पुरोगामी महाराष्ट्रावर कलंक
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला कलंक आहे. या हत्येमुळे पुरोगामी विचार किंवा पुरोगामित्व नष्ट होणार नाही. पुरोगामी विचार नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. डॉ.दाभोलकर हे आपल्या विचारांशी पक्के होते. त्यांच्या मारेकर्यांना शोधून हत्येमागील प्रवृत्तीचा सरकारने शोध घ्यावा.
– शरद पवार
ही तर गांधी हत्येमागचीच विचारसरणी
डॉ.नरेंद दाभोलकर यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. गांधीजींचा विचार ज्यांना सहन झाला नाही, त्यांनी त्यांची हत्या केली. ज्या पद्धतीने गांधीजींचा आवाज बंद केला गेला, त्याचप्रमाणे डॉ.दाभोलकरांच्या विचारांची ताकद सहन होत नाही अशा प्रवृत्तीने त्यांची हत्या केली आहे. ही हत्या करणारे व त्यामागील सूत्रधारांचा शोध सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही.”
जादूटोणाविरोधी कायद्याचा वटहुकूम काढलाच आहे. पुढे विधानसभेत हा कायदा मंजूर करू.
– पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
वैचारिक भूमिका घेऊ न शकणाऱ्यांचेच हे कृत्य आहे
देशाचा इतिहास पाहिला तर हिंदुत्ववाद्यांनी कधीही विचारांचे उत्तर विचाराने दिलेले नाही. संत तुकाराम, संत रोहिदास, महात्मा गांधी यांची हत्या ज्या प्रकारे करण्यात आली, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे. विचार मारून टाकण्यासाठी माणसे मारून टाकण्यात आली. दाभोलकर अलिकडेच माझ्या घरी जेवायला आले होते. ते मला म्हणाले होते, ‘तुम्ही फार कडक भूमिका घेता.’ आज त्यांचीच हत्या करण्यात आली. वैचारिक भूमिका घेऊ न शकणाऱ्यांचेच हे कृत्य आहे. दाभोलकर यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
– न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील
वटवृक्ष कोसळला
प्राचीन वटवृक्ष(डॉ.दाभोलकर) कोसळला, पण त्याने रूजविलेली बीजे दाभोलकरांसारखे अमर्याद वृक्ष तयार करील आणि आपल्या समाजातील अंधश्रद्धा समूळ नष्ट करतील.
– देबशीस पॉल, शिक्षण अधिकारी, सायन्स सेंटर, चेन्नई
जिंकून देणारा कबडीपट्टू
डॉक्टरांना चढायांपासून रोखणे खूप अवघड असायचे. त्यांचा खेळ म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा. श्रीरामपूर येथे 1975 साली अश्विनकुमार भोईर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होती. अंतिम सामना पुणे व सातारा यांच्यात सुरू होता. लढत चुरशीची सुरू होती. दोन्ही संघांचे गुण 13-13 असे बरोबरीत होते. सामना संपायला काही मिनिटे बाकी होती. शेवटची चढाई करण्यासाठी दाभोलकर मैदानात आले आणि त्यांनी पुणे संघाचे तीन खेळाडूंना बाद करून सातारा संघाला 17-13 गुणांनी विजय मिळवून दिला होता. त्यांचा खेळ अफलातून असे.
-शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते.
विवेकी नेता हरपला
डॉ.दाभोलकरांच्या हत्येने चळवळीचे मोठे नुकसान होऊन एक विवेकी नेता हरपला आहे. त्यांनी अंधश्रद्धा मुक्त व विज्ञानवादी दृष्टिकोनातून आयुष्यभर कार्य केले. बुवाबाजी विरोधात कायदा व्हावा म्हणून आग्रही भूमिका व चळवळ उभारली. त्यांची भूमिका धर्मांध लोकांना सहन होत नव्हती. त्यातूनच ही हत्या झाली असावी. त्यांच्या विचारांसाठी कार्यरत राहणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
-डॉ. मच्छिंद्र सकटे, दलित महासंघाचे संस्थापक
असा चिकाटीचा माणूस पाहिला नाही
डॉ. दाभोलकर हे सातत्यपूर्ण काम करणारे कार्यकर्ते होते. सलग 16 वर्षे इतक्या चिकाटीने काम करणारा माणूस मी पाहिलेला नाही. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यातून बोध घ्यावा. दाभोलकर कुठल्या एका पक्षाच्या विचाराचे नव्हते.
-नरेंद्र चपळगावकर (माजी न्यायाधीश)
तीव्र धिक्कार
एवढी भीषण गोष्ट घडू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाही. सर्व महाराष्ट्राने याचा तीव्र धिक्कार केला पाहिजे.
– अच्युत गोडबोले, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ
कायदा मंजूर करणे हीच श्रद्धांजली
डॉ.दाभोलकर एक कुशल संघटक होते. त्यांनी केवळ कार्य केले नाही तर त्यासाठी साधनसामग्रीही गोळा केली. सामाजिक कृतज्ञता निधीसारखा महत्वाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ताकद निर्माण झाली. शासनाने अंधश्रद्धाविरोधी कायदा मंजूर करावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
-अन्वर राजन (चळवळीतील कार्यकर्ते)
विचारांनीच उत्तर द्यावे
डॉ.दाभोलकरांसारख्या पुरोगामी विचाराच्या माणसाचा पुरोगामी पुण्यात दिवसाढवळ्या खून होणे, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे माझे रक्त प्रचंड उसळते. या घटनेला विचारांनीच उत्तर द्यावे. आमच्यासारख्या लोकांना एक नवीन विचार देणारी मंडळी संपतात, हे दुर्दैव असून याचा विचार सर्वांनी करायला हवा. सगळ्यांनी यामागे उभे राहायला हवे.
-गिरीश कुलकर्णी (अभिनेता, दिग्दर्शक)
बुवा-बाबांना माणसात आणायचे होते.
अलिबागला एका बुवाचे पितळ उघडे करण्यासाठी नरेंद्रकाकांसोबत माझ्या बाबांबरोबर मी गेले होते. त्या बुवाला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र, तिथून परतत असताना नरेंद्रकाका त्या बुवाला म्हणाले, ‘अरे तू इतरांना लुबाडून त्यांचे नुकसान करतोस. पण, या कामात माणूस म्हणून तुझेही नुकसान होतेय.’ हा प्रसंग आजही आठवतो. त्यांना फक्त अंधश्रद्धा संपवायची नव्हती, तर या बुवा-बाबांनाही माणसात आणायचे होते.
– गार्गी निळू फुले (अभिनेत्री)