थंडीचे दिवस असल्यामुळे देवळाच्या पाठीमागं शेकोटी पेटवून आम्ही सगळे बहिरल्या वाड्यातली आणि माळीवाड्यातली पोरं तापत बसलो होतो. जिकडं तिकडं वातावरण गारठून गेलं होतं. अंगावर भाळ टाकून, तोंडानं वाफंची धुराडे सोडत, खाकरत-खोकरत तरणी, म्हातारी तांब्या घेऊन रस्त्यानं येत होती.
गडी माणसं मस्ट्यांकड तर बाया पोरी मांगवाड्यापल्याड पांदीला जात होती. रतन महाराज देवळाची झाडलोट करण्यात गुंतला होता. गुराखी पोरं शेणाचे टोपले डोस्क्यावर घेऊन उकंड्यावर टाकत होती. उकंड्यावर हागायला बसलेल्या नागड्या पोराकडं बघून शिव्या देत होती. गावंदरीतून उठलेल्या धुराचा थर आभाळात दिसत होता. इतक्यात म्हादम्मा वाण्याचा गडी मांगवाड्याकडं पळत जाताना दिसला. आम्ही आऽऽवासून त्याच्याकडं बघत होतो. त्याच्या पायाचं पळणं बघून कायतर इपरीत घडलंय आसं वाटत होतं. तितक्यात बाबू गोसायानं त्याला हाटकिलं.
‘कार, रे रंगा? थंडीचं कुठं चाल्लास?’
‘कुठं म्हंजी काय बाम्मामा? आवो रातीला मालकाचं म्हसाड मेलं की! वास उठंल म्हणून सुभानदाला आनायला चाल्लोय.’ रंगानं तोंडातून तंबाकूची पिचकारी टाकत उत्तर दिलं. अन् तो मोठ मोठ्या ढांगा टाकत झप झप मांगवाड्याकड सुसाट निघाला.
रंगाला पाटम्होरं बघत आम्ही तसंच बसून होतो. आगटीतलं जळण संपत आलं होतं. तिकडं कुणाचाच ध्यान नव्हतं. आगटीतून धूर निघायला लागल्यावर बाबू गोसाई खवळून उठला; धुराकडं बघत मोठ्यानं वरडून तो माळ्याच्या बाब्याला म्हणाला ‘अरं ए पोरा! उठ की हेंद्रया, तुझी सासू आन जाळायला; तुझी बारी हाय! उठ की खज्जाळीच्या! त्या रंग्याकड काय बघत बसलास? थोबाड वासून!’
‘व्हय! माझी बारी न्हाय; या सुद्याची बारी हाय आनायची! बब्यानं घोगर्या आवाजात म्हटलं.’
‘आरं, रंग्याला बोलताना सुद्याने तेची सासू घातली की आगटीत. तुझं ध्यान नव्हत की काय? गिन्यान गेलेल्या! बाम्मामानं चिडक्या सुरात म्हटलं.
बाम्मामा चिडल्याचं बघून बब्या हळूच उठला. देवळाच्या जवळ गावाकरीला म्हासा वाण्यानं आपल्या शेताला कुपाटी लावल्या होत्या. बब्या त्याच्या कुपाटीच्या काट्या उपसू लागला. त्याचं दुसरीकडं कुठच ध्यान नव्हतं.
वरलाकडच्या आळीकडून अंगावर गुलाबी शालीचा भाळ टाकून एका हातात तांब्या अन् एका हातात धोतराचा सोगा धरून वाण्याचा म्हादाम्मा वाड्याकडं गडबडीनं निघाला होता. वाटतच शेत असल्यानं येता जाता त्याचं नेहमी आपल्या शेताकडं ध्यान असायचं. कुणीतर आपल्या शेताच्या काट्या उपसतंय हे त्याला दिसलं. म्हादाम्मा मोठ्यानं ओरडू लागला. शिव्या देतच तो तिकडं पळत सुटला. ‘कोण हाय रं येऽऽ खज्जाळीच्या? कुपाट कशाला उपसतूस? तुझ्या कुणाला जाळायचं की काय? आमच्या भवतीच कशाला निजवताव रे? सोताच्या मळ्यात निजवा की!’
म्हादाम्माचा आवाज ऐकून बब्याच्या अंगाला घाम फुटला, त्यानं लव्हाराच्या आळीकडं धूम ठोकली.
कुपाटीच्या बाजूनं शेताभोवती नजर टाकत म्हादाम्मा देवळामागं आमच्याजवळ आला. तिथं बाबू गोसायाला बघून तो थोडा चपापलाच. म्हणाला, बाबुम्मा तू, हायस व्हय!
व्हय, व्हय मीच हाय! थंडीचं तापायला ही पोरं आमच्या उडव्यांचं इरलं उपसतील म्हणून मी हितं राखायला आलोय. बाबुम्मा म्हणाला.
तुझं खरं हाय गां! पण… असं अर्धवट बोलत आगटीला पाय लावून बसत म्हादम्मा बोलू लागला.
‘आता कोण आमची कुपाट उपसत होतं रं बाबू? तुला दिससलास की’
‘नाही दिसला बाबा! मी बी आताच आलोय’ बाबू म्हणाला.
बाबूचं तुटक बोलणं ध्यानात येताच कुर-कूर करत पोरांना शिव्या देत म्हादाम्मा तांब्या घेऊन वाड्याकडं निघाला. इतक्यात मांगवाड्याकडून चारपाचजणांना घोळका गलका करत गावच्या बाजूनं येताना दिसला. त्यात म्हादम्माचा गडी रंगा सर्वांच्या पुढं होता. त्याच्याबरोबर सुभाना अन् त्याच्या भावकीतले सारेजण होते.
दोघांच्या हातात सुर्या तर दोघांनी दांड्या, दोर्या अन् जर्मलची भगुली घेतली होती.
बिडीचा धूर काढत सारेजण म्हादाम्माच्या वाड्यात घुसले. सार्या परिसरात आता कवळं ऊन पसरलं होतं. बाजूला असणार्या वडाच्या झाडावरून पाखराचा कलकलाट येत होता. मारूतीच्या देवळातली घंटी टंग् टंग् करत होती. घंटीचा आवाज ऐकून बायकाचा घोळका पाण्यासाठी माळ्याच्या हिरीवर निघाला होता.
थंडीचच सारे लोक जिकडं तिकडं कामासाठी लगबग करत होते. इकडं वाण्याच्या वाड्यातली मेलेली म्हैस दोरीनं दोन दांड्यात अडकवून चौघंजण रस्त्यानं ओढत होते.
मेलेल्या म्हसीची वरात बायाबापडे दारातून बघत होते. वाण्याची यव्वा डोळ्याला पदर लावून हुंदके देत होती.
“बाबांनो, माझ्या मायीला सावकास वडा रेऽऽ!” म्हणून रडत होती.
म्हसीचे डोळे उघडेच होते. तिच्या तोंडातून जीभ बाहेर आली होती. रंग्याचं काळ कुत्रं मागं- मागं जिभळ्या चाटत चालत होतं. वडाच्या झाडावर कावळे काव काव करत हाते. ते ऐकून रंगा म्हणाला, “चला रे कावळ्यांनो, वाण्याचं आवताण हाय तुम्हाला, चला मस्ट्याकडं जेवायला!”
म्हसाड वडून गड्यांना आता दम आला होता. सुभानदानं सुस्कारा टाकताच खांदा बदलण्याचा इशारा दिला, तसं सारेच थांबले. चिमाने बिडीचा झुरका मारण्यासाठी काडी वडली तसा रंगा म्हणाला, ‘अगा अण्णा; बिडीचं म्हागून बघ, आदी म्हासाडाचं बघ! म्हसाड मेल्याचं गावकी करणार्या शाम्याला कळालं, तर आमचं काम तुम्ही का केलं? म्हणून तो भांडत बसल त्याला कळण्याआधीच आपण काम उराकलं तरच खरं हाय.’
रंगाचं बोलणं ध्यानात घेऊन सारेजण म्हसाडाला जोरजोरात वडू लागले. कसंतरी एकदाचं म्हसीला मसनवाट्यात आणून कापायला सुरवात केली.
नाकाला हात लावून त्यांच म्हैस कापणं आम्ही लांबूनच बघत होतो. मला तर नुसत्या वकार्या येत होत्या.
म्हसीच्या मांडीचं कातडं हळूहळू निरपून काढत चिमा लाल-लाल सागूती जर्मलच्या भगुल्यात गोळा करत होता.
दूरवर मोकाट कुत्री गोळा झाली होती. त्यांना बघून रंगाचं काळं कुत्रं गुर्र-गुर्र करत होतं. दोन तीन गिधाडं बाभळीच्या फांदीवर बसले होते. आभाळात कावळ्यांची काव-काव चालू होती. सकाळचा थंड गारवा उन्हाने आता कमी झाला होता. गावात जिकडं-तिकडं कामाची लगबग चालू होती.
मसनवाट्यातलं काम संपवून रंग्या अन् त्याच्या सोबतीचे सगळेजण घराकडं निघाले होते. म्हसीच कातडं दांडीला अडकवून सुभानानं व चिमानं आपल्या खांद्यावर घेतलं होतं.
डोस्क्यावर घोंगड्याचा घोंगटा पांघरून रंगानं सागूतीचं भगूल घेतलं होतं. दत्तूच्या हातात सुर्या होत्या. बाबूनं जळणाचा भारा घेतला होता.
बिडीचा धूर काढत सगळेजण घराकडं निघाले होते. रंगाचं काळं कुत्रं त्यांच्या मागं पळत होतं. मधूनच पाणंदीला असलेल्या मिरगुडीच्या बुडात तोंड खुपसून एक पाय वर करून चुळूकभर धार सोडत होतं.
वाटत भेटणार्या प्रत्येकाला जोहार घालत रंगा अन् त्याच्या माणसांनी घर गाठलं.
घराच्या समोर असलेल्या उकंड्यातील बाभळीवर म्हसीचं कातडं चिमानं वाळण्यासाठी घातलं. बाजूलाच रंगा सागुतीचे वाटे घालत होता.
झाडाच्या फांदीवर वाळण्यासाठी टाकलेल्या कातड्याचा वास सगळीकडं पसरला होता. अगोदरच्या बाभळीच्या झाडावर पाच सहा जनावरांची कातडी वाळत होती.
वाटनं येणारा जाणारा वाटसरू त्याकडं किळसवाण्या नजरनं बघायचा, पचकन थुकत वाळवणारांना शिव्या द्यायची. एक दोनदा जोत्या वारकाकडून लोकांनी त्यांना कातडं वाळू न घालण्याबाबत तंबी दिली होती. पण कसं तरी लोकांच्या हाता पाया पडून त्यांनी आपलं काम तसंच पुढं चालू ठेवलं होतं.
शांताप्पा जंगमाला मात्र हे आवडलं नव्हतं. तो त्यांना धडा शिकविण्याची वाटच बघत होता. त्याला आज ती संधी मिळाली होती.
गावाच्या चौकाच लिंबाच्या बुडाला बसून जोत्या वारीक हजामती करीत होता. बाजूलाच कट्ट्यावर शांतप्पा जंगम बसला होता. त्याला रंग्याच्या माणसांनी म्हैस कापल्याचं कळालं तो जोत्या वारकाला बोलतच तिथून निघाला. त्यानं म्हादम्मा वाण्याची गावकी करणार्या शामाला रंगानं म्हैस कापल्याची बातमी सांगितली.
तसं शामानं आपल्या भावकीतल्या सगळ्यांना हाका मारून गोळा केलं.
‘रंग्यानं आपल्या गावकीच्या घरातली मेलेली म्हैस कापली. आपल्या हक्काच्या जनावरांवर त्यानं डल्ला माराला! म्हणून तो गोंधळ करू लागला. त्याच्या आवाजानं सारी वस्ती जागी झाली. जो तो रंग्याला जाब इच्यारलाच पाहिजे म्हणू लागला. तरणी पोरं हातात काठ्या घेऊन भांडण करायचं बोलू लागली. हा हा म्हणता पंधरा वीस जणांना जमाव हातात काठ्या घेऊन गावाच्या कडेला असलेल्या मांगवाड्यात घुसला. समोर रंगाचं छपराचं घर होतं. दोघा तिघांनी छपराची वडावड चालू केली. समोर दिसला त्याला ते मारत सुटले. तिथं एकच गोंधळ उडाला होता. बायका पोरांच्या रडण्याचा आवाज गावभर पसरला. बघणार्यांची तिथं गर्दी झाली.

सकाळपारी रानातून गुरांच्या धारा काढून घरी येत असलेल्या गावकरी पोरांनी मध्यस्थी करून त्यांचं कसं तरी भांडण सोडविलं. पण तवर सुभानाचं डोस्क फुटलं होतं. शामाच्या पोरानं काठीचा दणका दिला होता. सुभानाची बायको बायमा, “दुस्माना, तुझा मुडदा बसविला!” म्हणून त्याच्या नावानं कडाकड बोटं मोडत होती.
रंगानं सुभानाची जखम दाबून धरली होती.
सुभानाची लेकरं बाजूला उभा राहून मोठ्यानं रडत होती. बायमाक्का हुंदके देत, शामाला शिव्या घालत गावामध्ये भीमराव पाटलाच्या वाड्याकडं निघाली होती. तिच्या कडेवरचं नागडं पोरगं रडत होतं.
चौसोपी वाड्याच्या ढेळजत तक्क्याला रेटून पाटील सुपारी कातरत- कातरतच ढेकरा देत होता.
दारात सुभानाच्या बायकोला बघून त्यानं दोन बोट तोंडावर धरली अन् पचकन बाहेर पिचकारी टाकली व म्हणाला,
‘काय, झालं बोयमा?’
रडतच बायमानं पाटलाला सारं सांगितलं. अन् त्याच्या पायावर डोस्कं ठेवून आपल्या अंगावर झालेले माराचे वळ ती दावू लागली. बायमाचं रडगाणं ऐकून पाटील रागाला आले. का? काय केलं तू त्या भडव्यांचं वाटूळं! पाटील म्हणाले, पाटलाचा आवाज ऐकून रूका पाटलीन सोप्यातून ढेळजच्या दारात आली.
भीमराव पाटील कोतवालाला बोलावत म्हणाले,
‘आरं ए बाब्या!’
‘जी पाटील!’ – बाबू
‘जा, त्या पाडीवार शाम्याला वाड्यावर बोलीव.’ पाटील गरजले.
‘जी पाटील!’ म्हणून बाबू कोतवाल आपला पटका सांभाळत धोतराचा सोगा हातात धरून गावकुसाबाहेरच्या वस्तीकडं सुसाट पळाला.
तवर- रूका पाटलीनीनं बायमाला सोप्यात घेऊन तिच्या अंगावरची वळं बघितली.
बायमाची पाठ काळी निळी झाली होती. तोंडानं चुक् चुक् करत पाटलीनीनं बायमाला पाणी दिलं. पाणी पिऊन तिला थोडं बरं वाटायला लागलं.
तोपर्यंत भांडणाची बातमी गावभर पसरली होती. पाटलाच्या वाड्यात बायमाचं रडणं ऐकून लोकांनी वाड्यासमोर गर्दी केली होती.
इकडं बाबू शामाचा माग काढत त्याच्या वस्तीवर पोहोचला. बाबू कोतवालाला दारात बघून शामा घाबरला. तो थरथर कापू लागला. शामाचं पोरगं फरार झालं होतं.
शामाची बायको सोनाक्का कोतवालाच्या पुढं पदर पसरत म्हणाली, ‘बाबुम्मा, माझ्या मालकाला मारतील वं! तुमच्या पाया पडते. त्यांना कायबी करू नका.’
‘सोनाक्का, काळजी करू नगस, तुझ्या नवर्याला मी मारू देत नाही!’ पाटलाचं म्हणनं तर ऐकून घिऊ दी, बाबूनं धीर देत शामाच्या बायकोला समजावलं.
शामा, लक्सा, निळाम्मा, सोनाक्का कोतवालाबरोबर पाटलाच्या वाड्यावर हजर झाले.
बाबूच्या पाठीमागं शामाला बघताच पाटील गरजले,
‘बाब्या, तू बाजूला हो!’
तसं बाबूनं बाजू दिली. बाबू बाजूला सरकताच पाटलाची नजर शामावर पडली. लगेच पाटलानं आपल्या पायातला जोडा काढला अन् भिरकावून शामाच्या तोंडावर मारला. जोड्याच्या एका फटक्यातच शामाचं कपाळ फुटलं त्यातून रक्ताची धार लागली. शामा थरथर कापू लागला. पाटलाचा आवतार बघून लक्सा, निळाम्मा, बाजूला थरथर कापू लागले.

सोनाक्का रडत होती. पाटलाच्या पायावर गडाबडा लोळत ‘माझ्या नवर्याला मारू नका हो मालक! गरीबाला दया दाखवा, म्हणत होती.
‘पाटील यांना मारायचं आता बस करा! भांडण केल्याबद्दल यांना दंड लावा!’ गर्दीतून शांतप्पा जंगम मुद्याचं बोलू लागला.
‘गरीबाला कसला दंड लावता मालक? हामची लेकरं दोन दिसाची उपाशी हायती!”
निळाम्मा दंडाचं नाकारत बोलू लागला.
लेकरं उपाशी हयाती; तुम्ही तर न्हाई न्हवं उपाशी? शांताप्पा म्हणाला.
थोडा विचार करून भीमराव पाटलानं म्हादाम्माला बोलावून घेतलं.
‘म्हादाम्मा, तुमची गावकी कुनाकडं हाय?’ पाटील म्हणाले.
‘शामाकडं हाय!’ म्हादाम्मा
‘मग, तुम्ही रंग्याला तुमची म्हैस का कापू दिली?’ पाटील.
‘मी न्हाई बा!’ पाटील.
रंग्यानं आपल्या मनानच सुभानाला हे काम दिलं. रंग्या आमच्यात सालानं कामाला हाय! म्हादम्मा म्हणाले.
पाटलानं रंग्याला दरडावत समोर बोलावलं, तसा रंग्या डोक्याचं टापरं सावरत पुढे आला.
‘रंग्या!
‘जी मालक! रंगा
‘म्हादम्मा, काय म्हणतात ते खरं हाय का?’
‘जी, चुकलं माझं! तेंचं सारं खरं हाय.’ रंगा.
‘भाडखाऊच्या! तुला शाम्याला बोलावण्यासाठी सांगितलं असतांना’ तू तुझीच झकमारी का केलास? म्हादाम्मा रंग्याच्या अंगावर धावून जात म्हणाले.
‘मालक, मला गरीबाला माफ करा! सास्तूरच्या यापार्याचे मी उसने पाच रूपये घेतलं होतं. त्याबदली तेला मी कातडं द्याच कबूल केलं होतं. लेकरास्नी थोडी सागुतीबी मिळतीया म्हणून मी मनानच सुभानदाला सांगितलं. रंगानं पाटालाम्होरं अशी कबुली दिली.’
‘कापणाराबी अन् भांडण करणाराबी सगळेच भडवे माजून गेलेत!’ शांतप्पा जंगम म्हणाला.
‘शांतप्पा, यांचा माज उतरावयाचा का?’ पाटील म्हणाले.
‘मंग न्हाय तर काय! भडव्यांना मांसकांड खाऊन जोर चडलाय!’ शांतप्पा
पाटलाचा निवाडा ऐकलायला लोकांनी गर्दी केली होती. भिमरावदा आता काय न्याय देतात याकडंच सार्याचं ध्यान होतं.
‘शांताप्पा, कसा अन् कुनाला दंड लावायचा आता तूच सांग गा! पाटलानं शांताप्पाला पुढं करत म्हटलं.’
‘पाटील, दंड सार्यांनाच लावला पाहिजे!’ शांताप्पा
‘सार्यांना म्हणजे; कुनाकुनाला दंड लावावा.’ पाटील
सार्यांना म्हंजी सार्यांनाच त्यात म्हसीचा मालक, कापणारा, भांडण करणारा सगळेच गुन्हेगार हाईत.” शांताप्पा रागाने बोलत पाटलातर्फे न्याय देऊ लागला.
म्हसीचा मालक असलेला म्हादाम्मा वाणी शांताप्पाच्या आरोपाने गांगारून गेला.
शांताप्पा माझा काय गुन्हा हाय त्यात? मला कशाला दंड लावता. म्हादाम्मा म्हणाला.
‘म्हादाम्मा, म्हसीची इल्हेवाट कोण लावतंय? ते तुम्हाला म्हाईत न्हाई काय! म्हाईत असूनसुद्धा तुम्ही मुद्दामच तुमचा गडी रंग्या तेला म्हैस कापायला सांगितलं, म्हणून तुम्ही आरोपी हाव.’ शांताप्पा जंगमानं एका दमात म्हादाम्माचा गुन्हा खरा करून दावला.
शांताप्पा जंगमावर पाटलाचा मोठा इस्वास असल्यानं त्याचा निर्णय पाटलाला एकदम आवडला.
‘म्हादाम्मा, शांताप्पा खरं काय हाय तेच सांगतोय, तुम्हाला दंड भरावाच लागलं!’ पाटील म्हणाले.
गावातल्या लोकांना भानगडी करायला लावणं अन् वाद झाला की, त्या भानगडी पाटलाच्या वाड्यात नेऊन मिटवणं, त्यात मिळेल ते लुबाडणं हा शांताप्पा जंगमाचा उद्योग.
गावात सहसा शांताप्पाच्या नादी कोणी लागत नव्हतं. पाटलाचा माणूस हाय म्हणून लोक त्याला घाबरून राहायचे.
पाटील शाताप्पाच्या कानात काय तर सांगत होता. त्याचं म्हणनं ध्यानात घेऊन शांताप्पा मान हालवत होता.
जमलेली गर्दी रंगा, शामा अन् म्हादाम्माच्या तोंडाकडं टक लावून बघत होती.
शांताप्पा जंगम जमलेल्या गर्दीपुढं पाटलांचा निर्णय घोषित करू लागला. म्हसीचा मालक म्हादाम्मानं रंग्यावर इस्वास टाकून चूक केली, त्यामुळं हे भांडण झालं; म्हणून भांडणाला जबाबदार असणारे म्हादाम्मा यात पहिले गुन्हेगार हाईत. त्यांनी बारा रूपये अन् पाच पायली गहू दंड म्हणून सांजपातूर पाटलाकडं जमा करावा. शांताप्पानं भसाड्या आवाजात म्हादाम्माचा दंड सांगून टाकला.
म्हादाम्मा वाण्यानं दंड ऐकून बारा रूपयाच्या बदली जास्तीचे चार पायली गहू देण्याचे कबूल केले. पाटलानं तेला मंजुरी दिली.
‘म्हसाड कापणारे, रंग्या, सुभाना, चिमा, बाबू, दत्तू यांना एकेकाला पाटलांनी तीन- तीन रूपये अन् मळ्यात दोन दिस काम असा दंड सांगितला असून त्यांनी आजपासूनच मळ्यात कामाला जावं कामाच्या शेवट दिवशी पैशाचा दंड भरावा. तोंडातून पानाची पिचकारी टाकत शांताप्पानं म्हटलं.’ बाबू अन् दत्तूनं पैशाची बदली जास्तीचे दोन दिवस काम करण्याची परवानगी पाटलाकडं मागितली.
‘बराय! म्हणून पाटलांनं त्याला मंजुरी दिली.
परत्येकी पाच रूपये दंड, पाच दिवस मळ्यातली मोट जुपायची असा दंड शामा पाडीवारावर लावण्यात आला असून त्यानं लगीच मळ्यात जाऊन मोटंवर उभं राहायचं हाय. शांताप्पा म्हणाला.
शामा पाडीवारानं ‘पैशाचा दंड लावू नका मालक! मी गरीब हाय, मलाबी आगाऊ दिवस काम करण्याची सवलत द्यावी!’ म्हणून पाटलाकडं विनंती केली. पाटलानं त्याला नकार दिला.
म्हादाम्मा शांताप्पाकडं रागानं बघत आपल्या घराकडं निघाला. जाताना तो रंगाला म्हणाला,
‘रंग्या! माझ्या कामाचं कसं करणार हायस?’
‘मालक! दोन दिस माझं पोरगं करल तुमचं काम’ म्हणत रंगा जड पावलानं पाटलाच्या मळ्यात कामावर निघाला.
– प्रा. गोविंद द. जाधव