Categories
चळवळ

  चमत्काराचा दावा करून पत्रिका वाटण्याचे आवाहन करणार्‍यांविरोधात प्रबोधन

मार्च - २०१२

चंदगड व आजूबाजूच्या खेडेगावमध्ये गेल्या दोन तीन महिन्यात अंधश्रद्धा व गैरसमजुतीतून पत्रिका वाटण्याचा प्रकार चालू होता. एका मंदिरात दैवी चमत्कार झाल्याचा दावा करून त्याच प्रकारच्या 1000 पत्रिका देवाच्या नावाने 16 दिवसांत वाटण्याचे आवाहन त्या पत्रिकेत केले होते. त्या मंदिरात एक नाग निघाला तो ब्राह्मणरूपात प्रकटला व पुजार्‍याला म्हणाला माझ्या नावे पत्रिका छापणार्‍यांचा भाग्योदय होईल. मी चमत्काराने त्यांचे दु:ख दारिद्य्र नाहीसे करेन, पण जे पत्रिका वाटणार नाहीत किंवा पत्रिकेचा अपमान करतील त्यांचे खूप मोठे नुकसान होईल असे भावनिक आवाहन त्या पत्रिकेत केले होते.

            पत्रिका वाटणार्‍यांना लाखोंची लॉटरी लागल्याचे, सोन्याचा हंडा-गुप्तधन सापडल्याचे तसेच बेरोजगाराला नोकरी मिळाल्याचा दावा पत्रिकेत केला होता. तसेच पत्रिका फाडून टाकणार्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचे, एकाचा मुलगा वारल्याचे पत्रिकेत म्हटलं होते.

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चंदगड शाखा व माडखोलकर महाविद्यालयाच्या विवेकवाहिनी विभागाने याविरोधात प्रबोधन पत्रिका वाटण्याचे अभियान राबवले. लॉटरी लागणे ही योगायोगाची गोष्ट असून हे चमत्काराने अथवा देवाच्या नावे पत्रिका वाटण्याने होत नाही. तसेच गुप्तधन इत्यादी सापडल्यास ते सर्व सरकारजमा करावे लागते. त्यावर वैयक्ति मालकी नसते. तसेच नोकरी मिळण्यासाठी शिक्षण घेणे, स्पर्धेत उतरणे, क्षमता सिद्ध करणे हे अपेक्षित असते अशा आशयाच्या प्रबोधनपत्रिका वाटून लोकांना चुकीच्या आवाहनाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले. चंदगड शाखेचे प्रा.मनोहर दिवटे यांनी अनेक ठिकाणी जाहीरपणे पत्रिका फाडून दाखवून कागदरूपी पत्रिका फाडण्याने कोणतेही नुकसान होत नाही हे पटवून सांगितले. हे अभियान प्राचार्य डॉ.पी.आर.पाटील, प्रा.एन.एस.पाटील, प्रा.एम.एम.माने, प्रा.ए.डी.कांबळे, प्रा.एन.एस.मासाळ व विद्यार्थी यांच्या सहकार्‍याने यशस्वी झाले.

-प्रा. एम. एस. दिवटे, चंदगड, जि.कोल्हापूर