बंजारा समाजात इतर जातीप्रमाणे पत्रिकेचे खूळ वाढलेले दिसते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वच विधी ज्योतिष्य पाहिल्याशिवाय होत नाही. जवळजवळ 90 टक्के लग्ने कुंडली जमवून केली जातात. तरीही घटस्फोटाचे प्रमाण, गृहकलहाचे प्रमाण बंजारा समाजात वाढतांना दिसते. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
जर ज्योतिष्यांकडे विवाह कुंडली बघून लग्न झालेले असेल तर, अपयशाची कायदेशीर जबाबदारी ज्योतिषांनी स्वीकारायला काय हरकत आहे? अशा ज्योतिष्यांवर फसवणुकीच्या कायद्याखाली फौजदारी करावी. आर्थिक नुकसानीसाठी दिवाणी दावे करावेत. जर ज्योतिषी स्वत:ला व्यावसायिक समजत असतील तर ग्राहक मंचात त्यांच्या विरूद्ध तक्रारी कराव्यात. अपयशाची जबाबदारी ज्योतिषांनी स्वीकारलीच पाहिजे. अन्यथा त्यांनी व्यवसायाच्या व अपयशाच्या मर्यादा स्पष्टपणे सांगाव्यात. यापुढे ज्योतिष्याचा सल्ला घेणार्यांनी लिखीत स्वरूपात घ्यावा व दिलेल्या पैशाची पावती घ्यावी. म्हणजे त्याचे विरूद्ध कायदेशीर कार्यवाही करणे सोपे पडेल. कुंडली जमत नाही म्हणून मुलीचे लग्न वेळेवर होत नाही, चांगली स्थळे हातची जातात. माझे एक लातूरचे मित्र, त्यांची मुलगी एम.बी.बी.एस.एम.डी. होती. मुलगासुद्धा एम.बी.बी.एस.एम.डी.होता. पण त्यांची कुंडली जुळत नाही असा मुलीच्या बापाचा आग्रह असल्यामुळे शेवटी लग्न जमले नाही. मी म्हणालो, ‘अरे ज्योतिष्यच पाहून लग्न करावयाचे होते तर मुलीला एम.बी.बी.एस. कशाला शिकविले?’ पण मुलीचा बाप शिकून अज्ञानी. काही तर अशी मंडळी आहेत की, कोर्टासमोर किंवा तहसील कार्यालयासमोर पोत्यावर, फरशीवर बसलेल्या ज्योतिष्यांकडे पाच, दहा रूपये देऊन भविष्य विचारतात व तोसुद्धा ज्योतिष्य सांगतो की, सध्या तुमच्या पाठीमागे ग्रहदशा आहे. अमूक तमूक करा, तुम्हाला गाडी, बंगला सर्व काही मिळेल. अरे माझ्या अडाणी बांधवा, तुला गाडी, बंगला मिळेल म्हणून ज्योतिषी तुझे भविष्य पाहून सांगतो तर ज्योतिषांना स्वत:चे भविष्य का समजत नसावे? तो का पोत्यावर बसलेला आहे? यावरून आपल्या डोक्याची कीव आल्याशिवाय राहत नाही. ऑक्टोबर 2011 च्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये एक हकीकत प्रसिद्ध झाली होती. एका राज्य ज्योतिषाने आपल्या नात्यातील मुलाची पत्रिका पाहून व त्याचे उज्वल भविष्य पाहून स्वत:च्या मुलीचा विवाह त्या मुलाशी ठरविला. विवाह विच्छेद तर झाला पुढे नवरा मुलगा मानसिक रूग्ण झाला व या सर्व प्रकाराने खचून जाऊन ज्योतिष्याच्या मुलीने आत्महत्या केली. ज्याला स्वत:च्या मुलीचे भविष्य नीट कळत नाही ते दुसर्याचे भविष्य काय घडविणार? दुसरे एक उदाहरण असेच आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत भविष्यकाराने एक दैनिक सुरू केले. उण्यापुर्या एका वर्षाच्या आतच ते बंद झाले. यावर वृत्तपत्र सृष्टीत एक विनोद सांगितला जातो की, या भविष्यकाराने वृत्तपत्र सुरू करण्याचा मुहूर्त नीट बघितला नव्हता काय? अशोक कुलकर्णी हे ब्राह्मण सेवासंघाचे कार्यकर्ते असूनही त्यांनी ‘ज्योतिषी सामाजिक गुन्हेगार’ या शीर्षकाचा लेख अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ऑक्टोबर 2011 च्या अंकात लिहून ज्योतिषशास्त्राची चिकित्सा केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार!
सामान्य माणसाची मानसिक दुर्बलता हाच ज्योतिष्याचा मूळ आधार आहे. दुसरा आधार माणसाच्या आयुष्यातील अनिश्चितता व लवकर श्रीमंत होण्याची वृत्ती. एकाच वर्गात शिकलेले दोन विद्यार्थी अधिकारी होतील असा नेम नसतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मतिथी वेळेनुसार एकूण 14 बालके जन्मली. सर्वांचे स्थळ, काळ, वेळ एक असूनही पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले तर काही रिक्षावाले, कारकून झाले. त्यामुळे जन्म कुंडलीचा माणसाला काहीही उपयोग नाही. आजही बंजारा समाजातील बडे अधिकारी, नेतागण भविष्याच्या नादी लागलेले पाहून इंटरनेट युगात बंजारा समाजाची काय अवस्था आहे हे दिसल्याशिवाय राहत नाही.
याबाबतीत छत्रपती शाहू महाराज यांची एक आठवण नमूद करावीशी वाटते. शाहू महाराज जेव्हा शिकारीला निघाले होते त्यावेळेस काही ज्योतिष पाहणारी मंडळी त्यांच्या समोर येऊन महाराज आज आपल्याला अपघात होईल तरी आपण शिकारीला जाऊ नये असे आवर्जून सांगू लागली. छत्रपती शाहू महाराजांचा कर्मकांड, ज्योतिष्य यावर विश्वास नव्हता. त्यांनी प्रधानाला लगेच आदेश देऊन या सर्व ज्योतिषांना वाड्यात डांबून ठेवा व मी परत येईपर्यंत यांना जेवण अथवा पाणीसुद्धा देऊ नका असे सांगितले. प्रधानाने आदेशाप्रमाणे काम केले. दुसर्या दिवशी दरबारात येऊन त्यांनी प्रधानाला सांगितले त्या काल भविष्य सांगणार्या ज्योतिषाला घेऊन या आणि ज्योतिषी समोर येताच त्यांना महाराज म्हणाले, तुम्हाला तुमचेच भविष्य कळत असतं तर तुम्हाला रात्रभर उपाशी राहण्याची पाळी आली नसती. अनेक राजकीय नेते, कलाकार, ज्योतिष्य पाहिल्याशिवाय कोणतेही काम सुरू करत नाही. परंतु बंजारा समाजाचे नेते अन्न व औषधी प्रशासनमंत्री मा.मनोहरभाऊ नाईक हे कधीही ज्योतिष्य पाहत नाहीत. स्वत:च्या भूमिकेवर व कर्तृत्वावर इतके ठाम आहेत की, ते निवडणुकीचा फॉर्म भरताना मुहूर्त पाहत नाहीत. परंतु बहुमताने निवडून येतात. अर्थात अशी कणखर मनाची माणसे बंजारा समाजात फार दुर्मिळ आहेत!
ज्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्रात डॉक्टर शस्त्रक्रियेपूर्वी किंवा उपचारापूर्वी यशस्वीतेची टक्केवारी सांगतात व अपयशाची जबाबदारी विषद करतात, त्यात त्याला शरीराची स्वाभाविक रचना, पेशंटच्या शरीराचा स्वभाव(नेचर ऑफ बॉडी) व उपचाराला दाद देण्याची शरीराची पद्धत(रिस्पॉन्स) व रोग्याची मानसिकता यावर वैद्यकीय उपचाराची फलनिष्पत्ती अवलंबून आहे असे स्पष्टपणे सांगतात. यामुळे वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा स्पष्ट होतात व या शास्त्रावरील विश्वास वाढतो. वैद्यकीय शास्त्र हे दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय व लोकोपयोगी होण्यामागे त्या शास्त्राचा स्पष्टपणा व पारदर्शकता कारणीभूत आहे. ही पद्धती ज्योतिषांनी स्वीकारावयास काय हरकत आहे? जीवनात यश व अपयश येतच राहतात. हे सर्व पचविण्यासाठी माणसाला सशक्त मानसिकतेची गरज आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिक ताकद, प्रगतीसाठी झटण्याची जिद्द, सदृढ कुटुंब व्यवस्था एकमेकाला आधार देणारी कुटुंबातील व्यक्ती व त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार असणारी कुटुंबेच प्रसंगावर मात करू शकतात. सातासमुद्रापलिकडून शिडाच्या जहाजातून आलेला इंग्रज खंडपप्राय भारत देशावर राज्य करू शकतो तर ज्योतिष्याचा ताफा बाळगणारे पेशवे अयशस्वी का ठरतात? पेशवाईतसुद्धा पहिले बाजीराव पेशवे हे रांगडे शिपाईगडी होते. कच्च्या मक्याची कणसे व हिरव्या मिरच्या तोंडी लावून त्यांनी मोहिमा फत्ते केल्या. तत्कालीन पुण्यातील ब्राह्मण वर्गाने त्यांच्यावर अब्राह्मण्याचा आरोप करून बहिष्कार टाकला. ते बाजीराव पेशवे सर्वच युद्धात व राजनीतीत यशस्वी ठरले. याउलट नंतरच्या काळात कर्मकांडात व ब्राह्मणत्त्वाच्या आहारी गेलेले पेशवे पूर्णपणे अपयशी ठरले.
ज्योतिष्यशास्त्र(पंचांग) ही भारतातील उत्कृष्ट कालमापन पद्धती आहे. जगातील सर्व कालमापन पद्धती व दिशाशास्त्र हे भारतीय ज्योतिष्यशास्त्रावर आधारीत आहे. एवढेच नव्हे तर पाश्चात्य राष्ट्रात वापरले जाणारे ग्रेगरियन पंचांग(Solar) ही कालमापन पद्धतीसुद्धा भारतीय ज्योतिष्यविद्येवर आधारीत आहे. लोकमान्य टिळक हे ज्योतिषशास्त्राचे अत्यंत तज्ज्ञ होते. त्यांनी ज्योतिषशास्त्रविषयक अनेक पुस्तके लिहिली व संशोधन केले. तथापि त्यात एक वाक्यही फलज्योतिष्यावर लिहिलेले नाही. फलज्योतिष्य ही कोणातरी पोटार्थी अथवा धूर्त व्यक्तीने शोधून काढलेली कला आहे. याला शास्त्राचा आधार नाही. यामागे पोट भरण्याची किंवा राजकीय महत्त्व वाढविण्याची कला आहे. ज्यावेळेस प्लेग, कॉलरा, देवी यासारख्या रोगांच्या साथीत लाखो लोक मरत, त्यावेळेस ज्योतिष शास्त्र काय करत होते? दुष्काळ, महापूर, भूकंप या दुर्घटनेला कुठली ग्रहदशा म्हणावयाची? अशा आपत्तीत लाखोंनी माणसे मरतात. मरणार्यात बाराही राशींची माणसे असतात. मग सगळ्याच कुंडल्या सारख्या असतात का? अनेक राशींच्या व्यक्तीच्या एकत्रित मरण्याला फलज्योतिष काय उत्तर देऊ शकेल? कुठलीही राष्ट्रीय, नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती ज्योतिष टाळू शकले नाही. ज्या देशात ज्योतिष पाहिले जात नाही, त्या राष्ट्रात भारताच्या तुलनेत आत्यंतिक प्रगती झालेली आहे. केप आफ गुड होप्सला वळसा घालून शिडाच्या नावातून भारत खंडावर राज्य करणारे इंग्रज कुठलेही पंचांग घेऊन पाहून निघाले नव्हते अथवा अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस याने कुठल्याही शुभमुहूर्ताचा आधार घेतला नव्हता. याउलट पानिपतच्या लढाईवर पंचांगाची गाठोडी घेऊन पेशव्यांच्या सैन्याबरोबर गेलेले ज्योतिषी एक तर स्वत:चा जीव गमावून बसले, त्याचबरोबर त्यांच्या बायका, मुले कंधाहाराच्या बाजारात गुलाम म्हणून विकली गेली. पानिपतच्या पराभवापाठीमागे धार्मिक भावनाचा अतिरेक व ज्योतिषाचा अनावश्यक प्रभाव युद्धनीतीवर व युद्धशास्त्रावर झाला ही सुद्धा कारणे आहेत. कुठल्याही परिस्थितीत फलज्योतिष हे थोतांड असून ते कुठल्याही दृष्टीने कुटुंबाच्या व्यवस्थेत व राष्ट्र उभारणीस उपयोगी नाही. केवळ व्यक्ती-व्यक्तीमधील द्वेष, भावना, असंतोष व कमकुवत मानसिकता याचा फायदा फलज्योतिषी लोकांनी घेतलेला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तींनी मानसिक व बौद्धिक क्षमता, विज्ञानावरील निष्ठा वाढविल्यास व चिकित्सक बुद्धी ठेवून मनोदुर्बलता कमी केल्यास ज्योतिषाच्या आधाराची गरजच नाही. सामाजिक जीवनात बंधुनो, आपल्या जेवढ्या अडचणी आहेत, तेवढ्याच अडचणी कौटुंबिक जीवनात ज्योतिषाला आहेत. जर असे असेल तर त्यांच्याकडे स्वत:चा प्रश्न घेऊन जाणारा काय उपाय योजना करून त्यातून मुक्ती मिळविणार हेच कळत नाही? मी ज्योतिषी असल्यामुळे माझ्यावर ग्रहाचा कोप होत नाही, परिणाम भोगावे लागत नाही, मी स्वत:ला व कुटुंबियांना ग्रहदशेपासून दूर ठेवतो असे सांगणारा एकही ज्योतिषी भेटत नाही. याकरीता आपण ज्योतिष्यांपासून चार हात दूर राहिले पाहिजे. आपल्या बुद्धीचा विकास करावयाचा असेल तर मूलनिवासीनायक व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आपण नियमित वाचले पाहिजे. व्यवसाय व्यापारात मंदी आली, अथवा एखाद्यास वणवण फिरूनही नोकरी लागत नाही, लग्न जुळत नाही, अपत्यप्राप्ती होत नाही अथवा झाल्यास ते दगावणे, वारंवार आजारी पडणे आदी प्रकार घडत असल्यास असे अरिष्ट निवारणाचा दावा करणार्या ज्योतिष्यांमध्ये सर्वसाधारण फलज्योतिष्यांचा समावेश होतो. अशा अरिष्ट निवारणासाठी हे बाबा कालसर्पयोग नावाची इडा(वक्री मंगळासारखा प्रकार) राशीस्थानी असल्याचा बनाव करतात. हा कालसर्पयोग नष्ट करायचा असेल तर नाशिक येथे अमूक महाराजाकडे तो महापूजा करून काढावा लागतो असा सल्ला ते देतात. ज्याच्या राशीस्थानी कथित कालसर्पयोग आहे, त्यांच्याकडून प्रत्येकी 10 ते 20 हजार एवढे मोठे शुल्क आकारले जाते. यावरून वाचलेली एक घटना आठवते. एका व्यापार्याला धंद्यात तेजीमंदी सुरू राहते त्यामुळे तो हैराण होतो व ज्योतिषांकडे जातो. ज्योतिषी त्याला कालसर्प पूजा करण्यास सांगतात. त्यामध्ये 20 ते 30 हजार खर्च केल्यावरही काहीही फरक पडत नाही. शेवटी पुन्हा ज्योतिषाकडे जातो. पुन्हा पूजेमध्ये कमतरता राहिली म्हणून दुसरी पूजा करून घेतात. 30 हजार रूपये उकळले जातात तरी काहीही फरक पडत नाही. शेवटी हताश होऊन तो व्यापारी ज्योतिषाकडे येतो. ज्योतिषी त्याला नागमणीबाबत माहिती देतो व आंध्रप्रदेशचा पत्ता देतो. त्यानुसार व्यापारी व त्याचा मुलगा जाऊन नागमणी घेऊन येतात. तरी काही फरक पडत नाही. शेवटी नागमणी नकली निघतो. तो व्यापारी पुन्हा ज्योतिषाकडे जातो व त्याबाबत विचारणा करतो तर त्याला सरळ आंध्र प्रदेशच्या दलालाला भेट म्हणून सांगतो. त्याला फोन केला तर तो जीवे मारण्याची धमकी देतो. जेव्हा व्यापार्याच्या लक्षात आपण फसल्याचे येते तेव्हा कपाळावर हात मारून बसल्याशिवाय गत्यंंतर नाही. म्हणून बंजारा बांधवांनो संत सेवालाल महाराजांचा संदेश ‘जाणजो, छाणजो पचच माळजो’ यावर चिकित्सकबुद्धीने विचार करून स्वत:च्या सामर्थ्यावर व कर्तृत्वावर विश्वास ठेवा. महात्मा फुले यांचे तृतीय रत्न नाटक व सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक जरूर वाचले पाहिजे. संत सेवालाल महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्व.वसंतराव नाईक यांनी कधीही भविष्य पाहिले नाही तरी ते यशस्वी झाले. तर आपण का होणार नाही? माणसाच्या मनगटात ताकद असेल तर माणूस सर्व काही प्राप्त करून जीवन यशस्वी करू शकतो.
– याडीकार पंजाब चव्हाण