डाकीण ठरवून जीवे ठार मारण्यात आलेल्या जोहराबाईच्या साकली उमर(ता.अक्कलकुवा, जि.नंदूरबार) गावाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने प्रत्यक्ष भेट दिली आणि या प्रश्नाच्या दाहकतेचा अनुभव घेतला.
जोहराबाईच्या डाकीण मंत्राने आईचं दूध खराब केले आणि त्यामुळे दूध पिल्यावर बाळाला उलट्या होऊ लागल्या, असा आरोप संबंधितांनी जोहराबाईवर केला होता असे समजले. प्रत्यक्ष घटनास्थळी भीतीचे वातावरण असून या घटनेबाबत गावकरी, शेजारी अधिक माहिती सांगण्यास तयार नाहीत.
मोलगी पोलिस ठाण्यात जाऊन प्रत्यक्ष गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता या प्रकरणी धर्मा खार्या वळवी(जेठ) केलीबाई धर्मा वळवी, सखुबाई रिच्या पाडवी यांना अटक केल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलीस ठाण्यात त्याचवेळी काठी व सुरगस या दोन गावातील 60 ते 70 लोकांचा जमाव पोलीस ठाण्याच्या बाहेर आढळून आला. कार्यकर्त्यांनी माहिती घेतल्यावर समजले की, तेही डाकिणीचे प्रकरण आहे.

सुरगस(ता.अक्कलकुवा) येथील गांगीबाई बाबा तडवी या 50 वर्षीय महिलेस डाकीणेचा संशय घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. येथील देवना राया वसावे या 25 वर्षीय तरूणाने स्वत:च्या सात महिन्याच्या मुलाच्या आजारपणास गांगीबाईस दोषी ठरविले. कार्यकर्त्यांनी देवना व त्याच्यासोबत आलेल्या सुरगस गावातील ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला. पण डाकीण काढणारा गट कार्यकर्त्यांचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मोलगी पोलीस ठाण्याचे पी.आय.चव्हाण यांनादेखील सदर तरूणांने गांगीबाई ही महिला डाकीण आहे असे ठामपणे सांगितले. तसेच गुजरात येथील डॉक्टरांनी मुलाच्या आजारामागे डाकीण आहे असे जाहीरपणे सांगितले. मांत्रिकाची माहिती विचारल्यावर होर्यापाणी(ता.शिरपूर) येथील चंपालाल महाराजाने डाकीण काढल्याचे सांगितले.
अंनिस राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सदर प्रकरणाचे गांभिर्य गावकरी पोलीस पाटील व पोलीस ठण्याच्या निदर्शनास आणून दिले. गांगीबाईच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस पाटील यांची असून त्यांनी त्याबाबत कृतिशील न राहिल्यास अंनिस पोलीस पाटील यांचे पद काढून टाकण्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करेल असे सांगितले.
डाकिणीच्या प्रश्नांचे वास्तव्य दाहक असून त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती लवकरच डाकीण प्रथा विरोधी प्रबोधनाची पुनर्निधार परिषद घेण्याचा विचार करीत आहे.
अंनिसच्या या पथकात राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह राज्यकार्यकारी समिती सदस्य विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय सिंगवी, कार्यवाहक बहादूरसिंग पाडवी होते.
– विनायक सावळे