डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाची बातमी मला जेव्हा प्रथम कळाली तेव्हा माझी पहिली भावना संतापाची होती. सोबत दु:खाची भावना अर्थातच होती. परंतु संतापाची भावना अधिक होती. मध्येच चिंतेचीही भावना होती. लौकरच हे सर्व मागे पडून निर्धाराची भावना बळकट झाली. कमी जास्त प्रमाणात डॉ. दाभोलकरांच्या सर्वच सहकार्यांची भावना अशीच असणार याबद्दल मला शंकाच नाही.
मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनेचा भाग कधीच नव्हतो. परंतु त्या चळवळीचा भाग निश्चीतच होतो. कोल्हापूर जिल्हयाच्या अंनिसच्या चळवळीस बळ देण्याचे काम मी चिकाटीने व निर्धाराने करीत आहे. ज्या विकृतीने डॉ.दाभोलकरांचा खून केला त्या विकृती अनिसच्या चळवळीला आणि विविध उपक्रमांना सुरवातीपासून विरोध करीत आल्या त्यांचा मुकाबला धैर्याने करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे मी सर्व शक्तीनिशी उभा राहत आलो आहे. महाराष्ट्रव्यापी अंनिसच्या अनेक मेळाव्यांना मी हजर रहात आलो आहे. सातारा पुणे लातूर इ. सर्व ठिकाणी मी हजर राहिलो आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर मला नीट ओळखत होते. तसेच अनिसचे राज्यभरातले छोटे मोठे कार्यकर्तेही मला ओळखत आले आहेत. मी स्वत:, डॉ. नरेंद्र दाभोलकर, दै.पुढारीचे संपादक आणि इतर कांही यांच्या विरूद्ध सनातन संस्थेने 10कोटी रूपयांचा नुकासान भरपाईसाठी एक दावा फोंडा येथील कोर्टात दाखल केला आहे. अंनिसच्या गोव्यातील कार्यकर्त्यांनी पणजी येथे धर्मनिरपेक्षता या विषयावर व्याख्यान ठेवले होते. त्या सभेत मी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि इतर यांनी सनातन संघटने विरोधात भाषणे केली होती. त्यापूर्वी- गोवा राज्यातील मडगाव येथे एक बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटास सनातन प्रभातचा प्रचार कारणीभूत होता. आणि आरोपींच्या यादीत सनातन प्रभातचे कार्यकर्ते आहेत. असो.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जाण्याने चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण नुसती चिंता उपयोगाची नाही.
‘ चिंतासे चतुराई घटे ’ असे महात्मा कबीराने सांगून ठेवले आहे. दु:ख, संताप, चिंता या भावनांची जागा आता निर्धाराने घेतली पाहीजे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पार्थिवाच्या साक्षीने आपण सर्वांनी, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर का अधुरा काम कौन करगा पुरा?’ ‘हम करेंगे, हम करेंगे’ अशा घोषणा ही ताबडतोबीची प्रतिक्रिया नव्हती तर निर्धाराची अभिव्यक्ती होती. आता आपण सर्वांनी कृतीने दाखवून दिले पाहीजे. चिंता दूर ठेऊन चतुराई दाखविली पाहीजे.
डॉ. दाभोलकर आपल्यात होते तेव्हा आपणापैकी प्रत्येकाची जबाबदारी जेवढी होती त्यापेक्षा आता जास्त जबाबदारी आहे हे आपण मनेामन ठामपणे बाळगले पाहीजे. 18 वर्षाच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर आणि डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर जादुटोणा विरूद्धचा कायदा होत आहे. वटहुकुम निघाला आहे. तथापि त्याचे कायदयात रूपांतर करण्यासाठी पुन्हा या वटहूकुमास असेंब्लीची मान्यता घ्यावी लागणार आहे. आपले विरोधक, सनातनी प्रवृत्तीचे आमदार तर विरोध करतीलच करतीलच.परंतु राज्यकर्ते- पक्ष पुन्हा बोटचेपी भुमिका घेउून चर्चेचा घोळ सुद्धा घालतील. याचा मुकाबला करण्यावर आपल्याला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
या कायद्याचा वापर करून जादूटोणा याच्या आधारे जनतेला फसवणार्या बाबा व बाया यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाया करण्याचा धडाका सुरू केला पाहिजे. अनिसच्या प्रत्येक शाखेने येत्या महिना भरात प्रत्येकी किमान एक केस गुदरली पाहीजे अनिसचे सहानुभुतीदार स्थानिक वकिल यांचे सहाय्य घेतले पाहिजे. आरोपीत बुवा व बाया सर्वच सापडतील. त्याची उणीव भासणार नाही. अनिसच्या प्रत्येक शाखेने ताबडतोब बैठक घेऊन त्या दिशेने प्रयत्न सुरू केले पाहिजेत.
लोक प्रतिनिधींनी कायदा करायला 18 वर्षे घेतली. डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाची वाट पाहिली. अंमलबजावणीतही ते अनेक अडथळे आणतील. फौजदारी केस दाखल केल्या नंतर तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी आदोलनाचे कार्यक्रमही ठेवले पाहीजेत. कार्यकर्त्यांचे या कायद्यासंबंधीचे प्रबोधन केले पाहीजे. वकिलांचे सहाय्य घेतले पाहीजे.
विवेक वाहिनीवर भर द्या
अंनिसचे अनेक उपक्रम आहेत. परंतु मला असे वाटते की, विद्यार्र्थी व युवकात कार्य करणार्या विवेक वाहिनीवर भर द्यावा प्रत्येक कॉलेजमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला पुढे काय करणार? असा विषय ठेऊन व्याख्याने आयोजित केली पाहिजेत. अधिक नेटाने व अधिक चिकाटीने कामास लागा. अंनिसची राज्य शाखा एकत्र बसून काहीतरी कार्ये ठरवतील ती पार पाडा. एकमेकांच्या संपर्कात रहा. गांगरून जाऊ नका, खुनाने विचार मरत नसतात हे कृतीने दाखवून द्या.
–कॉ. गोविंद पानसरे