सध्याचे आपले जीवन धावपळीचे, ताणतणावाचे व स्पर्धेचे झाल्याने आपली मानसिक शांतता व स्वास्थ्य यावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. अशावेळी काही काळ आपण आपले स्नेही, मित्रपरिवार, परिचित यांच्यासमवेत एकत्र येऊन आपल्याच प्रश्नासंदर्भातील विषयावर मोकळेपणाने चर्चा करावी व आपले प्रश्न आपणाच सोडविण्याचा प्रयत्न करावा आणि याबरोबरच आपल्या समाजबांधवांचे या विषयावर विधायक प्रबोधन करावे या उद्देशाने ‘येसाई मराठा परिवार, सांगली’ या संस्थेची सुरवात डिसेंबर 1995 मध्ये करण्यात आली आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात करण्यात आली.
सध्या परिवाराने सभासद आणि समाज बांधवासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम सुरू केले असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
1) स्वत:चे आणि कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले रहाणेसाठी मार्गदर्शन करणे. लहान मुलांना सुरवातीपासून चांगल्या सवयी लावणे व त्यानुसार संस्कार करणे.
2) समाजातील युवापिढी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, संस्कार केंद्रे चालविणे, समुपदेशन केंद्र चालविणे.
3) वाचनाची आवड वाढावी यासाठी प्रबोधनात्मक साहित्य सहज उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न करणे.
4) समाजबांधवासाठी व्यायाम, योगासने, आहार यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व कार्यक्रमाचे आयोजन करणे.
5) विधवा विवाहासाठी आवश्यक ती मानसिकता तयार करणे व अशा विवाहांसाठी प्रयत्न करणे.
6) कालानुसार जुन्या रूढी व परंपरांमध्ये योग्य आणि आवश्यक ते बदल करणे-सुचविणे आणि त्यासाठी प्रबोधन, प्रचार करणे. धार्मिक कर्मकांडांचे स्तोम न माजविता वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून सण-समारंभ साजरे करणे. समाजस्वास्थ्य व पर्यावरण बिघडू न देणेबाबत दक्षता घेणे.
7. अंतेष्ठीचे सर्व विधी तिसर्या दिवशी पूर्ण करणेचा निर्णय अभ्यासू लोकांबरोबर चर्चा करून परिवारामार्फत घेणेत आला आहे. त्यानुसार काही ठिकाणी अंत्येष्ठीचे सर्व विधी तिसरे दिवशी पूर्ण करण्यात येत असून बरेच ठिकाणी सर्व विधी पाच दिवसांत पूर्ण करण्यात येत आहेत.
असे उपक्रम संस्थेचे सभासद स्वत:च्या पैशातून करीत आहेत. आपल्या समाज बांधवांना अशा उपक्रमांचा निश्चित लाभ होत आहे.
आपण या उपक्रमात सहभागी व्हावे आणि यथाशक्ती आर्थिक योगदान द्यावे.
-सुबराव पाटील (परिवार प्रमुख) मोबा.9423011511
बी.एम.खराडे पाटील (मोबा.9423268609)