जोहॅनस क्वॅक(जॉन) हा जर्मन तरूण भारतामध्ये आला होता. संशोधनाचा विषय होता-‘भारतीय बुद्धिवादी, त्यांच्या अश्रद्धेचे स्वरूप आणि श्रद्धेबाबत भ्रमनिरास’. बर्याच बुद्धिवादी संस्था आणि चळवळींबाबत माहिती मिळविल्यानंतर बुद्धिवादी चळवळीची आजची स्थिती जाणून घ्यायला अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तिचे कार्य यांचा अभ्यास करायला हवा या निष्कर्षाशी तो आला. अंनिसच्या कार्यपद्धतीवर त्याने संशोधन केले. या संशोधनाच्या प्रबंधाचे 500 पानी पुस्तक जगविख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकातील मजकुराचा मराठी भाषांतराचा संपादित भाग आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. जॉनच्या संशोधनाचा आणि त्याने काढलेल्या निष्कर्षांचा इथे सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना त्याचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे.
– सुमन ओक

जोहॅनस क्वॅक(जॉन) हा जर्मन तरूण भारतामध्ये आला होता. संशोधनाचा विषय होता-भारतीय बुद्धिवादी, त्यांच्या अश्रद्धेचे स्वरूप आणि श्रद्धेबाबत भ्रमनिरास. भारतातील बर्याच बुद्धिवादी संस्था आणि चळवळींबाबत माहिती मिळविल्यानंतर भारतातील बुद्धिवादी चळवळीची आजची स्थिती जाणून घ्यायला अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तिचे कार्य यांचा अभ्यास करायला हवा या निष्कर्षाशी तो आला. संशोधनाचा आणि त्याने काढलेल्या निष्कर्षांचा आम्ही इथे सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना त्याचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे.
मॅकस वेबर यांनी म्हटलं आहे -“भारत ही एक धर्मभूमी आहे. लोक आपलं आयुष्य एका मोहमयी बागेमधे व्यतीत करतात. अचाट तांत्रिक-मांत्रिक शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असतो. त्या बागेतून आपली सुटका करून विवेकी ऐहिक आयुष्य जगणं जणू त्यांना अशक्य. 21व्या शतकात सुद्धा भारत धर्म, अध्यात्म, जादू आणि चमत्कार यांच्यात गुरफटलेला आहे…” इत्यादी. हे काही प्रमाणामधे खरेही आहे परंतु हे पूर्ण सत्य नक्कीच नाही.
इथेही म्हणजे भारतातही विवेकवादी, निरीश्वरवादी, मानववादी आणि प्रत्यक्ष प्रमाणवादी स्वतंत्र विचारसरणीच्या चळवळी कार्यरत आहेत आणि मंत्रतंत्रांवरील आणि गुरूवरील आत्यंतिक श्रद्धा यांना आव्हान देत आहेत आणि त्यांतून लोकांवर होणारा अन्याय आणि त्यांची पिळवणूक दूर करण्यासाठी झटत आहेत.
विवेकवाद्याच्या वैदिक काळामध्ये असणार्या मूळांचा आणि त्यांच्यावरील भक्तिसंप्रदायाच्या प्रभावाचा ऐतिहासिक आढावा इथे घेतला आहे. त्याबरोबरच आजच्या विवेकवादाचे बीज 19 व्या शतकातील भारतातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींमधून आणि 19 व्या शतकातील इंग्लंडमधील धर्मविरोधी चळवळीतून इथे कसे रुजले याचीही चर्चा केली आहे.
या तरूण संशोधकाने स्वतः केलेल्या एथ्नोग्राफिक- पहाणीच्या (मानवजातिवर्णनात्मक) अनुभवावर आजकालच्या विवेकवादी चळवळींची उद्दिष्टं, कार्यप्रणाली इत्यादींची चर्चा केली आहे. त्यामधे अंनिस केन्द्रस्थानी आहे. अंनिसचे कार्यकर्ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि अंधश्रद्धा निर्मूलन कसे करतात याची रूपरेखा आणि कार्यप्रणाली आणि त्यांचा जगाकडे पहाण्याच्या विवेकी दृष्टिकोनाचा परिणाम याचा विचार प्रामुख्याने केलेला आहे.
भारतात धर्मविरोधी चळवळींचा अभ्यास फारच थोडा झालेला आहे. भारतीय जनता अत्यंत धार्मिक आहे या समजाला कोणीच आव्हान देत नाही कारण अभ्यासकांचा आणि संशोधकांचा कल अनेक धर्मांचा अभ्यास करण्याकडे असल्याने त्यांनी अस्तित्वात असलेल्या विवेकवादी आणिनिरीश्वरवादी किंवा नास्तिक परंतु लोकप्रिय असलेल्या गटांकडे दुर्लक्ष केले आहे.
अंनिससारख्या विवेकवादी चळवळींची खास वैशिष्ट्ये थोडक्यात दिलेली आहेत. तशीच धार्मिकतेच्या स्वरूपाचीही चर्चा केली आहे. धर्म आणि नास्तिक्य किंवा निधर्मीपणा एकमेकांसमोर उभे करण्याऐवजी धार्मिकतेचे स्वरूप आणि अश्रद्धेचे स्वरूप यांची तुलना जास्त उपयोगी ठरते असे अनेकांचे आणि या लेखकाचेही मत आहे.(अंनिसच्या कार्यकर्त्यांपैकी काहींचे असेच मत असावे.)
पुस्तकाचा तिसरा भाग या संशोधनपर पुस्तकाचा गाभा आहे. त्यामधे भारतीय विवेकवादींची उद्दिष्टे आणि कार्य यांची माहिती आहे आणि विश्लेषणही आहे. ते अंनिस या संघटनेच्या एथ्नोग्राफिक केस स्टडीमधे(मानवजातिवर्णनात्मक व्यक्ति-अभ्यास) व्यक्त झाले आहे.
चौथ्या भागामध्ये अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या अश्रद्धेचे स्वरूप स्पष्ट केले आहे. यातून कार्यकर्ते कसे प्रेरित होतात आणि एकूणच भारतीय विवेकवादी चळवळींची वैशिट्यपूर्ण लक्षणे काय आहेत ते स्पष्ट होते.
आणखी एक गोष्ट नमूद करायला हवी. ती म्हणजे जॉन यांच्या संशोधनाचे क्षेत्र अंनिस या संघटनेपुरते मर्यादित नाही. भारतातील एकूण विवेकवादाचा इतिहास, प्रगती, त्यातून होणारा एतद्देशीय लोकांचा तसाच विदेशी लोकांचा भारताबाबतचा भ्रमनिरास आणि या सगळ्याचा जागतिक विवेकवादी चळवळींवर होणारा परिणाम हे सर्व मुद्दे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. जॉन यांनी अंनिसची वैचारिक मांडणी, संघटनात्मक जडणघडण, कार्यक्रमांची आखणी व सादरीकरण इत्यादींबरोबर कार्यकर्त्यांच्या वागणुकीबाबत बारकाईने निरीक्षण केले आहे. त्यामधे कौतुक आहे तशीच विधायक टीकाही आहे. आत्मपरीक्षण करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल.
आता आपण जॉन यांनी अंनिसबाबत काय म्हटले आहे त्याकडे वळू.
भारतीय विवेकवादी चळवळ
भारतातील बहुतेक विवेकवादी संघटना 20 व्या शतकामधे जन्माला आल्या असल्या तरी त्यांची पाळेमुळे 19 व्या शतकातील इंग्लंडमधल्या आणि 19 व्या शतकातील व 20 व्या शतकातील भारतातील सामाजिक सुधारणा आणि जातीवादविरोधी चळवळींमधे सापडतील. आजचे विवेकवादी तर आपली पाळेमुळे थेट नास्तिक आणि जडवादी चार्वाक मताशी जोडतात तसेच भक्तिसंप्रदायातील काही अंगांशी जोडतात. त्यांचा बौद्धिक पाया आहे युरोपमधले प्रबोधन आणि पाश्चिमात्य जगातील 18व्या शतकात सुरू झालेली धर्मविरोधी चळवळ. त्यांच्यावर मार्क्सवादाचाही थोडाफार परिणाम आहे. परंतु विवेकवादी चळवळींचे स्वरूप ठळकपणे समोर येवू लागले ते 70 आणि 80 च्या दशकांमधे सुरू झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळींमुळे.
विवेकवादी, मानववादी आणि निरीश्वरवादी संघटनांच्या ह्या चळवळींचे ध्येय आहे समाजसुधारणा-भारतीय समाज विवेकी, न्याय्य आणि इहवादी व्हावा यासाठी झटणे. या सर्वच चळवळी अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी जनतेमधे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
भारतातील विवेकवादाच्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी संशोधकाने अंनिसचीच निवड का केली हे सांगतांना तो म्हणतो, ‘अंनिसची चळवळ महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पसरली आहे. तिचे कार्यकर्ते सर्वात जास्त सक्रीय आहेत. ते सर्व विनावेतन काम करणारे स्वयंसेवक आहेत आणि ते द्रविड कळघम या चळवळीसारखे राजकारणामधे बिलकूल रस घेत नाहीत.’
या चळवळीचे चारसूत्री उद्दिष्ट असे आहे :
1.अडाणी आणि भोळ्या लोकांची पिळवणूक करणार्या सर्व अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे.
2.समाजामधे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानववाद यांची जोपासना करणे.
3.जनतेमधे धर्माचे समालोचन करण्याची वृत्ती आणि इहवाद् जोपासणे
4.व्यापक समाजसुधारणेची निकड लक्षात घेवून उपयोगी आणि परिणामकारक उपक्रमांचे आयोजन करून त्यांची अंमलबजावणी करणे.
या उपक्रमामध्ये पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा, विद्यार्थ्यांचे लैंगिक शिक्षण, व्यसनमुक्ती अशा विविध कार्यक्रमांचाही समावेश असतो.
अंनिस ही चळवळ एक आदर्श आणि अनुकरणीय अशी विवेकवादी चळवळ आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनामधे असलेल्या अश्रद्धेचा प्रकार (म्हणजे वैचारिक कल) इतर सर्व विवेकवादी चळवळींमधेही दिसून येतो.
महाराष्ट्रातील संघटित विवेकवादाचा अर्वाचीन इतिहास
प्रेमानंदांनी 1983 मधे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी व्याख्याने देऊन, प्रात्यक्षिके दाखवून आणि चमत्कार करून लोकांना भुलविणार्या बाबाबुवांचे ढोंग उघडकीस आणले. त्यांच्या या कार्यक्रमांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यातून महाराष्ट्राच्या अनेक विभागातील उत्साही कार्यकर्त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम सुरू करण्यास प्रोत्साहन मिळाले. या ठिकठिकाणच्या वैयक्तिक प्रयत्नांना संघटित रूप देण्यासाठी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची’ (अंनिस) 1989 साली स्थापना करण्यात आली. असं डॉ. दाभोलकर यांनी आपल्या ‘ब्रॉड आयडिऑलॉजिकल स्टँड ऑफ इरॅडिकेशन ऑफ सुपरस्टीशन’ या पुस्तकात म्हटले आहे. (हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रसिद्ध व्हायचे आहे.)
अर्थात अंनिसच्या स्थापनेमागे एकटे प्रेमानंद कारणीभूत होते असे नाही. अंनिसच्या आधी अंनिससारखे कार्य करणार्या काही संघटना कार्यरत होत्या. याशिवाय 1977 मधे हमीद दलवाई यांनी ‘इंडियन सेक्यूलर सोसायटी’ (भारतीय इहवादी किंवा सत्यशोधक समाज) आणि अशीच समविचारी ‘मुस्लिम सत्यशोधक समाज’ अशा दोन संस्था स्थापन केल्या होत्या. मुस्लिमांची वेगळी संस्था स्थापन करावी लागली याचं कारण असं दिलं जातं की सामान्यतः मुस्लिम मनुष्य कोणत्याही चळवळीकडे किंवा संघटनेकडे, मग ती त्यांच्या हिताची असली तरीही काहीशा संशयानेच पाहातो.
वाईचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पुणे येथे बुद्धिप्रामाण्यवादी मंचाची स्थापना केली होती. शास्त्रीजींनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांना त्यांच्या मराठी साहित्यातील कामगिरीसाठी 1955 सालचे साहित्य अकादमी पारितोषिकही मिळाले होते. शास्त्रीजींचे कार्यही काही अंशी अंनिसच्या जन्माला कारणीभूत झाले आहे. कारण 1983 सालच्या महाराष्ट्र विज्ञान यात्रेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. ही यात्रा जेव्हा सातार्याला पोचली तेव्हा तिथल्या स्थानिक समितीचे मुख्य होते डॉ.नरेन्द्र दाभोलकर. अंनिसच्या उभारणीचा निश्चय पक्का होण्यास या यात्रेच्या अनुभवांची मदत झाली.
इंडियन रॅशनॅलिस्ट अॅसोसिएशनशी संलग्न असलेली नागपूर रॅशनॅलिस्ट अॅसोसिएशनही त्यावेळेस अस्तित्वात आलेली होती. नागपूर विश्वविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख सी.जी.पांडे या संस्थेचे नेतृत्व करीत होते. त्यांनी 23-4-76 रोजी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले होते की सर्व ढोंगी बाबाबुवांना अटक केली पाहिजे कारण त्यांच्या ढोंगीपणाचं यश ज्यावर अवलंबून असतं त्या लोकांच्या मनातील श्रद्धा आणि रूढींवरील निष्ठा मानसशास्त्रानुसार मानसिक आरोग्य बिघडल्याचे लक्षण आहेत. त्यांच्या या विधानामुळे बरेच वादंग माजले होते. त्याच वर्षी पुन्हा एकदा पांडे आणि त्यांच्या समविचारी सहकार्यांनी खळबळ माजविली होती. बळीरामबाबा यांना त्यांनी एका हवाबंद पेटीमधे 30 दिवस राहून दाखवावे असे आव्हान दिले. बळिराम बाबा हवेशिवाय (बंद पेटीमधे) 71 दिवस ध्यान करीत जिवंत राहू शकण्याचा दावा करीत असत. त्यांनी पांडें यांचे आव्हान स्वीकारल्याचे पत्रकारांसमोर लिहून दिले होते. परंतु प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या वेळी ते हजरच झाले नाहीत. प्रेमानंद यांचे महाराष्ट्रातील कार्यक्रम आखण्यात व पार पाडण्यात पांडे यांचा महत्त्वाचा वाटा होता.
याशिवाय अंनिससारखीच उद्दिष्टे असलेल्या जातीनिर्मूलन, महिला आंदोलन, स्त्रीमुक्ती, सक्षमीकरण, समाजसुधार अशा अनेक चळवळी महाराष्ट्रामधे सुरू झालेल्या होत्या आणि आजही कार्यरत आहेत. अंनिसची उभारणी झाली त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन नीरज साळुंखे यांनी आपल्या डॉक्टोरट थिसिसमधे सविस्तर केले आहे. व्यापक समाजसुधार किंवा क्रांतीचे उद्दिष्ट असलेल्या मार्क्सवादी आणि समाजवादी चळवळीसुद्धा कालांतराने एकच एक संकुचित उद्दिष्ट ठेवू लागतात. जसं अंनिसने अंधश्रद्धा निर्मूलन हे आपलं उद्दिष्ट ठेवलं आहे असं मत साळुंखे यांनी मांडलं आहे. परंतु या आधी चर्चा केलेल्या अंनिसच्या उद्दिष्टांच्या आढाव्याकडे पुन्हा एकदा नजर टाकल्यास ती किती व्यापक व समावेशक आहेत हे समजेल. शिवाय महाराष्ट्रातील मराठी विज्ञान परिषद, प्रयोग परिवार, लोकविज्ञान संघटना इत्यादींचाही त्यांनी या संदर्भात उल्लेख केला आहे.
विवेकवादाच्या उत्क्रांतीस व अंनिसच्या उत्पत्तीस कारणीभूत झालेल्या प्राचीन व अर्वाचिन ऐतिहासिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपण अंनिस या संघटनेची उद्दिष्टे आणि ती साधण्यासाठीची कार्यवाही यांचा पुढील विभागामध्ये विचार करणार आहोत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
या विभागामधे अंनिस ही संघटना भारतीयांचा आणि भारताबाबतचा इतरांच्या मनात असलेला भ्रम दूर करण्यात कशी कार्यरत आहे हे पहायचे आहे.
अंनिस स्वतःचे ग्राफिकल दर्शन ज्याद्वारे करते ते चित्र मोठे अर्थवाही आहे. चित्राच्या तळाशी अंनिसचा लोगो आहे. त्यामधे यिंग व यांग हे आकार एका वर्तुळामधे दाखविले आहेत. वर्तुळातच उजव्या बाजूल असलेली पेन्सिलविज्ञानाचे प्रतिक आहे. डावीकडची काळी उलटी बाहुली अंधश्रद्धा आणि अंधविश्वास यांंचे प्रतिक आहे. ज्ञान प्रकाश आणून अंधश्रद्धा आणि अंधविश्वास यांचा अंधःकार नाहीसा करते. नेहमीच्या संपूर्ण लोगोमधे विज्ञान, निर्भयता आणि नीती या शब्दांचा समावेश असतो. या चित्रातील लोगोमधे काँप्यूटर, सूक्ष्मदर्शक आणि इतरही काही गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्यामधून धर्म आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात उभे ठाकलेल्या विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांचा पाठपुरावा चित्रित केला आहे.
पुढे येणार्या एथ्नोग्राफीमध्ये हे सर्व मुद्दे चर्चेत आलेले आहेत. अंनिस वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न कसा करते; संघटनेची संरचना कशी आहे; अंनिसच्या अधिकृत कार्यसूत्रीचे विश्लेषण; अंनिसच्या कार्यकर्त्यांनी विवेकवादाचा लावलेला वेगवेगळा अर्थ; त्यांच्या आचरणातला विवेकवाद; अंनिसबाबतची महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक संदर्भातील लोकांची मते आणि अंनिसची परिणामकारकता किंवा प्रभाव या सर्वांचा आढावा या विभागात घ्यायचा आहे.
अंनिस कृति-कार्यक्रम विज्ञानबोधवाहिनी :
खेड्यापाड्यांमध्ये व शाळा कॉलेजांमधून विज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्यासाठी अंनिसने एक सायन्स व्हॅन-विज्ञानबोधवाहिनी -(प्रसार व प्रचारासाठी लागणारे सर्व साहित्य घेवून गावोगाव हिंडण्यास सोयीची अशी एक प्रशस्त मोटरगाडी) बनविली आहे. ही व्हॅन फिराच्या संमेलनाच्या वेळी संमेलनस्थळी म्हणजे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच उभी करून ठेवली होती. दिवसभर महाराष्ट्राबाहेरून आलेले प्रतिनिधी व्हॅनमध्ये शिरून निरीक्षण करीत होते. संध्याकाळी सर्वजण व्हॅनच्या मागील बाजूस रिचर्ड डॉकिन्स यांची ‘द रूट ऑफ ऑल इव्हिल्स’ ही फिल्म बघण्यासाठी जमा झाले होते. व्हॅनच्या मागच्या उघड्या बाजूवर एक चंदेरी पडदा लावलेला आहे. तो वरच्या बाजूस उघडतो. शाळांमधून प्रदर्शन व प्रात्यक्षिकांसाठी हा पडदा उघडला जातो.
या व्हॅनचे सर्व कार्यक्रम पार पाडणार्या दोन कार्यकर्त्यांशी ओळख करून घेवून जॉन यांनी नाशिक शहराच्या आसपासच्या ट्रिपमध्ये त्यांच्या बरोबर खेड्यांमधून प्रवास केला. त्याआधीच त्यांनी कार्यकर्त्यांकडून हिंदी गाणी शिकून घेतली होती. व्हॅनच्या कामाविषयी त्यांच्या मनात बरेच प्रश्न होते; जे सर्वांच्याच मनात उद्भवत असतील. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि जोपासना कशी करतात? अंधश्रद्धा कशा घालवता येतात? खेड्यातील लोक कसा प्रतिसाद देतात? ज्यांच्याभोवती या लोकांचं जीवन गुंफलेलं असतं अशा काही श्रद्धा आणि घटना घातक, रोगट आणि भ्रामक आहेत; धूर्त लोकांनी धर्माच्या नावाखाली या भोळ्या लोकांचं शोषण करण्यासाठी त्या निर्माण केल्या आहेत हे लोकांना कसं पटवून देतात? अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या विधानांना हे लोक विरोध करतात, का त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात? त्यांच्यामधे परिवर्तन घडते आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते विज्ञानवाहिनीचा उपयोग कसा करतात ते पहायला हवे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना आणि अंधश्रद्धा निर्मूलन:
सायन्स व्हॅन अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या परिचयाची आहे. परंतु इतरांसाठी इथे त्याविषयी थोडी माहिती द्यायला हवी. या गाडीमधे एका वेळी सात माणसे बसू शकतात. त्यात जेवण बनविण्याची सोय आहे. तसेच एक न्हाणीघरही आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाडीमधे एक फिल्म प्रक्षेपक, एक जनरेटर (विद्युत जनित्र), कार्यक्रम संपल्यानंतर विकण्याची पुस्तके आणि चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य इत्यादी गोष्टी असतात. या गाडीपेक्षा थोडी लहान आणखी एक गाडी आहे. तिच्यातही हे सर्व साहित्य असते.
गाडीच्या समोरच्या भागावर मोठ्या अक्षरात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ आणि ‘विज्ञानबोध वाहिनी’ असे लिहिलेले आहे. याच्या डाव्या बाजूस संत गाडगेबाबा आणि उजव्या बाजूस आएनस्टाइन यांची चित्रे आहेत. चित्रांच्या खाली त्यांची नावेही आहेत. या सर्वाच्या वरती ‘वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी ही गाडी रोटरी क्लब, जळगाव आणि शॅग्रीन व्हॅली या संस्थांनी अंनिसला भेट दिली आहे’ असे इंग्रजीत लिहिले आहे. मागच्या बाजूला पृथ्वीचा अंतराळातून घेतलेला फोटो, त्याखाली चार हसरी मुले आणि त्यांच्या खाली घटनेमधे दिलेले ‘वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता आणि अन्वेषक वृत्ती जोपासणे’ हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे लिहिले आहे.
वाहिनीच्या उजव्या बाजूला काँप्यूटर, लोहचुंबक, कारखाना, पवनचक्की, सूक्ष्मदर्शक, उपग्रह, परमाणुकेंद्र आणखीही काही गोष्टींची रंगित चित्रे आहेत. वाहिनीच्या डाव्या बाजूस असलेल्या चित्रांमधे फळे, भाज्या, दूध इत्यादी आरोग्यदायी अन्न, मेंदूचा भाग व श्वासनलिका दाखविलेले माणसाचे चित्र, काही औषधे, दात घासायचा एक मोठा लाल रंगाचा ब्रश व हिरव्या रंगाची टुथपेस्ट, शस्त्रक्रिया करतांना चेहर्यावर मास्क घातलेले दोन वेगवेगळ्या वर्णाचे डॉक्टर्स आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद दर्शविणारी माकडापासून ताठ चालणार्या मानवापर्यंत पायरीपायरीने झालेल्या उत्क्रांतीची चित्रे दाखविली आहेत. या सर्व चित्रांमधून वाहिनीची आणि अंनिसची उद्दिष्टे स्पष्टपणे सूचित होतात.
शाळा कॉलेजांमधून विज्ञानबोध वाहिनीचे कार्यक्रम सर्रास होत असतात. परंतु खेड्यांमध्ये मात्र तेथील लोकांचे निमंत्रण असल्यास आणि त्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम करण्याची सोय असल्यासच होतात. अंनिसचा संदेश लोकांपर्यंत परिणामकारकपणे पोचावा म्हणून अंनिसच्या काही ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तींनी त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून एक चांगला कार्यक्रम आखला आहे. काही तासांच्या कार्यक्रमातून अनेक समस्यांचा ऊहापोह कसा करायचा, कोणते संदेश लोकांपर्यंत कसे पोचवायचे याची व्यवस्थित आखणी केली आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांची मदत वेळोवेळी घेतली आहे. कार्यक्रमातील काही विषयांवर अंनिसची भूमिका स्पष्ट व सविस्तर मांडणारी छापील पत्रकेही आहेत. तरीही वेगवेगळे कार्यकर्तेआपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम सादर करीत असतात. श्रोतृवर्ग कसा आहे आणि किती वेळ मिळू शकेल हेही अशा वेळी लक्षात घ्यावे लागते.
गावाकडची जनता, शाळकरी मुले मुली आणि कॉलेजचे विद्यार्थी या सर्वांच्या परिप्रेक्षाशी (पर्स्पेक्टिव्ह) जुळवून घेण्याचा अंनिसचे कार्यकर्ते प्रयत्न करतात. वेगवेगळे खेळ आणि गाणी यातून कार्यक्रमातील श्रोतृवर्गाचा सहभाग वाढतो. कार्यक्रमामधे साधेपणा आणि जिवंतपणा राखण्याचा प्रयत्न असतो. लोकांच्या रोजच्या जीवनातील समस्यांचाही विचार होत असतो. पण असं असून सुद्धा काहीशा उच्च पातळीवरील कार्यक्रम उपदेशात्मक पवित्र्यामुळे अपेक्षेएवढे परिणामकारक होतात का याबाबत शंका वाटते. सुरुवातीसच अशी ‘मास्तराची’ भूमिका, विवेकवादी तात्त्विक भाषा (र्हिटरिक) आणि गावातील लोकांवर ‘इंप्रेशन’ मारण्याच्या प्रयत्नामुळे काहीसा तणाव निर्माण होतो. एकतर विज्ञानबोध वाहिनी गावात येणं हेच मुळात दरारा वाटावा अशी घटना आहे. विशेषतः भाषणापाठोपाठ एखादा चित्रपटही दाखविला जातो तेव्हा. त्याही पुढे जावून कार्यकर्ते केव्हा केव्हा संबंधित विषयातील मान्यता पावलेल्या तज्ञांची नावे घेतात, भौतिक व रासायनिक शास्त्रीय स्पष्टिकरणे देतात आणि त्यासाठी तांत्रिक भाषा वापरतात तेव्हा त्यांची विद्वत्ता सिद्ध होते पण त्यामुळे ऐकणार्यापर्यंत त्यांचा संदेश पोचण्याऐवजी त्यांच्याबद्दल दरारा वाढतो आणि लोक जवळ येण्याऐवजी लांब जातात. त्यातून अंनिसचे कार्यकर्ते जेव्हा प्रत्येक गोष्ट मोठ्या आत्मविश्वासाने ठासून सांगतात तेव्हा श्रोत्यांच्या मनातील हा भाव जास्तच दृढ होंतो. कार्यकर्त्यांचा आवेश, कळत नकळत होणारे त्यांचे हावभाव आणि त्यांची भाषा ‘माझंच म्हणणं खरं आणि तुमच्या हिताचं आहे’ हेच इतरांवर ठसविण्याचा प्रयत्न होत आहे असाच भास होतो. विशेषतः कार्यकर्ते(आणि इतर विवेकवादी) जेव्हा ईश्वर, देवदेवता, आत्मे यांच्या अस्तित्वाला आव्हान देतात; जादुटोणा करणार्या भगत, बाबाबुवांची चेष्टा करतात आणि जाणून बुजून अशुभ गोष्टी करतात तेव्हा त्यांचा उदंड आत्मविश्वास खेड्यातील लोकांना बोचतो. काही खेडुतांनी जॉन यांच्याजवळ बोलून दाखवलं होतं, ‘या विवेकवादींवर आपल्या वागण्याचा पश्चात्ताप करण्याची वेळ येणार आहे आणि तेव्हा त्यांची वाईट दशा होईल.’ हे जॉन यांचे निरीक्षण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
कार्यकर्त्यांच्या बोलण्यातला खटकणारा तिसरा प्रकार म्हणजे त्यांचे बोचणारे विनोद आणि गावच्या लोकांच्या श्रद्धांची आणि प्रथांची टर उडविण्याची सवय. प्रत्येक कार्यक्रमामधे पौराणिक मंत्रांंचं विडंबन, अंगात आल्याचं सोंग आणि खेडुतांच्या अडाणीपणाच्या आणि विवेकशून्यतेच्या गोष्टी सांगणं हे प्रकार हमखास असतात. त्यातून त्यांचेच बहुतांश हिंदी बांधव किती भोळेभाबडे, बावळट आणि मागास आहेत हेच दाखविलं जातं. थोडक्यात ज्यांचे प्रबोधन करण्यासाठी हे विवेकवादी खेड्यात पोचलेले असतात त्याच त्यांच्या बांधवांची ते आपल्या समोर बसल्यावर टर उडवतात. हे निरीक्षण आपले कार्यक्रम प्रबोधनाच्या दृष्टीने जास्त परिणामकारक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विचारात घ्यायला हवं.
कार्यकर्त्यांच्या एका जोडीने खेड्यामधे, शाळेमधे आणि महाविद्यालयामधे घेतलेला कार्यक्रम साधारणपणे असा असतो: विज्ञानवाहिनी हेच मोठं आकर्षण असतं. गाडी जिथे पोचेल तिथे प्रथम मुलांचा गराडा पडतो गाडीवर दिसणार्या चित्रांचा आणि संदेशांचा अर्थ लावायला सुरुवात होते. कसली गडबड आहे हे पहायला मग मोठी माणसेही जमतात. मुले सामान काढण्यास मदत करतात. कार्यकर्तेजमा झालेल्या मुलांना सामान बाहेर काढताना मधून मधून प्रश्न विचारतात. ‘तुझ्या गळ्यातला/दंडातला हा ताईत कुठून आणलास? त्याला किती पैसे पडले? तो कशासाठी बांधला आहे? त्याने काही फायदा झाला का? फायदा होतो असं तुला का वाटतं?’ इत्यादी. यातून कार्यकर्तेपुढे काय करणार आहेत याचा अंदाज बांधता येतो. वाहिनीबाबत किती कुतुहल आहे हे अनेक वेळा दिसून आल्यामुळे तिला बहुधा शाळेच्या अगर खेड्याच्या मधल्या चौकामध्येच उभी करतात. नंतर कार्यक्रम आयोजित करणार्या स्थानिक व्यक्तीच्या सल्ल्याने कार्यक्रम घोषित केला जातो. गाडीप्रमाणेच कार्यक्रमाची तयारी/मांडणी होत असतांना पाहण्यामध्येही मुलांना खूप रस असतो आणि त्यांची गर्दी वाढते.
प्रथम एक टेबल बाहेर ठेवण्यात येते. त्यावर एक तांदुळाने भरलेले भांडे, स्क्रू ड्रायव्हर, त्रिशूळ, नारळ, पांढर्या रंगाची पावडर, दिवा, काही कागद, आगपेटी, खिळे ठोकलेल्या दोन लांबट फळ्या, छोटीमोठी भांडी आणि वाडगे व आणखी काही सामान व्यवस्थित मांडून ठेवलं जातं. हे सारं जादूचं सामान म्हणजे कार्यकर्त्यांचे ‘मॅजिक किट’.
कार्यकर्त्यांना सगळीकडे मोठ्या आदराने वागवले जाते. कार्यक्रम करतांना कुठे फुलं देतात तर कुठे हार घालतात. प्रयोग करतांना त्यांचं वागणं एखाद्या तज्ञासारखं असलं तरी ‘आम्ही तुमच्यातलेच आहोत’ हे दाखविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. समोरच्या मुलांना आणि प्रेक्षकांना ते मित्र म्हणतात. काही मुले/प्रेक्षक जेव्हा आदराने त्यांच्या पायाला लवून स्पर्श करायला बघतात तेव्हा कार्यकर्ते ओशाळल्यागत होतात आणि त्यांना वाकू न देता त्यांची गळाभेट घेतात. आता पाया पडायला आलेल्या व्यक्तींवर लाजण्याची पाळी येते.
प्रयोगाला सुरुवात होण्यापूर्वी अंनिसचे कार्यकर्ते स्वतःची ओळख करून देतात. प्रथम अंनिसच्या चळवळीची माहिती देवून आणि वाहीनीची व कार्यक्रमांची उद्दिष्टे सांगून अंधश्रद्धांविरुद्ध लढणं किती महत्त्वाचं आहे हे पटवण्याचा प्रयत्न होतो. कार्यकर्ते प्रेक्षकांशी थेट संवाद साधून त्यांचा प्रयोगांमधला सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करतात, ‘मित्रांनो भानामती, भूत, करणी, यांच्याविषयी बोलायला आलो आहे. पण मी व्याख्यानबाजी न करता तुमच्याशी बातचीत करणार आहे. तुमचं म्हणणं काय आहे ते मला ऐकायचं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारेन तसेच तुम्हीही मला प्रश्न विचारा. माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आणि तुमच्या प्रश्नांची समाधानकरक उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करेन.’ इत्यादी. त्याबरोबर हेही सांगितले जाते की अंनिसचा धर्माला विरोध नाही. विरोध आहे तो केवळ ज्या अंधश्रद्धांमुळे तुम्हाला धूर्त लोक लुबाडू शकतात त्या अंधश्रद्धांना; त्यांच्या विरोधात तुम्ही व आम्ही सगळे मिळून लढू या.’
ज्यामुळे भोंदूबाबाबुवा स्वतःमधे दैवी सामर्थ्य असल्याचा दावा करतात त्या कथित चमत्कारांचे प्रात्यक्षिक हा कार्यक्रमांचा मुख्य भाग असतो. त्यानंतर त्या ‘चमत्कार’ वाटणार्या घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्यात येते. यातून संदेश हा द्यायचा असतो की जगामधे ‘चमत्कार’ अशी कोणतीही गोष्ट नाही. बाबाबुवांच्या तथाकथित चमत्कारांमागील कार्यकारण संबंध समजून घेतल्यानंतर अंनिसचे कार्यकर्तेही ते सारे कार्यक्रम करू शकतात. आणि प्रेक्षक स्वतःही थोड्याशा सरावानंतर करू शकतील. मधून मधून काही खेळ आणि गाणीही होतात. खास करून चमत्काराचा एक प्रयोग झाल्यावर दुसरा सुरू होण्याअगोदरच्या मधल्या काळामध्ये.
लिंगभेदाबाबतच्या शैक्षणिक चर्चेसाठी महिला आणि पुरूष असे दोन गट केले जातात. यामधे बहुधा छोट्या फिल्मचा उपयोग करतात. या भागामधे स्त्री-पुरूष शरीर रचनेतील लैंगिक फरक, गर्भनिरोधन, व्हेनेरिअल रोग, इत्यादींसंबंधी माहिती दिली जाते. शिवाय स्त्री-पुरूष विषमता, इहवादी समाजनिर्मितीची गरज, समाजसुधारकांची जबाबदारी तसेच धार्मिक कार्यांमधे होणारी उधळमाधळ, वाह्यात खर्चाला प्रोत्साहन देणारा पूंजीवाद, क्रिकेट आणि सिनेतारकांचे मुलांच्या समोर येत असलेले वास्तवाशी विसंगत असलेले आदर्श, वर्णजातीसंस्थेचा अन्याय, इत्यादींची चर्चा असते.
वेगवेगळे खेळ आणि चमत्कारांच्या प्रयोगामध्ये प्रेक्षकांचा प्रत्यक्ष सहभागही असतो आणि प्रतिसादही चांगला असतो. याबाबतीत उत्सुकता शिगेला पोचविण्याचे दोन प्रकार आहेत. एका विरोधाभास दाखविणार्या प्रयोगात कार्यकर्त्या महिलेच्याच अंगात येतं. ती घुमायला लागली की प्रेक्षकांना मोठी गंमत वाटते. दुसर्या प्रयोगात काट्यांचं अंथरूण (खिळे ठोकलेली फळी) अंथरून त्यावर एक कार्यकर्ता झोपतो. त्याच्या छातीवर दुसरी काटेरी फ़ळी ठेवण्यात येते. अचंबा व काळजी वाटण्यास एवढेच पुरेसे आहे. पण जेव्हा प्रेक्षकांमधल्या एकाला कार्यकर्त्याच्या छातीवरच्या फळीवर उभं राहण्यासाठी बोलावलं जातं तेव्हा प्रेक्षकांमध्ये खळबळ माजते.
असे प्रयोग जेव्हा महाविद्यालयामध्ये होतात तेव्हा प्रयोगाच्या अखेरीस धर्म, विज्ञान, अंधश्रद्धा इत्यादींवर जास्त खोलात जावून प्रश्न विचारले जातात आणि त्यांची तपशीलवार समर्पक उत्तरेही दिली जातात. याबाबत जॉन यांचा अभिप्राय अंनिसच्या कार्यकर्त्यांना अभिमान वाटावा असा आहे. ते म्हणतात, ‘मी पाहिलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये, विषय कितीही वेगवेगळे असले तरी, एकाही प्रश्नाचे उत्तर देण्याची कधीही टाळाटाळ झालेली मला आढळली नाही. हे प्रश्न अनेक वेळा धार्मिक कर्मकाण्डे आणि रूढी; आत्मा, भूते, अलौकिक शक्तींचं अस्तित्व; ज्योतिष शास्त्र व वास्तुशास्त्र यांच्याबाबतचे अंनिसचे मत किंवा बर्म्यूडा ट्रॅयंगलवरील तथाकथित परग्रहावरील जीवांचं अस्तित्व व इतर अलौकिक घटना अशाही विषयातील असायचे. परंतु सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाई.’
प्रात्यक्षिकांत दाखविण्यात येणार्या चमत्कारांचे तीन प्रकार आहेत. हातचलाखीचे प्रयोग, रसायनशास्त्राचा उपयोग असलेले प्रयोग आणि काही साधी साधनं किंवा तंत्रविज्ञानाचा वापर असलेले प्रयोग. सगळे बाबाबुवा याच तीन प्रकारच्या क्लुप्त्या आपल्या चमत्कारांच्या प्रयोगासाठी वापरतात. त्यांचे हे चमत्कार इतरांनाही करता येतात. त्यामधे कोणताही जादूटोणा, भूत, चेटुक काहीही नसतं. असतो तो केवळ बघणार्यांचा अंधविश्वास.’ अशा तर्हेची विधाने करून कार्यकर्ते तिन्ही प्रकारचे खेळ करून दाखवतात. सत्यसाईबाबांचे हवेतून सोन्याची साखळी वा अंगठी आणि विभूती काढण्याचे प्रयोग ते सहज करतात. खूप दाब देवून बरीच विभूती एका छोट्या गोळीमधे साठवता येते. ही गोळी, साखळी झब्ब्याच्या लांब बाहीमध्ये लपविलेली असते. गोळी प्लॅस्टिकच्या छोट्या बोटातही ठेवता येते.
रसायन शास्त्राच्या प्रयोगाचे उदाहरण म्हणजे नारळ पेटवणं. नारळावर विभूती (म्हणजे राखाडी रंगाची एक पावडर) टाकून नंतर त्यावर तीर्थ म्हणून एक द्रव पदार्थ टाकतात. ह्या कृतीसोबत एक विडंबन करणारा मंत्र-भूतं, भानामतीं, करणी-धरणी, चेटुकं-मेटुकं, अंगात येणं, झपाटणं, वाटतत्वं सर्वं झूटं भवति अशा तर्हेचा मंत्र म्हणतात. नारळावर द्रव पदार्थ पडताच त्यातून जाळ निघू लागतो. कोणकोणते बाबाबुवा हा प्रयोग कुठेकुठे करतात हा सर्व तपशील यावेळी सांगण्यात येतो. त्यानंतर या प्रयोगामध्ये तीर्थ आणि विभूती म्हणून कोणते पदार्थ वापरतात आणि त्यातून काय प्रक्रिया होतात याचे स्पष्टीकरण दिले जाते. इथे उद्देश रसायनशास्त्र शिकविण्याचा नसतो तर कोणतीही प्रथमदर्शनी अगम्य व म्हणून अलौकिक वाटणारी घटना खरी अलौकिक नसते; तिचा कार्यकारण संबंध सिद्ध करता येतो. पण लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून बाबा-बुवा त्याचे अवडंबर माजवतात आणि लोकांना फसवतात. त्यासाठीच शोषण करणार्या अंधश्रद्धांचा फायदा उठविणार्यांविरुद्ध कायदा व्हायला हवा हेही लोकांना पटवतात.
तिसर्या प्रकारच्या प्रयोगामध्ये एका धातूच्या कड्यामध्ये घोड्याच्या नाला अडकविलेल्या असतात. कडे त्यातून वेगळे करण्याची एक ट्रिक असते. कडे नालांपासून वेगळे करून दाखवण्यासाठी आधी मुलांना, नंतर मुलींना आणि त्यानंतर एका शिक्षकाला बोलावण्यात येते. कोणालाच कडे वेगळे करता येत नाही त्यामुळे प्रेक्षकांना ही गोष्ट अशक्यप्राय वाटते. त्यानंतर कार्यकर्ता पुढे येतो आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे भासवतो; मग खंडोबाला आवाहन करतो, ‘देवा खंडोबा माझ्यामध्ये संचार कर. कडे सोडवून दे’ वगैरे वगैरे. मग ते कडे लागलीच सुटते. त्यानंतर असाच काही टेक्नीक वापरलेला आणखी एक चमत्कार म्हणजे एका पूर्ण रिकाम्या लोट्यातून पाणी काढून दाखविणे. ह्या प्रयोगाच्या वेळी भारतातील सर्व पवित्र नद्यांना आवाहन करतात. जिभेमधून रक्ताचा एकही थेंब न सांडता त्रिशूळ आरपार काढणे हा प्रकारही नेहमी दाखवला जातो. जळत्या निखार्यावरून अनवाणी चालण्याचा प्रयोग अधूनमधूनच केला जातो.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक कथित चमत्कारामागची रहस्ये उलगडून दाखवली तरीही त्यामुळे चमत्कार अशक्य आहे असे सिद्ध होत नाही. म्हणून अंनिस चमत्कार करण्याचा दावा करणार्यालाच आव्हान करते. ‘जो कोणी चमत्कार करून दाखवील त्याला अंनिस 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल. असे तुमच्या गावातील बाबाबुवाला सांगा. त्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांच्याकडे जावू आणि लोकांच्या समोर त्यांच्या कृती (ट्रिक)किंवा ते करीत असलेल्या चमत्काराची तपासणी करू. चमत्कार खरा उतरल्यास बाबांना 11 लाख रुपये मिळतील. त्यांना आम्ही आमची ही वाहिनीसुद्धा देवून टाकू; त्यांच्या घरी राहून त्यांच्या शेतीची, गाईबैलांची निगा राखू. पण आम्हाला पक्की खात्री आहे की चमत्कार करून दाखविल्यावर त्याची तपासणी करू देण्यास कोणीही बाबा पुढे येणार नाही.’
अब्राहम कोवूर यांनी असेच आव्हान दिले होते. जगातील अनेक विवेकवादी संघटना असे आव्हान देत असतात. अंनिसच्या आव्हानाचे 11 लाख रुपये जनतेच्या देणगीतून जमा झाले असून ते बँकेमध्ये कायमस्वरुपी ठेव म्हणून ठेवलेले आहेत. (ही रक्कम आता 21 लाख रूपये झाली आहे.) अंनिसच्या वेबपेजवर एक अशा अर्थाचे विधान असते, ‘जगात घडणार्या सर्व घटना नैसर्गिक नियमांनी बद्ध असतात. चमत्कार घडवता येत नाहीत. चमत्कार बघणार्यांचा अडाणीपणा किंवा आपल्या ठाम विश्वासाला चिकटून राहण्याची वृत्ती त्यांना चमत्कारावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. 11 लाख मिळविण्यासाठी अंनिसची अट असते: चमत्कार करून दाखविणार्याने आधी अंनिसकडे 10 हजार रुपये ठेव म्हणून ठेवायचे; आणि एका लेखी करारपत्रावर सही करायची. एकदा आव्हान स्वीकारल्यावर ती व्यक्ती प्रत्यक्ष कसोटीच्या वेळी हजर झाली नाही तर ती ठेव जप्त होईल. त्यामुळे आव्हान स्वीकारण्यास अंनिसकडे वारेमाप व्यक्तींची पत्रे येण्याचे टळते. वैज्ञानिक कसोटीची सर्व पूर्वतयारी अंनिस करेल, पोलीस संरक्षणाखाली कसोटी पार पडेल, प्रेक्षकांची संख्या नियंत्रित असेल, चमत्कार करून दाखविणारा अपघात होवू न देण्याची खात्री देईल अशा अटी करारपत्रामध्ये असतात.
शंका विरुद्ध श्रद्धा: अन्वेषक वृत्तीची जोपासना: अन्वेषक वृत्ती जोपासण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते लोकांना खेळाच्या माध्यमातून काही सोपे प्राथमिक धडे शिकवतात. स्वतःची ज्ञानेंद्रियेच स्वतःला फसवू शकतात म्हणून असाधारण वा अलौकिक वाटणार्या घटना तपासायला हव्यात (जसे अंधारामध्ये भुताची आकृती दिसणं); पंचेंद्रियांपैकी कोणत्याही एकाच इंद्रियाकडून मिळणार्या संदेशावर पूर्णपणे विसंबू नये (कारण माहिती 85% डोळ्यांकडून, 9% कानांकडून, 3.5% घ्राणेंद्रियांकडून, 1.5% त्वचेकडून आणि 1% जिभेकडून मिळत असते); पुरेसा पुरावा नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये (कोणत्याही माणसाच्या बोलण्यावर, कधीही, कुठेही अंधपणे विश्वास ठेवू नये कारण ती व्यक्ती तुम्हाला फसवू शकते, आपण स्वतः शहानिशा करायला हवी.); पालकांनीच आपल्याला लहानपणी शिकविलेल्या गोष्टी सुद्धा विवेकशून्य श्रद्धा असू शकतात कारण हिंदूंच्या अनेक धार्मिक रूढी अंधविश्वासाला प्रोत्साहन देणार्या असतात आणि अन्याय आणि शोषणाची जडे असतात. (कारण बहुतेक पालकांना विज्ञान शिकायची संधी मिळालेली नसते, त्या उलट तुम्ही विद्यार्थी शाळेमधे विज्ञान शिकत आहात.)
भुते, मन आणि स्त्रिया:
केवळ तीन शतकांपूर्वी 15व्या व 16व्या शतकांमधे युरोपात हजारो स्त्रियांना चेटकिणी ठरवून जिवंत जाळण्यात आले होते. अखेरीस इंग्लंडमध्ये त्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली. अगदी अलिकडे मागील शतकामध्ये पाश्चिमात्य देशातील अनेक स्त्रियांना भुताने अगर देव्यांनी झपाटल्याच्या घटना घडल्या; आता त्या थांबल्या आहेत.कारण पाश्चात्य देशांनी या सर्व भोळ्या भाभड्या बायकांना त्यांच्या देव्या आणि भुतांसकट भारतामधे पाठवून दिले आहे. आणि भारतामध्ये उदंड झालेल्या बाबाबुवांना आपल्या देशात आश्रय दिला आहे. असे डॉ. दाभोलकरांनी एका ठिकाणी म्हटले आहे.
भूत कसं दिसतं असं विचारल्यावर खेड्यातील कोणीही इसम पटकन भुताचे वर्णन करेल, ’भुताची पाउले उलटी असतात; त्यांच्या कपाळावर डोळे असतात; कपाळावर डोळे नसल्यास त्यांचे डोळे छातीवर नाहीतर पाठीवर असतात; भुतांची सावली पडत नाही; भुते निर्मनुष्य ठिकाणी राहतात; महिलांची भुते पांढरी किंवा काळी साडी नेसतात; ब्रह्मराक्षस, हडळ असे भुतांचे वेगवेगळे प्रकार असतात.’ लोकांना भुतांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीही माहीत असतात. भुुते अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जास्त सक्रीय होतात असेही लोकांना वाटते. परंतु तुम्ही स्वतः भूत पाहिले आहे का असं विचारल्यास त्याचं मात्र उत्तर मिळत नाही. मात्र एका कार्यक्रमात एका 15 वर्षेवयाच्या मुलीने तिला भुताचा अनुभव आलेला आहे आणि जसे तुम्ही-आम्ही आहोत तशीच भुतेही असतात असे ठासून आंगितले. तिची अंनिसच्या एका महिला कार्यकर्तीशी बराच वेळ हुज्जत घालून झाल्यावर शाळेच्या शिक्षकांनी तिला समजावून सांगितले. आणि इतर मुले हसू लागली.
अंनिसच्या कार्यक्रमांमध्ये भूत या विषयाचे बरेच महत्त्व आहे. ते भूतशोध मोहिमा राबवतात. असा एक मोठा ‘शोध भुताचा-बोध मनाचा’ या नावाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधे राबविण्यात आला. लोक भुतांवर का व कसा विश्वास ठेवतात हे स्पष्ट करण्यासाठी विवेकवादी मानवी मनाचं कार्य कसं चालतं आणि त्यांचं (विवेकवादींचं) भुताने झपाटणं आणि मानसिक आरोग्य या दोन गोष्टींमधल्या संबंधाबाबतचे परिप्रेक्ष लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा श्रद्धा व अनुभव आणि रूढींनी लादलेल्या वेडगळ संकल्पना नीट तपासून पहाण्याचे महत्त्व पटविण्याचा प्रयत्न होतो.
भुतं आणि त्यांच्या चाळ्यांबाबत तसेच भूत उतरविण्याबाबत लोकांच्या मनातील अंधविश्वासाचा बाबाबुवा कसा फायदा उठवतात या बाबतची अंनिसची सैद्धांतिक मांडणी तसेच मन, मनाचे आजार आणि स्त्रिया याबाबतचे विवेकवादींचे परिप्रेक्ष याची थोडक्यात चर्चा करू या.
विवेकवादी प्रथम बाबाबुवांच्या अघोरी उपायांवर तसेच परंपराग्रस्त हिंदु धर्म आणि संस्कृतीमधे स्त्रियांवर कसा अत्याचार होत असतो यावर बोट ठेवतात. त्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते भूत उतरविण्याचे प्रात्यक्षिक दाखवितात. ‘भूताने झपाटल्याची भूमिका करायला कोण तयार आहे’ असे प्रेक्षकांना विचारतात. त्यांच्यातूनच एखाद्या मुलीस व्यासपीठावर बोलावतात. हा सर्व प्रसंग वास्तव वाटण्यासाठी त्याबरोबर एक गोष्ट सांगतात. 11 वर्षांची ही मुलगी रत्नमाला हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी आहे. पण तिला परिक्षेची धास्ती वाटते कारण ऐन परिक्षेच्या वेळी ती सर्व काही विसरून जाते. आपल्या मुलीपुढे काहीतरी समस्या आहे हे तिची आई जाणते. पण ती आजारी असल्याचे शारीरिक लक्षण-ताप, सर्दि-खोकला, डोकं दुखणं इत्यादी- काहीच दिसत नाही; मनाच्या आजाराची लक्षणे तर माहीतच नसतात आणि दिसतही नाहीत. रत्नमाला हळूहळू अशक्त मात्र होत जाते. मग आई तिला एका बाबाकडे नेते. बाबा तिला भुताने झपाटले आहे आणि ते उतरविल्यास ती ठणठणीत बरी होईल असे सांगतो. हे चर्हाट चालू असताना व्यासपीठावरील खरी रत्नमाला पुढे काय होणार या काळजीत उभी असते.
त्यानंतर बाबा काय करतात त्याचे प्रात्यक्षिक या रत्नमालेवर सुरू होते. तांदूळाने गच्च भरलेल्या भांड्यामधे त्रिशूळ (किंवा त्याजागी वापरण्यात येणारा स्क्रू ड्रायव्हर) खुपसून ते भांडे रत्नमालेच्या डोक्याभोवती फिरवले जाते. मांत्रिकांच्या तथाकथित मंत्रांचे विडंबन करणारी निरर्थक बडबड चालूच असते. भुताला रत्नमालेला सोडून देण्याचा आदेश देण्यात येतो. त्याला धमकी देण्यात येते, ‘रत्नमालेला सोडून तांदूळाच्या भांड्यात जा आणि पुन्हा कुणालाही झपाटण्याचा प्रयत्न करू नकोस.’ हे सांगत असतांना भांडयामध्ये त्रिशूळ पुन्हा पुन्हा खुपसून उचलले जात असल्याचे प्रेक्षकांना दाखविण्यात येते. काही वेळानंतर त्रिशूळ भांद्यात अडकून बसते. त्रिशूळ उचल्यावर भांडेही उचलले जाते. बघणारे आवाक होतात आणि कार्यकर्ता मोठ्या विजयी मुद्रेने सांगतो, ‘बघा रत्नमालेचे भूत आता या भांड्यामधे अडकले आहे. म्हणून भांडे उचलले जाते. हिचे भूत उतरविल्याबद्दल तुम्ही मला 500 रुपये द्यायला हवेत.’ अर्थातच भांडं का उचललं गेलं नाही याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्यात येतं कारण हाच महत्त्वाचा भाग असतो.
त्यानंतर कार्यकर्त्यांच्याच अंगात येतं आणि ते घुमायला लागतात. ते पाहून समोर बसलेल्या प्रेक्षकांना हसू येतं. विवेकवादींच्या दृष्टीने अंगांत येणं ही संकल्पनाच हास्यास्पद आहे आणि झपाटलेल्या व्यक्तींच्या अनियंत्रित हालचाली नुसत्या विलक्षणच नसतात तर त्या व्यक्तीच्या भयानक अविवेकाचं/मूर्खपणाचं द्योतक असतात. अंनिसच्या मते भुताचा व भुताने झपाटल्याचा अनुभव म्हणजे ढोंग तरी असतं नाहीतर मानसिक रोग असतो. त्यांच्या या मताला आगरकर आणि कोवूर यांच्या कार्याचा आधार आहे. त्यांच्या मते झपाटण्याचे चार प्रकार असतात- ढोंग (प्रिटेन्स), संस्कार, सूचना (सजेशन) आणि संवेदनभ्रम (सेन्सरी इल्यूजन). ढोंग हा प्रकार सर्वत्र आढळतो. अंगात आल्याचं ढोंग करण्यामधे त्या व्यक्तीचा किंवा इतर संबंधितांचा काहीना काही फायदा असतो आणि त्यावर उपाय म्हणजे त्याचे कारण शोधून त्याची ढोंग करण्यामागची गरज मिटवणं. संस्कारांमुळे झपाटण्यामधील भुताचे अस्तित्व अगदी लहान वयातच मुलांच्या मनावर बिंबवलेले असते; त्यामुळे अगदी विवेकनिष्ठ व्यक्तीसुद्धा असामान्य परिस्थितीमधे भुताच्या शंकेने व्याकुळ होतात. एखाद्याने भुताच्या अस्तित्वाबद्दल ठासून सांगितल्यास ती सूचना समोरचा माणूस स्वीकारतो आणि बालपणी झालेल्या संस्कारानुसार भूत पाहिल्याप्रमाणे किंवा झपाटल्यासारखे आचरण करू लागतो. चौथा प्रकार संवेदनभ्रम म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे होणारे आभास. याबाबत अंनिसचे कार्यकर्ते काय करतात ते आधीच पाहिले आहे. झपाटण्यामधे किंवा भुताचा अनुभव येण्यामधे कधी कधी एकापेक्षा जास्त प्रकार किंवा सर्वच प्रकार असू शकतात.
मनाच्या आजारामुळे भुताचे अनुभव येणं हा प्रकारही ह्या पुस्तकात सविसरपणे मांडला आहे. मनाच्या या आजाराचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मज्जाविकृती (न्यूरॉसिस) व दुसरा चित्तविकृती (सायकॉसिस) . उन्माद (हिस्टेरिया) किंवा तात्पुरते मानसिक विघटन हा न्यूरोसिसमधला एक प्रकार आहे. हा मानसिक रोग सासरी छळ होत असणार्या सुनेच्या बाबतीत कसा उद्भवतो याचे दाभोळकरांच्या पुस्तकातले वर्णन जॉन यांनी थोडक्यात उधृत केले आहे. हा रोग, त्याला कारणीभूत असलेली विवाहित तरुणींना सासरी मिळणारी वागणूक, आणि त्यांची कौटुंबिक-सामाजिक अवस्था आणि यावरील उपाय यांची प्राथमिक माहिती डॉ.दाभोळकरांच्या पुस्तकातूनच वाचायला हवी.
लोक मानसोपचार तज्ञांकडे न जाता बाबाबुवांकडे का जातात याबाबत जॉन यांनी अंनिस या संस्थेशी संबंधित किंवा पाठिंबा देणार्या काही मानसोपचारतज्ञांशी चर्चा केली. त्यांचे अभिप्राय त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. हे बाबाबुवा कसे असतात, त्यांचे पूर्वचरित्र काय असते, त्यांचे उपाय लोकांच्यातील अन्वेषण वृत्तीला कसे बाधक ठरतात, त्यांच्यामुळे अनेक अविवेकी व घातक उपाय करणार्यांना कसे मोक ळे रान मिळते, भोंदूंच्या चमत्कारांना बळकटी मिळते इत्यादी सर्व वाईट परिणामांची सविस्तर माहिती डॉ.दाभोलकर यांच्या पुस्तकात दिलेली आहे.
‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ यामध्ये डॉ.दाभोलकर सुरुवातीसच म्हणतात, ‘जेव्हा माणूस आपल्या हातातल्या बेड्यांनाच फुलांचे हार समजू लागतात तेव्हा त्यांना कोण जागं करणार आणि सांगणार ‘मूर्खांनो उठा, तुमच्या हातातल्या त्या बेड्या तोडा आणि स्वत:ची सुटका करा’. बायकांच्या बाबतीत तर त्यांच्या अंधश्रद्धाच त्यांचं शोषण करणार्याला मदत करतात. या तापदायी अंधश्रद्धा आणि रूढींचं जतन करण्यात त्यांना कृतकृत्य झाल्याचे समाधान वाटते. त्यामुळे त्यांचं किती प्रकारे शोषण होत असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. कोणी सांगितलं तर त्यांना पटणारही नाही. अंधश्रद्धांना तिलांजली देण्याऐवजी त्या मोठ्या धार्मिकतेने त्यांना जिवंत ठेवण्यात धन्यता मानतात. अशा तर्हेने बळकट झालेली पिढ्यांपिढ्यांची मानसिक गुलामी ही अंधश्रद्धेविरुद्धच्या लढयातील फार मोठी समस्या आहे.
जॉन यांच्या मते वरील विधानातून स्त्रियांबाबतचा अंनिसचा दृष्टिकोन, ‘स्त्रिया गुलामगिरीत आहेत आणि त्यांना त्यांच्या या असहाय्य स्थितीतून अंनिससारख्या पुरुषप्रधान संघटनांनी सुटका करायला हवी’ असा काहीसा पालकांनी अजाण लहानांची काळजी वाहण्याचा पवित्रा वाटतो. हा वडीलकीचा पवित्रा ‘अडाणी खेडुतां’च्या बाबतीतही दिसून येतो. त्यांना त्यांच्या मागासलेपणातून आणि विवेकशून्यतेतून विवेकवादींनीच बाहेर काढायला हवे असा दृष्टिकोन अंनिसच्या चळवळीमधे आणि एकूणच सर्व कार्यक्रमांमधे दिसून येतो. झपाटणं आणि मनाचे आजार या कार्यक्रमांमधे तर जास्तच दिसतो. एकूणच भारतातील विवेकवादी चळवळींमधील स्त्रीपुरुष विषमता आणि पुरूषप्रधानता यावर बरीच चर्चा करण्यासारखी आहे असं जॉन यांना वाटतं. परंतु इथे त्यांच्याशी अंनिसच्या कार्यकर्त्यांचे दुमत होणे स्वाभाविक आहे. एकतर पुरुषप्रधानता म्हणजे -चळवळीमधे स्त्रियांपेक्षा पुरूष संख्येने जास्त असणं-हे पुरषी वर्चस्व नव्हे. दुसरी गोष्ट ही की दाभोलकरांच्या वरील उतार्यामधे केवळ स्त्रियांच्या मनस्थितीचं वास्तव वर्णन आहे. त्यांना कनिष्ठ लेखण्याचा हेतु नसून त्यांची स्थिती सुधारण्यामधे नेमकी अडचण कुठे आहे हे स्पष्ट केले आहे. शिवाय तुम्हीच जाग्या व्हा, बेड्या तोडून टाका आणि स्वतःला स्वतंत्र करा असा संदेशही आहे.
तसंच स्त्रियांच्या आणि खेड्यातल्या लोकांच्या दुय्यम दर्जाला केवळ पुरुषप्रधानता आणि सुशिक्षित वर्ग जबाबदार आहे आणि पुरुषांनीच आणि सुशिक्षितांनीच त्यांची उन्नती करायला हवी असं मानणं म्हणजे इतर अनेक धार्मिक-आर्थिक-सामाजिक घटकांचे परिणाम व त्यातून निर्माण होणारी जबाबदारी नाकारण्यासारखे आहे. विवेकवादी चळवळींमधे प्रत्यक्ष काम करणार्या स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा खूप कमी असण्याची कारणे-स्त्रियांना आतापावेतो उच्च शिक्षणाची संधी न मिळणं, त्यांच्या फार वेळ घराबाहेर राहण्याबाबत समाजात व त्यांच्या कुटुंबात आणि विशेषतः त्यांच्या मुलांच्या मनात असलेली नापसंती, आणि स्वतः स्त्रियांनीच इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा संसाराला (मुले, पती आणि वडिलधारे यांच्या गरजा आणि अपेक्षा पुरविणे) दिलेली प्राथमिकता-हीही आहेत. पाश्चात्य देशांमधेही बर्याच प्रमाणात असंच चित्र दिसून येतं.
जॉन यांनी हेही नमूद केलं आहे की कार्यकर्ते स्त्रियांना जीवशास्त्रदृष्ट्या पुरुषांपेक्षा कोणत्याही बाबतीत कनिष्ठ किंवा दुय्यम दर्जाच्या मानीत नाहीत. तसेच त्यांच्या मते सर्व मानव जन्मतः बुद्धिवान प्राणी असल्याने समान असतात. रूढी, धर्म आणि सांस्कृती यामधून निर्माण होणार्या सामाजिक समस्यांमुळे काही स्त्रिया व पुरुष असहाय्य असतात. यावरील उपायांचाही ऊहापोह अंनिसने ‘यावर उपाय काय’ अशा मथळ्याच्या एका पत्रकात केलेला आहे. त्याचा उपयोग अंनिसचे कार्यकर्ते आपल्या कार्यक्रमातून करीत असतात.
या बाबतीत अंनिसचा वेगळेपणा हा की झपाटणे, अंगात येणे वगैरे मानसिक रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी कौटुंबिक व त्याबरोबरच काही अंशी त्याला जबाबदार असलेली समस्याग्रस्त सामाजिक परिस्थिती बदलायला हवी; आणि असं व्यापक परिवर्तन घडवून आणणं हे अंनिसचं उद्दिष्ट आहे याची सतत जाणीव असणं. सार्वजनिक क्षेत्रामधून स्त्रियांना वगळून त्यांचा दर्जा कायम दुय्यम राखण्याचा व पुरुषी वर्चस्वाला मान्यता देण्याचं कारस्थान सर्वच धर्मांनी केलेलं आहे. भारतात हे वर्चस्व सर्वच क्षेत्रांमधे अजून मोठ्या प्रमाणात दिसून येतं. असमानतेची ही शेकडो वर्षे धर्मामधे आणि रूढींमधे रुतलेली मुळे उखडून काढण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणं अत्यावश्यक आहे आणि अंनिसचे महत्त्वाचे उद्दिष्टही आहे.
अंनिसच्या या विज्ञानबोधवाहिनीच्या कार्यक्रमातील शेवटचा प्रयोग म्हणजे भगवी वस्त्रं घालून लोकांना फसविणार्यांचं ढोंग उघडकीस आणणं. हे विभूती समजले जाणारे महान लोक आपण खूप तपश्चर्या करून काही सिद्धी प्राप्त केल्या असल्याचे लोकांना भासवतात. त्यांचा बहाणा असा असतो: ते मन एकाग्र करून समाधी लावतात. मग त्यांच्यात अलौकिक दैवी शक्ती संचरते. ते जळती कापराची वडी आपल्या तळहातावर घेतात; ती तोंडातही घालतात व लगेच तोंड मिटवून ती विझवून टाकतात. कापराचा दाह त्यांना प्राप्त असलेल्या दैवी शक्तीमुळे त्यांना काहीही इजा करू शकत नाही असा त्यांचा दावा असतो.
अंनिसचे कार्यकर्तेही ह्या सर्व गोष्टी करतात आणि लोकांना दाखवतात की जळता कापूर हात भाजत नाही आणि त्या साठी दैवी शक्तीची आवश्यकता नाही. ढोंगी बाबाबुवा स्वतःला इजा होईल अशी कोणतीच गोष्ट करीत नाहीत. स्वतःलाच इजा होईल अशा गोष्टी करणारे लोक मानसिक रुग्ण असतात. नंतर कार्यकर्ते या प्रयोगाचे स्पष्टीकरण देतांना सांगतात, ‘अंगात आलेल्या एखाद्या बाईला (किंवा बाबाला) सांगा की कापूर सारखा ह्या हातावरून त्या हातावर असा बदलू नका, एकाच हातावर धरून ठेवा. किंवा तळहाताऐवजी पंजाच्या मागच्या बाजूवर कापूर ठेवा किंवा लोखंडाची तापलेली सळी हातात धरा.’ तसं करायला कोणीही तयार होणार नाही. याचं कारण असं की हे सर्व ढोंगी लोक ज्या गोष्टी करणं शक्य असतं त्याच गोष्टी करतात. अशक्य असलेल्या किवा तापदायक गोष्टी करीत नाहीत. यावरून अंगात येणं हे ढोंग आहे का मानसिक आजार हे लागलीच समजतं. आता तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवणार का? लोकांकडून अर्थातच नाही असं अपेक्षित उत्तर येतं.
इहवादी आधुनिकता:
लोकांनी विवेकनिष्ठ जीवन जगावं यासाठी सामान्य माणसांची मनं कशी जिंकता येतील यावर कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून नियमीतपणे चर्चा होत असते. त्यातून कार्यक्रम व त्यामागची तर्कशुद्ध वैचारिक मांडणी यांची आखणी कार्यकर्ते करतात. त्यासाठी प्रशिक्षण शिबिरेही भरविली जातात. आधुनिक काळातील लोक पूर्वीइतके श्रद्धाळू असू शकत नाहीत. कोणत्या ना कोणत्या धार्मिक किंवा अलौकिक गोष्टी/घटनांविषयी शंका किंवा विरोध त्यांच्या मनामध्ये असतोच. पूर्वीच्या काळी लोक जास्त श्रद्धाळू असल्यामुळे त्यांना अलौकिक शक्तीचा (भ्रामक) प्रभाव जाणवत असे. आणि त्यालाच ते भोळेपणाने वास्तव समजत असंत. त्याउलट आता लोकांच्या मनात धर्म-रूढी-श्रद्धा यांच्याविषयी शंका असतात. आणि त्याबाबत ते स्वतंत्र चिंतन करतात. समाजमानसात पाश्चात्य देशांमधे झालेला हा फरक भारतीय समाजातही घडवून आणण्याचा प्रयत्न विवेकवादी करीत आहेत. विज्ञानवाहिनीच्या कार्यक्रमांमधून लोकांचा भ्रामक श्रद्धाळूपणा, त्यांचं अलौकिक शक्तीच्या आभासाने भारावून जाणं, भुताखेतांची धास्ती घेणं इत्यादी नाहीसं करून त्यांना विचार करायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असतो.
‘झपाटणं’ ही घटना अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या मते ढोंग तरी असतं किंवा मनाचा आजार तरी असतो. त्यांच्या मते ह्यातून आणखी कोणताही अर्थ निघू शकत नाही. पण इथे हेही लक्षात घ्यायला पाहिजे की भारावलेल्या (एन्चान्टेड) दुनियेतील जगणं आणि इहलोकीच्या वास्तव दुनियेत जगणं यातील फरक प्रत्येकाला येणार्या अनुभवांवर अवलंबून असतो. या अनुभवांची पार्श्वभूमी प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे लोकांना त्यांचे विश्वास त्यांच्या श्रद्धा चुकीच्या आहेत एवढे पटवून दिले म्हणजे आपले काम यशस्वी झाले असं समजण्याचं कारण नाही. लोकांना आलेले अनुभव (उदा: भूत दिसणं, झपाटणं इत्यादी) तर्कशुद्ध वैज्ञानिक ज्ञानाने नाहीसे होत नाहीत; या अनुभवातून निर्माण झालेला त्यांचा अलौकिक संकल्पनांनी बनलेला भारावलेपणाचा दृष्टिकोन बौद्धिक चर्चेतून नाहिसा होत नाही. त्यांच्या मते अलौकिक शक्तींचं अस्तित्व, आत्मा-भूतखेत इत्यादींची मानवी जीवनातील लुडबूड ह्या गोष्टी नुसत्याच शक्य नव्हेत तर वास्तवात घडत असतात. या आधी आपण पाहिलं आहे की एका 15-16वर्षाच्या विद्यार्थिनीने अंनिसच्या एका कार्यक्रमात तिला आलेला भुतांचा अनुभव खरा आहे असे पुन्हा पुन्हा ठासून सांगितले होते. हा तिचा भ्रम असला तरी तिला ढोंगी किंवा मनोरुग्ण समजण्याचे कारण नाही. श्रद्धाळू लोकांच्या मते भूतखेत व अलौकिक शक्ती आपल्या समोर असलेल्या टेबल-खुर्ची इतक्याच खर्याखुर्या असतात. वास्तव असतात. हे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वच विवेकवादींनी श्रद्धाळूंशी संवाद साधतांना सदैव ध्यानात ठेवायला हवं.
अंनिसची संघटनात्मक संरचना आणि स्वरूप
महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांपैकी 27 जिल्ह्यांमधे अंनिसच्या 180 स्थानिक शाखांचे जाळे पसरले आहे. महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांमध्ये 353 तालुके आहेत आणि जवळच्या भविष्यामधे अंनिसचा प्रत्येक तालुक्यामधे आपली शाखा सुरू करण्याचा इरादा आहे. धुळे, नांदेड आणि कोल्हापूर या तीन शहरांच्या त्रिकोणामधील भागातून अंनिसला भरघोस पाठिंबा मिळतो. ग्रामीण तसेच शहरी या दोन्ही भागातून अंनिस चे सभासद आणि चाहते आहेत. अंनिसचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. दाभोलकर हे अंनिसचे सूत्रसंचालक आहेत. 1970 मधे एमबीबीएसची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी काही काळ वैद्यकी व्यवसायांत घालविला. पण त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्याला स्वतःला वाहून घेण्याचे ठरविले. ते बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीत सहभागी झाले होते. अंनिसखेरीज त्यांनी ‘परिवर्तन’ नावाची आणखी एक संस्था व्यसनमुक्तीसाठी स्थापन केली आहे. अंनिसशी संबंधित असलेल्या त्यांच्या ‘विवेकवाहिनी’ या संस्थेचेही ते अध्यक्ष आहेत. महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रशिक्षण या संस्थेद्वारे दिले जाते. त्यांच्या बोलण्यातला मोकळेपणा आणि ठामपणा त्यांचा स्वतःच्या विचारांबाबत दृढनिश्चय किती आहे हे स्पष्ट करतात. उदात्त साध्य आणि निर्मळ साधनं यांच्यामुळे त्यांना काहीच लपविण्याची गरज नसते.
दाभोलकर जरी सर्वात प्रभावी नेते असले आणि अंनिसचे सूत्रसंचालक असले तरी इतर विवेकवादी संघटनांप्रमाणे अंनिसचे भवितव्य नियतीच्या हाती सोपवलेले नाही. अंनिसच्या संरचनेमधे पदानुक्रम (हायरार्की) समान्तर पातळीचा असतो. दाभोलकरांच्या बरोबर दुसरे कार्यकारी अध्यक्ष अविनाश पाटील यांनीही पूर्णवेळ संघटनेला वाहून घेतले आहे. संघटनेचे मानद अध्यक्ष एन डी पाटील आहेत. डॉ. प्रदीप जोशी, विजय सालंकर आणि अनिरुद्ध जाधव हे तीन उपाध्यक्ष असून मिलिंद देशमुख आणि सुशिला मुंडे असे दोन सचीव आहेत. राज्यपातळी, जिल्हापातळी आणि तालुकापातळी अशा तीन पातळींवर अंनिसचे कार्य चालते. प्रत्यक्ष तृणमूल पातळीवरील काम स्थानिक एककं करीत असतात. यांची दर आठवड्याला बैठक होत असते आणि तालुका आणि जिल्हा पातळीवरील आपले प्रतिनिधी ही स्थानिक एकके निवडतात. हे निवडून आलेले प्रतिनिधी राज्यपातळी वरील समन्वय समितीच्या सभासदांची निवड करतात. समन्वय समितीच्या बैठकी दर तीन महिन्यांनी होतात आणि त्यामधे 10 ते 15 प्रतिनिधी हजर असतात. याशिवाय वर्षातून चार राज्य पातळी वरील बैठका होतात या बैठकांना कोणीही कार्यकर्ता हजर राहू शकतो आणि नियोजन आणि निर्णय प्रक्रियेमधे भाग घेवू शकतो. सर्व कार्यकर्त्यांना अंनिस संघटनेच्या कामाची माहिती देण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्ग घेत असते. विशिष्ट कार्यक्रमासाठी संघटनेबाहेरील संस्थांमधेही प्रशिक्षणासाठी कार्यकर्ते पाठविले जातात. यासाठी सर्व क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेतला जातो. भ्रामक वास्तुशास्त्रासाठी एका आर्किटेक्टने एक छोटेसे पुस्तकच लिहिले आहे. झपाटणं इत्यादी घटनांच्या संदर्भात मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेतला जातो. स्वतः दाभोलकरांनी अंनिसच्या ध्येय, कार्य, कार्यपद्धती, इत्यादींविषयी पुस्तके लिहिली आहेत.
अंनिसची घडण प्रत्यक्षात पूर्ण विकेंद्रित आहे. राज्यसमितीच्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्ते मिळून लोकशाही पद्धतीने निर्णय घेतात. आठ सभासदांच्या कार्यकारी समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाते. मराठवाडा, खानदेश, कोकण, विदर्भ आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र या पाच विभागांच्या जिल्हा व स्थानिक समित्यांचे नेतृत्व करणारा प्रत्येकी एक प्रतिनिधी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस हजर असतो. त्याशिवाय राज्यकार्यकारिणीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, वार्तापत्राची वर्गणी, चमत्कारांची प्रात्यक्षिके, कार्यकर्त्यांचे संघटन व शिक्षकांसाठी कार्यशाळा इत्यादींचे सचीव व एक महिला प्रतिनिधी एवढे सभासद असतात.
कार्यकर्ते वर्षाला पाचशे रुपये किंवा त्यांच्या मिळकतीतील 2% देतात. कार्यकर्त्यांनी किमान 50% बैठकींना हजर राहणे अपेक्षित असते. त्यांना त्यांच्या कामासाठी काहीही मानधन दिले जात नाही. अंनिससाठी त्यांना जी पदरमोड करावी लागेल तेवढीच रक्कम त्यांना दिली जाते. कार्यकर्त्यांची अंनिसच्या ध्येयावरील निष्ठा आणि कार्याशी असलेली बांधिलकी हाच या चळवळीचा कणा आहे.
जॉन यांना अंनिसच्या बैठकांमध्ये किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्याची पूर्ण मोकळीक होती. अशी मोकळीक इतर कोणत्याही विवेकवादी संघटनेने त्यांना दिली नाही असे त्यांनी नमूद केले आहे. एवढ्या विशाल संघटनेला नियमितपणे बैठकी घेवून ठिकठिकाणी होत असलेल्या कामांमधे मेळ साधणं आवश्यक असतं. या बैठकींमधून दिसून येणारं विवेकवादी चैतन्य (स्पिरिट) वाचकांच्या लक्षात येण्यासाठी जॉन ऑगस्ट 2007 मधे डोंबिवलीत भरलेल्या बैठकीचं एक प्रातिनिधिक बैठक म्हणून वर्णन करतात. ज्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याची इच्छा असेल ते सर्व या बैठकीला हजर राहू शकतात; संघटनात्मक, रणनीतीबाबत आणि वैचारिक चर्चेत भाग घेता येतो तसेच योजना आखण्यात आणि निर्णय घेण्यामधेही योगदान देता येते. कामाबरोबर कार्यकर्त्यांना आपल्या जुन्या सहकारी मित्रांच्या भेटीगाठींचाही आनंद मिळतो. डोंबिवलीच्या बैठकीमध्ये बरेचसे डोंबिवलीचे स्थानिक कार्यकर्ते आणि बाहेरून आलेले 40 असे एकूण बरेच सभासद होते. बैठकीची, राहण्याची, खाण्यापिण्याची इत्यादी सर्व व्यवस्था डोंबिवलीच्या स्थानिक सभासदांनी केली होती.
बैठकीच्या कामकाजाचं स्वरूप साधारणपणे असे होते: पहिल्या दिवशी डॉ. दाभोलकरांनी आणि स्थानिक अध्यक्षांनी दुपारी बैठकीला सुरुवात केली. बरेच महत्त्वाचे काम पार पाडायचे असल्याने वेळ दवडल्यास चहासाठी राखून ठेवलेलं मध्यंतर आखडतं घ्यावं लागेल हे सुरुवातीसच स्पष्ट केलं गेलं. बैठक सुरू होताच सकाळचं अघळपघळ मैत्रीचं वातावरण एकदम गंभीर झालं आणि सर्वांनी कामावर लक्ष केंद्रित केलं. सर्व कार्यकर्ते विधायक सामाजिक कार्यासाठी उत्सुक होते; कोणत्याही कामासाठी मदतीची हाक आली तर अनेक स्वयंसेवक लागलीच पुढे यायचे. केव्हा केव्हा चर्चा तीव्र होवून वातावरण तापायचं. परंतु सर्वांच्या समान चिंता, अंनिसच्या कामाबाबत असलेली कळकळ आणि ध्येयावरची निष्ठा सार्या विवादावर आणि मतभेदांवर मात करतांना जाणवायचे. विनोद, आठवणी आणि अलिकडे घडलेल्या गोष्टी सांगण्याने वातावरणातले गांभिर्य नाहीसे व्हायचे.
सर्वात जास्त जाणवणारी गोष्ट म्हणजे म्हणजे मधून मधून म्हटली जाणारी विवेकवादी गाणी. त्यांच्यामुळे अंनिस इतर अनेक विवेकवादी संघटनांपेक्षा खूपच वेगळी वाटते आणि केवळ एक वादविवादमंडळ न राहता खूप जास्त कार्यक्षम आणि कृतिप्रवण संघटना बनली आहे. बौद्धिक वितंडवाद आणि अमूर्त वैचारिक ऊहापोह इथे नसतो. त्याऐवजी इथे दिसून येतं व्यापक विवेकवादी चळवळीचं सामूहिक-सामाजिक महत्त्व. हीच गाणी अंनिसच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधे गायली जायची तेव्हा ते केवळ एक शैक्षणिक प्रचाराचं साधन वाटायचं. पण बैठकींमधल्या गाण्यांमुळे सभासदांच्यामधले आपसातील संबंध जिव्हाळ्याचे होतात हा गाणी गाण्याचा मोठा फायदा आहे. सर्व सभासदांना सर्व गाणी तोंडपाठ असतात. यातून अंनिसची चळवळ किती सक्रीय आणि स्फूर्तिदायी आहे हे दिसून येतं. गाण्यानेच सर्व बैठकी सुरू होतात आणि जमलेले सारे सभासद रात्री झोपण्याअगोदर समूहगाणी गातात. काही सभासद पहाटेपर्यंत चर्चा करतात; त्यामधेही मधून मधून गाणी होतातच.
आणखी एक गोष्ट ठळकपणे दिसते. एकही सभासद बुजरा वाटत नाही. प्रत्येकजण आपलं म्हणणं अगदी ठासून मांडत असतो. आपापसात बोलताना, जेष्ठ सभासदांशी बोलताना किंवा जॉन यांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारताना प्रत्येक लहान-मोठा सभासद समोरासमोर मोकळेपणाने कोणताही आडपडदा न बाळगता दुसर्याशी बोलतो. हा अंनिसच्या समान्तर पदानुक्रमाचा आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा परिणाम असावा. इथे प्रत्येकाच्या छोट्या-मोठ्या योगदानाची दखल घेतली जाते. कार्यकर्त्यांना स्वतःच्या कामाचा आढावा घेण्याचा, तो लोकांपुढे सादर करण्याचा आणि त्यावर होणार्या टीकेला समर्पक उत्तरे देवून आपले म्हणणे मांडण्याचा सराव झालेला आहे. सर्व कार्यकर्त्यांच्यात आत्मविश्वास दिसतो आणि आपल्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय याची त्यांना स्पष्ट आणि पक्की जाणीव असते.
याचं एक कारण हे असावं की दाभोलकर स्वतः ह्या बैठकांचं संचालन आणि मार्गदर्शन अत्यंत कुशलतेने करतात. सर्व चर्चांच्या आणि कृतींच्या ते केंद्रस्थानी असतात आणि इतर सभासद वेगवेगळ्या कामांसाठी जबाबदार असतात व त्यांच्या कामाविषयीच्या चर्चेचे संचालन करून निर्णय घेण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. परंतु दाभोलकर कोणतीही बैठक कधीही एकपात्री प्रयोग होवू देत नाहीत. नागपूरला भरलेल्या एका बैठकीमधे सर्व जेष्ठ सभासदांना एका प्रेस कॉन्फरन्ससाठी बैठक सोडून काही काळ बाहेर जावे लागले. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत मागे राहिलेल्या तरूण कार्यकर्त्यांनी बैठकीचे संचालन सुरळीतपणे केले. जेष्ठ सभासद परत आल्यानंतर सामान्य सभासदांबरोबर सतरंजीवर बसून चर्चा ऐकत राहिले आणि तरूण कार्यकर्त्यांनी सूत्रसंचालन चालू ठेवले. या सर्व गोष्टींमुळे अंनिस चळवळ म्हणजे एकखांबी तंबू तर नक्कीच नाही व जेष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनावरही पूर्णपणे अवलंबून नाही हे स्पष्ट होते. ही चळवळ आहे लहानमोठ्या कार्यकर्त्यांची एक मजबूत संघटना.
हे झालं सर्वसाधारण मोठ्या बैठकांचं स्वरूप. पण त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं चळवळीच्या समोर असलेल्या समस्यांची चर्चा, त्यावरील निर्णय व कार्यक्रमांची योजना लोकशाही पद्धतीने आखणे. चर्चेमधे येणारे मुद्दे/समस्या अशा: फिराच्या व तत्सम इतर बैठकींना प्रतिनिधी म्हणून हजर राहिलेल्या सभासदांचे, विज्ञानबोधवाहिनीचे व स्थानिक शाखांच्या कामाचे अहवाल सादर करणे; संघटनेला बळकटी आणण्याचे उपाय; तरुणांना संघटनेकडे आकर्षित करण्याचे उपाय; घातक अंधश्रद्धांच्या विरुद्धच्या कायद्याला पाठिंबा मिळविणं; वार्तापत्रासाठी नवीन वाचक वर्गणिदार मिळविणं; माध्यमांशी संवाद साधणं; समोर उभ्या असलेल्या समस्या सोडवणं, झालेल्या कामाची चिकित्सा करणं,इत्यादी इत्यादी. यातील काही मुद्यांची चर्चा करू.
अहवाल सादरीकरण:
नागपूरच्या बैठकीमध्ये अविनाश पाटील यांनी डाकीण प्रथेविरुद्ध चालू केलेल्या मोहिमेमधे आदिवासी समूहांच्या योगदानाविषयीचा अहवाल सादर केला. अयोेध्येला भरलेल्या फिराच्या संमेलनाचा अहवाल मिलिंद देशमुख यांनी सादर केला. दोन्ही विज्ञानबोध वाहिनींच्या अहवालावर बरीच चर्चा झाली. त्यांनी सोळा तालुक्यांमधील 63 शाळांमधे कार्यक्रम केले. 44880 रुपये देणगीदाखल मिळविले आणि 8879 रुपयांची पुस्तके विकली. सर्व सभासदांनी त्यांचं कौतुल केलं.
संघटनेला बळकटी आणणं:
नागपूरमध्ये नवीन सभासदांची नोंदणी करणं, देणग्या मिळविणं इत्यादी आर्थिक मुद्यांची चर्चा झाली. स्थानिक शाखांच्या बैठका व इतर संमेलनं नियमीतपणे कशी समायोजित करावीत, त्यातील चर्चेमधे कोणते विषय असावेत यावरही चर्चा झाली. या बाबतीत वर्षभर चर्चेत घेता येतील अशा अनेक विषयांवर दाभोलकरांनी एक पुस्तक लिहिले आहे. संघटनेला बळकटी आणण्यासाठी शहरातील/गावातील अंनिसच्या कार्याला पाठिंबा देतील अशा वकील, डॉक्टर इत्यादी जेष्ठ व्यावसायिकांची यादी बनवून त्यांना सभासद करून घ्यावे असा उपाय सुचविण्यात आला.
तरुणांना अंनिसच्या कार्याकडे आकर्षित करणं:
यावरची चर्चा महत्त्वाची होती आणि तितकीच रंगलीही. तरूण सभासदांनी लहान लहान गट बनवून बेकारी, जागतिकीकरण, जीवनसाथीची निवड, स्त्री-पुरूष विषमता, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन असे विषय निवडून त्यावर चर्चा करावी. त्यासाठी त्या त्या विषयाच्या तज्ञांनाही बोलवावे म्हणजे चर्चा खूप सखोल होईल असे काहींचे म्हणणे होते तर इतर काहींना याचा विवेकवादाशी काय संबंध असा प्रश्न पडला. बर्याच जणांनी जीवनाच्या प्रत्येक अंगास विवेकवाद भिडतो म्हणून अशा सर्व विषयांची चर्चा व्हावी; विवेकवाद काही मुद्द्यांपुरता संकुचित न करता तो विवेकी जीवनाचा सर्वस्पर्शी मार्ग व्हायला हवा असे मत मांडले.
वार्तापत्रासाठी वाचक वर्गणीदार मिळविणं : यासाठी वार्तापत्रात बरीच सुधारणा व्हायला हवी असे मत दिसले. दुसर्या समविचारी संघटनांच्या सभासदांचे लेख घ्यावेत म्हणजे भारताच्या इतर राज्यांमधे काय होते आहे हे समजेल अशी सूचना आली. अंनिसने फिराचे संमेलन पुण्यामध्ये आयोजित केले होते यावरून अंनिसच्या सभासदांमधे प्रगल्भता वाढत असल्याचे जाणवते.
माध्यमांशी संवाद साधणं: आपल्या प्रेक्षकांची संख्या (टीआरपी) वाढविण्यासाठी बहुतेक वाहिन्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसार-प्रचाराऐवजी अंधश्रद्धा आणि विवेकशून्य रूढी रिवाजांचाच संस्कृतीच्या नावाखाली प्रचार करीत असतात. याबाबतीत दाभोलकरांनी आय बी एन 7 या वाहिनीशी संपर्क साधून त्यांना सापळा रचून, गुप्त कॅमेर्याच्या सहाय्याने बाबाबुवांचे पर्दाफाश करणारे कार्यक्रम दाखविण्याची विनंती केली आहे आणि त्या दिशेने काही पाउले टाकली आहेत. अशी माहिती दिली.
अंधश्रद्धांविरोधी कायदा: विधानपरिषदेमध्ये हा कायदा मंजूर होण्यासाठी काय करायला हवे यावर बैठकीमधे सतत चर्चा होत असते. मुख्यमंत्री आणि समाजकल्याणमंत्री या दोघांना सर्व कार्यकर्त्यांनी पत्रे पाठवावीत व यामधे दलित व इतर मागास वर्गातील लोकांचा सहभाग मिळवावा असे उपाय सुचविण्यात आले.
सभासदांविषयी: अंनिसचे सभासद सर्व जातींचे आहेत. काही ब्राह्मणही आहेत. महात्मा फुले यांच्या पठडीतल्या या चळवळीचे नेते डॉ. दाभोलकर आणि काही इतर कार्यकर्ते ब्राह्मण जातीचे आहेत ही गोष्ट त्यांना मुळीच खुपत नाही. कारण या सर्वांनी आपली जात टाकून दिली आहे. उच्चजातीय लोकांना अंनिसमधून वगळणे म्हणजे जातपातीच्या भिंती बळकट करण्यासारखे आहे. त्या सर्वांचा धर्म मानवता हाच असतो. विवेकवादी असणं म्हणजे धर्म व जातपात यांच्या पलिकडे जाणं आहे. असं अंनिसचे सर्व सभासद मानतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातिसमूहांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातच अंनिसमध्येही सर्व जातींचे सभासद आहेत. कृतिशील कार्यकर्त्यां स्त्रियांची संख्या मात्र एकूण कार्यकर्त्यांच्या 1/5 पेक्षाही कमी आहे.
अंनिसच्या होम पेजवर स्त्री प्रश्नाविषयीचा मजकूर थोडक्यात असा आहे, ‘पुरुषी वर्चस्वाखालच्या समाजात स्त्रिया वर्षानुवर्षेगुलामगिरीत राहिल्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास आणि आत्मसन्मान हरवला आहे. जीवन सफल होण्याची काहीच आशा नसल्याने त्या स्वतःकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात आणि अंधश्रद्धेच्या आहारी जातात. —याची जाणीव स्त्रियांना आणि सर्व समाजाला करून द्यायला हवी. ह्या मानसिक दुरावस्थेतून व गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी ठोस कार्यक्रम आखायला हवेत.’ अंनिस स्त्रियांच्या प्रश्नाविषयी सजग आहे हेच लक्षात येते.
नियतकालिके: आपला संदेश लोकांपर्यंत पोचविण्यासाठी अंनिसची दोन नियतकालिके आहेत आणि 40पेक्षा जास्त मराठी व इंग्रजीमधील पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्याशिवाय वार्षिक व इतर अहवाल आणि होमपेजवरील मजकूरही छापले जातात. यामधील बहुतेक चर्चा महाराष्ट्रातील समस्यांशी निगडित असते. एखादं दोन लेख इतर विषयांवरही असतात.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘अंधश्रध्द्धा निर्मूलन वार्तापत्र’ नावाचे मासिकही गेली 20 वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होत आहे. त्याचे सुमारे 10 ते 15 हजार सभासद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा वार्षिकांकही प्रसिद्ध होतो. त्यासाठी कार्यकर्ते जाहिराती मिळवितात. ज्यांचा विनियोग संघटनेच्या वार्षिक खर्चासाठी केला जातो. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात केवळ अंनिसच्या सभा, बाबाबुवांचा पर्दाफाश किंवा भूत-भानामतीच्या घटनांची मुळे शोधून काढण्याचे कार्यक्रम याविषयीच माहिती असत नाही. तर त्यामध्ये इतरही मजकूर असतो, माणसाचं जगणंच विवेकपूर्ण व्हावं यासाठी अंनिसचे कार्यकर्ते विवेकवादी तत्त्वांचे पालन कसे करतात त्याची उदाहरणं-आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह, मुहूर्ता ऐवजी सोईस्कर दिवस निवडणं, जन्म-विवाह-अंत्यसंस्कार या जीवनाच्या धार्मिक विधी व त्यांच्यावरचा खर्च टाळणं, त्याऐवजी निधर्मी रीती अंगीकारणं- अशा गोष्टी वार्तापत्रामध्ये असतात. हेतु असा की ह्यामुळे प्रेरित होवून इतरांनीही त्यांचे अनुकरण करावे. त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरूष समता, जातीअंताचा लढा यासारखे विषयही हाताळले गेले जातात. आज हे वार्तापत्र केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेच नव्हे तर देशातील विवेकवादी चळवळीचे व्यासपीठ बनले आहे.
अंनिसचं दुसरं नियतकालिक ं‘थॉट अँड अॅक्शन’ (विचार आणि कृति पत्रिका) यामधे समस्यांची सैद्धांतिक चर्चा जास्त असते. याचा रोख इंग्रजी बोलणार्या भारतीय व इतर देशातील बुद्धिवादींकडे असतो.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटनांतर्गत ‘विचार कृती पत्रिका’ नावाचे मासिकही प्रसिद्ध केले जाते. यात संघटनांतर्गत प्रश्नांचा उहापोह केला जातो.
डॉ.दाभोलकरांनी अगणित लेख आणि डझनभर पुस्तकं लिहिली आहेत. लेखांइतकीच त्यांची भषणेही प्रभावी असतात आणि आपले विचार लोकांना पटवून देण्यास समर्थ असतात. याशिवाय त्यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांसाठी अनेक मार्गदर्शक पुस्तिका लिहिल्या आहेत. अंनिसचे इतर कार्यकर्तेही विपुल लिखाण करीत असतात.
टीव्ही, इंटरनेट यासारख्या माध्यमांचा उपयोग करून आपला संदेश लोकांपर्यंत लवकर व जास्त परिणामकारकपणे पोचवता यावा अशी सर्व विवेकवादींची अपेक्षा असते. या दृष्टिने अंनिसचे विस्तृत होमपेज सतत अद्यतन (अपडेट) केले जाते. प्रमोशनल डिव्हीडीही बनविण्यात येतात. काही कार्यकर्ते फेसबुक, ऑर्कुट, इत्यादींचा वापर करतात. लवकरच या क्षेत्रातील हालचाली जास्त वेगाने होवू लगतील.
आर्थिक संरचना: अंनिसची सारी मदार स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर अवलंबून आहे. तरीही एवढे सारे कार्यक्रम पार पाडायला निधी जमविण्याची आवश्यकता असतेच. निधी जमविणं, त्याचा विनियोग, हिशोब ठेवणं इत्यादीबाबत अगदी खुलेपणा दिसून येतो. बैठकीमधे आर्थिक बाबींवर चर्चा सुरू झाल्यावर जॉन यांना बाहेर जावे लागले नाही. आमचा लढा न्याय्य आहे; आमचं साध्य आणि आमची साधनही स्वच्छ व न्याय्य आहेत त्यामुळे लपविण्यासारखे काहीच नाही असा त्यांचा पवित्रा असतो. अंनिसचा प्रतिनिधी म्हणून एखाद्या दूरगावी भरलेल्या बैठकीस हजर राहायचे असेल तर प्रवासखर्च व तेथे राहण्याचा खर्च ज्यांना परवडणार नाही तेवढ्याच कार्यकर्त्यांना अंनिसतर्फे दिला जातो. सायन्स व्हॅनबरोबर अनेक महिने राहणार्या काही कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याचा खर्च अंनिसतर्फे होतो. विंदा करंदीकर (आता हे महाकवी हयात नाहीत), श्रीराम लागू यांच्यासारख्यांनी व इतर श्रीमंत मंडळींनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून दिलेल्या देणग्या, सभासदांची वर्गणी आणि पुस्तकांची विक्री यातून हातखर्च केला जातो. आम्ही पाश्चात्यांचे हस्तक नाही म्हणून भारताबाहेरील देशांकडून मिळणारा पैसा कटाक्षाने टाळला जातो. यास तीनच अपवाद आहेत. 1991 मधे अंनिसला लंडनच्या सेक्युलर सोसायटीकडून 600 पौंड मिळाले. त्यातून अंनिसच्या ध्येयांशी संबंधित विचारांची इंग्रजी भाषेतील पुस्तके सर्वसंमतीने खरेदी करण्यात आली. 2006 मध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेने दाभोलकरांना दिलेल्या पुरस्काराचे पैसे त्यांनी अंनिसच्या चळवळीला देवून टाकले. शॅग्रीन व्हॅलीच्या रोटरी क्लब कडून मिळालेल्या देणगीतून दोन सायन्स व्हॅन्स खरेदी करण्यात आल्या. आतापर्यंतच्या एवढ्याच परदेशी देणग्या आहेत.
अंनिसचे बरेचसे कार्यक्रम आत्मनिर्भर असतात. काही कार्यक्रमांना महाराष्ट्र शासनाचा सहयोग लाभतो व शासकीय आर्थिक मदत मिळते. ग्रामीण भागातून वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक वृत्ती रुजविण्यासाठी अंनिसने ‘विज्ञानबोध कार्यक्रम’ आखला आहे.
इतर समविचारी संघटनांशी सहकार्य:‘मानवासाठी भावी काळामधे विवेकवादाची सत्यता पडताळण्याची भूमी भारतच ठरेल’ असे पॉल कुर्ट्झ यांनी म्हटले आहे. फिरा या संस्थेच्या सहाव्या विराट संमेलनाचे आतिथ्य व संयोजन अंनिसने 2007 मधे पुणे येथे केले. इथे धर्माच्या नावाने भोळ्याभाबड्या लोकांना लुटणार्या बाबाबुवांवर केंद्रित असलेलं विवेकवादींचं लक्ष आता भ्रामक विज्ञानाकडेही (स्यूडोसायन्स) वळल्याचं दिसून आलं. 50 विवेकवादी संघटना फिराच्या सभासद आहेत. 1997 साली केरळातील पलक्कड येथे फिराची पहिली सभा संपन्न झाली. भारतीय विवेकवादी चळवळीचे जेष्ठ व जाणते नेते बसव प्रेमानंद (हे आता हयात नाहीत) यांनी फिरा संघटना स्थापन केली. पुण्याचे संमेलन जेबीएस महाविद्यालयाच्या परिसरात झाले. संमेलनाचे शीर्षक होते, ‘इंडियन रॅशनॅलिस्ट मुव्हमेन्ट -प्रेझेन्ट, पास्ट, फ्यूचर’ (भारतीय विवेकवादी चळवळ-वर्तमान, भूतकाळ, भविष्य.) सूरतच्या सत्यशोधक सभेचे, झारखंड व बिहारच्या सायन्स फॉर सोसायटीचे, रॅशनॅलिस्ट फोरम ऑफ हैदराबादचे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, ओरिसा रॅशनॅलिस्ट अॅसोसिएशनचे, केरला युक्तिवादी संघमचे, दक्षिण कन्नड रॅशनॅलिस्ट अॅसोसिएशनचे, पंजाबच्या तर्कशील सोसायटीचे आणि इतर प्रांतातील अशाच विवेकवादी संघटनांचे असे शेकडो प्रतिनिधी संमेलनास आले होते.
संमेलनाचे मुख्य दोन हेतु होते. अखिल भारतातील विवेकवादींना एकमेकांना भेटून विचारांचे आणि त्यांच्या संघटनेने केलेल्या कार्याच्या माहितीचे आदानप्रदान करता यावे. दुसरा हेतु कायद्यांच्या बिलांबाबतचे धोरण आखणे. पहिले बिल -फिराचे- धर्म आणि राजकारण एकमेकापासून पूर्णपणे अलग करण्याबाबतचे होते. दुसरे बिल -अंनिसचे- चेटुक, झपाटणे इत्यादींवरील अघोरी उपायांविरुद्ध (अंधश्रद्धाविरोधी) कायदा करण्याचे. राजकारणात सहभागी असलेल्या विवेकवादी मंडळींच्या सहाय्याने ही दोन्ही बिले विधानसभेत मांडता यावीत या दृष्टीने काय करायला हवं यावर बरीच चर्चा झाली. अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या मसूद्याचे इतर भाषांमधे भाषांतर करून त्या त्या प्रांतांच्या विधानसभेत ते बिल मांडावे असे या चर्चेमधे ठरले. यातून अंधश्रद्धाविरोधी केंद्रीय कायदा बनू शकेल आणि राष्ट्रीय अंधश्रद्धाविरोधी समिती स्थापन करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली.
तिसरा मुद्दा होता स्यूडोसायन्स-भ्रामक विज्ञानाचा. अवैज्ञानिक आंधळ्या श्रद्धा विज्ञानाचा बुरखा पांघरून लोकांसमोर सादर केल्या जातात तेव्हा त्यांना विवेकवादी भ्रामक विज्ञान म्हणतात. पाश्चिमात्य देशांमधे वैकल्पिक आणि पूरक औषधी (अल्टरनेटिव्ह अँड काँप्लिमेंटरी मेडिसिन) ही भ्रामक विज्ञानाच्या सदरात येतात. भारतात छद्म विज्ञान किंवा भ्रामक विज्ञान या अर्थाने स्यूडोसायन्स हा शब्द साधारणपणे विसाव्या शतकाच्या अखेरीस वापरण्यात येवू लागला. पाश्चिमात्य देशात प्राकृतिक विज्ञानास या छद्मी विज्ञानाच्या तावडीतून वाचवण्यावर विवेकवादी संघटनांना लक्ष केंद्रित करावं लागलं. भारतात वैकल्पिक आणि पूरक औषधींना विरोध करण्याबरोबर तथाकथित वैदिक विज्ञान-विशेषतः ज्येतिषशास्त्र व वास्तुशास्त्र-यांनाही विवेकवादी विरोध करतात. 21 व्या शतकाच्या सुरुवातीस तेव्हाचे मानवसंसाधन मंत्री व विश्वविद्यालय अनुदान आयोग (युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन) ज्योतिष शास्त्र हा विषय विश्वविद्यालयांमधे पदवीसाठी अभ्यासविषय म्हणून आणू पहात होते. तेव्हा विवेकवादींनी आणि वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला. फिराचे मुख्य नरेन्द्र नायक आपल्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करताना म्हणाले, “यापुढे विवेकवादींना बाबाबुवांच्या या नवीन छद्मवैज्ञानिक पिढीशी मुकाबला करायचा आहे. एका पातळीवर चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण आणि दुसर्या पातळीवर चमत्कारांचं छद्मविज्ञानाच्या भाषेत दिग्मूढ करणारे स्पष्टिकरण देवून लोकांना फसविणार्या बाबाबुवांच्या कारवायांचा मुकाबला कसा करायचा याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. निसर्गोपचार, होमियोपॅथी, रंगचिकित्सा इत्यादी वेगवेगळ्या नावांनी औषधोपचार पाद्धती वापरण्यात येत आहेत. अशा 14 पद्धतींची यादी करून सर्वोच्च्य न्यायालयाने यापैकी कोणत्याही पद्धतींना प्रोत्साहन देवू नये असे म्हटले आहे. ….एखाद्या काँप्यूटर सेंटरवर जाऊन तुम्हाला आपले भविष्य आजकाल जाणता येते. … आधुनिक विज्ञानात वापरण्यात येणार्या अनेक तंत्रज्ञानांचा आणि संकल्पनांचा वापर करून हे लोक विज्ञानाच्या नावाने अंधश्रद्धांना प्रोत्साहन देवून बळकटी आणीत आहेत.” नायक यांच्या मते बाबा रामदेव, दीपक चोप्रा आणि श्री श्री रविशंकर हे सर्व याच पठडीतले लोक आहेत. त्यांचे सिद्ध न झालेले दावे विज्ञानसिद्ध असल्याचे ते लोकांना सांगतात. रविशंकर आपल्या सुदर्शन क्रियेने सर्व व्याधी दूर करण्याचे आश्वासन देतात तर रामदेव त्यांच्या योगासनांना सर्व व्याधींवरचा रामबाण उपाय मानतात. पण कोंणीही ठोस वैज्ञानिक पुरावा कधीच देत नाहीत. त्यांच्या या दाव्यांचा पद्धतशीर अभ्यास करून ते खोटे आहेत हे सिद्ध करण्यास व लोकांना पटवून देण्यास विवेकवादी आणि वैज्ञानिक यांनी दबावगट निर्माण केले पाहिजेत. या चर्चेला वर्तमानपत्रांनीही प्रसिद्धी दिली होती.
पाश्चात्य व भारतीय विवेकवादींमध्ये सतत आदानप्रदान होत असते. अंनिसच्या वेबसाईटवर अशा अनेक देशी-विदेशी संघटनांशी संपर्क साधण्यासाठी दुवे दिले आहेत.
अंनिसचे इतर गतिविधी (अॅक्टिव्हिटीज): अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार याखेरीज इतर अनेक कार्यक्रम अंनिस पार पाडत असते. त्यांच्या जाहीर सभा, त्यांच्या मोहिमा आणि मोर्चे व विज्ञानवाहिनी हे कार्यक्रम तर सतत असतातच. यांच्याबरोबर ग्रंथ यात्रा, ग्रंथ प्रकाशन, विज्ञान यात्रा, आकाश दर्शन, लैंगिक शिक्षण, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती अशा अनेक मुद्यांवर त्यांचे सतत कार्यक्रम चालू असतात.
धर्माची विधायक चिकित्सा करणे हे अंनिसच्या चार मुख्य ध्येयांपैकी एक ध्येय आहे. ह्या ध्येयाची व्यवहारात पूर्तता करण्यासाठी अंनिस पशूबळींच्या प्रथेला विरोध करते. वाईजवळच्या काळूबाईच्या यात्रेमध्ये हजारो भक्तगण जमतात आणि शेकडो जनावरांना बळी देतात. 2005 साली या पशूबळींमुळे झालेल्या रक्त-मासाच्या चिखलामुळे अनेक लोक घसरून पडले आणि गर्दीमध्ये तुडविले गेले. बरीच प्राणहानी झाली. अंनिसच्या प्रयत्नांनी आणि जिल्हा अधिकार्यांच्या मदतीने अशा पशुबळींची प्रथा खूपच नियंत्रणाखाली आणली आहे. जटामुक्ती हे असेच आणखी एक उदाहरण आहे. केसामध्ये जट झालेल्या मुलींना यल्लम्मा देवीला न वाहता त्यांच्या जटा जाहीरपणे कापून अंनिसचे कार्यकर्ते‘यल्लम्मा देवीचा कोप’ या भ्रमाचा भोपळा फोडून टाकतात. आणि जटा झालेल्या मुलींना त्यांच्या पुढ्यात अंधश्रद्धाळू समाजाने वाढून ठेवलेल्या भावी वेश्यावृत्तीतून वाचवतात.
बाबाबुवांचा पर्दाफाश करणंही विधायक धर्मचिकित्सेचा व्यावहारिक भाग आहे. वार्तापत्रामधे याविषयीची भरपूर माहिती येत असते. शिवाय स्थानिक वर्तमानपत्रांमधूनही त्याला प्रसिद्धी मिळत असते. केवळ हिंदूच नव्हेत तर ख्रिश्चन व मुस्लिम बाबाबुवांचे बुरखे फाडायला अंनिस मागे सरत नाही. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवर रेव्हरंट (मान्यवर श्रद्धाळू) मिको हगिन्स आणि आणखी काही देशीविदेशी श्रद्धाळूंच्या उपस्थितीत एक विराट मेळा घेण्यात आला. प्रार्थनेद्वारा सर्व रोग बरे करण्याचा अनुभव या मेळाव्याला हजर राहून लोकांनी अनुभवावा अशी लोकांना मिको हगिन्स यांनी वर्तमानपत्राद्वारा हाक दिली होती. याविरुद्ध अंनिसने पोलिसात तक्रार नोंदविली. आणि सभेच्या जागी अपंग लोकांचा मोर्चा नेऊन पाद्री मंडळींना त्यांचे अपंगत्व दूर करण्याचे आव्हान दिले. अखेरीस सर्व पाद्री मंडळींना अटक करण्यात आली. बाबा-बुवा, पीर-फकीर, पाद्री-माता इत्यादींची धार्मिक भोंदुगिरी अंनिसने उघडी पाडल्याची अशी अनेक उदाहरणे अंनिसच्या वार्तापत्रात वाचायला मिळतील.
आपल्या अंगी दैवी शक्ती असल्याचा दावा करणार्या या मंडळींचे ढोंग उघडकीस आणायचे म्हणजे त्यासाठी फार गुंतागुंतीच्या क्लिष्ट योजना आखाव्या लागतात. माहिती काढण्यासाठी या लोकांना वेष पालटून अनेक वेळा भेटावे लागते. पुरावे गोळा करावे लागतात. फोटो, व्हिडियो इत्यादींच्या सहाय्याने दस्तावेज (डॉक्युमेंटस) तयार करावे लागतात. पोलिसांना कळवून त्यांची मदत घ्यावी लागते. या सर्व गोष्टी अंनिसचे कार्यकर्तेकिती काटेकोरपणे करतात त्याचा मनोरंजक आढावा वार्तापत्रातूनच वाचायला हवा. करीत असलेल्या साहसाचा परिणाम काय होईल आणि परिस्थिती कोणते वळण घेईल याचा त्यांना अंदाज नसतो. अर्थात अशी उदाहरणे विरळ आहेत. अंनिसचा उद्देश एखाद्या व्यक्तीचे बिंग उघड करण्याचा नसून लोकांमध्ये चिकित्सक वृत्ती बाणवणं हा आहे.
ही चिकीत्सक वृत्ती कशी कशी बाणवायची, लोकांच्यात जाणीव-जागृती कशी निर्माण करायची याचे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अंनिस नियमितपणे शिबिरे आयोजित करते.
आपली उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी असे शेकडो कार्यक्रम अंनिस राबवीत असते. त्याची सविस्तर माहिती वार्तापत्रातून व दाभोलकरांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातून जास्त तपशिलासह वाचायला मिळेल.
अंनिसचे विचारधन आणि अजंडा
आतापर्यंत आपण अंनिसची संघटनात्मक घडण आणि प्रत्यक्षात पार पाडले जाणारे कृतिकार्यक्रम यांची चर्चा केली. या प्रकरणामधे या चळवळींना पायाभूत असलेलं अंनिसचं विचारधन आणि त्यांच्या अजेंडावर असलेल्या कळीच्या संकल्पना यांचा विचार करणार आहोत.
विवेकवाद: अंनिसच्या जागतिक दृष्टिकोनाचा केंद्रबिंदु: विवेकवादामध्ये जीवनाच्या समस्या समजून घेण्यात व त्यांची उकल करण्यात विवेकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिथे श्रद्धा, आतला आवाज, अधिकारी पुरुषाचं मत, किंवा साक्षात्कार हे ज्ञानप्राप्तीचे स्रोत होवू शकत नाहीत. विवेकाच्या सहाय्याने निष्कर्ष तपासून जेवढे खरे उतरतील तेवढेच विवेकवादी मान्य करतात. पुरेसा पुरावा उपलब्ध नसला तर विवेकवादी आपले निष्कर्ष स्थगित ठेवतात. जगाच्या आकलनासाठी ते तर्क आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर करतात. धार्मिक ग्रंथ किंवा देव, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म यासारख्या अवैज्ञानिक, तर्कशून्य संकल्पनांशी निगडित असलेली नीतिमत्ता त्यांना मान्य नाही. विवेकवादी केवळ मानवी आशाआकांक्षा यांच्याशी निगडित असलेली तर्कशुद्ध नीतिमत्ता अंगीकारतात. असे आपल्या ‘बुद्धीवादी घोषणापत्रात’ रामेंद्रनाथ यांनी म्हटले आहे. विवेकवादींचं तत्त्वज्ञान केवळ धर्म व विज्ञानापुरते मर्यादित राहात नाही. ते राजकारण, नैतिकता, अर्थकारण तसेच दैनंदिन जीवनातील व्यवहार व निर्णय या सर्व क्षेत्रांना लागू होते.
विवेकवाद जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना लागू केला पाहिजे असे बहुतेक विवेकवादी आणि अंनिसचे कार्यकर्ते मानतात. लग्नकार्य व इतर उत्सव-समारंभ यामधे होणारा अनाठायी खर्च टाळला पाहिजे, तसेच दिवाळी वा समारंभांमधे फटाके व दारुकाम टाळले पाहिजे असे बरेच कार्यकर्ते मानतात. पण आपण अति विवेकवादी होता कामा नये, जीवनात आनंद देतील अशा काही गोष्टी मधून मधून करायलाच हव्यात. नाहीतर प्रत्येक बाबतीत विवेकवादाचा आग्रह धरल्यामुळे लोक आपल्यापासून दूर जातील. आपलं ध्येय न्याय्य समाज निर्माण करण्याचं आहे; काकवृत्तीने व्रणावर चोच मारण्याचे नाही असेही काही कार्यकर्त्यांना वाटते.
प्रत्येक बाबतीत विवेकाचा आणि विवेकवादाचा आग्रह धरल्यामुळे विवेकवादी अवास्तव गंभीर, शुष्क, आग्रही, उदासीन, विनोदशून्य असतात; त्यांना भावभावना, कला, सृजनात्मकता या मानवी संवेदना नसतात असा सामान्य लोकांमधे गैरसमज असतो. आपल्यावरील हा शुष्कपणाचा आरोप खोडून काढण्यासाठी विवेकवादी आपल्या कार्यक्रमांमध्ये कलाविष्कार आणि साहित्यकृतींचा आवर्जुन अंतर्भाव करतात. मानवी जीवनात कलाविष्काराचं खूप महत्त्व आहे. भावना, कला, सृजन या क्षेत्रांत धर्मसंस्थेची मक्तेदारी होवू देता कामा नये. मानवाच्या या क्षेत्रातील आत्माभिव्यक्तीसाठी (सेल्फ एक्सप्रेशन) इहवादी व धर्मनिरपेक्ष अवसरही मिळाला पाहिजे.
धर्म आणि अंधश्रद्धा: डॉ. दाभोलकरांच्या मते जातिव्यवस्था ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. धर्माच्या बाबतीत अंनिसची नक्की भूमिका काय आहे हे स्पष्ट होत नाही असे जॉन यांचे म्हणणे आहे. त्याची कारणे ते अशी देतात. 1. आपल्या कृतिकार्यक्रमांना मूलभूत असलेल्या संकल्पना अंनिस सुसूत्रित करीत नाही. 2. धार्मिक श्रद्धा आणि रूढी यांच्या अनिश्चित क्षेत्राबाबत अंनिसच्या कार्यकर्त्यांची मते वेगवेगळी असतात. 3. अंनिसचा या बाबतीतील अधिकृत पवित्रा आणि कार्यकर्त्यांचा संघटनांतर्गत पवित्रा यामध्ये फरक दिसून येतो.
अंनिस धर्म आणि अंधश्रद्धा यात फरक करते. आणि केवळ शोषण करणार्या अंधश्रद्धांनाच विरोध करते. काहींचं म्हणणं असं असतं की अंधश्रद्धा हेच धर्माचं मूळ आहे. बरेच कार्यकर्ते श्रद्धा धर्म आणि अंधश्रद्धा हे शब्द समानार्थी वापरतात. बरेच कार्यकर्ते आपली मतं जाहीरपणे मांडणं टाळतात. याची कारणं शोधायला आपल्याला थोडेसे इतिहासात डोकावावे लागेल.
1980 साली अंनिसची धर्माच्या बाबत भूमिका काय असावी यावर एक मोठा वाद झाला. अंनिसचा विरोध धर्मसंस्थेलाच असावा की धर्मातील काही बाबी निष्पक्ष किंवा काही अंशी सकारात्मकही आहेत असे मानावे? हा मुख्य मुद्दा होता. व्यक्ती तितक्या प्रकृती तशीच मतेही असतात. त्यामुळे धर्म या संस्थेलाच जाहीरपणे विरोध केला पाहिजे इथंपासून ते धार्मिक बाबतीत अंनिसने लुडबुड करूच नये इथंपर्यंत वेगवेगळी मते मांडण्यात आली. खूप खल झाल्यावर अंनिसने मध्यममार्गी पवित्रा अंगिकारला. तीच भूमिका आजतागायत अधिकृत मानली जाते.
इथे असेही म्हणता येईल की देव आणि धर्म या माणसाच्या कुबड्या आहेत. त्या त्याने टाकून देवून स्वतःच्या बळावर प्रगती करायला शिकले पाहिजे. हे मान्य करूनही सर्वसाधारण माणूस त्याच्यावर बालपणी झालेल्या संस्कारांमुळे स्वतःला दुबळा समजतो. त्याचे पाय बळकट करण्याआधीच त्याला त्याच्या कुबड्या फेकून द्यायला सांगणे योग्य आहे का त्याचे पाय बळकट करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे याचा विचार व्हायला हवा. आणि व्यापक व समावेशक परिवर्तनाचा उद्देश पाय बळकट करणं हाच असायला हवा. ते साध्य झाल्यास माणूस स्वतःच स्वतःच्या कुबड्या फेकून देईल.
फिराच्या सम्मेलनात मिलिंद देशमुख यांनी अंनिसची अधिकृत भूमिका मांडली ती अशी: ‘आमचा देव व धर्म यांना विरोध नाही. परंतु स्वयंघोषित बाबा-बुवा, तांत्रिक-मांत्रिक, ज्योतिषी आणि इतर भोळ्या भाबड्या जनतेला आणि धर्माच्या आणि देवाच्या नावाने लुबाडणार्या मतलबी माणसांना आहे. हे धूर्त लोक हितकारक वाटणार्या काही धार्मिक संकल्पनांची तोडमोड करून अशा तर्हेने लोकांसमोर मांडतात की त्यामुळे दैव, ज्योतिष, पुनर्जन्म, भुतं, चेटुक, चमत्कार, मंत्रतंत्र आणि दिव्य औषधी असल्या अंधश्रद्धा दृढ होतात.
‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकातील ‘धर्माबाबत समितीची भूमिका’ या प्रकरणात दाभोलकरांनी म्हटले आहे, ‘धर्म व ईश्वर याबाबत अंनिसची भूमिका निष्पक्ष आहे. ईश्वर आहे का आणि आपण त्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये याची चर्चा अंनिसच्या व्यासपीठावरून जाहीरपणे कधीच होत नसते.’
आपल्या संकल्पना लोकांना पटाव्यात म्हणून अंनिसचे कार्यकर्ते अंनिसची ध्येयं आणि कार्य म्हणजे भक्तिमार्गी प्रगतीशील संतांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आहे तसाच 19 व्या शतकातील धर्मसुधारणेच्या चळवळींचाही वारसा आहे असे आग्रहाने सांगतात. नागपूरच्या डॉ. आंबेडकरांच्या नावे सुरू झालेल्या अध्यासनातर्फे झालेल्या त्यांच्या भाषणात तर दाभोळकर ‘गरिबांना व पीडीतांना मदत करणारे लोकच खरे संत असतात आणि जे अशा गरीब व पीडितांना आपली मुले मानतात त्यांच्यात देवत्व असते’. असे म्हणाले. या बाबतचे संतवचन असे आहे:
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा॥
दाभोलकरांनी अवलंबिलेला हा मार्ग कट्टर ईश्वर-धर्म विरोधकांना फारसा रुचत नाही; तरीही अंनिस धर्माच्या विरोधात किंवा धर्माच्या बाजूने प्रचार करणार नाही; पण न्याय, सत्त्य, विवेक, समता आणि मानवी स्वातंत्र्य यांचा पुरस्कार हिरीरीने करील हा पवित्रा त्यांना संघटनेच्या प्रचाराच्या दृष्टीने योग्य वाटतो. धर्माचा जाहीरपणे विरोध करण्याने सामान्य लोक अंनिसपासून दुरावतील आणि अंनिस धर्म बुडवायला निघाली आहे या अपप्रचाराला बळी पडतील हे त्यांना पटते. ईश्वराची संकल्पना भ्रामक आहे ती सोडून द्या असं सांगितलेलं लोकांना मुळीच पटणार नाही. धार्मिक आचार व श्रद्धा ही बहुतांश लोकांची मानसिक गरज असते ही वस्तुस्थिती आहे आणि ती मान्य करायला हवी. म्हणून दाभोलकर स्वतः हिंदू असल्याचे मान्य करतात. आणि अंनिसची मूल्ये धार्मिक मूल्यांशी सुसंगत आहेत व त्यांचा लोकांनी आदर केल्यास आम्हाला आनंदच होईल असे सांगतात.
अंनिसची ही रणनीती परिणामकारक ठरत आहे. परंतु ती मध्यममार्गी किंवा निष्पक्ष म्हणता येणार नाही. तर ती पुरेशी स्पष्ट नाही असे म्हणावे लागेल असे जॉन यांना वाटते. धर्माच्या नकारात्मक बाबींचं -धर्माच्या नावाने पिळणूक, फसवणूक व अन्याय करणं यांचं समर्थन कोणीच करणार नाही. शिवाय कोणत्या गोष्टींना पिळणूक, फसवणूक किंवा अन्याय म्हणायचं याबाबतची तशीच वैयक्तिक धार्मिकतेबाबतची कार्यकर्त्यांची मतेही भिन्न भिन्न आहेत. धर्माचरण कुठपर्यंत खाजगी आहे आणि ते इतरांना तापदायी केव्हा होतं या बाबत कार्यकर्त्यांमधे काही स्पष्टता नाही. परंतु अंनिसच्या होमपेजवर या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळतात.
कार्यकर्त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा-धर्म या बाबतच्या वैयक्तिक मतांमध्ये तफावत दिसते परंतु त्यांनी आखलेले कार्यक्रम आणि अंनिसने आग्रह धरलेला अंधश्रद्धाविरोधी कायदा यामधून अंनिसची अंधश्रद्धांबाबतची भूमिका स्पष्ट होते. कोणकोणत्या गोष्टी अंधश्रद्धा आणि अघोरी उपचार या सदराखाली येतात त्या गोष्टींची एक सविस्तर यादीच अंनिसने कायद्याच्या प्रस्तावित मसूद्यामध्ये दिलेली आहे. थोडक्यात म्हणजे अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या अंधश्रद्धांविषयीच्या मतमतांतरांचा लघुत्तम साधारण विभाजक असा असेल: अंधश्रद्धा म्हणजे धर्माची दूषित व विघातक बाजू! तिला विरोध करणे प्रत्येक विवेकी माणसाचे कर्तव्य आहे.
आधुनिक आणि राष्ट्रवादी अजेंडा : अंनिसची कोणत्याही राजकीय पक्षाशी वा त्यांच्या विचारांशी बांधिलकी नाही. परंतु राजकारणातील वादविषयांबाबत (इश्यूज) अंनिसची स्वतःची स्वतंत्र भूमिका असते. भारताच्या राजकारणातल्या धर्माच्या प्रभावाला त्यांचा सक्त विरोध असतो. आणि विवेकवादाच्या प्रसाराने सर्वच क्षेत्रातील धर्माचा प्रभाव नाहीसा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शिक्षणात इंग्रजी माध्यमाचा अट्टाहास, अणुबाँब निर्मिती, मागास जातींसाठी आरक्षण, धार्मिक असहिष्णुता, शेतकर्यांच्या आत्महत्या, असे अनेक प्रश्न आज समाजापुढे आ वासून उभे आहेत. परंतु आपल्या खर्या समस्या काय आहेत हे ओळखण्यासाठी आवश्यक असलेली तर्कशीलता समाजात नाही. ही गोष्ट राजकारण करणार्यांच्या पथ्यावर पडते. समाजामधे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला गेला तरच लोक आपल्या खर्या समस्या कोणत्या ते ओळखून त्यावर सखोल चर्चा करू शकतील व भावनांच्या आहारी न जाता सर्वानुकुल असे योग्य उपाय सुचवू शकतील.
अंनिसचे कार्यकर्ते आपल्या ध्येयधोरणांना आधुनिक मानतात; श्रुतिस्मृतीपुराणोक्त पठडीच्या विरोधात असल्याचे मानतात.
विवेकवादींच्या मते परंपरा म्हणजे मागासलेपणा, निरक्षरता आणि अंधश्रद्धा; म्हणून परंपरांना विरोध करायला हवा. या उलट काही हिंदुराष्ट्रवादी असं मानतात की प्राचीन भारताच्या सुवर्णकाळातील परंपरागत मूल्ये,श्रद्धा, कर्मकाण्डे, प्रचलित आचरण आणि अधिकारी गुरुजन या सर्वांकडे दुर्लक्ष करीत राहिल्याने आज आपली ही हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. याउलट अंनिसच्या मते समाज सतत मागासलेपणातून आधुनिकतेकडे प्रगती करीत असतो. विवेकवादींनी अंगिकारलेल्या आधुनिकतेमध्ये ‘इहवादी राष्ट्र-राज्य (नेशन स्टेट)’ ही संकल्पना केन्द्र स्थानी असते. अंनिसच्या उपक्रमसूचीमध्ये (अजंड्यामध्ये) दरवर्षी 26 जानेवारी रोजी होणार्या ‘संविधान महोत्सवाला’ मोठं महत्त्व आहे.26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित केलेल्या ‘संविधानाशी बांधिलकी’ या उपक्रमामध्ये ध्वजारोहण, संविधान ग्रंथाची मिरवणूक आणि जाहीर चर्चा असे कार्यक्रम होत असतात.
अशा कार्यक्रमातून अंनिसची विधाने आणि कृतिकार्यक्रम संविधानातील तत्त्वांना अनुसरून असतात एवढेच नव्हे तर ती प्रत्यक्ष व्यवहारात आणली जातात. ‘भारतीय संविधान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानववाद आणि अन्वेषक मानसिकता अंगिकारायला आणि इतरांना तसे करण्यास उद्युक्त करायला सांगते. प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य आहे. संविधानात तसा स्पष्ट उल्लेख आहे. तेच आम्ही करीत आहोत.’ असे अंनिसचे कार्यकर्ते सर्व कार्यक्रमांमधे ठासून सांगत असतात. 1976 च्या 42 व्या संशोधन अधिनियमानुसार संविधानाच्या 51 अ या कलमामधे नागरिकांच्या कर्तव्यांची यादी दिली आहे. पुरुषोत्तम नारायण हक्स यांच्या प्रयत्नातून इंदिरा गांधींच्या शासनकाळात ही दुरुस्ती अंमलात आली.
भारतातील आजच्या परिस्थितीचे चिकीत्सक मूल्यांकन (इव्हॅल्युएशन) करणे आणि देशाच्या प्रगतीला आणि विकासाला हातभार लावणे हेही अंनिसच्या ध्येयधोरणात समाविष्ट आहे. आपण भारत राष्ट्राचे क्रियाशील नागरीक आहोत आणि या देशाची-राष्ट्राची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे असा दुसरा एक धोरणात्मक पैलू अंनिसच्या अजंड्यामधे दिसून येतो. या दुसर्या पैलूतून डोकावणारा राष्ट्रवादी दृष्टिकोन विवेकवादींच्या वैश्विक मानवतावादाला काहीसा छेद देणारा वाटतो. याबाबत अंनिसचा खुलासा असा: भारताचा विकास आणि प्रगती हा अखिल मानवजातीच्या विकासाचाच एक हिस्सा आहे. मानवजातीच्या विकास-प्रगतीला इतर सर्व लहानमोठ्या राष्ट्रांबरोबर भारताच्या विकास-प्रगतीचा हातभार लागायलाच हवा. याबाबत काही कार्यकर्ते जास्त राष्ट्रवादी वाटतात तर काही पूर्णपणे मानववादी, राष्ट्र संकल्पनेच्या पलिकडे पोचलेले वाटतात.
अंनिसच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवाद हा चिकित्सक राष्ट्रवाद म्ह्णता येईल. दीपक गिरमे याबाबत म्हणतात, ‘आम्हाला जर महासत्ता बनायचे असेल तर आधी आम्हाला मध्ययुगातून बाहेर पडायला हवं. आम्ही जोपावेतो अंधश्रद्धांमध्ये रुतलेले आहोत तोपर्यंत काहीही प्रगती होणार नाही.’ 2004 सालच्या भाजपाच्या ‘इंडिया शायनिंग’ ह्या राष्ट्रवादापेक्षा अंनिसचा राष्ट्रवाद फार वेगळा आहे. अंनिस व विवेकवादी प्राचीन व अर्वाचिन भारताचा गौरव करण्यापेक्षा त्याच्या मागासपणाला कारणीभूत असलेल्या गोष्टींची चिकित्सा जास्त करतात. गिरमे म्हणतात, ‘भारत कचराकुंडी झाला आहे-जाती, अंधश्रद्धा आणि बेकारीची कचराकुंडी. महासत्ता बनायला आधी देशात कुठे काय बिघाड झाला आहे-होतो आहे ह्याचा ऊहापोह व्हायला पाहिजे.’ भारत एक सुंदर बाग आहे असं मानून काहीच साध्य होणार नाही. प्राचीन सुवर्णकाळाचे गोडवे गात बसण्यापेक्षा भविष्यात सुवर्णकाळ कसा आणता येईल याचा विचार विवेकवादी करतात. त्यासाठी अर्थातच विवेकवादाचा प्रचार व्हायला हवा. प्रबोधन काळात युरोपने जशी प्रगती केली तशी संधी भारताला मिळालीच नाही. म्हणून देशाला आधुनिक करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो.
चिकित्सक राष्ट्रवाद विरुद्ध ‘इंडिया शायनिंग’ राष्ट्रवाद हा काही नवा वाद नाही. आणि विवेकवादी आणि हिंदुत्ववादी यांच्यापुरता मर्यादितही नाही. त्याची मुळे आगरकर आणि टिळक यांच्यातील वादाशी जोडता येतात. अर्थात टिळक आणि आजचे हिंदुत्ववादी यांच्या विचारात खूप मोठी तफावत आहे हे विसरून चालणार नाही. परंतु चिकित्सक राष्ट्रवादींची भूमिका आणि आगरकरांची 19 व्या शतकाअखेरची भूमिका यांच्यात खूप साम्य आहे. आगरकर आणि विवेकवादी दोन्हींच्या मते सामाजिक सुधारणा आणि धर्मचिकित्सा या दोन समस्यांचा आधी विचार केल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य सामाजिक सुधारणांच्या अगोदर मिळवायला पाहिजे आणि राष्ट्रीय अस्मिता आणि राष्ट्राभिमान जागा करणं हे आत्मपरीक्षण आणि भारतीय परंपरांचं उघडपणे अवमूल्यन करणं यापेक्षा फार महत्त्वाचं आहे हे जाणलं पाहिजे. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. विवेकवादी सर्व भारतीय जनतेचं ऐक्य हे आपल्या राष्ट्रवादातील एक महत्त्वाचा पूर्वपक्ष (प्रेमिस) मानतात. आणि या बाबतीत जातिव्यवस्थांना विरोध करणार्या हिंदु-आर्यद्वेषी किंवा ब्राह्मणद्वेषी संघटनांपेक्षा अंनिसचं वेगळेपण अगदी ठळकपणे दिसून येतं. जातीव्यवस्था हीच मुळात एक अंधश्रद्धा असल्यामुळे तिचे निर्मूलन करणे अंनिसचे ध्येय आहे. जातीबरोबर जात्याभिमानाचे, जातीच्या अस्मितेचेही निर्मूलन व्हायला पाहिजे. स्वार्थी हेतूने किंवा परंपरा जपण्याच्या नावाखाली त्यांना खतपाणी घालता कामा नये असेही अंनिस मानते व आचरते.
विवेकवादाचे व्यक्तिगत आकलन
भारतीय विवेकवादींमधे अशा बुद्धिवादींचा एक वर्ग आहे. या वर्गाची मंडळी चांगली सुशिक्षित व पाश्चात्य तत्त्वज्ञान जाणणारी असतात; विश्वमहाविद्यालयांमध्ये तत्त्वज्ञान शिकवतात आणि त्यांचा धार्मिक श्रद्धा, तत्त्वप्रणाली आणि संकल्पना या सर्वानाच विरोध असतो. ते एका पद्धतशीर, सुसंगत जागतिक विवेकवादी दृष्टिकोनाची मांडणी करण्याच्या प्रयत्नात असतात. हे लोक वातानुकूलित बैठकीत बसून एकमेकांशी काथ्याकूट करतात आणि बाहेर विद्वत्तापूर्ण व्याख्याने देतात. परंतु खरे काम करतात ते अंनिसच्या कार्यकर्त्यांसारखे; तळागाळातील लोकांच्यात जाऊन पडतील त्या हालअपेष्टा सोसत, प्रसंगी विरोधकांचे हल्ले झेलत आपण घेतलेला वसा चालू ठेवतात. आणि त्यांच्यामुळेच खरे परिवर्तन हळू हळू का होईना पण प्रत्यक्षात घडत आहे. पण खरा बदल घडवून आणणारी ही मंडळीसुद्धा हे मान्य करतात की त्यांच्या चळवळीला या वर वर्णन केलेल्या बुद्धीवादींचीही गरज आहेच कारण हेच लोक आर्थिक मदत करतात; आपली घरे काँप्यूटर इत्यादींचा वापर करू देतात; त्यांच्या मोटारगाड्या देतात. इतर हितचिंतक त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून काही वेळ अंनिसच्या कामासाठी देतात. त्यांच्यातील भाषांतर करणे, धोरणात्मक आखणीसाठी मदत करणे, कोर्टकचेरीची कामे करणे इत्यादी कौशल्यांची अंनिसला गरज असते. काही जण (सिनेमा नट इत्यादी) आपलं वजन खर्च करून अंनिसला ’पब्लिसिटी’ मिळवून देतात. शेवटी हेच खरं की या सर्वांचा – त्यांच्या ज्ञान, कौशल्य, काबाडकष्ट – यांचा मेळ जमल्यामुळे अंनिसच्या कार्याचा सतत मोठा होत असलेला रथ पुढे पुढे जात राहतो.
या संदर्भात डॉ.दाभोलकरांच्या ‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकामधे प्रत्यक्षात घडलेल्या घटना, त्याबाबतची अंनिसची भूमिका व कार्यकर्त्यांनी केलेली कृती आणि या सर्वामागची तात्विक बैठक प्रत्येक लेखात दिलेली आहे. वरील आशयाला त्यातून पुष्टी मिळते.
अंनिसचे कार्यकर्ते स्वतःच्या जीवनात विवेकवाद कसा आणतात हे पाहण्याची गरज जॉन यांना वाटली. बहुतेकांना सामाजिक आणि नैतिक प्रश्नांविशयी जास्त कळकळ असते. तेवढी विज्ञान आणि धर्म यांच्यामधल्या लढ्याविषयी नसते. जगण्यातील विवेकवादाबाबतची विविध मते थोडक्यात अशी सांगता येतील.
डॉ. दाभोलकरांच्या एका भाषणानंतर मतपरिवर्तन झालेल्या एका गृहस्थाचे मत असे: ‘मी समाजात कसं वावरावं, कोणाशी व कशी मैत्री करावी, पैसे कसे व कुठे गुंतवावे याबाबत आता मी वेगळा विचार करू लागलो आहे. मी आता शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवत नाही कारण त्यामध्ये पराकोटीचे शोषण आणि अविवेक भरलेला आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनावरील आपल्या एका भाषणामध्ये ‘अंनिसचा कार्यकर्ता कसा असावा’ हे सांगतांना डॉ. दाभोलकर म्हणतात, ‘(समाजात वावरण्याची)योग्य पद्धती, स्वायत्तता, जिज्ञासा, हिंमत आणि विनयशीलता हे पाच घटक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकेनाचा मौलिक आशय आहे. हिंमत आणि निर्भयतेबद्दल बोलतांना ते सॉक्रेटिसचे उदाहरण देतात. सॉक्रेटिस ज्या समाजात राहात होता त्या समाजाला सत्य पचवायची ताकद नव्हती. आजच्या आपल्या समाजातही आपण जेव्हा एखादे वैज्ञानिक सत्य -ज्याबाबत आपली स्वतःची खात्री झालेली आहे असे सत्य- लोकांना सांगतो तेव्हा प्रचलित व्यवस्था ज्यांना (स्वतःच्या स्वार्थासाठी) बदलू द्यायची नसते ते लोक आपल्यावर चिडतात. (त्यांच्या रोषाला सामोरं जायला हिंमत लागते.) कुठली गोष्ट चांगली व कुठली वाईट हे विवेकवादींनी स्वतःच ठरवायला पाहिजे. आणि ज्या गोष्टीच्या चांगलेपणाबद्दल स्वतःची खात्री असेल ती गोष्ट लोकांना कशाचीही तमा न बाळगता स्पष्ट सांगितली पाहिजे.’
विवेकवादी अंनिस कार्यकर्त्यांची अविवेकाशी झुंज म्हणजे अन्यायाविरुद्धची लढत आहे. त्यांच्यामध्ये निर्भयतेची आणि आपला युक्तिवाद बिनतोड असल्याची जाणीव दिसून येते. अशी निर्भयता विवेकवादींचा भ्रमनिरास झाल्यामुळे येते. मानवी मनातील पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या-सूड घेणारे आत्मे, देवाची अवकृपा, प्राक्तन, निसर्गाचे कोप इत्यादी- कल्पित गोष्टींच्या भीतीपासून ते मुक्त होतात.
इथे आपण अंनिसच्या कार्यकर्त्यांचे विवेकवादाबाबतचे वैयक्तिक आकलन किती भिन्न भिन्न आहे ते पाहिले पुढील प्रकरणामध्ये विवेकवाद आचरणात कसा उतरतो ते पहायचे आहे.
रोजच्या जगण्यातील विवेकवाद
विवेकवादी लग्न कसं करतो? स्वतःच्या मुलांना आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करू देतो का? लग्नातील कर्मकांड आणि रूढीच्या नावाने होणारा वायफळ खर्च टाळतो का? कोणी नातेवाईक मेल्यास त्याचा अंत्यसंस्कार कसा करतो? स्वतःच्या मरणानंतर अंत्यसंस्कार केले जावूनयेत असे ठामपणे सांगतो का? शरीर रचना विज्ञान शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी मरणोत्तर स्वतःचे शरीर दान करतो का? अशा प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला विवेकपूर्ण जीवन कोण जगतो ते ठरविता येईल.
अंनिसचा पूर्ण वेळ कार्यकर्ता झाल्यावर जीवन कसं बदलतं हे दाखविण्यासाठी जॉन यांनी अविनाश पाटील यांचे उदाहरण दिले आहे. समाजकार्य करता यावं म्हणून त्यांनी अंनिसमध्ये प्रवेश केला. हे करत असतांना पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील परस्पर संबंधाविषयी त्यांचा दृष्टिकोन पार बदलून गेला. समाजामधे बायकोपेक्षा नवरा श्रेष्ठ समजला जातो. हा समज त्यांना पूर्णपणे बदलायचा आहे. स्त्री-पुरूष समान पातळीवर आल्याचे त्यांना पहायचे आहे. स्त्री-पुरूष समान आहेत हे आम्हाला आमच्या घरातील व इतर स्त्रियांना तसेच सार्या पुरुषांना पटवून द्यायचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे त्यांच्या विचारात हा बदल घडून आला. अविनाश पाटील बांधकाम व्यवसायात नोकरी करीत होते. परंतु या व्यवसायातील वातावरण आणि कामाची पद्धत त्यांच्या विवेकवादी धारणांशी असलेल्या बांधिलकीशी सुसंगत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या व्यवसायामध्ये ठेकेदारांना अधिकार्यांना आणि ग्राहकांना खुश करावे लागे. व्यवसायातील भोंदू धार्मिकता, दारू पिणं-पाजणं आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे अविनाश वैतागले. बांधकाम व्यवसाय सोडल्यावर त्यांच्या आयुष्यात फार मोठा बदल झाला. आता त्यांच्या घरात पूजा अर्चा होत नाही. अंधश्रद्धेशी निगडित असा कोणताही आचार पाळला जात नाही. त्यांच्या आई थोडेफार देवधर्म करतात पण त्याही आता बदलू लागल्या आहेत. त्यांची पत्नी व इतर नातेवाईकही अजून विवेकवाद पूर्णपणे अंगिकारायला तयार नाहीत. याबाबत सर्वांशी ते नेहमी चर्चा करतात. मानवी मानसिकता बदलण्यास बराच वेळ लागतो. परंतु विचारांच्या सामर्थ्याने ते शक्य आहे आणि शक्य होत आहे असे त्यांना वाटते.
त्यांच्या परिवाराला शिक्षणामध्येही मुलांसमोर विवेकवादी आदर्श हवे आहेत. आपल्या मुलांमध्ये टीव्ही वर दाखविल्या जाणार्या अंधश्रद्धांच्या मालिका आणि अवास्तव, अतिरंजित जाहिराती यांच्याबाबत जागरुकता यावी असे वाटते. असेच बदल इतर सर्व कार्यकर्त्यांच्याही कुटुंबियांमध्ये होत आहेत. आता त्यांची मुले दिवाळीमध्ये फटाके उडवीत नाहीत. मोठी मुले सिगरेट वा दारू पीत नाहीत. थोड्याशा अंतरासाठी रिक्षा करण्याऐवजी पायी जातात.
विवेकवाद आणि मानववाद एकमेकास बरेचसे सुसंगत आहेत. त्यामुळे अंनिसच्या सभासदांचे वागणेही असेच असते. ज्या शाळेत अगर खेड्यामधे सायन्स व्हॅन कार्यक्रमासाठी जाते तिथे कार्यक्रम झाल्यावर कार्यकर्तेजेव्हा जेवण घेतात तेव्हा तेथील स्वयंपाक करणार्या महिलांनाही आपल्या बरोबर जेवण्याचा आग्रह करतात. या आग्रहाबरोबरच काही घरातील महिलांना त्या दुय्यम असल्याची जाणीव करून देणार्या – नवर्याचे जेवण झाल्यावर त्याच्या उष्ट्या ताटात बायकोने जेवण्याच्या प्रथेचा निषेध करतात.
काही सुस्थितीतील विवेकवादींच्या घरातील फर्निचरवरही विवेकवादाचा शिक्का आढळतो. एका गृहथांच्या घरी भारतीय व पाश्चात्य विवेकवादी साहित्याचे अनेक ग्रंथ होते. त्यामधेच एक ठळकपणे नजरेत भरेल असा सॉक्रेटिसचा पुतळा होता. नांदेडच्या शिवदास हमंद यांच्या मुलाच्या खोलीत आर्यभट्ट यांचे चित्र, तसेच आर्यभट्ट सुपर कॉम्प्युटर, आणि त्याच नावाचा उपग्रह यांची चित्रे होती. त्यांच्या मुलांना फलज्योतिष आणि इतर अंधश्रद्धा कशा भ्रामक असतात हे सांगण्यात फार गोडी आहे.
सामान्यपणे कार्यकर्त्यांची घरे साधी असतात. त्यांच्या घरात देवादिकांचे, बाबाबुवांचे फोटो, पुतळे, मुर्ती इत्यादी काही नसते. कार्यकर्ते आंबेडकरांचे अनुयायी असल्यास बुद्धाची मूर्ती असते. हनुमंत भोसले यांनी घरातील धार्मिक खाणाखुणांचं स्पष्टीकरण असं दिलं, ‘माझ्या पत्नीच्या आणि मुलीच्या पूजा-अर्चांमध्ये वेळ घालविण्याला मी मज्जाव करीत नाही. मला मात्र माझं काम म्हणजेच देवपूजा आहे. मी लोकांना सत्य आणि योग्य काय आहे ते फक्त सांगतो. त्यांना धर्म सोडून द्या असा आग्रह करीत नाही—इत्यादी.’
अंनिसच्या भोवतालच्या परिस्थितीचा संदर्भ
‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या आक्षाभोवती अंनिसची चळवळ फिरत असते. काहींना आमचं कार्य हेुतुपूर्ण, उपयुक्त आणि संयुक्तिक वाटतं; तर काहींना ते याच्या पूर्ण उलट दिसतं. काहींचं म्हणणं असतं की, अंधश्रद्धा नष्ट होईपर्यंत आपण यशस्वी होऊ शकणार नाही तर काही असं म्हणतात की, अंधश्रद्धा निर्मूलन हा अंनिसचा लोकांना दाखवायचा मुखवटा आहे. त्यामागे त्यांचं खरं उद्दिष्ट लपलेलं आहे. ते म्हणजे देव, धर्म, परंपरा या सर्वांचा विनाश. अखेर अंधश्रद्धा म्हणजे असतं तरी काय? असं हे लोक विचारतात.’ हा उतारा आहे डॉ.दाभोलकरांच्या पुस्तकातील ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ या प्रकरणातला.
अंनिसच्या विरोधकांचे मुख्यतः दोन गट असतात. एक हिंदू मूलतत्ववादींचा ज्यांचे म्हणणे असते की अंनिससारख्या विवेकवादी गटांना हिंदुधर्म आणि संस्कृती व हिंदू अस्मिता नष्ट करायची आहे. दुसरा गट आहे वसाहतवादानंतर अस्तित्वात आलेल्या बुद्धीजीवींचा. यातील पहिल्या गटाच्या- हिंदुमूलतत्ववादींच्या अंनिसवरील टीकेचा आपण इथे विचार करू या. अंनिस व इतर विवेकवादी महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी बिल आणीत आहेत हा एक मुद्दा आणि त्यांच्या आक्षेपातील दुसरा मुद्दा म्हणजे अंनिसच्या ‘अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’. त्यांच्या या महाराष्ट्रभर होत असलेल्या कार्यक्रमांमुळे अंनिस आणि विवेकवादींवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जातो.
धार्मिक गटांचा कडाडून विरोध आहे अंनिसने प्रस्तावित केलेल्या घातक, हानीकारक व शोषण करणार्या अंधश्रद्धांविरुद्धच्या कायद्याला. या कायद्याला ते श्रद्धेविरुद्ध कायदा म्हणतात. कायद्याअभावी अंनिसने ज्यांचा पर्दाफाश केलेला आहे असे अनेक बाबाबुवा व तांत्रिक-मांत्रिक 1954 सालच्या ‘ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमेडीज अॅक्ट’ खाली पकडले गेले तरी लगेच सुटतात. न्यायमूर्ती जहागिरदार हे अस्तित्वात असलेल्याच कायद्यांचा उपयोग विवेकवादाच्या बाजूने करीत असत. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या 1984 सालच्या निवडणुकीमध्ये राजकारणी लोकांनी लोकांनी धर्माचा वापर जाहीर सभांमध्ये करण्याला त्यांनी विरोध केला.
अंनिससारखेच अंनिसचे विरोधक, विशेषतः बाबाबुवा, कायद्यांचा उपयोग करतात. अंनिसवर व अंनिसच्या कार्यकर्त्यांवर विरोधक सतत कोर्टामध्ये खटले दाखल करीत असतात. यामधे अंनिसच्या कार्यकर्त्यांचा फारच वेळ आणि पैसा वाया जातो. काही खटले तर सर्वोच्च न्यायालयात नेले जातात. त्यासाठी डॉ. दाभोलकरांना अनेक वेळा दिल्लीला जावे लागते.
अंनिसने प्रस्तावित केलेले अंधश्रद्धा विरोधी बिल पास झाले आणि योग्य कायदा अंमलात आला तर अंनिसला त्याचा उपयोग आपली उद्दिष्टे साधण्यासाठी आणि जागतिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्यासाठी नक्कीच होईल. या कायद्याचे अधिकृत नाव आहे, ‘महाराष्ट्र जादुटोणा, दुष्ट व अघोरी प्रथा (विरोधी) कायदा 2005’. कायद्याचे उद्दिष्ट आहे, ‘जादूटोणा करणार्या भोंदू वैद्य आणि लुबाडूंपासून; तसेच आपल्याजवळ अलौकिक, चमत्कारपूर्ण औषधी व शक्ती असल्याचा दावा करून खोटी आश्वासने देणार्या; सामाजिक स्वास्थ्याला आणि सामान्य लोकांच्या खात्रीलायक वैज्ञानिक औषधोपचारावरील विश्वासाला हानी पोचविण्याच्या आणि त्यांच्या अज्ञान-अंधश्रद्धांचा फायदा घेऊन त्याना भोंदू वैद्य ढोंगी बाबाबुवा आणि जादुटोणा करणार्यांकडे जाण्यास प्रवृत्त करण्याच्या घातक कारवाया करणार्या लोकांपासून जनतेला वाचविणे.’
अंनिसचा प्रभाव
अंनिसचा प्रभाव किती मोठा आहे याचा थोडासा अंदाज आपण घेतलेला आहे. हा प्रभाव कोणत्या प्रकारचा आहे हे सांगणं कठीण आहे. त्याआधी हा प्रभावाचा प्रश्न आणखी पुढे कसा नेता येईल या बाबत जॉन काही सावध सूचना देवू इछितात. अंनिस कोणाकोणावर प्रभाव पाडू शकते? अंनिस संघटनेच्या कार्यकर्त्यांवर, त्यांच्या कार्यक्रमांना हजर राहणार्या प्रेक्षक-श्रोत्यांवर प्रभाव पाडू शकते. याशिवाय कायद्याच्या क्षेत्रात विशेषतः अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या बाबीत तात्पुरता आणि टिकावू दोन्ही तर्हेचा प्रभाव पाडू शकते. सरतेशेवटी विवेकवादींचा एकूण जागतिक दृष्टिकोन आणि त्यांचे ठोस कृतिकार्यक्रम यांचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. हा प्रभाव म्हणजे भ्रमनिरास आणि विवेकीकरण (रॅशनलायझेशन) या प्रदीर्घ प्रक्रियेचाच भाग आहे. विवेकवादी संघटनांचे कार्यक्रम, व्याख्याने, प्रकाशने आणि माध्यमांच्या कार्यक्रमातील हजेरी यांचा हेतु समाजावर प्रभाव पडावा हा असला तरी संघटनाच या कार्यक्रमातून बळकट होत असतात हाही महत्वाचा परिणाम आहे. हे त्यांच्या बैठका, परिषदा, नियतकालिके आणि सम्मेलने यांचे विश्लेषण केल्यावर स्पष्ट होते. त्यातून संघटना आतून बळकट होतात. त्यातून सैद्धान्तिक एकोपा, समज आणि सुसंगती तसेच कार्यकर्त्यांमधे मित्रभाव वाढतात व संघटनेशी असलेली बांधिलकी जास्त घट्ट होते. नाही म्हटलं तरी 1989 साली जन्माला आलेली ही चळवळ नुसती तग धरून राहिलेली नाही तर सतत वाढते आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यामध्ये पसरत आहे.