Categories
प्रेरणा

दिशाहीन वास्तुशांतीला फाटा देऊन दिशादर्शक गृहप्रवेश

जून – २०११

अनिष्ट रूढी परंपरेत जखडलेला विज्ञान युगातील माणूस आजही वास्तुशांतीसारख्या कर्मकांडात अडकलेला असताना या दिशाहीन रूढींना फाटा देऊन सर्व समाजाला दिशादर्शक असा गृहप्रवेशाचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले यांनी यशस्वी करून दाखविला आहे. निमंत्रण पत्रिकेवर पुरोगामी विचाराचे संत इतिहासातील थोर व्यक्तींचे छायाचित्रे छापून शेवटच्या पानावर त्यांचे विचार छापले आहेत. सकाळी राहुरी येथील रोटरी ब्लड बँकेत रक्तदान शिबीर संपन्न झाले. आदर्श माता भागुबाई येवले यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त गणवेश वाटप करण्यात आले. प्रा.डॉ.भागचंद खुरूद व प्रा.भाऊसाहेब जरांगे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ झाला.

            महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांतून आलेल्या पोस्टरचे प्रदर्शनही भरविण्यात आलेले होते. त्यामध्ये व्यसनमुक्ती, पर्यावरण, स्वच्छ व सुंदर गाव, लोकसंख्या या विषयावरील पोस्टर प्रदर्शन व अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती यावरील प्रात्यक्षिके पाहून आलेली सर्व पाहुणे मंडळी खुष झाली. अनेकांनी नोंद वहीत आपला अभिप्राय व्यक्त केला. चर्चेचा विषय ठरलेला जगातील पहिला व्यसनमुक्तीचा ध्वजही घरावर यानिमित्ताने अंनिसचे जिल्हाध्यक्ष अरूण पा.कडू यांच्या उपस्थितीत घरावर फडकला. घर बांधणार्‍या कामगारांचे कौतुक क्वचितच होते; परंतु येवले यांनी इंजिनियरसह कामगार व कारागीर यांचा ‘संत गाथा व्यसनमुक्तीची’ हा ग्रंथ, गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. कारभारी फाटक व नुराभाई पठाण यांनी जिजाऊ पुजनाचे आयोजन केले होते. या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले. नेहमीप्रमाणे गृहप्रवेशाचे औचित्य साधून काहीजण भेटवस्तू घेऊन आले. मात्र त्या स्विकारल्या नाहीत त्याऐवजी व्यसनमुक्त चळवळीसाठी रोख रक्कम पावती देऊन स्वीकारण्यात आली. प्रत्येक पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

            रात्री 10 वाजता समाजप्रबोधनपर अंधश्रद्धा निर्मूलनाचे जागर सुरू झाले. त्यामध्ये डॉ.वाघ व नृत्यविशारद अहमदनगरचे अनंद द्रविड, श्रीकांत ससाणे व त्यांचे सहकारी यांचा भरगच्च कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आठ वर्षांची मुलगी प्रेरणामुळे अंनिसची कार्यकर्ती(करंजी) सुष्मिता घोरपडे नृत्यगायन व अंगात येण्याची प्रात्यक्षिके करून प्रेक्षकांची मने जिंकली.

डॉ.मच्छिंद्र वाघ, नेवासा, जि.नगर