Categories
कविता

कविता

वार्षिकांक – २०१२
देवान निवद बोकड खाल्लं असतं तर
पुजार्‍याची पोटं वाढली असती काय?

म्हणे देवाला हजार डोळे मग
खुद्द देवाच्या मूर्तीची चोरी घडली असती काय?

देव मला दिसला दहशतवाद्यांच्या हल्ल्याने अ‍ॅबॉर्सन झालेला
पोलीस ठाण्यात कमांडोज्ची मागणी करण्यासाठी आलेला

देवा! तुझ्या आशिवार्दाने आजपर्यंत कोणाचं बुरं भलं झालं नाही,
भक्तांचं हाल पाहून तुझं काळीज कधी ओलं झालं नाही.

हल्ली मंदिरातूनच वास येतो मला माणूस जाळल्याचा

मशिदीतून येतो आवाज किंकाळ्यांचा अन् गोळ्या झाडल्याचा

दत्ता पांडुरंग सरगर, मंगळवेढा, जि.सोलापूर


बाजार बुणग्यांनो
ही अंधश्रद्धा नाही
हिच्यासाठी नाही करावं लागत
होम, हवन, नवस, सायास
माती होतही नसते प्रसन्न
बुवा, बाबा, बाईच्या भस्म भंडार्‍यानं!
काणीला पीळ घालावा तसं
स्वत:ला पिळून घ्यावं लागतं वावरात
मातीचा टिळा लावूनच करावा लागतो
कणखर कण्याचा इळा
तवा कुठं फुलतो हिरवा मळा
तुम्ही कुठली सपनं दाखवताय मातीला
राशी-भविष्याचे संस्कार अन्
भस्म-भंडार्‍याचे चमत्कार?
अंधश्रद्धेच्या नादी लावणार्‍या
बाजार बुणग्यांनो
आता आम्हालाही कळू लागलंय
सपनात जगायचं!
की सत्यात??

शिवाजी महादेव सातपुते, नागणेवाडी, जि.सोलापूर


अज्ञान हे निसर्ग शिकलेल्यांचे
मग धूर्त चतूर पंडीत पाडतो भूल
            अन् उंबराला येते फूल॥

सत्य सदैव धरा रे ध्यानी
घातले कितीही जरी खत पाणी
वड, पिंपळ, औदुंबरा लागी
            सूक्ष्म फुलती फुले फळाच्याच अंगी॥

कथितो परम ज्योतिषी एक
शतकातील भाग्यवंत मी देख
लिलीचे फूल डकवी उंबरास
            किती थोर चमत्कार की भास

टाका दक्षिणा, लोटांगण घाला
भुलवित भोळ्या श्रेयस श्रद्धेला
कमाईचा सुलभ उपाय याला
            अहो, आश्चर्य, तो चतु:र्भुज की झाला!!

शंकर महादेव माळी, यशवंतनगर, सांगली.


अफवेला पूर आला, गाव नि गाव जागे
म्हणे देवीचा प्रकोप झाला, जो तो फोनवर सांगे

देवीचा प्रकोप भारी डोळ्यामधून अश्रू वाहे
जसा हादरा भूकंपाचा, जणू भासवतो आहे

पुजार्‍याची किमया सारी, पोटपूजा व अर्थनीती
मूर्तीला भावना नाही, अश्रू ही ढोंग नीती

‘म्हणे’ नंदी दूध पितो, धूर्त लोक सांगे
धर्मांधतेचे पीक आले, हतबल विज्ञान मागे

सुशिक्षितांचा तोल सुटला, तारांबळ घरी-दारी
जीव वाचवा-जीव वाचवा, रात्री-बेरात्री फोनवरी

काल मरणाच्या भीतीने, मानवजात हादरली
मेंदूभर अंधश्रद्धा, पुन्हा एकदा सिद्ध झाली

काळोखी वैरीण रात्र विज्ञानाला लाजवून गेली
शिकलेली नवी पिढी, शरमेने खजिल झाली

असा कसा प्रकोप होतो, या विज्ञान युगात
कार्यकारणभाव न समजे, आजच्या या घटनेत

दृष्टिकोन विज्ञानाचा, ‘अंध’श्रद्धेत खिळून बसला
पारलौकिक मानवतेचा, अध्यात्मात शांत निजला

महादेव कांबळे, यवतमाळ


असेन मी तर असशील तू
माझ्यावाचून जगी कुणाच्या
आश्रयास प्रभू जाशील तू
पाषाणातुन मूर्ती कोरून
उटी चंदनी तुजला लावून
माझ्या हातून तुजी निर्मिती
माझ्यावाचून शून्यच तू
घरावाचूनी माझी वणवण
दिले तरी तुझ मंदीर बांधून
नैवेद्याच्या ताटासाठी
माझ्यावरी अवलंबून तू
राग, लोभ, मद, मत्सर सगळे
विनाशकारक मजला कळले
तुझ्या रूपाने भीती घातली
मीच मला धर ध्यानी तू

राम मोरे, घाटकोपर(पू.), मुंबई


नंतर अडचण येऊ नये म्हणून
तिचे लग्न लहानपणीच लावले
-त्यांच्या सहिष्णु धर्माने!
(जेंव्हा तिला लग्न म्हणजे काय तेही कळत नव्हते.)
विधवेचे आयुष्य वाट्याला येणे,
फारच वाईट-!

त्यात ‘असला’ समाज,
रोज दु:खात होरपळण्यापेक्षा,
एकदाच जाळून टाकण्याचा,
विचार मांडला-
-त्यांच्या सहिष्णु धर्माने!

काळीज कापणारा तिचा आक्रोश ऐकून,
ऐकणारांचे कान फुटू नयेत म्हणून,
जीव खाऊन ढोल बडवले,
-त्यांच्या सहिष्णु धर्माने!

भर दिवसा एक जीव जाळून झाल्यावर,
तिला अमर करण्यासाठी,
मंदिराची उभारणी केली,
-त्यांच्या सहिष्णु धर्माने!

हजारो मं.दिरातल्या ‘सती’
मशाली बनून बाहेर पडल्या,
तेंव्हा
शेपूट पायात घालून पळ काढला,
-त्यांच्या सहिष्णु धर्माने!

अनिल चव्हाण, कोल्हापूर


चिंध्या चिलखत, गाडग्याची ढाल
हाती तलवार, खराट्याची॥

            कवड्यांची कानी, कवच कुंडले
            विचार मांडले, वैज्ञानिकांचे॥1॥

झाडूनिया गाव, काढी सारी घाण
मग प्रबोधन, कीर्तनातूनी॥

            कीर्तनामधून, करी ऐसे वार
            भोंदू होई गार, प्रबोधनाने॥2॥

अशिक्षित तुम्ही, वैज्ञानिक दृष्टी
वर्षावली वृष्टी, सत्यज्ञानाची॥

            तुझ्या खराट्याने, देव घाबरले
            चरणी आदळले, तुमच्या बाबा॥3॥

रूढी परंपरा, सत्यनारायण
नाही त्यात राम, वदे कीर्तनी॥

            अंगारे-धुपारे, मुर्खांचा हा खेळ
            अनर्था नां वेळ, सांगती जना॥4॥

बाबांनी शोधला, माणसात देव
अन्य नाही ठेव, तिर्थी-देवळी॥

            अंधश्रद्धांवरी, सदैव प्रहार
            जगी संत थोर, गाडगेबाबा॥5॥

मधुकर धंदरे, नागपूर


श्रावणी सोमवार पहिला आठवडा
मोकळे केस, राहिला अंबाडा
कर्मकांडाचा किती हो पगडा
शिकवीन म्हणते डार्विनचा धडा
स्त्री जन्माची खरी व्यथा
फुका देवीच्या गौरव-गाथा
गळा घोटती, कन्या प्रसवता
बाकी सार्‍या भाकडकथा.
ज्ञानोबा, तुकोबा
सर्वस्व त्यागिले,
बाबा, बापू आज
सुखांसी भोगिले.
अंधश्रद्धा आहेत कुठे?
बाबांनी प्रतिपादन केले,
यज्ञ पेटवून त्यांनी
शाळेचे उद्घाटन केले.
पदरात मूल, चार भिंती चूल,
चिंता ज्योती-सावित्रीला,
दंड तुटला, अवकाश नटला
वंदन मात्र सती-सावित्रीला.
धर्म-पंथाच्या नावाने
दुकाने काढली
अन् दारी देवाच्या
दलाली वाढली.
इंटरनेटच्या साहाय्याने
टळली बाबा गैरसोय
सिलिकॉन व्हॅलीत आता
सत्यनारायणाची सोय.
रक्षकाचा आव आणला
कर्मकांड केवढे माजले
धर्म कधीच संपला
थोतांड तेवढे राहिले.
यशोशिखरे चढताना
पूर्वजन्मीचे पुण्य,
काटे-कुटे तुडवताना
टीका-‘कर्तव्यशून्य’
डुक्कर अन् गाईने
धर्म बाटतो काय?
नरा कापिले अन् जाळीले
धर्माकडे उत्तर काय?

अर्जुन जगधने, गोरेगांव, मुंबई