Categories
प्रासंगिक

देशाच्या बुद्धी हत्येचा खेळ

फेब्रुवारी – २०१५

ऐका हो ऐका! आपला वैभवशाली भूतकाळ ऐका! हम भी कुछ कम नही! आपले पूर्वज काय सॉलीड होते राव! आपल्या पूर्वजांचं अभिनंदन!

9 हजार सालापूर्वी आपल्या देशात विमानं उडत होती. ती एका ग्रहावरून दुसर्‍या ग्रहावर जात असत. या विमानात 30 इंजीने बसवलेली असायची. युद्धासाठी ही विमानं सर्व तर्‍हेनं सज्ज असत. त्या काळातल्या गाईसुद्धा कमालीच्या चमत्कारिक आणि वेगळ्या होत्या. एका गाईच्या शरीरात एक बॅक्टेरिया असा असायचा की, तो तिच्या एका वेळच्या जेवणाला(चार्‍याला) 24 कॅरट सोन्यात रूपांतरीत करत असे.

आपल्या पूर्वजांचे आणखी चमत्कार बघा. कोण म्हणतो गणपती खोटा देव आहे. हत्ती आणि माणूस यांच्या शरीराची एकमेकांशी सर्जरी, ऑपरेशन करून आपले पूर्वज डॉक्टर गणपती सदृश्य मानव तयार करण्यात तरबेज होते. हत्तीचं डोकं आणि मानवाचं शरीर यांची जोडजाड करायची सर्जरी कला आपल्या पूर्वजांना अवगत होती.

तुम्ही लवकरच ऐकाल खात्री होईल तुमची. आम्ही सांगतो आणखी एक बात. आपले पूर्वज मंगळावर नाश्ता करत. सकाळी सकाळी थोडा फेरफटका मारत. मग सूर्य डोक्यावर आला दुपारी की क्षणात जात बृहस्पती(बुध) वर आणि मस्त लंच चापून ओरपून खात. गुरूवर रात्री उतरत. डिनर करत झकासपैकी. हे असे दावे, बढाया मुंबईत पार पडलेल्या 102 व्या इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये काही तथाकथित शास्त्रज्ञांनी ठोकले. विज्ञानाचे विद्यार्थी, मीडियाचे प्रतिनिधी आणि सारे शास्त्रज्ञ ते ऐकून अवाक् झाले. या परिषदेत भारतातून विविध सरकारी-खाजगी संस्था, संघटनांत काम करणार्‍या विज्ञान संशोधकांनी भाग घेतला होता. ग्लोबल वॉर्मिंग, हवामान आणि शेती उत्पादन, शिक्षण पद्धती, नगरविकास, रोजगार निर्मिती, वाहतूक, आरोग्य, आहार, पूरातत्व शास्त्र, जीवाश्मशास्त्र, स्पेस सायन्स, जीवशास्त्र अशा लोकांच्या जीवनाला भिडणार्‍या नाना विषयांवर शास्त्रज्ञांनी प्रदर्शनं भरवली होती. विविध विषयांवर परिसंवाद झाले. त्यात शास्त्रज्ञांनी आपापले शोधनिबंध मांडले, मतं मांडली. विज्ञानाच्या या गंभीर मेळ्याला गालबोट लावण्याचं काम मात्र वरील भंपक दावे करणार्‍या तथाकथित शास्त्रज्ञांनी केलं.

‘प्राचीन भारतीय विज्ञान’ या विषयावर सायन्स काँग्रेसमध्ये कॅप्टन आनंद बोडस यांनी निबंध वाचन केलं. त्यांनी पुराण कथांत विमान उड्डाणाची कल्पना कशी आहे हे मांडत पूर्वजांना विमान उडवण्याची कला अवगत होती अशा बढाया मारल्या. ही विमानं गरजेनुसार छोटी-मोठी होत असत, उलटी चालत असत. पुष्पक विमान कसं होतं, त्याच्या सुरस-चमत्कारिक कहाण्या बोडस यांनी मांडल्या.

बोडस यांच्या या संशोधनाबद्दल ‘नासा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेनं नाराजी व्यक्त केली. अमेरिका, युरोपात या विज्ञान क्षेत्रातल्या वाह्यात बढायांविषयी कीव व्यक्त झालीय.

सायन्स काँग्रेसमध्ये विमान कलावाल्या बोडस यांच्यासारखेच ज्योतिष, भविष्य, हस्तरेषा आत्मज्ञान, अध्यात्म अशा स्युडो सायन्स समजल्या जाणार्‍या विषयातले स्वयंघोषित तज्ज्ञ अवतरले होते. त्यांनी त्यांचे विषय मांडले. चित्रविचित्र बढाया घुमवल्या.

या सार्‍या प्रकारामुळे या सायन्स काँग्रेसच्या आयोजनाविषयी प्रश्न तयार झाले आहेत. हे असे अवैज्ञानिक लोक इथं कुणी घुसवले? त्यांना निबंध वाचायला परवानगी कुणी दिली? देशातल्या केंद्रीय मंत्र्यांसमोर हे स्युडो सायंटिस्ट बढाया मारत असताना मंत्री मौन धरून का बसले? की हे सारं केंद्र सरकारने ठरवून केलं होतं? सरकारचा या स्युडो सायन्सला पाठीशी घालण्याचा डाव आहे काय?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सायन्स काँग्रेसला आले होते. त्यांच्या कानावर या भंपक गोष्टी गेल्याच असणार. ते खूप सतर्क गृहस्थ आहेत. त्यांनी याविषयी ना नाराजी व्यक्त केली. ना त्याबद्दल काही प्रतिक्रिया व्यक्त केली. पूर्वी मनमोहनसिंग पंतप्रधान असताना ते वादग्रस्त विषयांवर मौनात राहत. मोदी हे बोलके पंतप्रधान आहेत. त्यांनी या विषयी मौनात जाणं समजू शकत नाही. देश-विदेशात या प्रकाराने भारताची लाज गेली. अशा वेळी पंतप्रधानांना त्याचं सोयरसुतक नाही हे न समजण्याइतके लोक खुळे नाहीत. त्यांना बोडसांचे फसवे दावेही समजतात. मोदींचं डावपेची मौनही कळतं. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समोर स्युडो सायन्सचा उदोउदो होत होता. त्यांनीही त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. उलट वेगळ्या शब्दांत या भंपकपणाचं समर्थन केलं.

स्युडो सायन्सवर मोदींचं मौन, जावडेकरांचं आडून समर्थन यामागे एक वैचारिक सूत्र आहे. मोदी-जावडेकर उजव्या विचार शक्तींचे प्रतिनिधी आहेत. ते सत्तेवर आहेत. बोडस यांच्यासारखे स्युडो शास्त्रज्ञ त्या विचाराला लोकांमध्ये बळ मिळवून देणारे प्रचारक आहेत. सत्तेतले लोक आणि प्रचारक यांची ही मिलीभगत आहे. वर्तमानातल्या अडचणी लपवायच्या त्यापासून पळायचं भूतकाळात शिरायचं. रोमँटिक बढायांमध्ये लोकांना गुंगवायचं. अरे आजची आताची काळजी चिंता काय करता? ती विसरा. आपल्या भूतकाळात डोकावून पहा. आपला इतिहास, पुराण काळ किती गौरवशाली होता ते बघा. स्वत:ची बुद्धी चालवू नका. प्रश्न काय विचारता? प्रश्न विचारणं हे बरं नाही! अशी ही खास फॅसिस्ट विचारसरणी. मंद बुद्धी, डोक्यानं आम्ही सांगतो ते माना डोलावून खरं माना. तुमचं कल्याण होईल! अशी या विचारसरणीची शिकवण असते. ही विचारसरणी तिचे पाईक तरूणांची प्रश्न विचारायची सवय खुडण्यासाठी काम करते. प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती घातक आहे असं या विचारसरणीच्या पाईकांना वाटतं. हिटलर या विचार सरणीच्या लोकांचं प्रेरणास्थान आहे. सध्या सत्तेत असलेले नेते, धार्मिक नेते आणि फसव्या विज्ञानाचे समर्थक संशोधक यांच्यासारखे तथाकथित संशोधक हे या फॅसिस्ट जमिनीतली रोपटी आहेत. विनायक दामोदर सावरकर एकदा म्हणाले होते, ‘एक वेळ गायीची थोडी हत्या झाली तरी चालेल, पण उभ्या देशाच्या बुद्धीची हत्या करू नका’. फॅसिस्टांना सावरकर प्रात: स्मरणीय आहेत. पण त्यांचे हे विचार मात्र त्यांना समजत नाहीत काय?

वैभवशाली पुराणकाळ, देव, धर्म, संस्कृती याविषयी खोटी मिथकं पसरवून देशाच्या बुद्धीची हत्या करण्याचे प्रयोग, खेळ मुंबईच्या सायन्स काँग्रेसमध्ये खेळण्यात आले. मोदी, जावडेकर यांची सत्ता या खेळामागे ठामपणे उभी राहिलेली दिसली.

महाराष्ट्रात 1995-99 साली भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या गणपतीनं दूध पिलं होतं. जोशींच्या गणपती पाठोपाठ अनेकांच्या मूर्त्या दूध मागू-पिऊ लागल्या होत्या. 1999-2004 या काळात केंद्रात वाजपेयी सरकार होतं. त्यावेळी संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर जोरात भटकले आहेत. भटकर म्हणतात, पुढची दहा वर्षे मी विज्ञान आणि अध्यात्म यांच्या सांगडीसाठी झिजवणार आहे.

जयंत नारळीकरांसारख्या जगानं, देशानं डोक्यावर घेतलेल्या शास्त्रज्ञाने ज्योतिष आणि त्यासारख्या स्युडो सायन्सला नकार द्या. त्यापासून दूर रहा असं लेख लिहून सांगितलं त्या नारळीकरांच्या कर्मभूमीत फसव्या विज्ञानाचे समर्थन होते, माथेफिरू खुन्यांची मंदिरे बांधण्याचे प्रयत्न होतात, काही जण मंगळावर जाऊन आल्याचा दावा करतात तर काही जण ताजमहाल हा तेजोमहाल होता असं सांगतात. हे सर्व चिंताजनक आहे.

पुराणे, देव-धर्म, संस्कृती, इतिहास, जाती धर्म भेद आदी वैदिक भ्रमांचा पर्दाफाश करणारं लेखन अलिकडच्या काळात विपुल झालंय. प्रबोधनकार ठाकरेंनी कर्मकांड, पुराणांचं थोतांड उघड केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भटांचं कुभांड स्पष्ट केलं. मुकुंदराव पाटील, माधवराव बागल, न.र.फाटक, डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर, डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचं लेखन प्रबोधनाची दिशा दाखवतं. अशा लेखक, सुधारकांचे विचार झाकोळून टाकण्याचा, तरूणांना भ्रमित करण्याचा डाव फॅसिस्ट शक्ती खेळत आहेत. त्याचा एक भाग म्हणून सायन्स काँग्रेसमध्ये हुशारीने हा वेगळेपणा करण्यात आलाय.

आपली आणि आपल्या मुलांची आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक जिंदगी कशी असावी? त्यांची सूत्रं स्वत:ला कडवे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध म्हणून घेणारे बाबा, महाराज, मौलवी, फादर, भिख्खू यांच्या हातात द्यायची का? परत या कडव्या धर्मांधामागे हितसंबंधीवैज्ञानिकांची फौज उभी आहे. ते आपल्याला कसं जगायचं त्यांचे तर्क वापरून शिकवणार आहेत. हे लोक गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार मानणार. मात्र बुद्धाने सांगितलं, विवेकवादी व्हा. विज्ञानवादी व्हा. भौतिक प्रश्न पहिले सोडवा. देव आहे नाही यावर चर्चा करत फुकट आयुष्य वाया घालवू नका. हे मात्र आपल्यालूा सांगणार नाही. हा मोठा कट आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. पुन्हा सायन्स काँग्रेसमध्ये देशातले नामवंत शास्त्रज्ञ सहभागी होते. त्यांनी या लोकांविरोधात निषेधाचा एक सूरही व्यक्त केला नाही. हा तर मोठाच धोका आहे. सत्तेला घाबरून हे पोटार्थी वैज्ञानिक गप्प झाले असावेत.

संविधानात अनुच्छेद 51(अ) नुसार केंद्र आणि राज्यावर वैज्ञानिक समज वाढवण्याची जबाबदारी टाकलेली, बंधनकारक केलेली आहे. त्या संविधानावर चालणार्‍या देशात सायन्स काँग्रेसमध्ये अवैज्ञानिक गोष्टी तरूण पिढीसमोर मांडल्या जातात. हे महासत्ता होण्याच्या वल्गना करणार्‍या पंतप्रधानांसह सर्वांना लज्जास्पद ठरावं अशी बाब आहे.

आपला देश ‘डेंगू’ आणि त्यासारख्या आजारांवर संशोधन, उपचार करण्यासाठी योग्य पैसा, साधनं उभी करू शकत नाही. उलट धार्मिक आयोजनांवर राज्याचा पैसा वारेमाप उधळला जातो. सरकार सत्तेच्या बळाचा वापर करून विज्ञानाला दाबून खोट्या विज्ञानाला बढावा देऊ पाहतंय. त्या देशाच्या भविष्याची काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे.

 राजा कांदळकर, मुंबई

संपर्क : 9004315221