Categories
पुस्तक परिचय

डाकीण – एक अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थ

सप्टेंबर - २०१२

            डाकीण पुस्तक हातात येण्याआधी अलाईस अल्बिनियाचं “एम्पायर्स ऑफ इंडस व्हॅली” वाचत होते. सिंधू नदीचा मूळापर्यंत घेतलेला शोध आणि त्यानिमित्तानं नदीकाठानं गेली हजारो वर्षं फुललेल्या, संपलेल्या आणि संपवलेल्या संस्कृतींचा मागोवा या पुस्तकानं घेतलाय. नदी आणि स्त्री यांची नेहमीच तुलना होते, जशी भूमी आणि स्त्रीची! पण नदीशी होणारी तुलना मला जास्त योग्य वाटते. नदीमुळं जीवन फुलतं, संस्कृती बहरते…. आणि मग जेव्हा तिचा पुरेपूर वापर करून होतो तेव्हा मग कधीतरी तिलाच संपवण्याचे वेगवेगळे प्रयोग सुरू होतात.

            या निमित्तानं त्या भागातील पुरातन शिलाचित्रांचाही उल्लेख येतो. अत्यंत आदिम समाजाचं त्यात प्रतिबिंब दिसतं. बार्झोहोम येथील एका चित्रात एक पुरूष धनुष्य ताणून आणि एक बाई भाला रोखून शिकारीच्या तयारीत आहे. तिच्या अविर्भावावरून त्या काळात असणारं तिचं स्वतंत्र स्थान जाणवतं. पण पुरूषप्रधान व्यवस्थेत मुरलेल्या काही पुरातत्व शास्त्रज्ञांना बाईचं हे स्वतंत्रपण, शिकार करणं आणि पर्यायानं तिची असलेली त्या टोळीवरची ‘पकड’ सहन न झाल्यामुळे हळूहळू त्या चित्राचं स्पष्टीकरण बदललं गेलं. एवढंच नाही तर मूळ चित्रात असलेले तिचे शरीरविशेष अतिशय ठळक असताना तिच्या शरीरावरचे उंचवटे सपाट केले गेले. चित्रातील जननेंद्रियाला दगडाची एक बारीक भेग ठरवलं गेलं.

            हे वाचत असताना लक्षात आलं की, आजही बरोबरीच्या स्त्रिया अधिक सक्षम, सबल झाल्या की, त्यांचं किती-किती प्रकारांनी खच्चीकरण केलं जातं. बाहेरच नव्हे तर घरातही! इतक्या हजारो वर्षांपूर्वीच्या एका दगडावर कोरलेल्या चित्रातली ‘पॉवरफुल’ बाई आजच्या पुरूषाला सहन होऊ नये?’ म्हणजे आपल्यापेक्षा ‘डोईजड बाई’चं अस्तित्व संपवणं हे पुरूषांच्या किती आतपर्यंत पोचलंय! मग मला आठवली तथाकथित उच्च वैदिक संस्कृतीतल्या विद्वान गार्गीला मिळालेली धमकी- “जास्त बोलशील जर तुझं मस्तक धडावरून खाली लोळू लागेल!”

            आदिम कालपर्वात ‘मूल जन्माला घालणं’ अर्थात ‘मातृत्व’ ही महत्वाची शक्ती होती. इतरांच्या मनात एक गूढ होतं. भीतीमिश्रीत आदर होता. तिला जमिनीतून धान्यही दुप्पट काढता येत होतं. आणि माणसांचं प्रतिरूपही निर्माण करता येत होतं. पुरूषाला रक्तस्त्राव झाला तर तो मृत्यू पावताना दिसायचा. पण स्त्रीला कसलीच इजा न होता होणारा रक्तस्त्राव चालू राहिला तर ती मात्र जिवंतच! त्यामुळे तिच्या मासिक स्त्रावाभोवतीही गूढपणा दाटलेला. टोळी संस्कृतीच्या काळात माणसांची संख्या जेवढी जास्त तेवढं टोळीचं सामर्थ्य जास्त. मग अशी माणसं निर्माण करणारी स्त्री अर्थातच महत्वाची! म्हणूनच त्या काळात तिच्या लैंगिकतेवर कोणतीच बंधनं नव्हती. किंबहुना आजची लैंगिक नैतिकता तेव्हा अस्तित्वातच नव्हती. आणि म्हणूनच योनीशुचितेची क्षुद्र संकल्पनाही नव्हती. स्त्रीभोवतीचं हे गूढ वलय, भीतीमिश्रीत आदर हे सगळं पुढे काळाच्या चक्रात, संस्कृतीच्या संकरात, नांगर आणि बैलाच्या प्रवेशानंतर लोप पावत गेलं. पहाता पहाता स्त्रीप्रधान संस्कृती पुरूषसत्तेत बदलत गेली. स्त्रीचं स्थान एक उपभोग्य वस्तू, मालमत्ता एवढंच शिल्लक राहिलं. मग राहिलं काय तर आजही आमच्या देवळातून असलेल्या लक्ष्मी, पार्वती, दुर्गा आणि कालीमाता… आणि भारतभर विखुरलेल्या आदिवासी समाजमनात थयथया नाच करणारी डाकीण …. भुताळी!!!

            “डाकीण- एक अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थ” या संध्या नरे-पवार यांच्या ‘शोधग्रंथा’त डाकीण प्रथा काय असते, डाकीण काढणं म्हणजे काय, डाकीण उतरवणं म्हणजे काय आणि डाकिणीला शिक्षा करणं या तिन्ही टप्प्यांचं यथास्थित विवेचन आलं आहे. मुंबईजवळच्या जव्हार-मोखाड्यापासून ते धुळे-नंदूरबारपर्यंतच्या आदिवासी समाजातल्या अनेक डाकीण ठरवल्या गेलेल्या स्त्रियांच्या कहाण्या लेखिका आपल्यासमोर मांडते. हे सर्व सांगताना फक्त डाकीण ठरवलेल्या स्त्रियाच नाहीत तर जे भगत-मांत्रिक हे काम करतात त्यांच्याही मुलाखती ती घेते. हे वाचताना, जो आदिवासी समाज आपल्याला फक्त वारली चित्रं नाहीतर  ‘डॉक्युमेंटरीज’ मधून माहीत असतो, तो समाज त्यांच्या सार्‍या श्रद्धा-अंधश्रद्धा, आदिम रूढी-परंपरा, संस्कृती या सार्‍यासकट आपल्यासमोर जिवंत होतो. फ्लॅट संस्कृतीत भिंतीला भिंत लागलेल्या घराबद्दल आपण मनानं किती कोरे असतो, तसंच हेही! ही माणसं काही दूर अफ्रिकेच्या जंगलात किंवा दक्षिण अमेरिकेत नाही रहात. ही तर आपल्याच जिल्ह्यात, आपल्याच राज्यात रहाणारी माणसं. पण आपण त्यांच्यापासून किती दूर आहोत, हे ठळकपणे जाणवतं आणि स्वत:चीच शरम वाटते.

            लेखिका सांगते की, आदिवासींच्या मनात डाकीण असते. आदिम मानवाच्या मनातल्या स्त्रीबद्दलच्या गूढ भितीनं आता डाकिणीचं रूप घेतलेलं दिसतं. मग पाड्यावर काहीही वाईट घडलं की, माणसांची जनावरं होतात. एखाद्या निराधार, एकट्या किंवा नको असलेल्या बाईला डाकीण ठरवलं जातं. मग तिला जिवंत जाळण्यापासून ते तुकडे करून फेकून देण्यापर्यंत काहीही केलं जातं. आदिवासी समाजाचे जगण्याचे समज, प्रथा समजून घेतल्या तर लक्षात येतं की कोणत्याही नुकसानकारक घटनेमागे चेटूक हेच कारण असतं. आणि ते करणारी नेहमी चेटकीणच असते. त्यांच्या भाषेत ‘डाकीण’. मग डाकीण काढणं, परीक्षा घेणं आणि शिक्षा करणं हा त्या समाजाच्या कर्तव्यपालनाचा भाग ठरतो. समूहाची कर्तव्य भावना ही उन्मादात बदलते. ‘खून के बदले खून’, ‘आंख के बदले आंख’ असे त्याचं स्वरूप असतं. स्त्रियांच्या दु:खामागे पुरूषसत्ताक पद्धतीचे उभे आडवे धागे विणलेले आहेत. त्यात बंदिस्त झालेल्या स्त्रियांमध्ये ‘भगिनीभाव’ नाही. त्यामुळेच एक स्त्री दुसरीला डाकीण ठरवायला विरोध करत नाही तर पुढाकार घेते. जिला डाकीण ठरवलं जातं तिचाही या प्रथेवर विश्वास असतोच. फक्त जेव्हा तिला डाकीण ठरवतात तेव्हा तिला माहीत असतं की, आपण हे काही केलेलं नाही. पण अशा बाईला क्वचितच घरच्यांची साथ मिळते. कधी मिळाली तरी समाजानं बहिष्कार टाकल्यावर त्यांनाही जगणं कठीणच होतं. नवरा, कुटुंब इतरांपलुढे मान तुकवतात. एकदा डाकिणीचा शिक्का बसला की कधी हल्ला होईल, कधी जीव घेतील, या भयाच्या टांगत्या तलवारीखाली तिचं जिणं सुरू होतं.

            ‘डाकीण प्रथा आणि पोलीस यंत्रणा’ या प्रकरणात पोलिसांची उदासीनता, आदिवासी समाजातून भरती झालेल्या पोलिसांचं गोंधळलेलं मन याबद्दल लेखिका संगतवार लिहिते. ‘लोकप्रतिनिधी आणि अनिष्ट प्रथा’ या प्रकरणात राजकीय पुढार्‍यांच्या संधीसाधू, दांभिक वृत्तीवर ती नेमकेपणानं बोट ठेवते. आदिवासी समाजातल्या पुढार्‍यांनाही हे सगळं चालू रहायला हवंच आहे. जसं “सुसंस्कृत” समाजात गुन्हेगारी, वेश्याव्यवसाय, पोलीस आणि राजकारणी यांचे हितसंबंध गुंतलेले असतात, तसंच इथंही भगत, पोलीस पाटील आणि पुढारी एकमेकांना कसं ‘सांभाळून’ घेतात तेही लेखिका सांगते. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संघटना आणि संस्थांचे प्रयत्न फार अपुरे पडतात. जंगल, जमीन, पाणी, शिक्षण या मुद्यांवर काम करणार्‍या संघटनांना आपलं काम पुढं नेण्यासाठी ‘जनाधार’ हवा असतो. अशा वेळी त्या लोकांच्या श्रद्धा-परंपरांवर हल्ला चढवणं अडचणीचंच. साहजिकच ते या सगळ्यांच्या विरोधात उभे रहात नाहीत, काही बोलत नाहीत. मग सगळी जबाबदारी येते ती  ‘अंनिस’वरच! 2003 मध्ये ‘अंनिस’नं पहिली डाकीणविरोधी परिषद नंदूरबारला घेतली. तेव्हापासून आजतागायत ‘अंनिस’चे कार्यध्यक्ष अविनाश पाटील आणि त्यांचे इतर सहकारी त्या त्या भागात या प्रथेविरोधात जागरूकतेनं काम करत आहेत. पण या सगळ्यालाही शेवटी मर्यादा आहेतच.

            शिक्षण हा एकच मार्ग माणसाचं अज्ञान, अंधश्रद्धा दूर करेल असा एक भाबडा पर्याय आपल्यासमोर असतो. पण लेखिका सांगते की, आदिवासी पाड्यावरची मुलं पुस्तकात काहीही शिकली तरी ‘डाकीण’ त्यांच्या मनातून पुसली जात नाही. डाकीण असते की नसते हा प्रश्नच त्यांच्या मनात उद्भवत नाही. हे वाचल्यावर मनात येतं की, आपल्याकडे नाही का उच्चविद्याविभूषित माणसं ज्योतिष, नवसं, सत्संग यावर अवलंबून असतात, त्यांचं विज्ञान फक्त पुस्तकात! इथंच आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे!

            बहुतेक अंधश्रद्धांचा नेहमीच प्रत्यक्षपणे आरोग्याशी संबंध असतो. रोग आणि मृत्यू यांची भीती आजही माणसाला तेवढीच वाटते, जेवढी आदिम माणसाला वाटत होती. इथं तर बालमृत्यू, मातामृत्यू हे तर पाचवीलाच पुजलेले. डॉक्टरवर विश्वास नाही, वैद्यकीय सुविधा पाड्यापर्यंत पोचलेल्या नाहीत, अशा समाजात झाडपाल्याची, मुळ्यांची माहिती असलेला उपचार करणारा भगत हा मग डॉक्टरपेक्षा मोठा होतो. तो त्यांची भाषा बोलतो, त्यांच्या ‘लॉजिक’ला पटणारे उपाय सांगतो, हे सगळं लेखिका छान पद्धतीनं सांगते. जनार्दन महाराजांनी अपेंडिक्स पेशंटला कसं पटवलं, हा किस्सा वाचताना एकीकडं हसू येतं आणि एकीकडं मन खेदानं भरून जातं.

            ‘जमीन ते जादूटोणा’ या तिसर्‍या भागात डाकीण म्हणून एखाद्या स्त्रीला गुन्हेगार बनवण्यात तिची जमीन, घर, मालमत्ता हडप करणं हा हेतू कसा असतो, हे लेखिकेनं अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट केलं आहे. या सगळ्या कहाण्या वाचताना मन विषण्ण होत जातं आणि त्याचवेळी मालमत्ता हडप करण्यासाठी जबरदस्तीनं नवर्‍याच्या चितेत ढकलल्या गेलेल्या बायकांची आठवण येते.

            डाकीण प्रथेचा अभ्यास करताना मध्ययुगीन युरोपमधल्या ‘विच हंटींग’ कालखंडाला दुर्लक्षून चालणारच नाही. ‘युरोपातील विच हंटींग’ या प्रकरणात लेखिका धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि अर्थातच पुरूषसत्तेनं रचलेल्या षड्यंत्राचा इतिहास आपल्यासमोर उभा करते. ‘स्त्री आणि अघोर’ या पुस्तकाच्या शेवटच्या भागात काळाच्या वेगवेगळ्या वळणांवर स्त्रीला अघोर ठरवून कसा बळी घेतला गेला आणि घेतला जातो याचं अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण केलं आहे. एकीकडे नंदूरबारमध्ये डाकीण ठरवून आदिवासी स्त्रीची खांडोळी केली जात असताना तथाकथित उच्चभ्रू वर्तुळामध्ये ‘मी डाकीण आहे’ असं उघडपणे सांगत प्रतिष्ठा मिळवणारी इप्सिता राय-चक्रवर्ती…. या आपल्या समाजातील विसंगतीवर लेखिका अचूकपणे बोट ठेवते. ‘बिलव्हेड विच’ हे पुस्तक लिहिणार्‍या इप्सिताच्या निमित्तानं ‘विक्का’ धर्म आणि त्यांचं जगभरातील संघटन यांची विस्मयजनक माहितीही मिळते. संपूर्ण पुस्तकभर लेखिका आपल्याला सतत जुने-नवे इतिहास, समाजशास्त्र यातील संदर्भ देत रहाते. आदिम जगातला आदिम धर्म, यातूविधी, मंत्र-तंत्र, जादूटोणा आणि संबंधित कर्मकांडं यांची सांगोपांग माहितीही या निमित्तानं कळते. ‘डाकीण’ या एकाच प्रश्नाचा अभ्यास करताना लेखिकेनं घेतलेल्या अचाट परिश्रमाची जाणीव आपल्याला सातत्यानं होत रहाते.

            ‘कधी तरी ती होती’ या प्रकरणाचं मला विशेष महत्व वाटतं. ‘अंनिस’मध्ये शहरी, सुशिक्षित, ग्रामीण अशा सर्व थरात काम करणार्‍यांनी हे वाचायलाच हवं. अनेकदा चळवळीत काम करताना शहाणे-सुरते कार्यकर्तेही ‘माणूस’ समजून घेण्यात कमी पडतात. तर्ककर्कश्शतेत गुरफटतात, असं माझं निरीक्षण आहे. आपण तसं गंमतीत म्हणतो “अंडरवर्ल्डवाल्यांचीही त्यांची अशी एथिक्स असतात” तसंच जादूटोण्यामध्येही एक कार्यकारणभाव गृहीत धरलेला असतो. त्यातही एक ओबडधोबड तर्कसुसंगती आहे. त्यांच्या नजरेतून हे सर्व समजून घेणं ही कार्यकर्त्याची गरज आहे. अगदी आदिम माणसानं सुरू केलेलं तर्कशास्त्र आणि ‘लॉजिक’ आहे ते. ते फार रासवट आहे, क्रूड आहे. निसर्गाचं संतुलन साधण्यासाठी चांगली शक्ती असते तशीच वाईट शक्तीही असते. चांगल्या गोष्टीमागे चांगलं कारण, तसं वाईट गोष्टींमागे वाईट! या पुस्तकाच्या निमित्तानं लेखिकेनं आदिवासींना खूप जवळून निरखलंय, जाणलंय. हे वाचत असताना आपल्या लक्षात येतं की, एकाची दुसर्‍याशी संगती लावू पहाणारं आदिम मन अजूनही जसंच्या तसं त्याच अनघड स्वरूपात आदिवासी माणसामध्ये नांदतं आहे. आजूबाजूचं बदललेलं जग त्याच्या खिजगणतीतच नाही… आणि आम्ही त्यांच्या भोवतीचे विकसित समाजाचे घटक? आमचं आजचं पूर्ण विकसित तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याची सुरवात कुठेतरी याच रासवट संगतीतून झाली आहे हे विसरतो आणि ‘त्यांना’ मागास ठरवून आमच्या रोजच्या कामांना लागतो. पण ‘डाकीण’ वाचताना मला जाणवलं ते हे की घडणार्‍या वाईट घटनेसाठी आपल्याच कुटुंब-घरा-गावातल्या बाईला डाकीण  ठरवणं मागास आहे, क्रूर आहे. पण मग आजही मूल नसलेल्या बाईला ओटी भरू न देणं, बारसं-डोहाळे जेवणाला न बोलावणं, विधवेला सर्व ‘मंगल’ कार्यक्रमातून वगळणं, आपल्याच घरातील ‘वांझ’ स्त्रीची नजर लागून दूध आटलं किंवा बाळ आजारी पडलं, असं म्हणणं, हे काय कमी क्रूर आहे? आदिवासी रोखठोक आहेत म्हणून शरीरावर हल्ला करतात. सुसंस्कृत म्हणवणारे आपण तर बाईला जगणंच अशक्य करतो. दोन्हीत काहीच फरक नाही. पुस्तक वाचत असताना आपल्या समाजातील दांभिकपणा आपल्या मनात सतत अधोरेखित होत रहातो.

प्रा. आदिती मुळ्ये