Categories
अभिवादन

आठवणीतले दाभोलकर

एप्रिल - २०१४

डॉक्टरांच्या निधनानंतर अंनिवाच्या वाचकांनी व कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या आठवणीवर आधारित लेख पाठविले. या सर्व लेखामधील महत्त्वाचा आशय संकलित करून देत आहोत. – संपादक

अन् मस्तक नत् होते….!

नचिकेतने सकाळी सकाळीच, “बाबा एक दु:खद बातमी आहे, काल सकाळी डॉ.दाभोलकरांची हत्या झाली.”

ज्ञानेश्वर, तुकाराम, गॅलिलिओ, म.फुले, आंबेडकर, आगरकर यांच्या पंक्तीत आज डॉक्टर जाऊन बसले होते. दिवसभर जेवण खाण कशावरच मन लागेना. गेल्या चार वर्षांतील त्यांच्या सहवासातील क्षण अन् क्षण जसेच्या तसे डोक्यात पिंगा घालू लागले.

पुण्यातील कार्यक्रमात मी मिलिंदबरोबर असे. अंनिसने प्रकाशित केलेली पुस्तके बरोबर घेत असू. त्या पुस्तकाबरोबर आणखी काही पुरोगामी विचार सरणी असलेली, मुलांना आवडतील अशी पुस्तके घ्यायचे मनात आले. एवीतेवी गाडीने आम्ही प्रवास करत असू. डॉक्टरांना मी हा विचार बोलून दाखवला मात्र, त्यांनी लगेच पुण्यातील काही चांगल्या प्रकाशकांशी गाठ घालून दिली. आज आमची ‘ग्रंथ दिंडी’ चांगली चालू आहे. डॉक्टरांची प्रेरणा आणि वेळोवेळी असलेली मदतच त्याला कारणीभूत आहे.

नुसता कायदा होऊन उद्देश साध्य होणार नाही तर कायदा राबवणार्‍या पोलिसांना सुद्धा अंधश्रद्धा आणि त्यांचे दुष्परिणामांची जाणीव असणे गरजेचे आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून दौंडला पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये डॉक्टरांनी प्रबोधन केले. चळवळीचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी बुवाबाजीचे प्रयोग करून दाखवले. जवळ जवळ 500 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रबोधित करण्यात आले. कार्यक्रम खूपच चांगला झाला. माझ्या पुस्तकांच्या स्टॉलवर खूपच गर्दी उसळली आणि त्यांना आटोक्यात ठेवायला पोलिसांनाच अवघड झाले. जणू पोलिसांना विषय किती चांगला पचनी पडला होता त्याचा प्रत्यय लगेच आला.

निमित्ता निमित्ताने डॉक्टरांचे आमचेकडे येणे जाणे होत असे. आमच्या घरच्यांना सुद्धा डॉक्टरांच्या निगर्वीपणाचा, साध्या राहणीचा आणि विचारांच्या पक्केपणाचा अचंबा वाटे. पण त्यांनी आपले विचार लादण्याचा कधी आग्रह धरला नाही. माझ्या आईला ती आज 85 वर्षांची आहे. डॉक्टर गेल्यावर मिलिंदला पत्र लिहिल्याशिवाय राहवले नाही. त्यांचे जाणे हे आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य गेल्यासारखे झाले आहे.

आज वारूळातून भरभर मुंग्या बाहेर पडाव्यात तशा आठवणी बाहेर येत आहेत आणि ते सारे साठवून मस्तक नत् झाल्यावाचून राहत नाही.

विश्वास पेंडसे, पुणे.


पुरोगामी परिवर्तनाचा सेनानी

दाभोलकर हे पुरोगामी विचाराचे सेनानी होते. ते अहिंसेची छाती आणि विवेकाची ढाल घेऊन लढत होते. धर्मांध, जात्यांध शक्तीच्या भेकड मारेकर्‍यांनी पाठीमागून येऊन त्यांच्यावर अवचित हल्ला केला. आणि सेनानी धारातीर्थी पडले. आमच्या हातीपण अहिंसा आणि विवेकाचीच आयुधे सेनानीने दिल्यामुळे आमचा भयंकर संतापही “डोळ्यांतील अश्रू गिळुनी आम्ही। विझवित आहोत हृदयातील अग्नी॥” असाच थंड करावा लागला.

डॉ.दाभोलकर म्हणजे साधे सरळ व्यक्तीमत्व, त्यांच्या सौम्य पण तर्कशुद्ध वागण्याबोलण्यामुळे ते कार्यकर्त्यांना आपलेसे करीत. ते आम्हाला नेहमीच मित्र व मार्गदर्शक वाटत. मी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळी महर्षीनगर, पुणे येथे अंनिसचे दर्शकपूर्ती अधिवेशन भरले होते. ते मी पाहिले. सामाजिक बदलासाठी मला ही मूलभूत चळवळ वाटली. माझे वैचारिक अधिष्ठान पुरोगामी विचाराचेच असल्यामुळे मला या चळवळीला जोडून घ्यावे वाटले. शिवाय चमत्कारांचे कुतुहल होतेच. चमत्कारामागे(जादू नव्हे) काय भानगड असते हे पण मला जाणून घ्यायचे होते. मी चळवळीत सामील झालो व डॉ.दाभोलकरांचा भरपूर सहवास मिळाला तो शेवटपर्यंत. पुणे शाखेत भरपूर काम केले. पुणे शाखेचा कार्याध्यक्ष म्हणून कित्येक महत्वाच्या घटना जबाबदारीने पार पाडल्या, ते केवळ डॉक्टरांच्या प्रोत्साहन आणि प्रेरणामुळे, डॉक्टरांच्या बरोबर शाळा, कॉलेजातून व बाहेरगावी सभा, शिबीरातून काम करण्याची संधी मिळाली. विचारांची जडण-घडण झाली. पारतंत्र्यापेक्षा स्वातंत्र्यात कोणी सुरक्षित नाही ही नामुष्की आहे. संत तुकाराम कसे गेले माहीत नाही, महात्मा फुल्यांना मारण्यास मारेकरी रात्री आले होते. आगरकरांची प्रेतयात्रा काढली ती प्रतिकात्मक होती डॉ.दाभोलकरांचा त्या नराधम्यांनी भर दिवसा खून केला व खरोखर प्रेतयात्रा काढली ही स्वातंत्र्यामध्ये कोणत्याही शासनाला शरमेची गोष्ट आहे. मित्रहो, अंनिसने भ्यायचे नाही पण सावध जरूर राहावयाचे आहे. कारण आता दिवससुद्धा वैर्‍याचे आहेत.

तुलश्री रासकर, पुणे.


आदरणीय डॉ. दाभोलकर

आपण 25 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कसे कार्यकर्ते झालो. अंधश्रद्धाचे निर्मूलन करत असताना, विवेक वादाकडे आम्ही कशी वाटचाल केली हे आमच्या कधी लक्षातच आले नाही.

आपण आम्हाला भिडायचे कसे शिकविले त्याचबरोबर लढायचे कसे हे देखील शिकविले, त्या लढाईचे हत्यार होते ‘अहिंसेचे’. आम्हाला ‘महात्मा गांधी व अहिंसा’ एवढेच पुस्तकात व शाळेत शिकवले. पण प्रत्यक्षात लढाई करताना ‘अहिंसा’ आपणच आम्हाला शिकवली. शनि-शिंगणापूरचा समता सत्याग्रह, डाकीण प्रथा विरोधी मोहीम, पोतराज प्रथा निर्मूलन, देवदासी प्रथा निर्मूलन, सत्यशोधकी विवाह, आंतरजातीय विवाह, पर्यावरणपूरक गणेशोत्सव-होळी-दिपावली, अनिष्ट प्रथा व परंपरा विरोधी लढे हे सर्व लढे अहिंसेने कसे लढायचे हे शिकविले. अगदी समोरच्याची मानहानी व मानभंग होईल असे सुद्धा वर्तन आमच्या हातून होऊ दिले नाही.

‘शेवटी अहिंसाच विजयी होते, हा जगाचा इतिहास आहे’, हे तुम्हीच आम्हाला शिकविले पण ‘त्या दिवशी हिंसेचा विजय झाला’ असे क्षणभर वाटले. परंतु दुसर्‍याच क्षणी आमच्या मनाने उचल खाल्ली व सांगितले की, ‘नाही हिंसा कधीच विजयी होत नाही, हा जगाचा इतिहास आहे’ हे तर आपणच आम्हाला सांगितले आहे.

आपले विचार पुढे नेण्यासाठी कार्यकर्ता कधीच खचणार नाही, दबणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे कारण आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.

अनिल कोरे, मोहोळ, जि. सोलापूर


विवेकाचा खून

भारतातील अनेक समाजसुधारकांनी समाजातील जातीपातीच्या उतरंडी नष्ट करून एकूण मानव जात एकच असते यासाठी अव्याहतपणे कार्य केले. त्याचप्रमाणे डॉ.दाभोलकरांना देखील मानव उच्चनीचता मान्य नव्हती. उच्च समजल्या जाणार्‍या जातीत जन्माला येऊनही, अव्हेरलेल्या, दबलेल्या, दलित, पीडित, अगतिक, असहाय्य लोकांना बरोबरीने वागवावे हाच विचार दाभोलकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत कृतीशीलपणे जपला.

डॉ.दाभोलकरांनी स्थापन केलेल्या वैज्ञानिकतेच्या आधारावर, विवेकी, विचारी प्रबोधनात्मक कृतीशील अशी अंनिस ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा तालुकास्तरावर असणारी जवळजवळ 350 च्या आसपास शाखा असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. त्यामध्ये क्रियाशील असणारे कार्यकर्ते, सभासद अत्यंत संयमाने, विवेकाने, तारतम्याने, सद्सद्विवेकबुद्धीने, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कार्यरत आहेत. याची सर्वदूर नोंद आहे. दाभोलकरांच्या विचाराने प्रेरीत असणार्‍या सर्व कार्यकर्त्यांच्या संयमाची प्रचिती दाभोलकरांच्या हत्येवेळी स्पष्ट झालेली आहे. एखाद्या बाबा-बुवाच्या, एखाद्या धार्मिक संघटनेच्या नेत्याचा किंवा एखाद्या राजकीय पुढार्‍याचा खून किंवा हत्या झाली असती तर किती उद्रेक, जाळपोळ, मोडतोड, मारामार्‍या यांना ऊत येऊन देशाचे, समाजाचे, सार्वजनिक मालमत्तेचे किती प्रमाणात नुकसान झाले असते, किती जणांना जखमी व्हावे लागले असते. हकनाक बळी जावे लागले असते. परंतु डॉ.दाभोलकरांची निर्घृण हत्या होऊनही कुठेही असले अनुचित प्रकार घडलेले नाहीत. एकूणच समाजसुधारकांचा वारसा जपणार्‍या दाभोलकरांचे कार्यकर्ते त्याच पद्धतीचा वारसा चालविणारे आहेत.

बजरंग लोणारी, इचलकरंजी


डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यामुळे जीवनाला दिशा मिळाली.

2001 ला अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेक वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने विमलाबाई देशमुख कन्या शाळेवर राज्यव्यापी दोन दिवशीय कार्यक्रमाचे शिबीर घेण्यात आले होते. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार करण्यात आला होता. तेव्हा मला डॉ.पित्रतुल्यासारखे वाटले त्यावेळेपासून माझ्या जीवनामध्ये एक वेगळीच दिशा मिळाली.

धर्माच्या विरोधात ते कधीच बोलत नव्हते. धर्माच्या नावावर चालणार्‍या भोंदूगिरीला ते नेहमीच विरोध करायचे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यंना श्रद्धा व अंधश्रद्धा हे काय आहे ते 1000 प्रयोगांच्या माध्यमातून सांगण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे शेकडो कार्यकर्ते निर्माण करता आले. यापेक्षा समाजसेवा कुठलीही मोठी नाही असे मला वाटते. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी मला उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून 2011 मध्ये गौरविले. त्यावेळेस डॉ.नरेंद्र दाभोलकर मला म्हणाले की, मेघराज तुझी घरची परिस्थिती नाजूक असतानादेखील तू महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात वेळेवर येऊन कार्यक्रमाला उपस्थि राहतोस याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि तुम्हा सर्व निस्वार्थ कार्यकर्त्यांमुळे अंनिसची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर रूजायला लागलेली आहे. आणि हम होंगे कामयाब असे उद्गार काढायचे आणि खांद्यावर प्रेमाने हात ठेवून प्रोत्साहन द्यायचे.

समाजासाठी बेभान होऊन जगत असताना परिवाराची पर्वा न करता फक्त समाजासाठी जगायचे व समाजासाठीच मरायचे म्हणणारे डॉ.नरेंद्र दाभोलकर आज आपल्यात नाहीत ही मोठी खंत वाटते. पण त्यांचे विचारकार्य अजरामर राहतील यात शंका नाही. त्यांचे मारेकरी अजून मोकाट असले तरी डॉ.नरेंद्र दाभोलकरांना संपवण्यात त्यांचे विरोधक यशस्वी ठरले असले तरी त्यांचा विचार संपवण्यात ते कदापिही यशस्वी ठरणार नाहीत. जगाच्या इतिहास सांगतो की, ज्या ज्या महापुरूषांना संपविण्यात आले. त्यांचे विचार नंतरच्या काळात अगदी वेगाने फोफावले. आज डॉ.नरेंद्र दाभोलकर आमच्यात नसले तरी काय झाले त्यांच्या विचारांचे लाखो दाभोलकर तयार झाले आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मोडीत निघाली अशा भ्रमात राहू नये. या घटनेमुळे चळवळीला बळकटी आली असून आम्ही खचलेलो नाही. उलट नव्या जोमाने त्यांचे कार्य पुढे अविरत सुरू राहील.

मेघराज एस.गायकवाड, अहमदपूर


डॉ. दाभोलकरांचे कार्य जोमाने फोफावेल

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी, सर्व प्रकारचे भौतिक लोभ सोडून आयुष्य वेचणारे डॉ.नरेंद्र दाभोलकर आता आपल्यात नाहीत. त्यांची वक्तव्ये आणि त्यांचे कार्य लक्षात घेता, ते म.गांधी सारखे मवाळ पंथी व्यक्ती होते. कुणाला जिव्हारी लागेल अशी टीका त्यांनी कुणावरही केली नाही. जादूटोणाविरोधी कायद्याच्या बिलाबाबत सुद्धा त्यांनी अनुकलनीय संयम बाळगला.

माझा आणि त्यांचा परिचय जळगावच्या सभेत झालेला होता. मी दोन तीन वर्षे, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचा वर्गणीदार होतो. त्यांचे विचार, त्यांच्या पुस्तकांमधून वाचून व सभांमध्ये ऐकून मी भारावल्यासारखा होत असे आणि अंतर्मुख बनून विचारमग्न होत असे.

डॉ.नरेंद्र दाभोलकरांसारख्या शांत, मवाळपंथी धोरण असलेल्या, कोणालाही न दुखावता, निष्ठापूर्वक स्वकार्य करणार्‍या व्यक्तीचा भीषणरित्या खून व्हावा ही गोष्ट या अणुयुगात सुद्धा क्रूरकर्मे जन्मास येत आहेत हेच सिद्ध करते. व्यक्ती मरते परंतु तिचे सर्वमान्य विचारधन नष्ट होत नाही म्हणून डॉ.दाभोलकरांचे कार्य यापुढे जोमाने फोफावेल याची मला खात्री आहे. डॉ.दाभोलकरांच्या खुनी क्रूरकर्म्यांचा मी निषेध करतो.

हिंमत दादा मोरे, टेहू, जि.जळगाव