भारतीय तत्वज्ञान म्हणजे फक्त वेद आणि वेदान्त, असा एक समज पाश्चात्य देशांत प्रचलित आहे आणि गेल्या काही वर्षांत चाललेल्या ‘हिंदुत्वा’च्या भरती-ओहोटीच्या खेळात तो आपल्याकडेही रूजलेला दिसतो. खरं तर आपल्या इतिहासात वेदविरोधी, चैतन्यविरोधी अनेक तत्ववेत्ते आणि पंथ होऊन गेले. अगदी उपनिषदांपासून ते शंकराचार्यांपर्यंत वेदान्तवाद्यांना भौतिकवाद्यांविरूद्ध तीव्र वैचारिक लढा द्यावा लागला. कधी ग्रंथसंपदा नष्ट करून तर कदी ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ अशी हेटाळणी करून सनातन्यांनी जडवादाची मुस्कटदाबी करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला, आजही तो चालू आहेच.


तत्वज्ञानातले प्रवाह: माणूस विचार करू लागला तसे त्याला स्वत:बद्दल आणि विश्वाबद्दल प्रश्न पडायला लागले. विश्व खरं(सत्य) की खोटं(मिथ्या)? भौतिक परिस्थितीतून विचार होतो की विचार ईश्वरदत्त असतात? इत्यादी. या प्रश्नांची माणसांनी शोधलेली उत्तरं म्हणजे तत्त्वज्ञान. जे चैतन्याला प्राधान्य देतात, चैतन्यातून जड वास्तवता निर्माण झाली असं मानतात, ते चैतन्यवादी. जे जडाला प्राधान्य देतात, जडातून चैतन्य निर्माण झालं, भौतिक परिस्थितीतून विचार निर्माण होतात असं मानतात, ते जडवादी. जगभरात तत्वज्ञानातील आयडियालिझम(चैतन्यवाद किंवा कल्पनावाद) आणि मटेरियालिझम(जडवाद किंवा भौतिकवाद) हे दोन मुख्य आणि स्पष्ट तट आहेत. चैतन्यवाद हा चिंतनशील आणि निवृत्तीप्रधान आहे तर जडवाद हा प्रयोगशील आणि कृतीप्रधान आहे. जडवादाचा मक्ता पाश्चात्त्यांकडे आहे आणि चैतन्यवादाचा पौर्वात्य किंवा भारतीयांकडे आहे, हा समज पार चुकीचा आहे. प्लेटो, बर्कले, ह्यूम, हेगेल यासारखे पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते चैतन्यवादी होते, तर कपिल, बृहस्पती(लोकायत/चार्वाक), कणाद, बुद्ध जेमिनी, गौतम, कुमारिल भट्ट हे प्राचीन भारतीय तत्त्ववेत्ते जडवादी आणि निरीश्वरवादी होते. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाला ‘दर्शन’ असं म्हणत. प्रसिद्ध दर्शनांपैकी वेदान्त(उपनिषद) उत्तरकालीन न्यायवैशेषिक आणि महायान बौद्धवाद ही दर्शनं चैतन्यवादी होती. लोकायत, सांख्य, पूर्वमीमांसा, पूर्वकालीन न्यायवैशेषिक, मूळ स्वरूपातील बौद्ध आणि जैन तत्वज्ञान ही दर्शनं जडवादी आणि निरीश्वरवादी होती. मात्र यापैकी लोकायत, बौद्ध आणि जैन यांनी वेदान्त व वेद दोन्ही नाकारले, म्हणून त्यांना नास्तिक निरीश्वरवादी असं म्हणतात. तर इतर जडवादी दर्शनांना वेदान्त मान्य नसला तरी वेद मान्य होते, म्हणून त्यांना आस्तिक निरीश्वरवादी असं म्हणतात. (आस्तिक याचा खरा अर्थ वेद मानणारा असा आहे)
चैतन्यवादाचा जन्म : ज्ञात ऐतिहासिक साधनांचा विचार करायचा तर वैदिक काळापासून सुरवात करावी लागते. ऋग्वेदाच्या आणि त्याहीआधीच्या काळातला टोळ्यांचा समाज हा प्राथमिक साम्यवादी अवस्थेत होता. साहजिकच संसाराकडं पहाण्याची त्यांची दृष्टी निसर्गवादी म्हणजेच भौतिक होती. या काळात माणूस आणि निसर्ग यांच्यापासून स्वतंत्र, अमूर्त अशी विश्वनिर्मिती महाशक्ती आहे असा विचार नव्हता. सूर्य, अग्नी, वायू, वरूण अशा नैसर्गिक देवता मानल्या जात असल्या तरी स्वार्थासाठी त्यांची प्रार्थना करण्याशिवाय पूजाअर्चा, कर्मकांडं नव्हती. पुढचे तीन वेद हे उपनिषदं या काळात उत्तर भारतातील आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत मोठे बदल झाले. पशुपालनाबरोबर शेती आली. लोखंड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालं. वस्त्यांची शहरं झाली. सगळ्याच प्रकारचं दळणवळण वाढलं. इतर व्यवसाय वाढीला लागले तशी श्रमविभागणी आली. एकंदर सामाजिक उत्पन्न वाढलं तशी वरकड शिल्लक वाढली. समाजाचे यज्ञात कर्मकांडं करणारे आणि युद्धात लढणारे असे दोन भाग होतेच. आता पशुपालन, शेती करणारा वर्गही वेगळा झाला आणि कालांतरानं तो व्यापार करू लागला. हे झाले ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आक्रमक आर्यांनी इथल्या टोळ्यांवर वर्चस्व मिळवलं होतं, त्यांच्याकडे या तीन वर्गांची सेवाचाकरी आली, पुढे काही प्रमाणात शेतीही आली. ही मुळातली ‘गुणकर्मविभागश:’ चातुर्वर्ण्य व्यवस्था. समतावादी गणसंस्था लयाला गेली, लोकशाहीचं विसर्जन झालं आणि नवी शोषणावर आधारित व्यवस्था आली. लढाईसाठी निवडलेले नेते गणावर आपली सत्ता प्रस्थापित करू लागले. या सगळ्या उलथापालथीला ‘आध्यात्मिक’ पाठींबा हवा होता तो पुरोहितवर्गानं दिला. ही राज्यं रामायणातील दशरथ किंवा जनकाच्या राज्यांसारखी लहान होती, त्यात गणव्यवस्थेच्या परंपरांची धुगधुगी होती पण तरीही ती राज्यसंस्था होती. विचार हे समाजातल्या अधिकारी वर्गाचे विचार असतात(कार्ल मार्क्स), तसंच इथंही झालं. या बदलत्या व्यवस्थेचं वैचारिक प्रतिबिंब उपनिषदांमध्ये पडलं. अर्थात उपनिषदांमध्ये विश्वाबद्दलचं तत्वचिंतनही आहे. पण या वैचारिक भरार्या घेण्याच्या नादात पायाखालची जमीन सुटली आहे. ज्ञानेंद्रियांना जाणवणार्या जगाच्या पलिकडे त्यापासून स्वतंत्र, अतर्क्य, गूढ, निर्गुण, निराकार असं ‘ब्रम्ह’ आहे असा ‘शेाध’ त्यांनी लावला. माणसातला ‘मी’ म्हणजे त्याचं जिवंत शरीर नसून त्याच्यापलिकडचं ब्रम्हासारखंच ‘आत्मा’ नावाचं काहीतरी आहे असाही ‘शोध’ त्यांनी लावला. पाठोपाठच पुनर्जन्म, पूर्वसंचित, मोक्ष अशा कल्पनाही आल्या आणि सगळ्या तर्कटातून ‘अध्यात्म’ जन्मलं!
वेदान्ताची धार्मिक भूमिका : उपनिषदं या वेदांनंतर केलेल्या रचना म्हणजे वेदान्त. मुळात वेदान्त हे एक चैतन्यवादी तत्त्वज्ञान. पण पुढे स्मृतींच्या(मनुस्मृती इ.) काळात वेद आणि वेदान्त ‘अपौरूषेय’ आणि पवित्र मानले जाऊ लागले, तसा ब्रम्हाचा ब्रम्हदेव झाला, वर्गांच्या जाती झाल्या आणि तत्वज्ञानाचं धर्मात रूपांतर झालं. वेदांमध्ये ऋग्वेदातील ‘नारदीय सूक्त’ वगळता काहीच तत्वज्ञान नाही. त्यामुळे वेदान्त हेच हिंदू समाजव्यवस्थेचं अधिकारी तत्वज्ञान झालं, हिंदू धर्मशास्त्राचा वैचारिक आधार झाला. भारतातल्या शोषक वर्गाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वर्चस्वाचं वेदान्त हे वैचारिक हत्यार बनलं. चातुर्वर्ण्याच्या नव्या व्यवस्थेच्या समर्थनार्थ, सामान्य जनतेच्या विचारांना बेड्या ठोकण्यासाठी एक गूढवादी तत्वज्ञान मिळालं. ब्रम्ह जाणून घेणं हे खरं ज्ञान आणि तेही गूढ, अतर्क्य असं म्हटल्यानंतर या ज्ञानाचा मक्ता सत्ताधारी वर्गाकडे आला. ज्ञानाच्या या राखणदारांचे आदेश न पाळणं, त्याविरोधात बंड करणं हे ‘महापाप’ झालं. या पापाला या आणि नंतरच्या जगात शासन होणार हे तर ‘विधीलिखित’ झालं.
जडवाद : याला प्रतिक्रिया म्हणून बहुधा जडवादाची परंपरा सुरू झाली. चैतन्यवाद आणि जडवाद यांच्यातील वैचारिक संघर्ष व्यावहारिक क्षेत्रात मुख्यत: ईश्वरवाद विरूद्ध निरीश्वरवाद असा झाला. यातला निरीश्वरवाद या नकारात्मक शब्दाऐवजी त्याला स्वभाववाद म्हणणं योग्य ठरतं. विश्वाचा विकास ज्या त्या वस्तूच्या स्वभावधर्मामुळे झाला, तेथे ईश्वराच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही(“ईश्वर अभावात्, स्वभावेन इव”) अशी स्वभाववादाची सकारात्मक भूमिका आहे. याउलट कोणी एक सर्वज्ञ, प्रबळ अशी शक्ती विश्वाची निर्मिती, नियंत्रण आणि संचालन करते अशी ईश्वरवादाची भूमिका आहे. या भूमिकेबद्दल आपल्याकडच्या निरीश्वरवाद्यांनी तेव्हा जे प्रश्न विचारले तेच आजही आपण विचारतो : ईश्वरानं विश्व निर्माण केलं तर त्याला कोणी निर्माण केलं? जर ईश्वर स्वयंभू असेल तर विश्व का स्वयंभू नसावं? ईश्वर जर निर्गुण-निर्विकार तर त्याच्यात सृष्टी निर्माण करण्याची इच्छा कुठून आली? इच्छा आली की आसक्ती आली, आसक्ती आली की बंधन येतं, मग ईश्वर अमर्याद स्वतंत्र कसा असेल? आणि जर तो अमर्याद स्वतंत्र नसेल तर तो ईश्वर कसला? म्हणून लोकायतिकांनी अतिशय सोप्या शब्दात आपली मांडणी केली आहे :
“भूतात्मकं जगत्। स्वभावं जगत: कारणं आहु:।
न परमेश्वर: अपि कश्चित्।
न पुनर्जन्म: न मोक्ष:। मरणं एव मोक्षः।”
स्वभाववाद्यांमध्ये अनेक पंथ होते. कपिल प्रणित ‘सांख्य, चार्वाक(बृहस्पती?) प्रणित ‘लोकायत’, गौतम(बुद्ध नव्हे!) प्रणित ‘न्याय’, कणादप्रणित ‘वैशेषिक’, जैमिनीप्रणित(पूर्व) मीमांसा हे प्रवृत्तीपर पंथ तर बौद्ध आणि जैन हे मुख्यत: निवृत्तीपर पंथ. चार्वाकमत सोडलं तर यातही कालांतरानं ईश्वराचा किंवा कर्मकांडांचा शिरकाव झालाच. तरीही प्रत्यक्ष भौतिक अनुभव आणि त्यावर आधारित तर्कशुद्ध विचार ही स्वभाववाद्यांची शक्ती राहिली आहे.(स्मृतीकार आणि शंकराचार्य यांनी ज्याला कडाडून विरोध केला त्या न्यायशास्त्राचा प्रणेता गौतम स्पष्ट म्हणतो की, “संशय आणि चिकित्सा हे विचारांचं मार्गदर्शक तत्व असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ‘का’ हा प्रश्न विचारून त्याचं तर्कशुद्ध उत्तर शोधलं पाहिजे.”) याउलट शब्दप्रामाण्य, गूढवाद आणि धनिक व सत्ताधारी वर्गाचा आधार ही चैतन्यवादाची बलस्थानं होती. जडवादी विचारसरणी सामान्य लोकांमध्येही बरीच पसरलेली असावी, कारण वेदान्तवादी जडवाद्यांशी सतत टक्कर घेतं असं दिसतं.
स्मृतींमध्ये जडवाद्यांना धर्मभ्रष्ट, नीतीभ्रष्ट असं म्हटलं आहे. अर्थात आपल्या बहुतेक जडवाद्यांनी त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे. लोकायत हे इ.स.पूर्व सहाव्या-सातव्या शतकातलं सर्वात कट्टर जडवादी दर्शन. त्यात चार्वाकांनी स्मृतीकारांबद्दल वापरलेली ही दोन वचनं पहा : “आगम: धूर्तप्रणित:” म्हणजे वेद-वेदान्त हे बेरकी लोकांनी बनवले आहेत. “त्रयो वेदस्य कर्तारो भंडधूर्तनिशाचराः” म्हणजे तीन वेदांचे कर्ते हे भोंदू, बेरकी आणि निशाचर आहेत. असं ते म्हणतात कारण हिंदू धर्मरक्षकांना वेदांची आणि ब्रम्हदेवाची गरज चातुर्वर्ण्याच्या संरक्षणासाठी होती, एरवी ईश्वर मानण्या-न मानण्यानं त्यांना काही फरक पडत नव्हता. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात औदार्य आणि समाजव्यवस्थेच्या क्षेत्रात असहिष्णुता असे हे वेदान्त पुरस्कृत हिंदू धर्माचे दोन विसंगत चेहरे आहेत. तात्विक क्षेत्रात जडवाद्यांच्या भूमिका तर्कशुद्ध असल्यामुळे विरोधक निरूत्तर होत. वेदान्ताचे कट्टर पुरस्कर्ते शंकराचार्य महाबुद्धीमान असले तरी जडवाद्यांबरोबरचा त्यांचा युक्तीवाद ‘वेदप्रामाण्य’ हाच होता, तर्कशुद्धता हा नव्हता. आणि बुद्धीशिवाय वेदांसहित इतर कोणत्याही गोष्टीचं प्रामाण्य मानणं हाच तर मतभेदाचा मुद्दा होता. ब्रम्हज्ञान हेच अंतिम ज्ञान आणि वेदोक्त श्रद्धेला जडवाद्यांचा विरोध होता. ‘प्रत्यक्षं एव प्रमाण:, न कश्चित् आगम:’ या मुद्यावर लोकायत आणि इतर जडवादी ठाम होते.
वस्तुनिष्ठ ज्ञानाचं साधन कोणतं मानायचं, प्रत्यक्ष प्रामाण्य की शब्द प्रामाण्य हा या दोन विचारप्रणालींमधील टोकाच्या मतभेदांचा कळीचा मुद्दा आहे. याबद्दल चैतन्यवाद्यांचं म्हणणं असं की, आजूबाजूच्या जगाचं ज्ञान इंद्रियांद्वारे होत असलं(व्यावहारिक सत्य!) तरी जे ‘अंतिम सत्य’ आहे ते अंर्तदृष्टीनंच कळू शकतं, त्यासाठी आध्यात्मिक साधनंच अंगीकारावी लागतात, योगसाधना करावी लागते. जडवाद्यांचं म्हणणं असं की, आपली इंद्रियं हीच खर्या ज्ञानसंपादनाची साधनं आहेत. अंतर्दृष्टी आणि योगसाधनेचे अनुभव सार्वत्रिक नाहीत आणि म्हणून मान्य करता येत नाहीत. मीमांसा या दर्शनाचे खंदे समर्थक कुमारिल भट्ट म्हणतात, “न लोकव्यतिरिक्तं हि प्रत्यक्षं योगिनां अपि” म्हणजे जे प्रत्यक्ष ज्ञान सर्वसाधारण लोकांना अनुभवता येत नाही ते योगी पुरूषांनाही असू शकत नाही. ज्ञानसाधनेच्या या दोन मार्गांपैकी प्रत्यक्ष कसोटीचा, कृतीचा जडवादी मार्ग म्हणजे आजचा आपला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मार्ग. याच स्वभाववादी विचारसरणीमुळे सुश्रुत, नागार्जुन, महावीराचार्य, वात्स्यायन, आर्यभट हे प्राचीन शास्त्रज्ञ त्यांचं योगदान देऊ शकले.
जडवादाला उतरती कळा : इतकं प्रभावी आणि भौतिक जगाशी प्रत्यक्ष जोडलेलं तत्वज्ञान पुढे तग का धरू शकलं नाही? त्याचा आधार घेऊन शोषितांचे उठाव का झाले नाहीत? याचं पहिलं कारण म्हणजे तत्वज्ञानाच्या या चर्चांचा संबंध व्यवहाराशी, दलितांच्या ऐहिक उद्धारासाठी घालण्याचा आग्रही प्रयत्न एकट्या गौतम बुद्धांनीच केला. इतर बहुतेक तत्ववेत्ते हे बौद्धिक पातळीवर वावरत होते. अशोकाच्या राजवटीनंतरच्या राजसत्ता या वेदान्तवादाला अनुकूल होत गेल्या. स्मृतीकालानंतर बौद्धिक आणि शारीरिक श्रमांची ताटातूट झाली ती वेदान्ताच्या दैववादी विचारांना पोषक ठरली. इ.स.च्या आसपास प्रामुख्यानं शेतीवर आधारलेली स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अस्तित्वात आली. गुप्तकाळात सरंजामशाही आली. व्यवसायाधिष्ठित जातीव्यवस्था होतीच. या सगळ्याचा जो गोफ विणला गेला त्यामुळे समाजव्यवस्थेला अचल आणि सनातन स्वरूप आलं. बुद्धीप्रामाण्यवादी, मुक्त विचारांच्या अविष्कारासाठी हे वातावरण प्रतिकूल होतं. तरीही आठव्या शतकापर्यंत जडवादाचं तत्वज्ञान टिकून होतं. सातव्या शतकातील बौद्ध तत्वज्ञानी धर्मकिर्तीवर चार्वाकाच्या तत्वज्ञानाचाही प्रभाव होता. ‘प्रमाणवर्तिका’त तो लिहितो, “वेद प्रामाण्यं कस्यचित् कर्तृवाद: स्नाने धर्मेच्छा जातिवादावलेप:।
संतापारंभ: पापहानाय चेति ध्वस्तप्रज्ञानां पच्य लिङगानि जाड्ये॥”
म्हणजे वेद प्रमाण मानणं, कुणीतरी विश्व निर्माण केलं असं समजणं, पुण्य मिळवण्यासाठी तीर्थात स्नान करणं, जातीबद्दल गर्व बाळगणं, पापांचा नाश व्हावा यासाठी प्रायश्चित्तं घेणं, ही मनाचं संतुलन गेल्याची पाच लक्षणं आहेत.
पण नवव्या शतकात शंकराचार्य झाले. वेदान्ताच्या या कट्टर समर्थकानं आपल्या वादकौशल्याच्या जोरावर सगळ्या जडवाद्यांना दुर्बल केलं, वेद-वेदान्त मानणार्या सर्व पंथांना एका माळेत ओवलं, धर्मप्रसारासाठी चार दिशांना चार पीठं स्थापली. या सगळ्याचा परिणाम म्हणून आधीच्या सनातनी समाजव्यवस्थेला दगडासारखं काठिण्य आलं. ‘ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या’च्या आक्रमक प्रसारामुळे जडवादी विचारसरणी लुप्तप्राय झाली. पुढे इ.स.1008 मध्ये गजनीचा महमूद मंदिरं लुटण्यासाठी आला तेव्हापासून मुस्लीम आक्रमणं सुरू झाली, 1206 पासून त्यांची राजवट भारतावर आली, त्यानंतर परिस्थितीशरण समाज भक्तीमार्गाकडे वळला. तत्वज्ञानाच्या चर्चेला वावच उरला नाही.
‘वेदान्त’ या नावाखाली वैदिक धर्माचं पुनरूज्जीवन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वातंत्र्य चळवळींच्या दरम्यान झालं. या काळात देशात नैराश्याचं आणि न्यूनगंडाचं वातावरण पसरलं होतं. भारतीय जनतेचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागा करणं हे नेत्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं. यासाठी मुख्यत: विवेकानंद, लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांनी भगवद्गीतेचा उपयोग केला (भगवद्गीता ही वेदान्तातल्या विविध विचारधारांची भेळमिसळ आहे). “देश हा देव आहे, राष्ट्रभक्ती हा धर्म आहे, शरीर नाशवंत असलं तरी आत्मा अमर आहे, म्हणून शारीरिक हालापेष्टांची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढायला पुढे व्हा” असा संदेश या नेत्यांनी भारतीय लोकांना दिला. “इंग्रजांनी प्रगत शास्त्र आणि साधनं वापरून देश जिंकला असला तरी जड जगाकडे तुच्छतेनं पहाणारी आपली पुरातन आध्यात्मिक संस्कृती मुळातच श्रेष्ठ आहे, तेव्हा न्यूनगंड टाका आणि लढायला सज्ज व्हा, अंतिम विजय आपलाच आहे”, असा स्वाभिमानही त्यांनी लोकांना दिला.
कालांतरानं स्वातंत्र्य मिळालं, निधर्मी संविधान आलं तरी चैतन्यवादी भ्रामक कल्पना आणि परंपरेचा अहंकार मात्र तसाच राहिला. याउलट, समाजाच्या ऐहिक सुस्थितीचा विचार करणार्या बुद्धीप्रामाण्यवादी लोकांनी ब्रिटिशांविरोधात लढण्याऐवजी अनिष्ट प्रथा-परंपरा दूर व्हाव्यात यासाठी सुधारणांचा मार्ग स्वीकारला. हाही एक प्रकारे चैतन्यवाद आणि जडवाद यातला झगडाच. आजही तो धर्मवाद विरूद्ध अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या विवेकवादी चळवळी या स्वरूपात चालूच आहे…..