Categories
चार्वाक कट्टा

 बुरख्याआडचे चेहरे

फेब्रुवारी – २०१२

शरयू : अरे मागच्या महिन्यात भेटलो असतो तर एका गरमागरम बातमीवर चर्चा करता आली असती.

समीर : विषय जर गॉसिप या सदरात मोडणार नसेल तर आताही बोलू शकतो.

शरयू : एका ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या नेत्याच्या नातीने मुस्लीम तरूणाशी लग्न केले याला तू काय म्हणशील?

ज्योती : मला एक कळत नाही की, आजोबाने काय म्हणावे आणि नातीने काय करावे याचा संबंध आपण जोडू नये.

प्रतिक : का जोडू नये? कारण हेच लोक ‘लव्ह जिहाद’ वगैरेचा बागुलबुवा उभा करतात, आणि स्वत:च्या घरात मात्र सर्व काही चालू देतात.

समीर : प्रतिक, तुझ्या शब्दात नकळतपणे पुराणमतवादी विचार दिसून येतात. तुला जणू काही असे म्हणायचे आहे की, त्यांनी तलवारी वैगेरे घेऊन त्या दोघांची हत्या करायला पाहिजे होती.

प्रतिक : नाही, माझे असे म्हणणे नव्हते पण त्यांच्या वागण्यात दांभिकपणा आहे.

कल्पेश : पण या दांभिकपणापेक्षा पुरोगामित्वाचा दांभिकपणा जास्त वाईट नाही का?

आशिष : एक तर तुम्ही उगाच चर्चा करताना ती भरकटवत आहात पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे बातमी खरी की खोटी याची शहानिशा न करताच तावातावाने भांडत आहात. तुम्ही ज्या बातमीबद्दल बोलत आहात ती खोटी आहे.

कल्पेश : बातमी खोटी असली तर लोकांनी लगेच विश्वास ठेवावा याचे कारण फार महत्वाचे आहे. आजवर या लोकांचा इतिहास बोलावे त्याच्या उलट वागावे असा आहे.

आशिष : त्यापेक्षा मी स्वत: ज्याचा अनुभव घेतला त्याबद्दल बोलूया का?

गौतम : तू काही दैवी अनुभव वगैरे तर घेतला नाहीस ना?

आशिष : तसेच म्हणायला हरकत नाही. गेल्या महिन्यात सनातनी धर्माचा पुरस्कार करणार्‍या संघटनेच्या आश्रमात जाण्याचा योग आला.

प्रतिक : तुला मध्येच थांबवतो, पण योग आला हा शब्द चुकीचा नाही का वाटत?

शरयू : प्रतिक, तू उगाच प्रत्येक वेळेस आक्षेप घेतोस, स्वत:च  दुर्दैव हा शब्द सारखा वापरत असतोस.

गौतम : प्रतिक चुकत असेल म्हणून त्याने घेतलेला आक्षेप चुकीचा असे आपण नाही म्हणू शकत. योग्य कृती ही की, आपण दोघाच्या चुका सुधारल्या पाहिजेत. “योग आला”, “आपले भाग्य असे की यांच्यासारखे पाहुणे आपल्याला लाभले आहेत”, “दुर्दैवाने” असे अनेक शब्द आपण वापरतो. त्याचे मूळ दैववादी मानसिकतेत आहे. मला माझ्या दादाचे उदाहरण आठवते. त्याच्या लग्नानंतर त्याला कुणी “लग्न कधी झाले असे विचारले” असं विचारले तर तो आधी म्हणायचा की, “लग्न झाले नाही, लग्न केले.”

कल्पेश : थोडा विचार केला तर आपण पर्यायी शब्द शोधू शकतो. “योग आला” याऐवजी “संधी मिळाली”, दुर्दैव याऐवजी दु:खदायक घटना असे शब्द वापरणे जास्त योग्य आहे.

शरयू : तुमचा भाषेचा वर्ग संपला असेल तर आपण आशिष काय म्हणतो ते ऐकूया का?

आशिष : आता सुधारून बोलतो. एका सनातनी धर्माचा पुरस्कार करणार्‍या संस्थेच्या आश्रमात मी जाऊन आलो. तिथले सगळे वातावरण पाहून मी अवाक् झालो. अशा पद्धतीने लोक राहू शकतात याचा मी विचारच केला नाही. आतापर्यंत मी भाविक किंवा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक पाहिले आहेत पण इतक्या उघडपणे भोळसटपणाचा नमुना मी पाहिला नव्हता. स्त्रियांनी कुंकू किती मोठे लावायला पाहिजे इथपासून छोट्या छोट्या कृतीत धर्माचे काय म्हणणे आहे हे तर होतेच पण आपली भक्ती पूर्ण होऊ नये म्हणून कुणीतरी कशी करणी केली अशा गोष्टी लोक अगदी गंभीरपणे ऐकत होते. त्यातल्या साधकांची श्रेणी कशी चढत जाते आणि त्यांना शक्ती कशी मिळते हे सगळे ऐकायला तिथे पिकनिक काढायला पाहिजे. आणि सगळ्यात मजेशीर प्रसंग कुठला असेल तर त्याच्या गुरूने एका गाडीतून प्रवास केला होता त्या गाडीची लोक आरती काय करतात… आणि त्याकडे टक लावून पाहत काय असतात…!! सगळेच मजेशीर.

ज्योती : लोक अंधश्रद्धेमुळे इतके मूर्ख बनतात याचे कारण काय असेल?

प्रतिक : मला एक शंका येते की, गाडी म्हणा किंवा आश्रमाची व्यवस्था म्हणा, हे काही आपोआप चालत नाही. हा पैसा कुठून तरी येतो. फक्त भक्तांना लुबाडून एवढा पैसा गोळा होत असेल का? पुन्हा इतका मूर्ख भक्त काय रोजगार करत असेल. आपण नाही का राजकारण्यांना मूर्ख म्हणत पण प्रत्यक्षात त्यांना लोकांना कसे मूर्ख बनवावे याचे ज्ञान बरोबर असते. त्यामुळे मला शंका येते की, हे लोक मूर्ख नसावेत पण मूर्ख आहोत असे भासवत असावेत.

            आपण मात्र या लोकांच्या मूर्खपणाच्या गोष्टी चघळत राहतो आणि सगळा भर त्यांच्या आध्यात्मिक मांडणीकडे देत राहतो. खरे म्हणजे या लोकांना खरोखर धर्मावर आधारित राष्ट्र आणायचे आहे की, यांचा उद्देश दुसराच आहे याचा विचार करायला पाहिजे.

ज्योती : तुझ्या मते असा दुसरा कोणता उद्देश असू शकेल?

प्रतिक : याचे उत्तर मला नीटसे ठाऊक नाही.

शरयू : मग तू बोललास तरी कशाला?

आशिष : पूर्णपणे ठाम असल्याशिवाय बोलू नये असे जर मानले तर आपल्याला पुढेच जाता येणार नाही. आणि प्रतिकने काही सिद्धांत मांडला नाही. त्याने अंदाज वर्तवला. आणि वरकरणी तरी मला तो बरोबर वाटतो. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, आपली लढाई मूर्ख माणसासोबत असती तर ती आपण कधीच जिंकली असती.

गौतम : मला वाटते की, माणसे मूर्ख किंवा बुद्धीमान असतात यापेक्षा व्यवस्था किती हुशार आहे यावर ते ठरते. जेव्हा इकडच्या कारखानदारांना जास्तीत जास्त लोकांनी एकत्र काम करावे असे वाटत होते तेव्हा ते सर्वधर्मसमभाव या मूल्याला पाठींबा देत होते. आता जेव्हा त्यांना, लोकांनी एकत्र येऊ नये असे वाटते, तेव्हा ते वेगवेगळ्या मार्गांनी लोकांची धार्मिक अस्मिता जागृत कशी राहील याचा विचार करतात.

ज्योती : म्हणजे हे सर्व बुरख्याआडचे चेहरे म्हणायचे तर….!!

कल्पेश : बुरखा शब्द पुन्हा चुकीचा आहे. कारण बुरखा सक्तीने लादलेला असतो आणि बर्‍याचदा हा शब्द विशिष्ट धर्मासाठी वापरला जातो. त्याऐवजी मुखवटा हा शब्द योग्य वाटतो नाही का?

शरयू : कल्पेशच्या ठरावाला अनुमोदन देऊन मी सभा संपली असे जाहीर करते.

आशिष : शरयू, आता तर काही दुसरे काम पण नाही. इतक्या लवकर काही संपवायची गरज नाही.

शरयू : महो महाशय, परीक्षा जवळ आहेत त्याचा अभ्यास असतो हे लक्षात असू द्या. आणि आता आपल्याला देवाचा धावा करायची देखील सोय उपलब्ध नाही. नाहीतर त्यावर आणखीन एक चर्चा सत्र घडेल.

संजय सावरकर