Categories
रिंगणनाट्य

डाकीणप्रथा निर्मूलनास कायद्याचं बळ

शहादा गट
वार्षिकांक – २०१४

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर खुनाचा निषेध म्हणून प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे सरांच्या विचारांचे अविष्कार म्हणजे रिंगणनाट्य. आजपर्यंत आम्ही पथनाट्य, सडकनाट्य ऐकली होती; परंतु रिंगणनाट्य काय भानगड ही कळायला मार्ग नव्हता. आणि त्याचा विषय अंधश्रद्धा निर्मूलन, जात धर्म, स्त्रियांचे शोषण, भोंदूची फसवेगिरी, ज्योतिष्यांची राशीभविष्याचं गौडबंगाल आणि अजून खूप काही. अंधश्रद्धेचा आवाका खूप मोठा आणि समाजात या अंधश्रद्धेची मुळं अगदी खोलपर्यंत मुरलेली. डॉक्टरांनी अशा अनेक अंधश्रद्धेविषयी केलेला संघर्ष आमच्या ग्रुपच्या काही कार्यकर्त्यांनी ऐकला होता आणि अशाच एका ज्वलंत, निर्दयी, स्त्री जातीला हीनपणाची व माणुसकीला काळीमा फासणारी नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील ‘डाकीण प्रथा.’

मांत्रिकांच्या सांगण्यावरून त्याची वासनिक भूक शमवू न शकणार्‍या किंवा धन-संपत्तीच्या घरगुती भांडणामुळे, गावातील पुढार्‍यांच्या मुजोरपणामुळे एका स्त्रीला डाकीण ठरवून तिचा शारीरिक, मानसिक छळ, गावात नग्न धिंड, सार्वजनिक कामांवर बहिष्कार आणि कधीकधी गावाबाहेर काढून जिवंत मारण्याच्या धमक्या अशी कितीतरी छळाला येथील स्त्रीला सामोरे जावे लागत होते.

अशा वर्षानुवर्षे चालू असणार्‍या डाकीण प्रथेवर प्रभावीपणे प्रकाश टाकला होता तो अंनिसने आणि फक्त प्रकाशच टाकून ती थांबली नाही तर त्याचे निर्मूलन करण्याची जबाबदारी प्रबोधने, पोलिस पाटलांच्या परिषदा घेऊन कृतीशीलपणे उचलली. जादूटोणा विरोधी कायद्यात याविषयी कठोर शिक्षा करणारे कलम अंतर्भूत केले आणि म्हणूनच आम्ही शहादा-तळोदा गटाने ‘डाकीण निर्मूलन’ हा विषय रिंगणनाट्यासाठी घेऊन आता डॉक्टरांच्यामुळे डाकीण प्रथा निर्मूलनासाठी कायद्याचे बळ मिळणार असल्याने ही अमानुष प्रथा बंद होणार असल्याचा आशावाद दाखवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण डाकीण प्रश्नांवर आम्ही हात घातला असे नाही पण त्याची छोटी झलक आम्ही दाखविण्याचा प्रयत्न या रिंगणनाट्यातून केला आहे.

नाटकात काम करणारे आम्ही सर्व म्हणजे मी खंडू घोडे, शहादा अंनिसचा 3 वर्षांपासून कार्यकर्ता आहे. तसेच प्रविण अहिरे, दिनेश निकुंभे हे सुद्धा कार्यकर्तेच होते. रविकिरण देसले, धिरज शिरसाठ, प्रविण निकुंभे हे कॉलेजचे विद्यार्थी आणि शहादा अंनिसच्या 1 वर्षांपासून संपर्क असलेले कार्यकर्ते. पुष्पा ठाकरे, अनिता पावरा व रविंद्र पवार हे तळोदा येथील एम.एस.डब्ल्यू.कॉलेजचे विद्यार्थी होते. तसेच भारती पवार ही सुद्धा अंनिसची कार्यकर्तीच परंतु कार्यशाळेत सहभागी झालेली नव्हती. नाटकाचा आम्ही सराव करत असतांना खिडकीतून पाहून सर्व नायक हुबेहुब सादर करणारा प्रसन्न कुलकर्णी हा छोटा कलाकार खूपच नवीन. तसेच त्याची आई सुवासिनी कुलकर्णी ह्यासुद्धा नवीन. आमच्या नाटकाला जोडल्या गेल्या. तसेच किरण ईशी या धुळ्याच्या अंनिसच्या कार्यकर्त्याने आमच्या नाटकाचा सराव पाहून अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली. असे वेगवेगळ्या वयोगटाचे वेगवेगळ्या भागाचे, कॉलेजच्या आम्ही कार्यकर्त्यांनी हे नाटक सादर केले. या सर्वांपैकी एक-दोन सोडल्यास कोणीही आधी नाटकात काम केलेले नव्हते. काहींना नाटक तर माहीत नव्हतं.

वावडदे, जि.नंदूरबार येथील रिंगणनाट्य कार्यशाळेचा अनुभव तर आमच्यासाठी अविस्मरणीय असाच आहे. कार्यशाळेचे तीन दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. अतुल पेठे सर व राजू इनामदार सरांच्या तीन दिवसांचा सहवास आमच्या सुप्त गुणांना जागृत करण्याचा काळ ठरला. कार्यशाळे अगोदर आम्हा कोणालाच वाटायचे नाही की, अशी नाटकं सादर करू शकू. परंतु पेठे सर व त्यांच्या टीमने ते आमच्याकडून करवून घेतले. आमच्यातील आत्मविश्वास जागृत करण्याचं काम या कार्यशाळेत झाले. प्रत्येकाला आपण काही तरी नेमकं करू शकतो असा विश्वास या कार्यशाळेत आला.

अतुल पेठे सरांची शिस्त तर जबरदस्तच होती. त्यांनी कार्यशाळेत सांगितलेले प्रत्येक शब्द-शब्द आम्हाला काही नवीन शिकवून जात होतं. पेठे सरांची शिकवण्याची व प्रत्यक्ष करून घेण्याची कला अप्रतिम आहे. त्यांनी तीन दिवस आम्हाला जराही निराश न होऊ देता न थकवता दिवसाला 16-18 तास कार्यमग्न ठेवले, आणि याच तीन दिवसात त्याची आमच्याकडून नाटक सादर करण्याच्या बारीक सारीक गोष्टी करवून घेतल्या. प्रत्येक गटाला निराश न करता त्यांच्यातील उणिवा न दाखवता त्यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा स्वभाव पाहून आम्ही थक्क झालो होतो.

18-18 तास एकसारखे बोलणारे, कधी रागावणारे तर कधी प्रेमाने समजून सांगणार्‍या अतुल पेठे सरांचा सहवास आम्हाला या कार्यशाळेत लागला. नंदूरबार जिल्ह्यात आवर्जून नाव घेणारे व तेथील राजकीय, सामाजिक माहितीचा प्रचंड ज्ञान असणार्‍या पेठे सरांकडून जेव्हा आम्ही माहिती घेतली तर खरंच मन सुन्न झालं होतं. राजकीय पुढार्‍यापासून येथील आदिवासींच्या बोलीभाषा, गाणे त्यांना माहीत होते.

या तीन दिवसांत आम्हाला नाटक सादरीकरणाचे धडे तर मिळालेच पण त्याचबरोबर आमच्या गटातील प्रविण अहिरेचा अभिनय कला, प्रविण निकुंभेचा शाहीर, रविकिरण देसलेचा अभिनय करण्याचा आत्मविश्वास वाढला. आणि धिरज शिरसाठ, पुष्पा ठाकरे, रविंद्र पवार यांना गाणे बसविण्याचे कसब मिळाले आणि माझे(खंडू घोडे) तर कोणत्याही नाटक विषयावर मी एक चांगलं नाटक लिहू शकतो असा आत्मविश्वास या कार्यशाळेत मिळाला.

खरंच जळगावच्या या रिंगणनाट्य कार्यशाळेमुळेच आम्हा मातीच्या गोळ्यांच्यापासून रिंगणनाट्य सारखं सुबक, वैचारिक कलाकृती पेठे सर व त्यांच्या टीमने केले आहे. प्रत्यक्ष नाटक सादरीकरणात तर आम्हाला प्रचंड ताण आला. नाटकात विषय ठरला, गाणे ठरले, पात्र ठरले. परंतु आमच्याचील बर्‍याच जणांना प्रत्यक्ष अभिनय करताना खूप समजावावे लागत असते. कारण नाटकाची कुठलेही स्क्रिप्ट नव्हती. डाकीण हा विषय होता परंतु त्यातील प्रसंग खूप वेगळे होते. आम्हाला त्याची सांगड कशी घालावी हेच कळत नव्हते. तसेच पात्रांचा प्रवेश कुठून असावा, आवाज किती अन् कसा काढावा याचे काही ज्ञान नव्हते. कार्यशाळेत 6-7 तास सराव करूनही आमचे नाटक बसले नव्हते. शेवटी जसे जमले तसं सादर केलं. पुष्कळशा चुका त्या सादरीकरणात होत्या. आमच्या बोलण्यात, उभे राहण्यात होत्या. परंतु अतुल पेठे सरांनी व त्यांच्या टीमने आमच्या त्या चुकलेल्या व फसलेल्या नाटकाचे एवढे कौतुक केले आणि शाबासकी दिली की सर्व इतर सहभागी गटाने आमची वाहवा केली. आणि यातून आमचा आत्मविश्वास दुप्पटीने वाढला.

कार्यशाळेनंतर नाटकाचा सराव पहिल्या आठ दिवसात जोमाने केला. परंतु गटातील 3 कार्यकर्ते तळोद्याचे असल्यामुळे सराव व्यवस्थित होत नव्हता. आम्ही एकमेकांचे पात्रांचे अभिनय करून सराव करू लागलो. रोज नवीन काही त्यात शिकू लागलो. त्यात दुरूस्त्या करू लागलो. अतुल पेठे सरांचे मेसेज अन् कॉल अधून मधून यायचे. नाटकाचा सराव कसा चालला याविषयी ते विचारायचे, पेठे सरांचा सतत संपर्क असल्यामुळे शेवटपर्यंत आमच्यात उत्साह टिकून राहिला. आमच्या ग्रुपमधील डाकीणचे पात्र करणार्‍या पुष्पा ठाकरेचा आवाज खूपच बारीक असल्याने त्यांनी आमच्या नाटकात आवाज वाढविण्याचा सल्ला वेळोवेळी दिला. सातारा आणि पुणे येथे नाटक सादर करताना त्यांच्या सूचना आम्हाला मिळत होत्या.

सातारा येथे जेव्हा आम्ही सादरीकरण केले तेव्हा आमची भीती काहीशी कमी झाली. पेठे सरांनी केलेल्या आमच्यासाठीचा प्रयत्न सार्थ ठरला असे आम्हाला वाटले. परंतु सातारा येथे झालेल्या राज्यातील इतर गटांचं सादरीकरण पाहून थोडा कमीपणा आम्हाला वाटला आणि नाटकात काही बदल करण्याचा आणि अभिनय चांगला करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला.

20 ऑगस्ट रोजी सादर होणार्‍या प्रयोगासाठी पुण्याला आम्ही एक दिवस आधी गेलो. तेथेही पेठे सर व राजू इनामदार सरांनी सराव करण्यास सांगितले आणि अजून त्यात अतिशय चांगला बदल केला. आमच्या गटाच्या पुष्पाचा रोल अनिता पावरांना दिला.

20 ऑगस्टचा तो दिवस आम्ही विसरू शकत नाही. ओंकारेश्वर पुलावर जमलेली राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून आलेली तरूणाई, सिनेकलाकार, कलाकार, राजकीय व्यक्ती, सामाजिक व्यक्ती पाहून आम्ही थक्क झालो, ओंकारेश्वर पूलापासून चळवळीची गाणी म्हणत, घोषणा देत निघालेल्या मोर्चात सहभागी हेऊन एक वेगळा अनुभव आम्हाला आला.

मनोहर मंगल कार्यालयात डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाचा निषेध करत मान्यवरांची भाषणे मन हेलावून टाकणारी होती. प्रचंड गर्दीने भरलेल्या भरगच्च मनोहर मंगल कार्यालयात हजारो लोकांसमोर आम्ही डॉक्टरांमुळे डाकीण प्रथा निर्मूलनासाठी कायद्याचे बळ मिळणार असल्याने ही बंद होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला असे आम्हाला वाटले.

20 ऑगस्टनंतर आमचे कुठेच प्रयोग होऊ शकले नाहीत परंतु शहादा आणि तळोदा येथे स्वतंत्र गट तयार करून ग्रामीण व शहरी भागातील डी.एड./बी.एड. कॉलेजमध्ये प्रयोग करण्याचे ठरवले आहे. अजून नवीन कार्यकर्तेमिळवून अधिक चांगल्या प्रकारे नाटकाचं सादरीकरण करण्याचा आमचा विचार आहे.

रिंगणनाट्य हे अंनिसचे प्रबोधनाचे यशस्वी साधन नक्कीच होऊ शकते कारण रिंगणनाट्य हे समाजपरिवर्तन करण्याचे प्रभावी साधन ठरेल. रिंगणनाट्यामुळे प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन आपला विषय त्यांच्यापुढे ठेवता येतो आणि त्यामुळे त्यांच्या मनावर प्रत्यक्ष प्रभाव टाकणारे प्रभावी साधन रिंगणनाट्य असू शकते असे आम्हाला वाटते.

संघटनेला अनेक नवीन कार्यकर्ते मिळण्यास वाव असतो कारण नाटकाद्वारे प्रत्यक्ष अभिनय करतांना कलाकार तो विषय अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि त्यामुळे तो या कामात प्रत्यक्ष सहभागी होत असतो. आमच्या ग्रुपच्या प्रसन्न कुलकर्णी व त्यांची आई सुवासिनी कुलकर्णी तसेच प्रविण निकुंभे हे नवीन कार्यकर्ते जोडले गेले आहेत. त्यांचे कुटुंबीयही संघटनेच्या उपक्रमात सहभागी होतात. म्हणूनच या नाटकामुळे नवीन कार्यकर्ते मिळतात हा आमचा अनुभव आहे.

रिंगणनाटकांची शक्तीस्थानं सांगायची झाली तर अतिशय प्रभावी साधन आहे. समाजमनावर प्रत्यक्ष परिणाम करणारे आणि हसत खेळत आपला विषय लोकांपुढे मांडता येण्यास सोपे आहे. रिंगणनाट्यामुळे प्रभावीपणे लोकांच्या समुहाशी चर्चा न करता त्यांच्या मनाशी संवाद साधण्याचं प्रभावी साधन आहे.

रिंगणनाट्याची मर्यादा तशी कार्यकर्त्यांची उपस्थिती असू शकते. कार्यकर्त्याने वेळ दिला तर नक्कीच ही समस्या सुटू शकते. समाज परिवर्तन करण्याची खरी गरज या माध्यमातून सुटण्यास मदत होईल.

रिंगणनाट्य हे कार्यकर्त्याला आपले विचार अभिव्यक्त करण्याचे साधन आहे तर नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचं साधन आहे. रिंगणनाट्यामुळे लोकांशी प्रत्यक्ष संवादाचा माध्यम आहे आणि त्यामुळे अंनिसचे कार्य अधिक जोमानं वाढविण्यास व रूजविण्याचं कलाविष्कार आहे. विचारांच्या लढाईला अभिव्यक्ती जोड यामुळे मिळत असते. कार्यकर्त्यांच्या विचारांना कृतीची जोड या माध्यमातून टिकू शकेल.

आणि शेवटी एवढेच सांगू इच्छितो,
आम्ही प्रकाशबीजे रूजवित चाललो

वाटा नव्या युगाच्या, रूळवीत चाललो॥
जे शिल्पकार सारे, येत्या नव्या युगाचे
त्यांची स्मृती मनाशी, जागवीत चाललो॥

विवेकाचा आवाज यापुढेही असाच सातपुड्याच्या दर्‍याखोर्‍यात दुमदुमत ठेवू.

खंडू घोडे

लेखक संपर्क: 9767668022