Categories
पुरस्कार

अतिवाडकर आगे बढो

ऑगस्ट - २०१२

            बेळगावचे नारायण अतिवाडकर गुरूजी हे तळमळीचा जीवनदानी कार्यकर्ता कसा असावा याचे अनुकरणीय उदाहरण आहे. नोकरी सोडून त्यांनी समाजाला शहाणे करण्याच्या कामात स्वत:ला काही दशकापूर्वी झोकून दिले. त्यामुळे जी अवहेलना उपेक्षा झाली, दारिद्य्र सोसावे लागले त्याची तमा केली नाही. त्यांना कर्करोगासारख्या व्याधींनी ग्रस्त केले तरी ते हिंमत हरले नाहीत. लिखाणाचे व्रत त्यांनी सोडले नाही. त्यांचे ‘नमस्तुभ्यम’ हे पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ यांच्या जीवनावर अलिकडेच प्रसिद्ध झालेले नाटक  हे त्यांचे 51 वे पुस्तक. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कारही या नाटकाला लाभला.

            अतिवाडकर यांनी 1962 साली स्वत:च्या गावच्या यात्रेतील पशूहत्या एकट्याने लढा देऊन बंद पाडली होती. यावर्षी ती पुन्हा सुरू होणार होती. 8 दिवस नवसासाठी बोकड मारून त्यामुळे गावातील गरीबाला आणखी गरीब बनवण्यात येणार होते. या विरोधात बैठका घेण्याचा अतिवाडकर यांनी खूप प्रयत्न केला परंतु बैठका होऊ शकल्या नाहीत. मग त्यांनी वेगळा मार्ग अनुसरला. त्या भागातील दिवंगत समाजसुधारक बहिर्जी शिरोळकर यांनी अंधश्रद्धा पशूहत्या यावर पोवाडे लिहिले होते. त्या पोवाड्याची 300 पुस्तके स्वत:च्या खर्चानी त्यांनी जत्रा होणार्‍या आंबेवाडी गावातील युवकांना वाटली. याचा परिणाम झाला आणि जत्रा समितीने साधा उत्सव करण्याचे जाहीर केले. तसेच कोणीही कर्ज काढून काहीही करू नये असे दवंडी पिटून आवाहन केले. अतिवाडकरांना जून महिन्यात अरविंद राऊत प्रतिष्ठान, मुंबई व चालना प्रतिष्ठान यांच्या तर्फे सामाजिक व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल 10,000 रूपयांचा पुरस्कार स्मृती चिन्हासह मिळाला. त्याबरोबरच महाराष्ट्र सरकारने अलिकडेच सीमा भागातील साहित्य चळवळीशी संबंधित संस्थांना अनुदान जाहीर केले; परंतु त्यामध्ये व्यक्ती म्हणून फक्त एकालाच अनुदान मिळाले ते म्हणजे नारायण अतिवाडकर. ही रक्कम 1 लाख रूपयांची आहे.

            नारायण अतिवाडकर यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अभिमान वाटतो. यापुढच्या काळातील त्यांच्या कर्तृत्ववान व निरामय आयुष्यासाठी संघटनेच्या मन:पूर्वक सदिच्छा!

-डॉ.नरेंद्र दाभोलकर