Categories
भांडाफोड

देवभाने येथे भोंदूगिरी करणार्‍या शास्त्रीबाबाने लिहून दिला माफीनामा

ऑगस्ट - २०११

धुळ्यापासून उत्तरेला सात/आठ कि.मी.अंतरावर असणार्‍या देवभाने या गावात डी.बी.शास्त्री (दिवान बारकू जोशी, रा.कुंभारी बु॥, ता.जामनेर, जि.जळगाव) या भोंदू बाबाने आपली भोंदूगिरी सुरू करून विविध वर्तमानपत्रातून व पत्रकांच्या माध्यमातून आपली जाहिरात परिसरात सुरू केली होती. जीवनातील कोणत्याही समस्यांचे निराकरणाच्या दाव्यापासून, राशी नक्षत्र, साडेसाती, शनीपिडा, वास्तुदोष, पितृदोष, कालसर्पदोष, नोकरी व्यापारामधील अडचणी आदींवर उपाय करण्याचाही दावा तो करीत होता. अनेक विधी करणे, तसेच त्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करत असे. 31 मार्च 2011 पासून देवभाने, ता.धुळे या ग्रामीण भागात हिरामण प्रधान यांच्या घरात त्याने आपले बस्तान मांडले होते. जोशी उर्फ शास्त्री बाबाने आपण स्वत: शिर्डी येथील असल्याची बतावणी गावकर्‍यांशी करून घरमालक व गावकर्‍यांमध्ये आपल्या भोंदूगिरीबद्दल खोटी प्रसिद्धी मिळविली होती. सुरवातीला 10 दिवस राहणार्‍या या शास्त्री बाबाने पुन्हा 11 एप्रिल रोजी वर्तमान पत्रातून हॅन्डबीले वाटून खास लोकांच्या आग्रहास्तव आपल्या मुक्कामाची तारीख वाढवून 22 एप्रिल केली होती.

            जोशीबाबाची वर्तमानपत्रातील जाहिरात व पत्रक धुळे  येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पाहिल्यावर समितीचे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्याशी चर्चा केली. समितीचे धुळे येथील बुवाबाजी संघर्ष प्रमुख शंकर पंढरीनाथ सगरे यांनी सापळा रचून सदर बाबास अटक करण्यासाठी उत्साह दर्शविला. त्यानुसार अविनाश पाटील यांनी माहिती दिल्यानुसार धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक शशिकांत शिंदे यांचे नावे निवेदन तयार करून दिले. समितीचे कार्यकर्ते शंकर सगरे, अमरदीप पवार, ए.ओ.पाटील प्रत्यक्ष पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर त्यांनी सहकार्य दाखवून देवभाने गाव ज्या सोनगीर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते तेथे जाण्यास सांगितले.

            दि.11 एप्रिल रोजी शंकर सगरे बाबाकडे जाऊन आपले कथीत गार्‍हाणे मांडू लागले. बाबा मला विवाह करून सुमारे 14 वर्षं झाली मात्र काही मुलबाळ होत नाही, मोठा भाऊ मृत झाला आहे. लहान भाऊ दारूड्या आहे. आई-वडील आम्ही सारे या चिंतेत असतो. तरी मला मुलबाळ होण्यासाठी काही उपाय करा अशी विनंती केली असता शास्त्रीबाबाने आपल्या पुस्तकात काही खोट्या आकड्यांची जुळवाजुळव करून ही समस्या माझ्यासाठी फार सोपी आहे. तुमच्या पत्नीला एका वांझोट्या(मुलबाळ नसलेल्या) स्त्रीने झपाटले आहे. त्या स्त्रीचे नावही मी तुम्हाला सांगेन असे सांगून या कामासाठी सपत्नीक माझ्या दरबारात यावे लागेल असे शंकर सगरे यांना सांगितले. तसेच काही विधी करावा लागेल त्यासाठी 3200 रूपये खर्च येईल, तसेच पाच नारळ, पाच खारीक, खोबरे, हळदी कुंकू, दरवाज्याच्या खालील काळी माती आणि दक्षिणा आदी गोष्टी लागतील त्या घेऊन तुम्ही माझ्याकडे या असे सांगितले. तुमचाच मृत मोठा भाऊ तुमच्या पोटी जन्म घेईल असा पुनर्जन्माचा दावाही केला. ठरल्याप्रमाणे शंकर सगरे यांनी या सार्‍या गोष्टी जमा केल्या व दि.15 एप्रिल रोजी समितीचे कार्यकर्ते अमरदीप पवार, प्रा.दीपक बावीस्कर यांचेसह सोनगीर पोलीस स्टेशन गाठले त्यानंतर तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना संपूर्ण कहाणी ऐकविली व आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोंदूबाबा कशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवित आहे व भोळ्या भाबड्या लोकांची आर्थिक, मानसिक पिळवणूक करीत आहे याची कल्पना दिली. अंनिस कार्यकर्त्यांनी कथन केलेली माहिती ऐकल्यानंतर संध्याकाळी पोलीस सहकार्याच्या मदतीने अंनिस कार्यकर्ते देवभाने गावात गेले असता तेथून डी.बी.शास्त्रीसह त्याची दोन मुले दादाराव दिवान जोशी, भगवान दिवान जोशी व राजराव विनायक जोशी ह्या चौघांना सोनगीर पोलीस स्टेशनला आणले.

            31 मार्चपासून भोंदूगिरी करणार्‍या बाबास सोनगीर पोलीस स्टेशनला आणले असता त्याच्या तीनही सहकार्‍यांनी अंनिस कार्यकर्त्यांकडे क्षमा याचना मागण्यास सुरवात केली. डी.बी.शास्त्री यांचा मोठा मुलगा दादाराव जोशी अंनिस कार्यकर्त्यास सांगत होता की, आमच्यासाठी ही घटना महत्वाची आहे यातून आम्ही जीवनाचा चांगला धडा घेऊ कारण आम्ही लोकांना फसवितो त्यावेळेस आम्हाला आनंद होतो मात्र आज आम्ही फसल्यावर खरी जाणीव होते आहे पण आम्ही आता शिक्षण घेऊ, माझा भाऊ शिक्षण करतो आहे आज आम्ही बाबाला घेण्यासाठी आलो होतो. तरी आम्हाला माफ करा आम्ही गावाकडे जाऊन शेतीवरून काहीही मेहनतीचे काम करू पण अशी भोंदूगिरी पुन्हा करणार नाही. अशी माफी मागितली. तसेच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनीही भोंदूबाबास अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. तुला किती मुले आहेत? ती कशी झाली? बाबाने देवाच्या कृपेने झाली असे उत्तर दिल्यावर पो.नि.देसले यांनी लगेच सांगितले तू काय यात्रेला, हिमालयात गेला होता का? त्यामुळे भोंदूबाबा व त्याची मुले, भाचा शरमेने मान खाली घालून उभे होते. आणि माफी मागत होते. या भोंदूबाबाकडून पोलिसांनी अंनिस कार्यकर्त्यांच्या मदतीने माफीनामा लिहून घेतला पुन्हा कधी अशी भोंदूगिरी करणार नसल्याचे त्याच्याकडून वदवून घेतले. अंनिस कार्यकर्त्यांना स.पो.नि.देसले यांनी ग्वाही दिली की, हा भोंदूबाबा आता धुळे जिल्ह्यात कधी येणार नाही.

            सहाय्यक पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक बागुल, यांनी सदर कार्यवाही केली. भोंदू बाबाकडून पोलिसांनी पुन्हा असे काम करणार नाही, लोकांना फसविणार नाही असा माफीनामा लिहून घेतला. सदर कार्यवाहीसाठी समितीचे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्यवाह प्रा.दीपक बाविस्कर, ए. ओ. पाटील, कार्यवाह अमरदीप पवार यांचे सहकार्य लाभले.

-प्रा. दीपक बाविस्कर