Categories
कायदा

भारतीय दंड संहिता (Indian Penel Code)

मार्च - २०११

हा भारतामधील सर्वात मोठा तसेच सर्वात जास्त वापरला जाणारा फौजदारी स्वरूपाचा कायदा आहे. इंग्रजाच्या राजवटीत 1860 साली हा कायदा अस्तित्वात आला. थोडा फार बदल करून आजही हा कायदा वापरला जातो. हा कायदा तपशीलात खूप काही सांगतो तरीदेखील आपल्या लेखन मर्यादेत आपण त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करू. हा कायदा एकूण 511 कलमांचा आहे. त्यामध्ये कलम 76 ते 95 हा अपवाद विषद करणारे आहेत. म्हणजे गुन्हा असला तरी तो कोणी, कोणत्या अधिकारात केला इ.बाबींचा विचार करून तो गुन्हा होत नाही. त्याबाबतचे अपवाद कोणते याचे विवरण दिले आहे. ते तपशीलाने आणि उदाहरणासह समजावून द्यायला पाहिजे.

            या कायद्याचे कलम 96 ते 106 हा स्वत:चा बचाव करताना जे गुन्हे होतात, आणि म्हणून त्यांना गुन्हा समजू नये वगैरे विषद करणारे आहेत. याबाबत वाचकांनी एकच पण महत्वाची बाब लक्षात घ्यावी की, जेवढा अपेक्षित बचाव आहे. त्या मर्यादेत सूट आहे. म्हणजे एखादा इसम लहान दगड घेऊन तुमच्या अंगावर येतो आहे. तुम्ही मात्र चाकू, तलवार वगैरे सारखे शस्त्र वापरून स्वत:चा बचाव करीत होतो असे दर्शवित असाल तर हा बचाव कायद्यासमोर ग्राह्य धरता येणार नाही. या कायद्याचे कलम 107 ते 120 हे गुन्ह्याला चिथावणी देण्यासंबंधी आहेत. म्हणजे एखाद्याचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग नसतो. पण गुन्हेगारांचा बोलविता धनी तो असतो. अशा इसमांवर गुन्ह्याला चिथावणी दिली म्हणून या विविध कलमांन्वये कारवाई होऊ शकते. या कायद्याच्या कलम 120 अ व 120 ब अन्वये गुन्ह्याचा कट रचला. कट कारस्थान शिजवितांना त्यामध्ये भाग घेतला म्हणून कारवाई होऊ शकते. राज्य किंवा शासनव्यवस्था यांच्याविरोधात केलेल्या कारवाया कलम 121 ते 130 अन्वये गुन्हे आहेत. कलम 141 ते 160 हे सार्वजनिक शांततेचा भंग केला तर होणारे गुन्हे विषद करतात. 161 ते 171 हे लोकसेवकांशी किंवा त्यांचे कडून घडणारे गुन्हे सांगतात. 171 ची सर्व उपकलमे निवडणूकीसंबंधीचे गुन्हे आहेत. 172 ते 190 लोकसेवकाच्या कायदेशीर अधिकाराशी संबंधित तर 191 ते 229 हे खोटा पुरावा देणे, सार्वजनिक न्यायाशी संबंधित, तर कलम 230 ते 263 हे चलनी नाणे, नोटा, प्रतिभूती यांच्याशी निगडित आहेत. कलम 264 ते 267 वजन, मापं, कलम 268 ते 294 सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता इ.शी संबंधित, तर 295 ते 298 हे धर्मासंबंधी आहेत.

            या कायद्याचा खर्‍या अर्थाने गाभा सुरू होतो. तो कलम 299 ते 377 मध्ये आहे. या कलमांमध्ये मानवी शरीरासंबंधी गुन्ह्यांचे वर्णन तपशीलात दिले आहे. त्याला गुन्ह्याच्या शिक्षांही सांगितल्या आहेत. तसेच कलम 378 ते 462 हे मालमत्तेसंबंधी आहेत. कलम 463 ते 489 दस्ताऐवजांसंबंधी, 493 ते 498 हे विवाहाशी संबंधित आहेत. 499 ते 502 हे अबु्र संबंधांने आहेत. कलम 503 ते 510 ही अवमानकारक वगैरेबाबत आहेत. तर शेवटचे 511 वे कलम जन्मठेप शिक्षा असणारे गुन्हा करण्याचा प्रयत्न करणेबाबत आहे. हा भारतीय दंड विधानामधील कलमांचा धावता आढावा आहे. आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून आपणाला कोणत्या गुन्ह्याला तोंड देण्याची शक्यता आहे. तसेच आपण जेव्हा संघर्ष करतो तेव्हा बुवा, बाबा, महाराज वगैरेविरूद्ध कोणत्या भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाखाली पोलीस कारवाई करू शकतात. याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तो सविस्तरपणे मांडणे जागेअभावी कठीण आहे. पण तरीही ढोबळ मानाने यासंबंधी चर्चा करणे आवश्यक आहे.  तसेच पोलिसांत तक्रार देताना, आपल्या विरूद्धच्या तक्रारीची माहिती घेताना, पोलिसांच्या गुन्ह्याचा तपास करण्याची पद्धत, न्यायालयाचे गुन्हे विषयक कामकाज कसे चालते, न्यायादानाची ठळक पण अत्यंत महत्वाची न्यायतत्वे वगैरे बाबीं सविस्तर लिहिणे आवश्यक आहे. हे सारे समजल्याशिवाय फौजदारी कायद्याने निर्माण केलेले पोलीस ते न्याययंत्रणा समजणार नाही. हे समजल्याशिवाय कायदा राबविण्याबाबतच्या विसंगत वाटणार्‍या गोष्टींचा उलगडा होणार नाही. या व्यवस्थेचा, या विषयीचे कायदे आपल्या म्हणजे न्यायाच्या बाजूने कसे राबविले जाऊ शकतील हे समजणार आहे. अनेकवेळा पोलीस अधिकारी, न्यायिक अधिकारी ढोबळ मानाने सामाजिक कार्यकर्त्यांकडे एका विशिष्ट नजरेने पाहतात ते तसे का वागतात याचे उत्तर आपणाला सापडत नाही. त्या उत्तराच्या काही उत्तरापैकी एक उत्तर फौजदारी कायदा, तो राबविण्याच्या पद्धती याबाबत आपली अपुरी माहिती, अज्ञान हे असते. ही भावना दूर करायची असेल तर फौजदारी कायदा त्यासंबंधीची यंत्रणा यांची मुलभूत, जुजबी माहिती असणे आवश्यक आहे. पुढील लेखांकात त्याची अधिक चर्चा करू या.

– अ‍ॅड. देविदास वडगावकर