www.csicop.org ही “कमिटी फॉर स्केप्टिकल इन्क्वायरी” CSI ची (चिकित्सक चौकशी समिती) अधिकृत वेबसाईट आहे. “परासामान्य (Paranormal) आणि विज्ञानाच्या सीमारेषेवरील (fringe-science) दाव्यांचं चिकित्सक वैज्ञानिक संशोधन होण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि अशा संशोधनातून कळलेल्या वस्तुस्थितीचं ज्ञान वैज्ञानिक जगत आणि सामान्य लोक यांच्यापर्यंत पोचवणं.” हे या समितीचं आणि पर्यायानं वेबसाईटचं उद्दिष्ट आहे. सर्वसाधारण समाज आणि प्रसारमाध्यमं ज्या परासामान्य दाव्यांचा चिकित्सा न करता स्वीकार करतात आणि त्यांना बळकटी देतात, त्यांना विरोध करण्यासाठी CSI ची स्थापना झाली. ‘वैज्ञानिक चिकित्सा’ ही तात्विक भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली. CSI तर्फे (आपल्यापैकी अभ्यासू वाचकांना सुपरिचित असलेलं) ‘स्केप्टिकल इन्क्वायरर’ हे मासिकही प्रकाशित करण्यात येतं. न्यूयॉर्कमधील अॅमहर्स्ट इथं मुख्यालय असणार्या या समितीत अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते, तत्त्वज्ञानी, शिक्षणतज्ञ यांचा समावेश आहे. CSI आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि नैतिक संघाची सदस्य आहे आणि धर्मनिरपेक्ष मानवतेचं तत्त्व मानते.
1976 मध्ये जेव्हा ही संस्था स्थापन झाली तेव्हा तिचं नाव “कमिटी फॉर सायन्टिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल”(CSICOP) असं होतं. 30 नोव्हेंबर 2006 ला हे नाव “कमिटी फॉर स्केप्टिकल इन्क्वायरी” CSI असं छोटं करण्यात आलं. चिकित्सक विचारपद्धती, विज्ञान आणि एकंदरच बुद्धीप्रामाण्यवाद यांना गवसणी घालणार्या संस्थेच्या व्यापक कार्यक्षेत्राला अनुलक्षून हा बदल करण्यात आला.
स्थापना : सत्तरच्या दशकाच्या सुरवातीच्या वर्षांत अमेरिकेमध्ये परासामान्य गोष्टींबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. विवेक गहाण ठेवून येणार्या या लाटेबद्दल अमेरिकेतील बुद्धीप्रामाण्यवादी लोकांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर, 30 एप्रिल आणि 1 मे 1976 या दिवशी न्यूयॉर्कमधील अॅमहर्स्ट इथं झालेल्या ‘अमेरिकन ह्युमॅनिस्ट असोसिएशन’(अकअ) च्या विशेष परिषदेत, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक पॉल कुर्टझ यांनी CSICOP ची स्थापना केली. याआधी 1975 मध्ये, ‘अकअ’चं मुखपत्र ‘ह्युमॅनिस्ट’चे संपादक असताना कुर्टझ यांनी ज्योतिषाच्या शास्त्रीयतेवर लेखी आक्षेप घेतला होता आणि त्याला 186 शास्त्रज्ञांनी पाठींबाही दिला होता. त्यानंतर त्यांनी हे निवेदन अमेरिका आणि कॅनडातील प्रत्येक वृत्तपत्राला पाठवलं होतं. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रोत्साहित होऊन कुर्टझ यांनी शक्य होतं तितक्या चिकित्सक संशोधकांना 1976 च्या या परिषदेला आमंत्रित केलं. यामध्ये मार्टिन गार्डनर, रे हायमन, जेम्स रॅन्डी आणि मार्सेलो ट्रुझी हे ‘रिसोर्सेस फॉर सायन्टिफिक इव्हॅल्यूएशन ऑफ पॅरानॉर्मल’(RSEP) या एका उगवत्या संस्थेचे सदस्यही होते. पॉल कुर्टझ त्यांच्या मांडणीत यशस्वी झाले. RSEP संस्था CSICOP मध्ये विसर्जित झाली. कार्ल सेगन, आयझॅक अॅसिमोव्ह, बी.एफ.स्किनर आणि फिलीप क्लास यांच्यासारखे नामवंत शास्त्रज्ञही CSICOP च्या उभारणीत सहभागी झाले.
भ्रामक विज्ञानाबाबतची भूमिका
ज्योतिष, परामानसशास्त्र, वूडू, योगिक उड्डाणं, पुनर्जन्म, श्रद्धोपचार, स्पर्शउपचार, जादुई विचारपद्धती, युरी गेलर (सायकोकायनेसिस), होमिओपथी, पर्यायी वैद्यक, मृत्यूसम अनुभव, उडत्या तबकड्या, यती, बर्म्युडा ट्रॅन्गल इत्यादी गोष्टी भ्रामक विज्ञानाच्या कक्षेत येतात अशी CSI ची स्पष्ट भूमिका आहे. या भूमिकेबद्दल अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाऊन्डेशनचं मतही अनुकूल आहे.
कार्यक्रम आणि उपक्रम :
CSI च्या सनदीनुसार प्रमुख उद्दिष्टं पार पाडण्यासाठी समिती 1.परासामान्य आणि विज्ञानाच्या सीमारेषेवरील आणि इतर दाव्यांचं चिकित्सक परीक्षण करण्याची आणि ग्राहकांच्या प्रशिक्षणात योगदान देण्याची इच्छा असणार्या लोकांचं जाळं ठेवणे; 2. अशा दाव्यांचं काळजीपूर्वक परिक्षण करणार्या प्रकाशित साहित्याची संदर्भसूची तयार करणे; 3.आवश्यक त्या क्षेत्रात वस्तुनिष्ठ आणि तटस्थ चौकशीद्वारे संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देणे; 4.बैठका आणि परिषदांचं आयोजन करणे; 5.परासामान्य दाव्यांचं परीक्षण करणारे लेख प्रकाशित करणे; 6.कोणतेही दावे चौकशी न करताच पूर्वग्रहानुसार नाकारायचे, असं न करता त्यांचं वस्तुनिष्ठपणे आणि काळजीपूर्वक परिक्षण करणे, या पद्धतीनं काम करते.
कार्ल सेगन यांनी ‘असामान्य दाव्यांच्या समर्थनासाठी असामान्य पुराव्यांची आवश्यकता असते’ असं म्हटलं आहे. CSI चा यावर नितांत विश्वास आहे, कारण आजवर कोणतेच परासामान्य दावे वैज्ञानिक चिकित्सेच्या कसोटीवर टिकलेले नाहीत.
माध्यमांचा प्रतिसाद
CSI चे अनेक कार्यक्रम माध्यमाभिमुख असतात. मुळात प्रसारमाध्यमांद्वारे होणार्या गूढ आणि परासामान्य घटनांच्या वापराविरूद्ध लढा देण्यासाठीच CSI अस्तित्वात आली. यासाठीची व्यूहरचना दुहेरी होती : एक म्हणजे परासामान्य आश्चर्यांचा पर्दाफाश करणारी माहिती माध्यमांना पुरवून चिकित्सकांच्या कामाला हातभार लावणे. दुसरं म्हणजे तथाकथित परासामान्य आश्चर्यांच्या प्रसारमाध्यमांकडून होणारा भयाकारी वापरावर नजर ठेवून त्याबाबत लोकांमध्ये आणि माध्यमांमध्ये जागृती करणे. लोकांचं लक्ष खिळून राहिल अशा विवादांमध्ये माध्यमांना रस असतो, हे तत्व वापरून लोकांच्या नजरेत भरतील असे सत्यान्वेषी कार्यक्रम चालू ठेवणे, असा यामागचा विचार आहे. माध्यमांचं जाळं, विविध टी.व्ही.शोज् आणि वृत्तपत्रांचे संपादक यांच्याशी समविचारी लोकांनी संपर्क साधावा, तथाकथित गूढ आणि परासामान्य घटनांबद्दलचा गाजावाजा टाळण्यासाठी ‘प्रत्यक्ष अनुभव’ टाकावा, यासाठी या वेबसाईटवर नव्वदपेक्षा जास्त माध्यम संस्थांचे ई-मेल पत्ते दिले आहेत.
भ्रामक वैज्ञानिक आणि परासामान्य घटनांचा मागोवा
भ्रामक वैज्ञानिक आणि परासामान्य घटनांचे प्रकार आणि पैलू अनेक आहेत. त्यांची लोकप्रियताही बदलत असते. यावर बारकाईने लक्ष ठेवून त्यानुसार CSI आपलं लक्ष्य बदलत असते. उदाहरणार्थ, intelligent design (बुद्धिमान निर्मात्यानं सृष्टीचा आराखडा काढून त्यानुसार विश्व निर्माण केलं ही कल्पना) च्या पाठीराख्यांनी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न वाढवले, तसं CSI नेही याकडे आपलं लक्ष वळवलं, अशी (उप) वेबसाईट तयार केली आणि उत्क्रांतीच्या बाजूनं, इंटेलिजन्ट डिझाईनच्या विरोधात लेख प्रसिद्ध केले.
विज्ञानावर आधारित उपचारपद्धतींऐवजी पर्यायी वैद्यकासारखं लोकांचं आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात आणणारं भ्रामक विज्ञान हा CSI च्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय आहे. पर्यायी उपचार, परासामान्य उपकरणं किंवा भ्रामक विज्ञानावर आधारित वस्तू यांच्या विक्रीतून प्रचंड नफा होतो असं ग्राहक संघटना, कायदेविषयक संघटना आणि शासनानं केलेल्या संशोधनानुसार लक्षात आलं आहे. या नफ्यातूनच अनेक परासामान्य गटांना जाहिरात, प्रचार, प्रसार यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो आणि त्यातून लोकांच्या आरोग्याला धोका पोचतो, हे लोकांच्या निदर्शनाला आणून देण्याचं कामही CSI करते.
CSI तर्फे 2005 पासून दरवर्षी ‘चिकित्सक विचारां’साठी ‘रॉबर्ट बॅलेस पारितोषिक’ देण्यात येतं. नताशा डेम्किना या मुलीचे डोळे ‘एक्स-रे’सारखं काम करतात, या दाव्याचं चिकित्सक परीक्षण करून त्याचा अहवाल रे हायमन, जो निकेल आणि अॅन्ड्रयू स्कोल्निक यांनी प्रसिद्ध केला. तेव्हापासून हे पारितोषिक देण्याची पद्धत सुरू झाली.
जगभरात सतत पसरवल्या जाणार्या या भ्रामक विज्ञानाच्या नवनवीन कल्पना आणि त्याचा चिकित्सकवैज्ञानिक प्रतिवाद समजून घेण्यासाठी या वेबसाईटला वारंवार भेट द्यायला हवी!
–डॉ.आशुतोष मुळ्ये