरहून पुण्याला आणले. आल्या आल्या माझ्या कन्येसह तुमचे ते हुतात्मा स्थळ गाठले! आणि तुमच्या स्मृती आठवू लागलो.

“आता आमच्या गावी आमच्या निवासस्थानी बसून तुमच्या स्मृतीला उजाळा देत तुमची ती शांत, शितल आणि कर्तव्य प्रतिमा मन:चक्षुसमोर आणतोय! दाभोलकर सर, तुम्ही आम्हाला क्षमा करा. तुमच्यासारख्यांना आम्ही संरक्षित करू शकलो नाही. तुमची क्षमा मागण्याचीही आमची लायकी नाही.

गेले वर्षभर तुमच्यावर मरण लादणारे तुमचे निर्दय मारेकरी घुबडासारखे लपून बसलेले आहेत. कदाचित अज्ञान स्थळी पळून जाऊन हे डरपोक अजून दबा धरून बसलेले असणार. एका महान सुधारकाला निर्दयपणे मारणारे ही हिंस्त्र श्वापदे शोधून काढण्यात आमची पिढी अपयशी ठरलेली आहे. पोलीस खाते त्या गुन्हेगारांना शोधून काढण्याच्या आशा संपुष्टात येत आहेत. असे झाले तर भविष्यात फार धोकादायक… परिस्थिती निर्माण होईल. कुणाचा कुणाला धरबंधच राहणार नाही. कोणीही कोणालाही केव्हाही कुठेही मारून खपवू शकते असा संदेश समाजात गेला तर कोणीही पुरोगामी समाजासाठी आयुष्यभर झोकून द्यायला धजावणार नाही. मारेकर्‍यांचा हाच दुष्ट हेतू आहे. केवळ एका नरेंद्रांना मारून हे नराधम थांबणार नाहीत त्यांना पुरोगामी विचारच कायमचा मारून टाकायचा आहे. हे फारच धोक्याचे आहे.”

प्रा. किसनराव वि. कुराडे

मोबा. 9881445491