Categories
भूताटकी

भुताच्या शोधात

मे - २०११

इतका बुद्धिमान असणारा माणूस भुतासारख्या कल्पनेला घाबरतो याचा खेद वाटत असला तरी खरं तर माणसाची विकसित बुद्धीच भुताच्या निर्मितेस कारणीभूत आहे. दीर्घकालच्या स्मरणशक्तीमुळे समोर उभ्या नसलेल्या किंवा मृत व्यक्तीबद्दलची त्याची आठवण ताजी राहू शकते. इतर प्राण्यांत ती फारशी आढळत नाही. त्यामुळे इतर प्राण्यांमध्ये भूत-पिशाच्च कल्पना नाहीत आणि बुद्धिमान माणसालाच त्याचे भय वाटते अशी तुलना करणे सोडून देऊ.

धर्म आणि भूत : खरं तर जे मुख्य धर्म म्हणून मानले जातात त्या धर्माच्या मृताबद्दलच्या कल्पना पाहिल्यास त्यात भुताला स्थान असण्याचे कारण नव्हते. कारण हिंदू प्रथेनुसार व्यक्तीचा तातडीने किंवा बारा दिवसांनंतर पुनर्जन्म तरी व्हायला हवा किंवा मोक्ष तरी प्राप्त व्हायला हवा. ख्रिस्ती माणसाचे पाप आधीच देवाच्या मुलाने भोगल्याने तो पापमुक्त होऊन देवाकडेच परत जातो. आणि मुस्लिम धर्मियांचा आत्मा ‘कयामत के दिन’ तक निवाडा होण्याची वाट पाहतो. परंतु धर्मावर श्रद्धा असूनही लोकांचा या धर्मकल्पनेवर विश्वास नसतो. आणि भीतीची मूलभूत भावनाच त्यावर मात करून भुताची कल्पना तयार करते.

            देवाची निर्मिती पिशाच्य कल्पनेतून झाली असावी असे अनुमान आगरकर सारख्या सुधारकांनी काढलेले आहे. सुरवातीला वाईट घडवेल, अशी ज्याबद्दल भीती वाटते त्या कल्पनेचे मनधरणी केल्यास वाईट घडवणार नाही अशा देवाच्या कल्पनेत तर पुढे सगळ्याचे कल्याण पाहणारा देव असा विकास झाला असावा असे मानायला वाव आहे. “माणूस महाबलाढ्य कसा झाला” या रशियन पुस्तकात माणसाची कथा मांडली आहे, त्यात पिशाच्य कल्पनेचा समावेश आहे. “एखाद्या शस्त्राने व्यक्ती मेली असं मानण्याऐवजी ते शस्त्र पिशाच्याच्या दुष्ट शक्तीने भारीत होतं” असा समज आपल्या रानटी पूर्वजांचा होता. “व्होल्गा ते गंगा” या पुन्हा अशाच राहुल सांकृत्यायन यांच्या कादंबरीवजा चित्रणात टोळीची राणी तिच्या उतारवयात तिच्या स्वत:च्या हाताने मारलेल्या बालकांच्या भुताच्या कल्पनेने घाबरून उठते असे चित्रण आहे. भारतीय मिथ्यकथेचा मागोवा घेताना भुताच्या कल्पना निर्मितीचा एक वेगळाच पैलू डी.डी.कोसंबी यांनी समोर आणला आहे. मिथ्यकथा त्याकाळच्या समाज जीवनाचं चित्रण करतात अशी डी.डी.कोसंबी यांची भूमिका आहे.

नरबळीची प्रथा आणि भूत

            सुफलतेच्या विधीच्या प्रसंगी नरबळी दिले जात.(आजही नारळ फोडणे हा नरबळी देण्याचे प्रतिक आहे.) परंतु तो या लेखाचा विषय नाही. महाभारतासारख्या ग्रंथात पाण्याच्या तलावाच्या काठी यश-गंधर्व यांनी प्रश्न विचारण्याचे आणि योग्य उत्तरे न देणार्‍यांना मारून टाकण्याचे प्रसंग आहेत. डॉ.डी.डी.कोसंबी यांच्या मते या घटना-प्रसंग नरबळी देण्याचे विधी आहेत. (“पुराणकथा आणि वास्तवता”) अशा प्रसंगी जो बळी दिला जात असे तो गंधर्व बनत असे. गंधर्व हे अशारिरी असून अप्सरांचे पती असतात. गंधर्वबाधा होणे याची लक्षणे आजच्या ‘भूतबाधे’च्या लक्षणांशी जुळतात. या सगळ्यांतून निघणारा अर्थ असा की, नरबळी दिला जाताना त्याची समजूत पटावी म्हणून त्याला उच्च स्थानाचे आकर्षण दाखवले जात असावे. अशी व्यक्ती मृत्यूनंतर अप्सरांच्या कायम सहवासात राहते अशी लालूच दाखवलेली आहे. जिहादसाठी आत्मघात करणार्‍या व्यक्तींना देखील स्वर्गात कुमारी अप्सरा त्यांच्या दिमतीला हजर असतील अशी लालूच आहे.

पिंपळावरचा मुंजा आणि बौद्ध धर्म :

            ‘हिंदू एक चकवा’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात संदीप जावळे यांनी असे म्हटले आहे की, बौद्ध धर्माला बदनाम करण्याचा भाग म्हणून पिंपळावर भुताचे वसतीस्थान बनवण्यात आले. बौद्ध धर्मात पिंपळ वृक्षाला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे पिंपळाकडे पर्यायाने बौद्ध धर्माकडे लोकांनी वळू नये म्हणून पिंपळावर भूत असते अशी भीती पसरवण्यात आली. असे संदीप जावळे यांचे म्हणणे आहे. अगदी अलिकडच्या काळातदेखील बाबरी मशीद पाडण्याचा कार्यक्रम नेमका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनीच का घडवण्यात आला यामागे योगा-योगापेक्षा जाणिवपूर्वक कटकारस्थानाचाच वास येतो.

            या दोन संदर्भावरून भूताच्या निर्मितीमागे केवळ एकच तर्कशास्त्र लागू शकणार नाही हे लक्षात येईल. येथे माझा वैयक्तिक अनुभव द्यायचा मोह आवरत नाही.

व्यक्तीच्या अस्तित्वाची सवय आणि मरणोत्तर भास :

            भुताचा भास फक्त त्याला घाबरणार्‍या किंवा भुतावर विश्वास ठेवणार्‍यालाच होतो असे माझे मत होते परंतु गेल्या वर्षी मी स्वत:च याचा अनुभव घेतला. (अर्थात त्यामुळे ‘भूत’ खरोखरच अस्तित्वात असते असे काही मी सांगणार नाही) परंतु त्यामुळे या कल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला याची कबुली द्यायला हरकत नाही.

            त्या मागची हकीकत अशी की, आमच्या सोबत काम करत असणारा कर्मचारी अचानक मृत्यू पावला. एका विशिष्ट ठिकाणी बसून येणार्‍या-जाणार्‍या इतर कर्मचार्‍यांवर गंमतीशीर शेरे करण्याची त्याची सवय आमच्या अंगवळणी पडली होती. याच कारणामुळे का होईना पण दोन-तीन वेळा तेथून जाताना तो तिथेच आहे आणि आपल्याला हाक मारतो असा भास मलादेखील झाला. असा भास भीतीपेक्षा सवयीचा परिणाम आहे हेही त्यातून लक्षात आले. ज्यांच्या मनात आधीच भुताची कल्पना ठाम मांडून आहे त्यांच्यासाठी हा भास म्हणजे त्याचा न मागता मिळालेला पुरावाच आहे. असे पुरावे आपण ठरवून केलेल्या प्रयोगापेक्षा जास्त ठसतात हेही तितकेच खरे. परंतु भुताची सांगड भीतीशीच का घातली जाते? आपला मित्र भूत झाल्यावर त्रास देण्याची शक्यता जास्त आहे असे का वाटावे याचे उत्तर काही उत्क्रांतीवाद्यांकडे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भीतीची भावना जीवन टिकून राहण्यामागे जास्त फायदेशीर ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रत्यक्षात साप असताना तो नाही असे वाटणे या भ्रमात असलेली व्यक्ती सर्पदंशाला आमंत्रण देऊ शकेल परंतु याच्या उलट म्हणजे साप नसताना साप असल्याची भीती त्या मानाने तोट्याची ठरत नाही. त्यामुळे विषाची परीक्षा घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही.

ड्रॅक्युला आणि व्हॅम्पायरचे भूत :

            ड्रॅक्युलावर आधारित चित्रपट पाहताना स्पेनचे मेंदूविकारतज्ज्ञ जुआन गोमेझ अलोन्सो यांच्या रेबीजच्या रूग्णामध्ये आणि ड्रॅक्युलाच्या चित्रणांमध्ये असणारे साम्य लक्षात आले. कुत्रा किंवा कोल्ह्यासारख्या प्राण्याच्या चाव्यानंतर रेबीज रोगाची शक्यता असते. या रूग्णामध्ये निद्रानाश, स्नायूंचे अचानक आकुंचन(मस्कूलर स्पाईम) यामुळे रक्तमिश्रित थुंकी येणे यांच्याबरोबरच उजेड, पाणी आणि आरशासारख्या वस्तूंना असणारी अतिसंवेदनशीलता यांचा ताळमेळ ड्रॅक्युला किंवा व्हॅम्पायरच्या चित्रणांशी जवळजवळ तंतोतंत बसतो. त्यात लसणाच्या वासाला भिणारे ड्रॅक्युला आणि दुसर्‍या सामान्य व्यक्तीचा चावा घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे ड्रॅक्युलामध्ये रूपांतर होणे या साम्यामुळे ड्रॅक्युला दुसरे तिसरे कोणी नसून रेबीजचे रूग्ण असावेत असे मानायला वाव आहे. व्हॅम्पायर आणि ड्रॅक्युलाच्या कहाण्या प्रसिद्ध होण्याचा काळ आणि रेबीजच्या युरोपमधील संसर्गाच्या उपद्रवाचा काळ हाही जुळतो. विशेषत: हंगेरीमधील 1721 ते 28 या काळात हा उपद्रव मोठ्या प्रमाणात होता. डॉ.जुआन यांनी या संदर्भातील एक लेख मेडिकल जर्नल ऑफ न्युरॉलॉजीमध्ये 1998 मध्ये प्रसिद्ध केला आहे. त्याअगोदर 1985 मध्ये डेव्हिड डॉल्फिन नावाच्या जीवरसायनतज्ज्ञाने रक्ताच्या आजाराशी व्हॅम्पायरशी तुलना करण्याचा प्रयत्न केला होता.

            रेबीज या आजाराशी रात्री प्राण्यामध्ये रूपांतर होणार्‍या मनुष्याच्या किंवा भुताच्या कथांशीदेखील सांगड घालता येईल. त्याशिवाय प्रेतात्मे फिरण्याच्या घटनेचा छडादेखील अशाच पद्धतीने लावला गेला. विल्फ्रेड नावाच्या एका कुमारवयीन मुलाला त्याच्या मृत्यूनंतर पुरण्यात आले. तो एका वर्षानंतर पुन्हा गावात आला परंतु कोस्टास या भौतिकीतज्ज्ञाच्या मते हे भूत नव्हते. ज्या हैती भागात विल्फ्रेड राहत होता त्याच परिसरात मिळणार्‍या माशांचे यकृत विषारी असते. हे विष मनुष्याला पूर्णपणे मारू शकत नसले तरी मनुष्य मेल्यासारखा निपचित पडतो. विल्फ्रेडच्या कथेमध्ये विषप्रयोगानंतर विल्फ्रेडला पुरण्यात आले. त्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेचा परिणाम त्याच्या मेंदूवर झाला असण्याची शक्यता होती. हैती परिसरात कबरी फार खोल खणल्या जात नाहीत. त्यामुळे विल्फ्रेड त्यातून बाहेर येऊ शकला. अर्थात काही किंमत चुकवूनच. त्यानंतर डॉ.रॉजर मॅलोरी यांनी विल्फ्रेडच्या मेंदूचे एम.आर.आय.स्कॅन केल्यानंतर त्यात मेंदूला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे इजा झाल्याचे निष्पन्न झाले. यातून विल्फ्रेड हा प्रेतात्मा नसून विषप्रयोगाचा बळी होता हेच सिद्ध झाले. अर्थात भुताखेताच्या नावाखाली कुणी कुणाचे खून केले असतील हे सांगणे कठीणच.

भूत कोकणातले : हिंदी चित्रपटावरून कुणी इथल्या भुतांबद्दल अनुमान काढण्याचा प्रयत्न करेल तर निष्कर्ष हमखास चुकतील. अर्थात त्याचे कारण हिंदी चित्रपटातील भुते ही इंग्रजी चित्रपटावर बेतलेली असतात. युरोपीय किंवा ख्रिस्ती/मुस्लिम संस्कृतीमधील भुते कबरीमधून उठून बाहेर येतात. त्यांच्याशी सर्वसामान्य व्यक्ती अयशस्वी का होईना मारामारी करू शकते. त्याचे कारण अर्थातच त्यांच्यातील दफनपद्धती आहे. हिंदू परंपरेतील भूत अशरीरी असते. त्यामुळे ते मनोकामना पूर्ण करण्यास शरीराचा ताबा घेते. नाहीतर भासमान असते. कोकणातल्या माझ्या गावी असताना असाच एक अनुभव ऐकायला मिळाला. विंचवाचा डंख झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्या मुलीला भुतानेच नेले असा समज त्यांच्या पालकांचा होता. त्याचे कारण मुलीला मृत्यू विंचवाच्या डंखाने लगेच झाला नव्हता. दोन दिवस त्या मुलीला बेशुद्धावस्थेत काही माणसे दिसत होती. ती माणसेच आपल्या मुलीला बोलवायला आली हा पालकांचा समज दूर करणे कठीणच होते. विंचू चावल्यानंतर रक्तदाबात कमालीची घट येते. या परिस्थितीत मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्याने असे भास होणे शक्य होते.

            श्वसनाचे विकारही बर्‍याचदा भुताच्या कल्पनेला बळकटी देतात. झोपेत श्वास कोंडला जाण्याचा विकार काही लोकांना असतो. किंवा उघड्यावर झोपणार्‍यांचा धुळीमुळे श्वास कोंडला जाऊ शकतो. अशा व्यक्तींना छातीवर कुणी बसले आहे असा भास होतो या सर्वाचा संबंध भुताशी जोडला जातो.

            भुताबद्दलच्या कल्पना या अशा काल आणि स्थान संदर्भात बदलत असतात. एवढेच आपण म्हणू शकतो.

-संजय सावरकर