Categories
अभिवादन

आठवणीतले दाभोलकर

ऑक्टोबर - २०१४

सन 1997 साली अं.नि.स.ची भोर शाखा स्थापन केल्यानंतर 2013 पर्यंत जवळजवळ शंभर वेळा सरांना प्रत्यक्ष अथवा फोनवर बोलण्याचा प्रसंग आला. पहिली पाच वर्षे, दरवर्षी आम्ही डॉ. दाभोलकर सरांच्या मार्गदर्शनाने ‘विसर्जित गणपती दान मोहीम’ राबवली. जे काही आम्ही केले ते सरांना एवढे आवडले की, सरांनी या मोहिमेला ‘भोर पॅटर्न’ असे नाव दिले. तसे त्यांनी दरवर्षी भोर मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जाहीर केले. एवढेच नव्हे तर मार्च 2011 च्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात सरांनी महाराष्ट्रातील संपूर्ण मोहिमेचा आढावा घेणारा लेख लिहिला, त्यात सुद्धा सरांनी पान नं.5 वर अं.नि.स.शाखा भोरच्या या उपक्रमाचा उल्लेख केला आणि अं.नि.स.च्या इतिहासात त्याचे डॉक्युमेंटेशन केले. यावरून सर स्वत:कडे कोणत्याही यशाचे श्रेय न घेता कार्यकर्त्यांना श्रेय देत असत. मला वाटते सत्तेचे, संपत्तीचे, राजकीय लाभाचे कसलेही प्रलोभन नसताना अं.नि.स.ला शेकडो शाखा स्थापन करून हजारो नि:स्वार्थी कार्यकर्ते मिळाले याचे गमक सरांच्या या कार्यकर्त्यांना मोठे करण्याच्या स्वभावात आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते व चळवळीचे आधारस्तंभ मा. निळू फुले यांच्या भोर भेटीतील घटना. विसर्जित गणेशमुर्ती दान स्वीकारण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. निळू फुले यांना डॉ. दाभोलकर पुण्याहून भोरला घेऊन आले. माझ्या हॉस्पिटलच्या गेटमधून गाडी बाहेर जातांना, गाडीचे एक चाक डावीकडच्या गटारीत जाऊ लागले. हे पाहून सर खूप घाबरले व वाहनचालकाला ताबडतोब त्याच ठिकाणी गाडी थांबवण्यास सांगून “निळूभाऊंना प्रथम गाडीतून खाली उतरवून घे” अशी सूचना मला केली. तसे मी केले. आता या वयात (वय सुमारे 80-82 झालेले) निळूभाऊंना काही इजा होऊ नये म्हणून आपण जिवापाड जपले पाहिजे.”

म्हणजे कार्यकर्ते ते दिग्गज यांना खूप जपणारे असे डॉ. नरेंद्र दाभोलकर सर होते.

माझी सरांची शेवटची भेट दि. 6 ऑगस्ट 2013 रोजी साधनाच्या जुन्या कार्यालयात पुणे जिल्हा अंनिस कार्यकारिणीत झाली. ‘जादूटोणा विरोधी कायदा’ व्हावा म्हणून नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनावेळी मा. ना. मोघे, ना. हर्षवर्धन पाटील, मा. मुख्यमंत्री, त्यांचे सचीव यांच्या भेटी घेऊन काय काय घडले, हे सरांनी सांगितले. आणखी त्यासाठी काय काय करावे याची चर्चा चालू असतांना सर म्हणाले, “आपल्याला अमीर खानसारखा सेलिब्रिटी मिळाला व त्याने हा कायदा व्हावा म्हणून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला तर आपले काम होईल.” सर 20 ऑगस्ट रोजी शहीद झाले. त्याच दिवशी आकाशवाणीवरील बातमीत मा. मुख्यमंत्री ताबडतोब कायदा करू म्हणाले. त्यानंतर कायदा झाला. सर, स्वत: शहीद झालात तुमचे शहीद होणे मुख्यमंत्र्यांना सेलेब्रिटीच्या भेटीसारखे वाटणे व त्यांनी तात्काळ कायदा करणे हे काय झाले सर या पुरोगामी महाराष्ट्रात?

डॉ. अरुण बुरांडे

संपर्क : 9850737590