Categories
संपादकीय

चवदार तळे ते कोल्हापूर

एप्रिल - २०१४

सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्यातील पाण्याचे आपल्या बांधवांसोबत ओंजळ भरून प्राशन करून संवेदनाहीन स्पृश्य समाजाला इशारा दिला- आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत व सार्वजनिक पाण्यावर आमचाही हक्क आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी व दलितांना न्याय मिळविण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. या ऐतिहासिक घटनेत समाजाच्या जुलमी धर्मप्रभावित कायद्याचा भंग केला गेला. पुढे पाण्यासाठीच्या हक्काच्या मोहिमा बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीच्याद्वारे महाराष्ट्रात गाजल्या. या चळवळीत डॉ. नरेंद्र दाभोलकर सहभागी होते.

धर्माच्या नावाखाली जादूटोणा व अघोरी उपायांचा धाक दाखवून समाजातील विविध घटकांना लुबाडणार्‍या बुवाबाबांना चाप लावण्यासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ झाला खरा; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधन मोहिमेची गरज महाराष्ट्र अंनिसला भासली. म्हणून या मोहिमेचे नियोजन झाले या लोकजागराची सुरवात चवदार तळ्यापासून झाली याला विशेष महत्व आहे व बाबासाहेबांनी केलेल्या सत्याग्रहापेक्षा वेगळा आशयही आहे. बाबासाहेबांचा सत्याग्रही लढा हा जुलमी कायदा मोडण्यासाठी होता. महाराष्ट्र अंनिसची 9 मार्चला चवदार तळ्यापासून सुरू झालेली मोहीम ही जुलुमकारी प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठीच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहे. पण दोन्ही लढे अंतिमत: समान ध्येयासाठीच आहेत. अन्यायकारी रूढीपासून मानवमुक्तीचे ध्येय साकार करण्यासाठीचेच हे लढे आहेत. म्हणूनच चवदार तळ्यापासून अंधविश्वासविरोधी प्रबोधन मोहीम सुरू करण्यात महाराष्ट्र अंनिसने कल्पकता दाखविली. सामाजिक समतेसाठीच्या लढ्यात परस्परांना साथ देत नरेंद्र दाभोलकर व बाबा आढाव यांनी विविध चळवळी उभारल्या. आज दाभोलकर हयात नाही. पण त्यांनी सुरू केलेल्या अंधविश्वासाविरोधी चळवळीला प्रेरणा देण्यासाठी बाबा आढाव यांच्या हस्ते महाडला सुरवात झाली. चवदार तळ्यातील पाण्याने दिवा पेटवून अंधश्रद्धेचे बळी ठरणार्‍या घटकांना प्रकाशवाट दाखविण्यासाठी बाबा आढाव यांच्याबरोबर शैला दाभोलकर उपस्थित होत्या.

महाडपासून सुरू होणारी जादूटोणाविरोधी कायद्यासाठीच्या अंमलबजावणीसाठीची जनजागरण मोहीम महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यक्रम करत कोल्हापूरला संपेल. या मोहिमेत जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुसूचीतील विविध कलमांचा आशय लोकांपर्यंत पोचविला जाईल. सोबत कायद्याच्या चित्रमय पुस्तिका व अंनिवाचा कायदा विशेषांक लोकांना उपलब्ध करून दिला जाईल. चमत्काराची विविध प्रात्यक्षिके दाखविली जातील. यातून दोन हेतु साध्य होतील. एक म्हणजे जादूटोणाविरोधी कायदा नेमका काय आहे, त्याचा उपयोग कसा करता येईल याबाबत जनप्रबोधन होईल व दुसरा परिणाम म्हणजे जादूटोणा करणारे बुवा, बाबा यांना या मोहिमेद्वारे इशारा मिळेल. करणी व तंत्रमंत्र करणार्‍या एका महाराजाला काही दिवसांपूर्वी सांगली येथे अटक झाली. पूर्वीच्या कायद्यानुसार अटक झालेला बाबा जामिनावर लगेच सुटून जाई. या बाबाला सांगली कोर्टाने जामीन नाकारला आहे. तो जेलमध्येच आहे. अशा घटना लोकांपर्यंत पोचल्या तर छुपे बुवाबाबा तंत्रमंत्र व चमत्कार याद्वारे फसवणूक करताना नक्कीच तीनवेळा विचार करतील.