Categories
चिकित्सा

 भ्रम संस्कार

फेब्रुवारी – २०१३

            नदीचे मूळ व ऋषीचे कूळ शोधू नये असे म्हणतात. ऋषीच्या जन्माचे मूळ शोधायला गेले तर गर्भ संस्काराच्या चिंधड्या उडालेल्या दिसतील. पोटाचीच तिजोरी। भीतीचाच ठेवा॥ अशा पद्धतीने ओटीपोटावर स्वस्तिक चिन्ह काढून वर विड्याच्या पानाने जलसिंचन केले जाते. बायबलमध्ये गरोदर स्त्रियांनी सैतानाचे नाव घेऊ नये नाहीतर सैतानच जन्माला येतो असे म्हटले आहे, पुराणामध्ये गरोदर स्त्रियांनी मंत्रोच्चार ऐकूच नये असे म्हटले आहे. कारण कायतर ऋषीचे शाप खरे होतात.

            ‘आधुनिक वैद्यक शास्त्र’ ही विज्ञानाने मानवाला दिलेली अभूतपूर्व देणगी आहे. पूर्वी आपली बहुसंख्य मुले बालपणीच मृत्यूमुखी पडणार ही गोष्ट आईबाप गृहीत धरून चालत. ह्या परिस्थितीत सुधारणा झाली ती प्रतिबंधक लस शोधल्यामुळे. त्यावेळी जन्म हा मुख्य प्रश्न नव्हता. मूल तगणे महत्वाचे होते. त्यासाठी कर्मकांडे नवस-सायास याचे उदंड पीक होते. पण आजच्या ‘छशलश्रशरी ऋराळश्रू’ मध्ये एकाच अपत्याचा अपेक्षित जन्म हीच गोष्ट लक्षणीय काळजीने ग्रासली आहे. बाळंतपण म्हणजे पुनर्जन्म ही पूर्वीची समस्या आता खूप सुलभ झाली आहे. परंतु भविष्यातील संभाव्य किंवा भ्रमीत समस्या बद्दल कुतुहलमिश्रीत भीती व चिंता यामुळे विनाकारण या गोष्टीचा बाऊ केला जात आहे.

            माकडिणीचे पिल्लू माकडिणीला बिलगून रहात असल्यामुळे काम करण्यासाठी तिचे हात रिकामे असतात. त्यामुळे ती उदरनिर्वाह स्वत:च करू शकते. पण मानवी बाळाचं तसं नसतं त्यामुळे बाईला परावलंबीत्व येतं. तीच वाट पुढं पक्की सडक बनते. वीर्य दानानंतर फलिताचे सर्व सोपस्कार निसर्ग नियमनानुसार होतात म्हणजे त्यात मानवी मनाचे, इच्छेचे काही चालत नाही. ह्या सर्व क्रिया अनैच्छिक असतात.  त्यात आपण कृत्रिम वैद्यकीय उपचार केल्याशिवाय किंवा विशिष्ट आजार वगळता त्यात काही बदल होत नाही. मातेचे म्हणून स्वत:चे काही प्रश्न असतात. तिचे आरोग्य, हृदयरोग, मधुमेह, भ्रृणाच्या वाढत्या आकारमानाचा तिच्यावर येणारा ताण. आपदग्रस्त काळ, युद्ध, दंगली,भूकंप ह्यावेळी आलेलं गरोदरपण अतिशय हलाखी, अभावग्रस्थ सोयीसुविधा यामुळे ती अतिशय मानसिक ताणातून जात असते. त्यापेक्षा अनाथ केलेल्या भ्रुणाच्या मातेची, सामाजिक, स्वार्थी, प्रतिष्ठेच्या नावाखाली मानसिक स्थिती कशी असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. तरी अनाथ गृहामधील गोरीगोमटी स्वच्छंद मुले फुलासारखी टवटवीत असतात. कुठे गेले ते गर्भसंस्कार?

            ज्ञान मिळवण्यासाठी,  आवाज, स्पर्श, चव, वास, प्रकाश, आकारमान, रंग, हालचाल, चित्र इत्यादीची गरज लागते. इंद्रियांना त्याचा प्रत्यक्ष सराव लागतो. हे आजच्या काळातील मेंदूविज्ञान सांगते. तरी अभिमन्यूला पुढे केले जाते. गर्भाच्या वाढीच्या काळात आकारमानात होणारी वाढ व स्नायूच्या मजबुतीकरणासाठी गर्भाच्या काही हालचाली आवश्यक असतात ती विचारपूर्वक केलेली कृती नसते. जन्मानंतर म्हशीचे वासरू उभे राहणे दूध पिणे इत्यादीची तयारी होण्यास जन्मापूर्वी स्नायू विकसित होण्याची गरज असते. त्यावेळी होणार्‍या हालचाली सहज सुलभ असतात. त्याचा अर्थ गर्भाला सगळं समजतं असं नाही. आपण कान बंद करून किंवा पाण्यात बुडून आवाजाचे लक्षपूर्वक निरीक्षण केले तर आपणाला(पूर्व परिचय असूनदेखील) फार काही समजत नाही. भु्रणाला पाण्यासह अनेक आवरणातून संगीत आणि मंत्रोच्चार काय समजत असेल तेच जाणोत. आवाजाची दिशा, अंतर, तीव्रता याचे भान तरी कसे येऊ शकेल. त्यामुळे संगीतोपचार शिकवणीचे गौडबंगाल समजून घ्या. जोतिरावाची आई ज्योतीची पूजा करत होती म्हणून जोतिराव महात्मा झाले असले संशोधन करणार्‍यांनी भ्रामक विज्ञानाचा बाजार मांडला आहे.

            निसर्गात काही प्रसंगी व्यंग, मतिमंदपणा सारख्या विकृती असू शकतात. त्यावर नियमित तपासणी व काही मर्यादित उपचार करणे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध झाले आहेत. त्यावेळी विवेकी निर्णय घेणे शक्य झाले आहेत. त्यामुळे भिण्याचे कारण नाही.

            गर्भ काळात किंवा बाळ जन्मानंतर दोन जिवाचे पोषण म्हणून दुप्पट आहार घेतला जातो. भु्रणाच्या वाढीच्या काळात 200 ते 300 कॅलरी अंदाजे पुरेसे असतात. परंतु गर्भ संस्कारवाले चमचमीत, कोडकौतुक म्हणून अव्वाच्या सव्वा खायला देतात मग वजन वाढून पुढील आयुष्यात अनेक व्याधी सुरू होतात. ह्या पहिलवानी खुराकाबद्दल आधुनिक आहार शास्त्राने समतोलपणा कसा असावा याचे मार्गदर्शन करावे. गर्भसंस्कार नव्हे. आनंदी, उत्साही, सजग, समाधानी सर्वांनी सर्व काळात असणे उचीत नव्हे काय? नुसता गरोदरपणाच अपवाद कशाला?

            एकदा बाळ सुरक्षित सुदृढ जन्माला आले की, संस्कार झालेचे कृतकृत्य वाटते. पण मूल वाढवताना बालमानस शास्त्राचं मागमूस देखील माहीत नसतं. फक्त गर्भ संस्काराच्या धुंदीत कोडकौतुक नावाखाली व्यक्तिमत्व विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. खरं म्हणजे बालमानस शास्त्राची मूल वाढवताना खरी गरज असते. ते अनेकांच्या गावी नसतं.

गर्भ राहिल्यानंतर घ्यायची काळजी आहार, व्यायाम, विश्रांती ह्याची शास्त्रोक्त माहिती सांगणारी पुस्तके, विश्वकोष, इ. इंटरनेटवर सापडते. त्याचा पुरेपूर वापर करून तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नियमित तपासणी व योग्य औषधोपचार घेतल्यास गर्भारपणाबद्दल भीती बाळगण्याचे कारण नाही. शेवटी ध्यान केंद्रासारख्या, गर्भसंस्कारवाल्यांनी त्यांच्या गर्भसंस्काराद्वारे शि, शू शिक्षित (Toilet Trained) बालक जन्माला घातले तर असंख्य माताभगिनी त्यांचे खूप उपकार मानतील.

रमेश माणगावे