उच्चभ्रू शोषक व राजसत्ता हे सामाजिक न्यायाच्या बाबतीत बहुधा उदासीन असतात. शोषितांना त्यांच्या शोषणाची जाणीव नसते. यामुळेच स्त्रिया, दलित व वंचित यांच्यावरील अन्याय, अत्याचार व शोषण करणार्या दुष्ट प्रथा चालूच राहतात. प्रबोधनाने व दलितांच्या जागृतीने अशा प्रथा कमी होत असल्या तरी काही ठिकाणी त्या अवशेष रूपाने चालूच राहिलेल्या दिसतात. अशाच एका कुप्रथेचा प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे यांनी घेतलेला हा वेध.
देवदासी ही भोगदासीच असते. भोग देण्यासाठीच तिचा जन्म असतो. देवाच्या नावाने हे करायचे असते. कर्नाटकातील मद्दटनूर व कळकंबा (जि.बेल्लारी) या गावातील ग्रामस्थ आजही या कल्पनेला चिकटून आहेत. गुढी पाडव्यानंतर येणार्या पहिल्या अथवा दुसर्या शनिवारी या देवदासींचा जाहीर भोग घेण्याची प्रथा शंभर वर्षांपूर्वी या गावात होती. काळाच्या ओघात ती कमी झाली आहे. पण ती जागा देवदासींना अर्धनग्न करून संभोग वगळता तिच्याशी सर्व चाळे करण्याच्या प्रथेने घेतली आहे. 1987 पर्यंत ही प्रथा तेथे चालू होती. पण नंतर पोलीस खाते व पुरोगामी संघटनांनी ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला. ‘ओकळी’ हे त्या प्रथेचे नाव.(अजूनही ती काही ठिकाणी चालू आहे.)
‘ओकळी’ रंगपंचमीसारखा सण असतो. सणादिवशी रेड्डी, पाटील, इनामदार व देसाई आदी प्रस्थापित समाजातील तरूण गावातील देवळासमोर असलेला हौद रंगाने भरतात. देवाचे नाव ‘अंजनेया’ उर्फ बिळी कल्लाप्पा(पांढर्या दगडाचा आप्पा म्हणजे पालक किंवा पालनकर्ता) असे आहे. गावातील तरूण देवदासी यावेळी मंदिरासमोर जमतात. रांगेत उभ्या राहतात. त्यांच्या समोर गावातील देसाई, इनामदार, पाटील, रेड्डी यांची तरूण मुले थांबतात. प्रत्येकाच्या हातात, साडी, चोळी, फुलाची माळ असते. या सर्व वस्तू देवदासींना दिल्या जातात. देवदासी नवी साडी, चोळी नेसते. फुलांच्या माळा घालून सजते, नटते.
दुपारचे चार वाजले की ही सर्व मंडळी रंगाच्या हौदाजवळ जमा होतात. हौदात रंगाशिवाय दुसरे काहीच ठेवले जात नाही. खास रंग ठेवण्यासाठीच तो बांधलेला असतो. देवदासी समोर आल्या की, ‘ओकळी’ला सुरवात होते. हौदाजवळ थांबलेले तरूण तांब्याने रंग भरून देवदासींवर शिंपडतात. एक-दोन क्षणांतच देवदासी नग्न झाल्यासारखी वाटते. कारण त्यांना दिलेली साडी इतकी पातळ आणि पारदर्शी असते की, अंगावर साडी असूनही नसल्यासारखी असते. देवदासी रंगाने भिजल्या की, त्यांच्या अंगावर साडी आहे असे म्हणण्याचे कोणाचेच धाडस होत नाही. देवदासींच्या पाठी लागून तरूण त्यांच्या अंगावर रंग फेकतात, त्यांना मिठीत घेतात, कुरवाळतात. फक्त संभोग वगळता पाहिजे ते चाळे करण्यास त्या दिवशी धर्माने मुभा दिलेली असते. रात्री आठपर्यंत हा खेळ चालतो. तो पाहण्यासाठी गावातील सर्व स्त्री-पुरूष, आबाल-वृद्ध जमा झालेले असतात. सवर्ण मंडळी आपल्या मुलाचा पराक्रम, तर दलित आपल्या मुलींची विटंबना उघड्या डोळ्यांनी बघतात. कोणालाच काही वाटत नाही. कारण प्रत्येकाच्या डोळ्यांवर असते धर्माची पट्टी! ती हटविण्यास कोणीच तयार होत नाही.
या प्रथेचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळासाठी फक्त दलित देवदासी आणि सवर्ण मुलेच असतात. दलितांच्या तरूणांना आणि सवर्णांच्या महिलांना त्यात स्थान नाही. त्यांनी फक्त प्रेक्षकाची भूमिकाच घ्यावी, असा परंपरांचा दंडक आहे. खेळ संपला की, देवदासींना नारळ, फुले आणि पाच-पंचवीस रूपये दिले जातात. नवे कपडे मिळाले, पैसेही मिळाले या आनंदात त्या निघून जातात.
अशा प्रकारचा खेळ बघून हनुमान प्रसन्न होतो, त्यामुळे गावात दुष्काळ पडत नाही, गावावर संकट येत नाही, अशी भाविकांची धारणा आहे.
दोन वर्षांपूर्वीही ‘ओकळी’साठी दोन्हीही गावात जोरात तयारी चालू होती. पण बेल्लारीचे पोलीस अधीक्षक सुभाष भरणी यांचे लक्ष या प्रथेकडे गेले. त्यांनी विशेष जिल्हा दंडाधिकारी नायक, समाजकल्याण विभागातील अधिकारी, पुरोगामी महिला संघटना, दलित संघर्ष समिती यांचा पाठींबा घेऊन ‘ओकळी’विरूद्ध मोहीम उघडली. प्रचारसभा घेतल्या. भित्तीपत्रके लावली. कायद्याचा धाक दाखविला. पण लोक परंपरेपासून हटायला तयार नव्हते. सवर्ण आणि देवदासी या दोघांकडूनही प्रचारमोहिमेला विरोध होऊ लागला. श्री.भरणी यांच्या दारात देवदासी रडत बसू लागल्या. त्या म्हणायच्या, ‘ही प्रथा बंद झाली की, देवाचा कोप होईल. गावात दुष्काळ पडेल. आम्हाला साडी-चोळी कोण देणार? तुम्ही प्रथा बंद करू नका.’
सवर्ण मंडळी या भागातील खासदार बसवराजेश्वरी यांच्याकडे गेली. पोलीस अधिकार्यांच्या कारवायांबद्दल खासदारांनी त्यांना बदलीची धमकी दिली. चंद्रगुत्तीत नग्नसेवेला विरोध करणार्यांची काय अवस्था झाली याची आठवण करून दिली. पण श्री.भरणी आपल्या निर्णयापासून ढळले नाहीत. ते म्हणाले, ‘मला हे प्रकरण घेऊन नेता व्हायचे नाही. जे काही घडते ते बेकायदेशीर आहे. मी फक्त कायद्याची अंमलबजावणी करतोय.’
या वादातच मुद्दटनूर मधील ‘ओकळी’चा दिवस जवळ आला. आदल्या दिवशी राज्य राखीव दल, तसेच पोलीस व गृहरक्षक दलाचे पाचशे जवान गावात दाखल झाले. गस्त सुरू झाली. ‘ओकळीमध्ये भाग घेणार्याला आम्ही अटक करू. त्यांना गुन्हेगार ठरवू’ असा इशारा ग्रामस्थांना देण्यात येत होता. या शिवाय सभाही होत होत्या. परिणाम असा झाला की, शेकडो वर्षे चालत आलेली ‘ओळकी’ची परंपरा बंद पडली. या गावच्या वातावरणाचा धडा घेऊन कळकंबा गावच्या ग्रामस्थांनीसुद्धा हा खेळ चालविला नाही. मुद्दटनूर हे सहा हजार तर कळकंबा हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. बेल्लारीपासून दोन्ही गावे पंधरा-वीस किलोमीटरवर आहेत.
सुधारणावादी चळवळीला चंद्रगुत्तीतही यश आले होते. ओळकीच्या बाबतीतही चळवळ यशस्वी झाली. याबाबत बोलताना श्री.भरणी म्हणाले, ‘एका समाजातील देवदासींनी अर्धनग्न होऊन धावत सुटावे, सवर्ण तरूणांनी दारूच्या नशेत यांच्याशी झोंबाझोंबी करावी हा कुठला न्याय? ह्या खेळामुळे गावात जर संपन्नता येत असेल तर सर्वच जाती-जमातीचे स्त्री-पुरूष असा खेळ का खेळत नाहीत? याचा अर्थ काही स्वार्थी लोकांनी ही प्रथा सुरू केली आहे.’
भरणी यांच्यासारख्या अधिकार्याचे या प्रथेकडे लक्ष गेले. त्यांनी गावातील लोकांचा, देवदासींचा आणि पुढार्यांचा रोष पत्करून ही प्रथा बंद पाडली. निदान बेल्लारी जिल्ह्यापुरते तरी त्यांच्या प्रयत्नाला यश आले. या त्यांच्या कार्याची दखल पुरोगामी मंडळींनी घेतली. पण शासनाने मात्र श्री.भरणी यांच्या या कार्याचे कौतुक करण्याऐवजी, त्यांना बक्षिस देण्याऐवजी, त्यांची बदली रेल्वे खात्यात केली. यावरून शासन कोणाच्या बाजूने उभे राहते, कोणाला पाठींबा देते हे सहज लक्षात येईल.
ओकळीसारखी प्रथा का जन्माला येते? ती का टिकते? कोणाकडून टिकविली जाते? ती टिकवणार्यांचे हितसंबंध कशात गुंतले आहेत? आपला जाहीररित्या भोग घेतला जातो, आपली विटंबना केली जाते असे देवदासींना का वाटत नाही? राजकीय पुढारी या प्रथेला पाठींबा का देतात? असे अनेक प्रश्न या प्रथेने निर्माण केले आहेत.
देवदासीचा जन्मच मुळात आपल्या शरीराचा भोग दुसर्याला देण्यासाठी आहे असे तिच्या मनावर अनेक वर्षे, धार्मिक आधार घेऊन, बिंबवण्यात आले आहे. पूर्वी देवदासीचा भोग देवळातले पुजारी उघडपणे घेत असत. देवदासीचे लग्न देवाबरोबर झालेले असते. पुजारी हा देव आणि भक्त यामधील दलाल असतो. एखाद्या भक्ताचे गार्हाणे जसे पुजार्यामार्फत देवाकडे जाते तसे देवदासीने आपले शरीर पुजार्याला अर्पण करणे म्हणजे ते साक्षात देवाला अर्पण केल्यासारखे आहे. म्हणून देवदासी ही खर्या अर्थाने देवाची दासी न राहता अनेक वर्षे पुजार्याचीच दासी राहिली. पुजारी तिचा भोग घेत राहिला. पण आंध्रप्रदेशात देवदासींबाबत पूर्वी एक वाद निर्माण झाला. देवदासींवर अधिकार कोणाचा याबाबतचा तो वाद होता. राजा म्हणाला की, हे मंदिर(आंध्रमधील) मी बांधले आहे. मंदिरासाठी जमीन मी दिली. पुजार्याला, मंदिरात काम करणार्या इतर लोकांनाही आम्हीच जमिनी दिल्या. एका अर्थाने हे मंदिर, त्यातील मालमत्ता माझीच आहे. त्या गोष्टींवर माझाच अधिकार आहे. देवदासीला मंदिरातील देवाला वाहिले जात असेल तरी तिला जमीन-जुमला मीच देतो. मीच तिला जगवतो. माझाच तिच्यावर अधिकार आहे. म्हणून देवदासीचा भोग घेण्याचा अधिकारसुद्धा पुजार्याचा नसून माझाच आहे.’ याउलट, ‘राजासुद्धा धर्माचा सेवक आहे. धर्म सांगेल तसे त्याने वागावे. देवदासी ही देवाशी आणि धर्माची निगडित असल्याने तिच्यावर देवाचा म्हणजे त्याच्या दूताचा म्हणजे पुजार्याचाच अधिकार आहे’ असे पुजार्यामार्फत सांगितले जाऊ लागले. यावरून देवाच्या दासीकडे कोणत्या नजरेने पाहिले जात होते हेही ध्यानात येईल. पुढे राजेशाही संपली. यांच्याकडून मंदिराला मिळणारी मदतही बंद झाली. देवदासीला मिळणारी मदतही बंद झाली. त्यामुळे पुजार्याबरोबर राहणारी देवदासी मंदिराबाहेर आली. तिने धनिकांशी आपल्या उपजीविकेसाठी संधान बांधले. त्यांच्याशी ती शय्यासोबत करू लागली. त्यांच्याकडे होणार्या धार्मिक कार्यात भाग घेऊ लागली. पुढे काही इनामदार, जहागिरदार, धनिक मंडळी ही आपल्याला एखाद्या सुंदर तरूणीचा भोग घेता यावा यासाठी दलितांमधील अशी तरूणी देवाला सोडण्यासाठी तिच्या आईवडिलांना प्रवृत्त करू लागले. त्याबद्दल त्यांना मोबदला देऊ लागले. वयात आलेल्या देवदासीला वाड्यावर नेऊन तिचा भोग घेऊ लागले. इनामदार आणि धनिकांनीच देवदासीचा भोग घ्यावा ही गोष्ट रूढ होत गेली.
बदलत्या काळामुळे उघडपणे असा भोग घेणे कमीपणाचे मानले जाऊ लागले. म्हणून मग या भोग घेण्याच्या प्रवृत्तीला धार्मिक आधार देण्यात आला. धनिकांची तरूण मुले व दलितांच्या तरूण देवदासी यांनी मारूतीच्या मंदिरासमोर प्रणयक्रीडा केल्यास मारूती प्रसन्न होतो, गावावर संकट येत नाही, असे सांगितले जाऊ लागले. त्यातूनच ‘ओकळी’चा जन्म झाला. देवदासीची जाहीर विटंबना होऊ लागली. ओकळीच्या दिवशी सवर्ण तरूणांना श्रीकृष्णाचा अवतार प्राप्त होतो, दर दलित देवदासींना गोपिकांचा अवतार प्राप्त होतो, असेही सांगितले जाते. पण जो मारूती उर्फ हनुमान हा ब्रह्मचारी असल्याचा दावा काही जणांकडून गेला जातो, त्या बिचार्या ब्रह्मचार्याला आपल्यासमोर चाललेली प्रणयक्रीडा कशी सहन होते, असा प्रश्न मात्र कोणी उपस्थित करत नाही. याचा अर्थ असा की, या प्रथेमागे जी काही धार्मिक कारणे आहेत असे टाहो फोडून सांगितले जाते ती सर्व कारणे विसंगत, खोटी आणि फसवणारी आहेत हेच सिद्ध होते. श्रीकृष्ण आणि गोपिका यांची क्रीडा पाहून मारूती प्रसन्न होत असेल तर सवर्ण तरूणी गोपिका होण्यास का तयार होत नाहीत? दलित तरूणांना श्रीकृष्ण होण्याची संमती का दिली जात नाही? धर्माच्या नावाखाली दलितांची, त्यांच्या स्त्रियांची पिळवणूक करणे एवढाच मामला त्यामागे असलेला दिसतो. दलित देवदासींनी ‘ओकळी’च्या दिवशी प्रणयक्रीडा करण्यास नकार दिला तर तो देवाचा अपमान होतो, देव कोपतो असे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आहे. म्हणून त्याही प्रश्न न विचारता मुकाटपणे भोगदासी बनल्या. हे त्यामागचे कथित धार्मिक कारण. दुसरे कारण आर्थिक स्थितीशी निगडित आहे. या असंस्कृत खेळात भाग घेतल्यामुळे साडी मिळते, चोळी मिळते, पैसे मिळतात म्हणून देवदासी हा खेळ खेळण्यास तयार होतात. त्यांचे म्हणणे असे की, ‘आम्ही एरव्हीसुद्धा रस्त्यावर राहून स्वत:चा लिलावच करत असतो. ओकळीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांसमोर आमचा लिलाव होतो. पण मुळात तो लिलावच असतो.’ यावरून ओकळी प्रथा जशी कथित धार्मिक गोष्टीशी निगडित आहे तसा तिचा संबंध गरिबीशी सुद्धा आहे, तिच्या जातीशी आहे. समाजचौकटीत तिची जात खालची आहे. वरच्या जातीने खालच्या जातीतील लोकांचा पैशाच्या जोरावर, धर्माच्या नावावर, प्रथा परंपरांच्या नावावर छळ करावा, पिळवणूक करावी हाच येथील न्याय(!) आहे.
–उत्तम कांबळे
‘अनिष्ट प्रथा’ पुस्तकावरून साभार