Categories
चार्वाक कट्टा

दयामरण आणि इच्छामरण

एप्रिल - २०११

ज्योती : कोणत्याही विषयाला सुरूवात करण्यापूर्वी मला सर्वांचे मत ऐकायचे आहे. “अरूणा शानबाग”च्या बाबतीत न्यायालयाने जो निर्णय दिला त्याबद्दल आपण चर्चा करू या?

शरयू : मला वाटतं, या विषयावर चर्चा करण्याइतपत आपला अभ्यास नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाबद्दल चर्चा करणे चुकीचे ठरेल.

समीर : मला शरयूचे म्हणणे पटत नाही. नाहीतर प्रत्येक विषय असाच सोडून द्यावा लागेल. फक्त एवढी काळजी घ्यावी की, आपण फार कुणी शहाणे आहोत अशी वृत्ती बाळगू नये.

कल्पेश : मला वाटतं, “आपण फार शहाणे आहोत” अशी वृत्ती केव्हाही बाळगणं चुकच आहे. आपल्याला जे योग्य वाटतं ते ठामपणे मांडणं आणि तरीही इतराचं म्हणणं पूर्ण लक्ष देऊन ऐकणं जमू शकतं.

स्मिता : बर्‍याचदा असं होतं की, समोरची व्यक्ती बोलत असताना त्याचं ऐकण्यापेक्षा आपल्या डोक्यात काही वेगळाच विचार चालू असतो.

ज्योती : त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर मी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही मानसशास्त्रावरच चर्चा करत बसला आहात.

आशिष : अधिक फाटे न फोडता मी माझं मत सांगतो की, मला तरी न्यायालयाचा निर्णय योग्य वाटतो.

ज्योती : फक्त ‘हो किंवा नाही’ असं. उत्तर अपेक्षित नाही.

आशिष : मला तुझा रोख कळला, एक तर दुसर्‍या कुणाचा मृत्यू आपण ठरवावा ही कल्पना मला भयंकर वाटते.

शरयू : मला नाही तसं वाटत, अरूणा शानबाग ज्या अवस्थेत आहेत. त्या अवस्थेत जिवंत राहणं भयानक आहे. दया मरण म्हणजे जीव घेणं नव्हे.

गौतम : परंतु अशी वेळ आलेली नाही की कृत्रिम उपायाशिवाय त्या जगू शकत नाहीत. पुन्हा त्यांची काळजी घेण्यासाठी कितीतरी जण स्वेच्छेने तयार आहेत.

आशिष : याचा अर्थ असा तर नव्हे ना! की काळजी घेण्यासाठी कुणी नसेल तर त्यांना ‘मरण’ देऊन टाकावं.

गौतम : मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. परंतु मी थोडा ‘प्रॅक्टिकल’ विचार करत होतो.

प्रतिक : गौतमच्या म्हणण्यावरून तरी मला असं वाटतं की, उद्या जर भारतात दया मरणाचा किंवा इच्छामरणाचा अधिकार आला तर दया मरणाच्या नावाखाली किती खून होतील सांगता येत नाही.

शरयू : मला वाटतं, प्रतिक, तू अतिशयोक्ती करतो आहेस.

प्रतिक : अजिबात नाही, एके काळी पुरोगामी महाराष्ट्रातच ‘स्टोव्ह’चा भडका उडून अनेक बायका मरत होत्या. आपल्या लहानग्या मुलाला काही त्रास होऊ नये म्हणून त्या बहुतेक बिचार्‍या बायकांनी “स्वखुशीने आत्महत्या केल्याची मृत्यूपूर्व जबानी दिल्याचा इतिहास काही फार जुना नाही.

कल्पेश : प्रतिक, तू जे संदर्भ देतो आहेत ते फार जुने आहेत. आता काळ वेगाने बदलला आहे.

गौतम : तो कदाचित आपल्यासारख्या काही लोकांसाठी बदलला आहे. आपण कॉलेजमध्ये चर्चा करण्यासाठी जमू शकतो पण कित्येक मुलं माध्यमिक शाळेपर्यंत पोचू शकत नाहीत. इतकंच कशाला! आपल्यातलीच काहीजण कॉलेज सुटल्यावर कामावर जातात हे तरी आपण लक्षात घेतो का?

समीर : गौतम जे बोलला ते खरंच आहे पण विषयांतर नको म्हणून मी मूळ मुद्द्यांकडे लक्ष वळवतो. केवळ अरूणा शानबागचा विचार केला तर मलाही असे वाटते की, दया मरणाचा विचार व्हावा. परंतु हा निर्णय अर्थात तिच्या जवळच्या नातेवाईकांनी घ्यायला हवा.

प्रतिक : मला वाटतं, तिच्या जवळचे नातेवाईक म्हणजे तिची काळजी घेणार्‍या नर्सेसच आहेत. आणि त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहेच. आणि न्यायालयाने निर्णय दिला असता तरी त्याची अंमलबजावणी त्यांनी केली नसती. इतक्या वर्षात खाटेवर पडून असणार्‍या व्यक्तीच्या पाठीला जखमा होऊन ती व्यक्ती कधीच वेगवेगळ्या आजारांना बळी पडली असती पण तसं घडले नाही. यातच त्यांनी किती काळजी घेतली असेल हे स्पष्ट होते.

स्मिता : पण ‘अरूणा शानबाग’ एक नर्स होत्या म्हणून नाहीतर इतर कुणा सामान्य व्यक्तीची काळजी अशी घेतली गेली असती का?

प्रतिक : तुझा आक्षेप एकदम मान्य करूनही एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आपल्यासारखंच काम करणार्‍या व्यक्तीबद्दल थोडा तरी आपलेपणा वाटतोच. आणि महाराष्ट्रापुरता नर्सेसचा विचार केला तर खरं तर इतकं कौशल्याचं काम करताना त्याचं सामाजिक स्थान काय आहे. माझ्या ताईच्या काही मैत्रिणी ‘नर्स’ म्हणून काम करतात. त्यांनी ‘अरूणा’ला पाहिलेलं नाही पण त्यांना देखील तिच्याबद्दल जवळचं नातं वाटतं. हे स्वाभाविक आहे असं मला वाटतं.

गौतम : खरं तर ही भावना व्यापक व्हायला हवी. श्रम करणारे सर्वजण एकच आहेत असा विचार केला तर! मी विषयांतर करतो म्हणून माफ करा. पण जे लोक आंदोलन करतात ते श्रमिकच असतात. त्यांच्यावर लाठीमार करणारे पोलीसपण एका अर्थाने श्रमिकच आहेत.

स्मिता : गौतम, तू तर विषय कुठच्या कुठं भिडवतो आहेस. म्हणजे त्सुनामी जपानमध्ये आणि तू तिचा संदर्भ जैतापूरशी जोडायला बघतो आहेस.

प्रतिक : स्मिता, तू असं मानून चालली आहेस की, तसा काही संबंध नाहीच आहे.

स्मिता : जैतापूरचं प्रकरण म्हणजे ‘पोलिटिकल सेंटर’ आहे असं माझं तरी म्हणणं आहे. काकोडकरांसारखे शास्त्रज्ञ या प्रकल्पाबद्दल ग्वाही देत आहेत. त्याचं विधानसभेत भाषणही झालं.

कल्पेश : आणि मुख्यमंत्र्यापासून सर्व ‘मुख्य’ मंत्री झोपले होते.

आशिष : मुळात स्थानिक लोकांचा विरोध असतानादेखील सरकार असा प्रकल्प रेटून नेते हे चुकीचे नाही का?

स्मिता : परंतु असा विरोध गैरसमजांवर पण आधारीत असू शकेल. राजकीय विरोध म्हणून स्थानिकांना भडकवलं जात नसेल कशावरून!

प्रतिक : मुळात ‘सरकार’ या संस्थेवर गरीब माणसाचा विश्वास  नाही. आतापर्यंत ‘सरकार’ म्हणजे आपले जगणे कधीही हिरावून घेणारे संघटन अशीच सर्वसामान्य माणसाची भावना आहे. अगदी निनावी फोन करून ‘लाऊडस्पीकरची’ तक्रार करायला लोक घाबरतात. यावरूनच काय ते समज. अशी संस्था जेव्हा तुम्हाला घराबाहेर काढायला तयार होते तेव्हा साहजिकच लोक चिडणारच.

स्मिता : पण एकूण देश हिताचा विचार करायला नको का?

गौतम : देश म्हणजे बडे उद्योगपती असं तुला म्हणायचं नाही ना! काही मूठभर लोकांचं चांगभलं होणार आणि इतरांनी दारोदार हिंडायचं म्हणजे ‘देशहित’ अशी व्याख्या जास्त प्रॅक्टिकल होईल.

प्रतिक : खरं तर नव्यान्नव टक्के लोकांच्या फायद्यासाठी एक टक्का लोकांना दडपणं देखील चुकीचं आहे.

कल्पेश : जेव्हा नव्यान्नव टक्के लोकांचा फायदा असेल तेव्हा उरलेल्या एक टक्का लोकांना पुरेशी भरपाई देणेदेखील शक्य होईल.

ज्योती : म्हणजे याचाच अर्थ असा की, अशा मोठ्या प्रकल्पामध्ये लोकांची न दिलेली भरपाईची किंमत पकडलीच गेली नाही.

समीर : तरी माझ्या मते प्रकल्पाचा एकूण खर्च पाहता भरपाईची रक्कम कमी असावी.

प्रतिक : प्रश्न केवळ भरपाईचा नाही. मुळात जपानचा भूकंप झाल्यावर आपल्याकडे असा भूकंप होणारच नाही असं ठामपणे कसं म्हणता येईल.

शरयू : प्रतिक, तू तर विज्ञानावर निष्ठा ठेवणारा आहेस तरी तू असं विधान कसं करू शकतोस?

प्रतिक : मुळात भूकंपाचं भाकित करण्याबाबत विज्ञान इतकं प्रगत नाही. भूकंपप्रवण म्हणल्या जाणार्‍या भागात भूकंप झालेले नाहीत आणि सुरक्षित मानल्या गेलेल्या भागात मोठे भूकंप झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर वैज्ञानिकांनी अशी विधानं करणं योग्य नाही. मोठ्या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार होतो असं म्हणायला वाव आहे.

आशिष : ‘वाव आहे’ असं कशाला म्हणायचं, कालच विकिलिक्सने खासदारांची खरेदी-विक्री झाल्याचं जाहीर केलं आहे.

कल्पेश : ‘विकीलिक्स’ ने जाहीर केलं म्हणून खरं मानायचं कारण नाही.

गौतम : पण खोटं मानायचं देखील कारण नाही.

ज्योती : मला वाटतं चर्चा जरा जास्तच लांबत चालली आहे. आणि परिक्षांचा अभ्यासपण करायचा आहे तेव्हा इथंच थांबायला हरकत नाही.

गौतम : खरं तर अर्धवट चर्चा होऊ नये पण वेळेचे भान राखायला हवेच आणि परिक्षेच्या काळात तर नक्कीच मर्यादा पाळायला पाहिजे. त्यामुळे माझीही हरकत नाही.

– संजय सावरकर