नेवासा(जि.नगर) येथील सिटी सर्व्हे कार्यालयात अनेक दिवसांपासून भोंदूगिरी करणार्या बाबाचा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नुकतात पर्दाफाश केला.
कधी सुरेशनगर, तर कधी नाशिक येथील रहिवाशी सांगत अर्जुन शिंदे नावाचा बाबा गेल्या अनेक दिवसांपासून नेवासा फाट्याजवळील भूमी अभिलेख कार्यालयात येऊन सुखशांती देतो, असे सांगत होता. सिटी सर्व्हे कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचार्यांकडून या बाबाने बर्याचवेळा पैसेही उकळले. या बाबाचा गेल्या काही दिवसांपासून सिटी सर्व्हे कार्यालयात वावर जास्तच वाढला होता. त्रास देण्याचे प्रमाणही वाढत होते. काही दिवसांपूर्वी शिंदे बाबाचे कार्यालयात आगमन झाल्याबरोबरच काही समजदार कर्मचार्यांनी नेवासा येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह डॉ.मच्छिंद्र वाघ यांचा दूरध्वनीवरून माहिती दिली.
डॉ.वाघ यांनी तातडीने कार्यालयात धाव घेतली. बाबाला आपण व पत्नी आजारी असल्याचे सांगितले. लगेच डॉ.वाघ यांच्यासमोर व सिटी सर्व्हे कार्यालयातच त्या भोंदूगिरी करणार्या बाबाचे तंत्रमंत्र सुरू झाला. तुमच्या घरच्यांनीच तुम्हाला करणी केल्याचे डॉ.वाघांना सांगितले. शिंदे बाबाचा भोंदूगिरीचा प्रयोग चालू असतानाचा एका कर्मचार्याने अचानक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.वाघ यांचे नाव घेतले. त्याचवेळी हा बाबा घाबरून पळू लागला. सर्वांनी गराडा घालून त्यास पकडले.
डॉ.वाघ यांनी बाबांचा पोलखोल केला. लेखी घेतले. यापुढे भोंदूगिरी करणार नाही. कोणाला फसवणार नाही. मला कोणतीही तंत्रमंत्राची विद्या येत नाही असे शिंदे बाबाने लिहून दिले. मात्र तो सुरेशनगर(नेवासा) तर नाशिकचा रहिवाशी असल्याचे सांगतो. त्याचे नावही चुकीचे असल्याची शक्यता डॉ.वाघ यांनी व्यक्त केली. भोंदूबाबाविरूद्ध कर्मचार्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.