कोंबड्यानं दिलेल्या धारदार बांगेनं यल्लाप्पा खडबडून जागा झाला. लगबगीनं उठून त्यानं आजूबाजूला पाहिलं. अगदी फटफटीत होत आलं होतं. बरीच वर आलेली शुक्राची चांदणी निस्तेज होत चालली होती. मावळतीला झुकलेलं बाजलं पार उलंपालटं झालं होतं. यल्लाप्पानं ते पाहिलं आणि तो स्वगतच बोलला, “आराराऽ पार उजाडलं की!”
अंगावर चादरीची भाळ मारून, तो घरात गेला आणि “कुसे, एऽ कुसेऽऽ” असं म्हणत त्यानं कुसाबाईला चिखलातल्या मेढीगत लडालडा हलविलं.
वार्यानं हलणार्या मांडवावरच्या पडवळासारखं अंग तीन जागी वाकडं करीत कुसानं लोळण घेतली आणि म्हटलं, “का वं? रामाधर्माच्या पारी का कोकालताय?”
“अगं, पार उजाडलं की! सगळं आटपून वांगीला कवा जायचं?” यल्लाप्पा काहीसा चिडून म्हणाला.
“याऽ बयाऽ, खरं की काय?” असं म्हणत कुसा लगबगीनं उठली.
अंथरूण झडाझडा झाडून तिनं वलाणीवर टाकली. घाईघाईनं हातपाय तोंड धुतलं. रात्री राहिलेली भाकरी घेऊन तिच्यावर चटणीची भुकटी टाकली. झाली तयारी!
घरात जाऊन कोनाड्यात ठेवलेला जग तिनं रूसलेल्या पोराला ओढावं तसा दर्रदिशी दाराच्या तोंडी ओढला. जगाला अडकविलेले अनेक देव खुळऽकन् हसले. जगात कुठंतरी भंडार्यात पडलेली काकणं किणकिणली. दाराच्या तोंडी जग मांडून कुसा कमरेवर हात ठेवून म्हणाली, “आवं, आता का उशीर करताय? धरा; हात लावा जरा.”
खांद्यावर टाकलेलं धोतर सावरीत यल्लाप्पा पुढं झाला. कमरेत वाकून त्यानं जगाला हात लावला अन् तो कुसाच्या डोक्यावर दिला. कणत-कुथत कुसानं तो जग शिरावर झेलला आणि ती घराच्या बाहेर पडली.
यल्लाप्पानं मग एका काखेत झोळी अन् दुसर्या काखेत तुणतुणं अडकविलं. हातात चौडकं घेतलं आणि तो सुद्धा झपाझप वाटेला लागला. इनाम ओढा ओलांडून ते टेकडीला लागले. माळाचा गुलजार फुफाटा पायाला गुलालासारखा भासत होता, वारा थोडासा वाहतच होता. कुणी कष्टाळू शेतकर्यानं भल्या पहाटे जोडलेल्या मोटेचा कुईऽ कुईऽ असा आवाज येत होता. आख्या माळावर कुणी माणूस म्हणून दिसत नव्हतं. सगळं सामसूम होतं. त्या प्रसन्न वातावरणात कुसा आणि यल्लाप्पा गप्पा मारीत निघाले होते. वांगीच्या ओढ्याजवळ पोहचताना त्यांनी दिवसाचा सोनेरी गोळा वर येताना पाहिला. दोघांनीही मनोभावे सूर्याला नमस्कार केला.
ओढ्यात उतरल्यावर मानेचा कढ जावा म्हणून कुसानं जग खाली ठेवला. यल्लाप्पानंही मग चांगली बचकंएवढी तंबाखू मलळी. ह्या हातावरनं त्या हातावर तीन-तीनदा घोळली आणि तोंडात टाकली.
“हं, उचल बघू आता” असं म्हणून त्यानं जगाला हात घातला. कुसानं पुन: तो जग डोक्यावर घेतला.
गावात मरीआईचा गाडा आला, वासुदेव प्रगट झाला, दरवेशी अस्वल घेऊन आला किंवा डोंबार्याचा खेळ वाजू लागला तर पहिल्यांदा महारवाड्यात मागायचं ही सगळ्याच मागतकर्यांची प्रथा! महारांच्या चार घरातून दान मिळाल्याशिवाय मिळकत होणारच नाही, असा ह्या सगळ्यांचा विश्वास! कुसा आणि यल्लाप्पाही याला अपवाद नव्हते. खरं म्हणजे वांगी गावचा महारवाडा दीक्षा घेऊन केव्हाच बौद्ध झाला होता. तरीही हे मागतकरी प्रथम तिथलीच चार घरं मागितल्याशिवाय गावात पाऊल टाकत नव्हते.
कुसानं डोईवरचा जग मानेच्या काट्यानं तोलून धरला आणि ती डाव्या काखेत तुणतुणं धरून, उजव्या बारीक काडीनं ते वाजवू लागली. तुणतुण्याची तार झणझणू लागली. यल्लाप्पानं मान डोलवून “धोंड कॉट कॉटऽ” “धोंड कॉट कॉटऽ” अशा सुरातलं चौंडकं वाजवायला सुरवात केली. आणि दोघांनीही “ओऽ दूर जानेवालेऽऽ” ह्या गाण्याच्या चालीवर ‘रेणूका तू माझी आईऽ” हे गाणं धारदार आवाजात सुरू केलं. अंथरूणातून उठलेली उघडीनागडी पोरं “लेकानो, बघायला आलं” म्हणून त्यांच्याकडं धावली.

दीक्षा घेऊन बुद्ध झालेल्या आयाबायांना जोगवा वाढताना संभ्रम पडू लागला. पण यल्लम्मा हे कडक देवस्थान! ओल्या झाडालासुद्धा जाळून खाक करतं, अशी या देवस्थानाची ख्याती! मग माणसाचं काय होईल ते कसं सांगावं? माणसाचा तर आजनात धुरळाच होऊन जाईल! ही अंधश्रद्धा दूर व्हायला अजून भरपूर अवधी होता. म्हणूनच त्या जोगवा वाढत्या होत्या; पण चार-सहा घरं मागून होतात न होताच तोच अमृत अण्णाचा बापू आला अन् त्यानं “ए लेकानो, सारं जग सुधारलं अन् तुम्ही अजून जोगवा मागतायच का? व्हा तिकडं गावात!” असं खडसावलं.
कुसानं आणि यल्लाप्पानं आपला मोहरा गावात वळविला. नव्या नव्या चालीवर ‘आई’ची गाणी म्हणून ते दोघं जोगवा मागत हाते. कुणबी बायका पसा-कुडता दाणे सुपात घेऊन वाढत होत्या.
मागता मागता कुसा आणि यल्लाप्पा मारूती दादाच्या घराजवळ आले. त्यांना बघून ह्या दादाचं माथं भडकलं. तसा हा दादा स्वभावानं भारी फटकळ! देव नाहीच, असं समजून भुता-खेतासारखा रात्री-अंधारचंसुद्धा म्हसोबाच्या डोंगरात शेत राखणीसाठी मुक्काम ठोकायचा. कुणी भीक मागणारा दिसला की, दादाच्या कपाळाची शीर उभी रहायची. एकदा तर त्यानं मरीआईचा गाडा, पट काढून गडी फेकावा असा, फेकून दिला होता. मरीबाईच्या बाबानं वाळलेल्या केसांच्या जटा झाडून झाडून दादाला शाप दिला. पण दादाला काहीच झालं नाही.
….आणि नेमकी ह्या दादाच्या तावडीतच कुसा आणि यल्लाप्पाची जोडी सापडली गेली.
त्यांना तराटणी देत दादा म्हणाला, “ए यलप्या, ते वाजवायचं बंद कर पहिलं!” चौडकं आणि तुणतुण्याचा आवाज गप्पकन् बंद पडला. मारूतीदादा जरा थांबून म्हणाला, “का मागून खाताय रं सुक्काळीच्यानो! हातपाय झडल्यात का तुमचं? कष्ट करून पोट भरलं तर हातपाय काय उरावर येतील का?”
“मालक” यल्लाप्पा अवघडून म्हणाला,
“अन् तुला काय धाड आलीय गं! पाठवार मोजलं तर मुंडा हात भरंल की! आणि काय रे, गेल्या ऐतवारी तुमच्या जातभाईंनी बुद्धाची दीक्षा घेतली त्या घोळक्यात होता का न्हाय तुम्ही पण?” दादानं खडसावून विचारलं.
“व्हय; होतो की मालक!” कुसा घाबरून म्हणाली.
“मी राम, विष्णू, म्हसोबा असल्या कोणत्याच देवाला मानणार न्हाय, अशी शपथ पण घेतलीय का न्हाय तुम्ही?” दादाच दुसरा सवाल!
“व्हय; व्हय मालक!” कुसा आणि यल्लाप्पा दोघंही एकदम म्हणाले.
“मग!” चांगला दम भरून दादा म्हणाला, “ही शपथ कुणी तुमच्या बापानं पाळायची का? का नुसती पांढरी धडुतं घालून मिरवायला गेला होता तिथं? चला चालायला लागा, पुन: या गावात फिरकला तर याद राखा, जरा माणसासारखं जगा की!”
कुसा आणि यल्लाप्पा जग घेऊन गावाबाहेर पडले, आजवर अशी खूप बोलणी त्यांनी खाल्ली होती; त्याचं आजपर्यंत तरी त्यांना काही वाटत नव्हतं. पण मारूतीदादानं केलेल्या दीक्षाविधीच्या स्मरणानं त्यांच्या मनाला चटका लागला. गावाबाहेर असलेल्या वडाच्या सावलीला दोघेही न बोलताच थांबले. चितागती होऊन एकमेकाकडं पाहू लागले.
एवढ्यात डोक्यावर ट्रंक घेऊन चाललेला कदमाचा बापू दिसला. त्याला पाहून यल्लाप्पा म्हणाला, “रामराम मंबयवालं! सकाळच्या गाडीनं आला की काय?”
“होय, कसं बरं आहे ना?” बापूनं विचारलं.
“व्हय, पण तुम्ही मध्येच कसं काय येणं केलं?” कुसा काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.
“आलो सहजच!” बापू बोलला.
“सहज कसं?” यल्लाप्पा म्हणाला, “सदुआण्णाची जमीन खरेदी करताय नव्हं चार हजाराला?”
“तुम्हाला ठाऊकच आहे की मग!” बापू हसत हसत बोलला आणि चालू लागला.
कुसा बराच वेळगप झाली आणि म्हणाली, “आपणाला कवा जमीन-जुमला खरेदी करायला येईल का? हक्काचं घरदार तरी हाय का आपणाला? सातआठ वर्सं झाली हे देवाचं सव्वा मणाचं ओझं माझ्या शिरावर हाय! ह्या देवाला तरी कणव येऊ नये का आपली!”
“अगं चालायचंच, आपल्या नशिबातच हे हाय, त्याला आपण तरी काय करणार!” यल्लाप्पा धीर देत म्हणाला.
“ह्याला नशिब म्हणायचं? मागायला गेलं की दाराशी आलेल्या कुत्र्यागत माणसं धुडकावून लावत्यात. घर न्हाय न् दार न्हाय! हक्काचं म्हणून काय हाय ह्या जगात आपलं!” कुसा डोकं फिरल्यागत बडबडत होती.
“आता रं देवा! आगं तुझं म्हणणं तरी काय हाय मग!” यल्लाप्पा कातावून म्हणाला.
“आपणसुद्धा पुण्या-मुंबईला जाऊ या, कष्टाचं चार पैसं मिळवूया!”
“आन् हे देवस्थान गं!” यल्लाप्पा भांबावून म्हणाला.
“हे देऊ या सोडून!” कुसा निर्धारानं म्हणाली.
“कुसा!” यल्लाप्पा सावकाशीनं बोलू लागला, “ह्या कडक देवस्थानाच्या भंडार्यात हात घातला त्यामुळे सितू बुवाचं हातपाय झडलं; शंकर व्हलार रगात वकून मेला अन् रामण्णा झिजून झिजून गेला. आन् आपण ह्या देवाला सोडला तर एका रात्रीत धुरळा होऊन जाईल का न्हाय आपला?”
यल्लाप्पा चांगला हबकला होता.
“देवाची रगड सेवा केलीया आपण! आता त्या वडाखालच्या पडक्या विहिरीत ह्या देवाला टाकून मुंबईला जाऊ या. काहीतरी पोटाचा उद्योग करू.”
“आगं पण….” यल्लाप्पा अडखळला.
“काय व्हत न्हाय! मग त्या दिवशी दीक्षा का घेतली आपण? आता मनात आलंय हे खरं!” कुसा असं बोलली आणि जगातल्या भंडार्यात पडून असलेले सगळे पैसे तिनं काढून घेतले. मग तिनं तसाच जग उचलला आणि वडाखालच्या पडक्या विहिरीत थोडा खड्डा खणून त्यावर माती टाकली. एक अति कडक देवस्थान गप्पगुमान मातीआड झालं!
कुसा आणि यल्लाप्पानं त्याच्या एका नातेवाईकाकडं परेलच्या डबकचाळीत मुक्काम ठोकला होता. आठपंधरा दिवसांतच कुसा इतर बायकांच्या मदतीनं भाजीपाला विकायला शिकली.
भल्या पहाटे उठायचं, डोक्यावर हेलपाटी घेऊन परळ स्टेशन गाठायचं. पहिली गाडी पकडून थेट भायखळा मार्केट. भाजीपाला खरेदी करायचा आणि तो दिवसभर विकायचा.
हे बरं होतं. कुणाचं एक नव्हतं, दोन नव्हतं. पोटपाणी भागून दिवसाकाठी दीड दोन रूपये सुटायला मरण नव्हतं. डालडाच्या डब्याचे पत्रे ठोकून बनविलेली ती झोपडी कुसा आणि यल्लाप्पाला महालासारखी वाटायची. सगळं ठीक होतं. उण्याला भर म्हणून यल्लाप्पालाही ‘सन्सरी’मिलमध्ये ‘कोंबड’ खात्यात नोकरी मिळाली. आता सगळं मनासारखं चाललं होतं…

आणि एके दिवशी यल्लाप्पानं चार इष्टमित्रांना गोळा केलं. स्वत:ला भारीपैकी धोतर-पैरण अन् टोपी घेतली. मधल्या बोटात सोन्याची अंगठी चढवली. कुसासाठी तिच्या मनाला येईल असली साडी-चोळी घेतली. गळ्यात एक बोर-माळ अन् मणी डोरलं घातलं. गेली बरीच वर्षे लग्नाशिवाय नवरा-बायकोसारखं रहाणारं हे जोडपं रीतसर विवाहबद्ध झालं. आजपर्यंत त्यांचं लग्न झालंच नव्हतं. देवासाठी सोडलेल्या बाईनं लग्न करायची चालंच नव्हती. तिनं जग वागवायचा आणि चौडकं वाजविणारा गडी सांभाळायचा. पण यल्लाप्पा आता तिचा नुसता ‘गडी’ नव्हता. तिचा लग्नाचा नवरा होता. तिचं सौभाग्य-सर्वस्व होतं ते!
दिवस अंधारात दडत होते. अंधेरी रात्री उजेडासाठी धडपडत होत्या. कालचक्र चालूच होतं. चार-पाच वर्षांचा काळ गेला आणि एकदा आपल्या गावी जावं, असं कुसाच्या मनात आलं. आपला विचार तिनं यल्लाप्पाला बोलून दाखविला. सगळी तयारी झाली. एका ‘रातराणी’नं कुसा आणि यल्लाप्पा गावी येऊन पोचले.
गावात बराच बदल झाला होता. विजेचे खांब आले होते. मराठी शाळेची एक नवी इमारत उभी होती. कदमाच्या वीस खणी घराच्या मोकळ्या सोप्यावर पडव्या बांधून खोल्या तयार केलेल्या दिसल्या. बहुधा कदमबापूची पोरं वायली राहिलेली असावीत. पाराखाली पाणी उपसायचा पंप लावलेला दिसला. कडक उन्हामुळं पारावरची पानं मात्र पार गळून गेली होती. पूर्वीच्या तक्याच्या दारावर ‘बौद्ध विहार’ अशी पाटी लावलेली होती.
कुसा आणि यल्लाप्पा त्या बौद्धविहारातच विसावले. पण त्यांना पहाताच मध्या आळीच्या तानूबाईनं त्या दोघांना अगत्यानं घरी नेलं. मग चहूकडच्या आया-बाया गोळा झाल्या.
“कुसा, रांडं, किती ग बदललीयास?” हौसा वैनीनं विचारलं.
“चोरीमारी करून गेल्यागत कुठं फरारी झाला होता?” शिंदेबाई अंदाज घेऊ लागल्या.
“आमी मुंबईला गेलो होतो.” कुसा म्हणाली.
“कसं, बरं चाललंय नव्हं?”
“व्हय एकदम चांगलं! दोघांनाही नोकरी हाय! यावं म्हणलं चारआठ दिवसाच्या रजेवर!” यल्लाप्पा म्हणाला.
“बरं झालं. पण कुसा, देव कुठं हाय गं?” विठा वारकरणीनं विचारलं.
“हाय की!” कुसा म्हणाली.
“कुठाय? दिसत न्हाय ते! संगं आणला न्हाय का?”
“व्हय; देवाला रजा मिळाली न्हाय!” कुसा हसत म्हणाली.
“अगं द्वाडं”, विठा वारकरीण सांगू लागली, “वांगीच्या अण्णा भगताला देव घावलाय.”
“देव घावलाय?” गप्पकन् यल्लाप्पानं विचारलं.
“व्हय… गावाबाहेरच्या वडाखालच्या विहिरीत सायना संगीत देव घावला. देव्हार्यात जपून ठेवल्यागत होता. तुमच्या देवासारखाच? एक महिना झालं. वांगीत उरसाचा दणका उठलाय!”
हे खरं होतं. पाण्याचा दुष्काळ पडू लागला म्हणून अण्णा भगतानं ती विहीर खणली. त्यातच हा देव घावला. त्या देवाची गावभर वाजतगाजत मिरवणूक काढली. भगतानं देऊळ बांधलं आणि आपणच देवाचा भक्त होऊन बसला. घावलेला देव बघायला माणसांचा पूर वाहू लागला. पूजा व्हायला लागली. कैक आंधळ्यांना डोळे आले. वांझ बायकांना म्हणे त्या देवाच्या कृपेनं दिवस गेले. अनेक जणांना अनेक प्रकारे गुण आला. चहुकडं हाच बोलबाला!
कुसा आणि यल्लाप्पा हे सगळं मिस्किलपणे हसत, ऐकत होते!
दुसर्या दिवशी सकाळी उठून कुसा आणि यल्लाप्पा वांगीला गेले. नवीन बांधलेल्या देवळात खूप लोक जमले होते. आतल्या अंगाला एक कट्यावर जग मांडला होता. त्यातले सगळे देव चकचकीत होते. सभोवतालची मोरपीसं हळूवार वार्यानं उडत होती. जगाभोवती भंडार्याची उधळण झाली होती. समोर अण्णा भगत उघडबंब शरीर घेऊन बसला होता.
कुसा आणि यल्लाप्पा देवाजवळ पोहोचले.
“काय काम आहे तुमचं?” अण्णा भगतानं गुरगुरत्या आवाजात विचारलं.
देवाच्या नावावर मिळकत व्हायला लागल्यापासून अण्णा फार कमी आणि मोजकं बोलत होते.
“हा देव घावला तुम्हाला?” कुसानं विचारलं.
“पहिला सव्वा रूपया मांडा नि मग विचारा काय विचारायचं ते” अण्णा भगत म्हणाला.
“कुठं? त्या वडाखालच्या विहिरीतच घावला नव्हं ह्यो देव?”
“हो, हो. देव मला घावलाय, मला पावलाय! काय म्हणणं हाय तुमचं?” अण्णा भगत पुन: गुरगुरला.
“मालक, पाच-सहा सालांपूर्वी आम्हीच ह्या देवाला फेकला हाता!” यल्लाप्पा म्हणाला.
“तोंड आवरून बोला!” अण्णा नाकपुड्या फेंदारून म्हणाला, “जाळून राख करीन!”
“ते आम्हाला भ्या घालू नका. खोटं वाटत असेल तर त्या देवाच्या मागच्या बाजूला आमचं नाव हाय काय न्हाय बघा!” कुसा हसत म्हणाली.
अण्णा भगतानं उठून मोठा देव उचलला. त्याला उलटा केला. खरंच त्यावर बारीक अक्षरात नाव कोरलं होतं ‘कुसाबाई यल्लाप्पा तुपे!’
अण्णा भगताचं धाबंच दणाणलं. आता हे लोक बाहेर बोभाटा करणार. आपलं पितळ उघडं पडणार, याची त्याला धास्ती वाटू लागली.
तो एकदम नरम येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या देवाचं जुनं भगत! मी तुम्हाला शेदीडशे रूपय देतो, पण हे चार लोकांत सांगू नका.”
आणि त्यानं आपल्या आसनाखालून दहा दहाच्या नोटा काढल्या.
“ते र्हाऊ द्या तुमच्याकडंच अण्णासाब!” कुसा यल्लाप्पाकडं वळून म्हणाली, “आता चला हो!”
देवळाबाहेर पडणार्या कुसा आणि यल्लाप्पामागं पैसे घेऊन “ह्यातलं पाच पंचवीस तरी घ्या” असं म्हणत अण्णा भगत गयावया करीत होता.
– वामन होवाळ