डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी ज्यावेळी मला लिहावयाच्या आहेत असे संपादक राजू देशपांडे यांनी सांगितल्यावर मनाच्या एका कप्प्यात जोरदार हालचाल झाली. वेगवेगळ्या विचारांच्या लाटा उफाळून आल्या. डॉक्टरांना तसा मी 20 वर्षांपासून ओळखत होतो. पण त्यापैकी 18 वर्षे मी त्यांच्या एवढ्या जवळ गेलो की ते माझ्या जीवनाचा भाग, घरचे मेंबर कधी झाले हेच मला कळले नाही. डॉक्टर व माझ्या वयात बरेच अंतर पण जनरेशन गॅप म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्यात व माझ्यात कधीही जाणवली नाही. तसेच डॉक्टर त्यांच्या वयाच्या पेक्षा मोठ्या माणसाशी पण त्याच प्रमाणे संवाद करायचे. संवाद कौशल्याने डॉक्टर माणसे जोडीत. संवादकौशल्य, डॉक्टरांचा स्वभाव, जादूटोणाविरोधी कायद्यासाठी त्यांच्या मुंबईतील फेर्या, सनातनचे खटले, जाहिरात गोळा करणे इत्यादी बर्याच कारणामुळे मी डॉक्टरांच्या जवळ गेलो.
मी कोकणातून आलेला सामान्य माणूस. अंधश्रद्धा, देव, धर्म, भुते, देवस्की, करणी इत्यादी संस्कार घेऊन आलेला व नोकरी निमित्त मुंबईत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राहणारा (दादर भागात) मग ते संस्कार अधिकच घट्ट फिट्ट बसलेले. पण डॉक्टरांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या शिबिरातून बोलण्यातून माझ्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विवेकी विचारसरणीचा प्रभाव पडत गेला. माणसाचे मोठे शस्त्र मेंदूचा वापर. त्याची धार तल्लख झाली. म्हणूनच सामान्य कार्यकर्ता ते कोकण विभागाचा राज्य सरचिटणीस अशा प्रवासामध्ये डॉक्टरांचे प्रमुख मार्गदर्शन मला लाभले. डॉक्टरांची साधी राहणी उच्च विचारसरणी बघत गेलो. डॉक्टरांनी मला खरा देव, धर्म, नीती याचे आचरण शिकविले. त्यामुळे उत्सवात धर्माच्या नावाने चाललेली दांभिकता मला कळली. मुंबईत मोहमय नगरीत निर्व्यसनी म्हणून जगू शकलो.
डॉक्टर खरे माणसे पारखी होते. चळवळीत जोडलेल्या प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीप्रमाणे द्यायचे काम डॉक्टरांकडे नेहमीच होते. त्याचप्रमाणे सेलीब्रिटीसुद्धा या व्यवस्थेचे भाग आहेत व त्यांनी सुद्धा समाजाचे काहीतरी देण्याचं भान लागते याची आठवण करून त्यांनी अनेक सेलिब्रिटींना चळवळीत जोडून घेतलेले होते. म्हणूनच अनेक सेलिब्रिटी कोणतेही मानधन न घेता त्याचा वेळ चळवळीसाठी देत. कुशल नेता, प्रशासक, इव्हेंट मॅनेजर ते सामान्य कार्यकर्ते अशा वेगवेगळ्या भूमिकेत डॉक्टर एकाचवेळी वावरत होते. टाईम मॅनेजमेंट तर डॉक्टर स्वत: पाळीत पण त्यांनी अंनिसला तसेच सामाजिक चळवळीला सुद्धा त्याची शिस्त लावून दिली. कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही अडचणीत असला तरी त्याला धीर देऊन त्याला बरोबर घेऊन अडचणीतून डॉक्टर नेहमीच बाहेर काढीत. पार्ल्यामध्ये पुस्तक विक्री करताना कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला व पोलीस योग्य भूमिका घेत नसल्याने नाईलाजानेच मी डॉक्टरांना रात्री 9.30 वाजता फोन केल्यावर लगेचच डॉक्टरांनी चक्रे फिरवली. डॉक्टरांनी स्वत: पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांनाच जाब विचारला. कुठल्या कायद्याने तुम्ही आमच्या कार्यकर्त्यावर एफ.आय.आर.दाखल करणार? ते तर घटनेने सांगितलेले नागरिकाचे कर्तव्य करतात. एवढेच नव्हे तर डॉक्टर मुंबईत नसल्याने त्यांनी प्रा.एन.डी.पाटील सरांना सुद्धा आमच्या मदतीकरता फोन करायला सांगितले. त्यामुळेच पोलिसांनी आमची दुसर्या दिवशी सन्मानपूर्वक सुटका कुठलीही तक्रार आमच्यावर न ठेवता केली. एवढे करून डॉक्टर गप्प बसले नाही तर आमच्या ह्या संघर्षावर लेख लिहून तो अंनिस वार्तापत्रामध्ये प्रसिद्ध केला. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे आलेले फोन त्यामुळे आमचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढला. कार्यकर्त्यांना कसे उत्साहित करायचे हे डॉक्टरांकडून शिकायचे.
मुंबईत डॉक्टर आल्यावर त्यांच्या मित्राकडे किंवा नातेवाईकांकडे रहायचे. पण माझा संपर्क झाल्यावर माझ्याकडेही अधूनमधून रहायला यायचे. मी पूर्वी चाळीत रहायचो. लहान खोली किंवा इतर गोष्टींचा काहीही बाऊ न करता ते आपलेच घर आहे असेच वागायचे. दिवसभर आम्ही कामासाठी बाहेर. कधी दुपारी जेवलो तर नाही तर सकाळच्या नाष्ट्यावर किंवा हॉटेल किंवा रस्त्यावरचे खाणे व्हायचे. म्हणूनच आग्रहाने मी रात्रीचे जेवण त्यांना माझ्या घरी घेण्यास सांगायचो. डॉक्टर जेवणाचा पूर्णपणे आस्वाद घेऊन त्यातील आवडलेल्या पदार्थाची स्तुती तर करीतच पण तो कसा बनविला याची रेसिपी जाणून घेत. अशी आमची आई, आजी पदार्थ बनवित याचाही उल्लेख करीत. जाताना अन्नदाता सुखी भव असे आवर्जून माझ्या बायकोला नीलमला आणि आजीला बोलायचे. घरातील सर्वांची अगत्यपूर्व चौकशी करायचे. निधी लहान असताना तिच्याशी एका विशिष्ट पद्धतीने टाळ्याची अदलाबदल करत तिच्याशी खेळणारे असे प्रेमळ डॉक्टर होते. निधी मोठी झाल्यावर ती बारीक दिसल्यावर काय गं पोटभर व्यवस्थित जेवते की नाही अशी प्रेमळ चौकशी करणारे डॉक्टरच होते. डॉक्टरांच्या खुनानंतर डॉक्टर आमच्या घरी यायचे, जेवायचे, हे लोकांना कळल्यावर बर्याच जणांच्या चेहर्यावर आश्चर्य वाटले.
जादूटोणा विरोधी कायद्यासाठी जे आंदोलन डॉक्टरांनी चालविले त्यांचा सहकारी म्हणून मी एक महत्वपूर्ण साक्षीदार आहे. त्यासाठी जी चिकाटी डॉक्टरांनी दाखविली त्याला तोड नाही. आंदोलन दरवेळी नाविन्यपूर्ण पद्धतीने परंतु लोकशाहीच्या चौकटीत राहून करण्याच्या पद्धती डॉक्टरांनी आम्हाला शिकविल्या. कायद्यासाठी केलेली लढाई म्हणून जनतेसमोरील लढाई, माध्यमातील लढाई, वारकर्यांशी केलेली चर्चा, मंत्रालयातील लढाई या सर्व बाबतीत डॉक्टरांनी कधीही त्यांच्या संयमाचा तोल ढासळू दिला नाही. कायदा सर्वसहमतीने पास करू असे सरकारने म्हटले व विरोधी पक्षाशी आक्षेपांबद्दल बोलूया म्हटल्यावर विरोधी पक्षाशी चर्चा करून, त्याच्या आक्षेपाला खोडून उत्तरे देणारे डॉक्टरच होते. अर्थसंकल्पीय चर्चा लांबली तरीही मुख्यमंत्र्यांना सकारात्मक भूमिका घ्या असे सांगणारे डॉक्टरच. डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील शेवटचे 16 एप्रिल 2013 चे मुंबईतील जेल भरो आंदोलन. त्यासाठी एक दिवस आधीच डॉक्टर मुंबईत माध्यमांशी चर्चा, व्यवस्था, सर्व बाबी करून रात्री उशीर झाला म्हणून डॉक्टरांना मी बोललो सकाळी 10 वाजता आपले आंदोलन आहे. तुम्ही 9 वाजता या. तर डॉक्टरांचे उत्तर असे की कार्यकर्ते धावपळ करून, रात्री जागून दमून आलेले असतात आपण त्यांच्या स्वागतासाठी 7 वाजताच मैदानात असलेले बरे. मुंबईतील आंदोलन म्हणजे तसे खर्चिकच असते. मैदानातील तंबू, स्टेज, लाऊडस्पीकर, पोळी भाजी, चहा याचा खर्च बराच असतो. आम्ही ज्यावेळी सांगितले हा खर्च आमचा मुंबई जिल्हा करणार आहे. आम्हाला मिळालेल्या जाहिरातीचे पैसे व प्रसंगी लागले तर आम्ही जमा करू. त्याबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. पण समितीचे काम व समितीच्या प्रेमापोटी आपल्याच हितचिंतकांनी पोळी भाजीे त्यांनी कमी खर्चात दिलेली म्हणून काही पैसे उरले तर तुम्ही लगेच शाखेसाठी ठेवा असे प्रेमाने सांगितल्यावर आम्ही ते घेतले नाहीत. कारण आमचे काम सामाजिक आहे व ते काम योग्य रितीने असल्यास पैसे आपोआप मिळतात, कामे होतात हा विश्वास आम्ही डॉक्टर तुमच्याकडूनच शिकलेलो. जेल भरोच्या वेळी सर्वात पुढे तुम्ही व कार्यकारणी अटक करून घेईल. शक्यतो नोकरदार व वरिष्ठ नागरिकांनी अटक करून घेऊ नका असे तुम्ही सांगितले होते. तरी तुमच्या कायद्याच्या संघर्षासाठी आझाद मैदानावरील सर्व कार्यकर्तेव हितचिंतक जेलभरोसाठी तयार झाले ते तुमच्या तळमळीपोटीच.
लिहिण्यासारखे बरेच आहे. पण शब्दमर्यादा, वेळेचे भान डॉक्टरांनी शिकविले. म्हणून एखादी बाईट 1 ते दीड मिनिटात कशी द्यायची हेही डॉक्टरांकडून शिकण्यासारखे. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वात अनेक पैलू असल्याने ते शब्दांमध्ये बंदीस्त करण्यात माझी मर्यादा आहे हे नक्कीच.
शेवट डॉक्टरांच्याच उदाहरणाने करतो. एके ठिकाणी मोठी आग लागलेली असते. सर्वजण ती विझविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अशा वेळी एक छोटीशी चिमणी आपल्या आपल्या चोचीतून आगीवर पाणी टाकीत असते. त्या चिमणीला जेव्हा विचारले जाते तू तुझा जीव धोक्यात घालून चोचीने पाणी टाकते त्यांनी आग विझणार आहे का? त्यावर चिमणीचे उत्तर असते मी आग लावणारी नाही आणि आग लागलेली असताना गप्प बसणारीही नाही. माझ्या परीने आग विझविण्यास हातभार लावणारी आहे.
डॉक्टर तुमची काही स्वप्ने अधुरी राहिलेली आहेत, ती आम्ही तन, मन, धन अर्पून पुरी करीत राहू. तुमच्या विचाराचा, विवेकाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वारसा आम्ही अविरत चालू ठेवू एवढेच.
– नंदकिशोर तळाशिलकर