मार्च 2013. क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांचा प्रथम स्मृतीदिन. आण्णांचे एक सहकारी, समतेच्या लढ्यातील एक शिलेदार आणि कष्टकर्यांचे कैवारी डॉ.बाबा आढाव आण्ण्यांच्या स्मृतीदिनानिमित्त सकाळी नऊ वाजण्यापूर्वीच वाळव्यात दाखल झाले. आण्णांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांनी तडक सांगली गाठली. बाबा येणार म्हटल्यावर सांगलीतल्या परिवर्तनवादी केंद्रात म्हणजे कष्टकर्यांच्या दौलतमध्ये साथी विकास मगदूम, नाना हरूगडे, बजरंग खुटाळे, संभाजी सलगर ही मंडळी जमलेली होतीच. बाबा आल्याबरोबर आण्णांनी ज्या दुष्काळी जनतेसाठी हयातभर संघर्ष केला त्या दुष्काळग्रस्तांशी संवाद साधायचा निर्णय झाला. शेतकरी शेतमजुरांचे नेते साथी सत्यवान कुंभारकर यांना बरोबर घेऊन आम्ही सर्वजण महांकाली साखर कारखान्यावर गेलो. कारखान्याचे चेअरमन मा.विजयआण्णा सगरे यांचेकडून तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची, चारा छावण्यांची, पाणी पुरवठा करणार्या टँकरची माहिती घेतली. महांकाली साखर कारखान्याचे संचालक जीवनराव भोसले आणि त्यांचे सहकारी यांनी चालविलेली रांजणी येथील चारा छावणी पहावी. दुष्काळग्रस्तांशी संवाद साधावा असे ठरले. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण रांजणीच्या चारा छावणीकडे गेलो.
वैराण माळावर आणि रखरखत्या उन्हात कुठं पोत्यांचा तर कुठं वाळल्या पाल्याचा सावलीसाठी आसरा उभा करून जनावरं व माणसं त्याच्या दडक्या सावलीत कसंबसं अंगाचं मेटकुळं करून बसली होती. छावणीच्या मधोमध दहा बाय वीस फुटाचं एक उसाच्या पाल्याचं तात्पुरतं छप्पर उभं केलं होतं. ते छप्परच त्या चारा छावणीचं कार्यालय होतं. एका रजिस्टरमध्ये जनावरांची संख्या, त्यांची वर्गवारी, लाभार्थी, आलेल्या व वाटलेल्या चार्याची नोंद केलेली होती.
रांजणीच्या छावणीतल्या स्त्री-पुरूषांना बाबांनी स्वत:च्या स्टाईलनं बोलतं केलं. सुरवातीला बोलायला दबकणार्या महिला कालांतरानं धडाधडा बोलू लागल्या. सकाळी स्वयंपाक करून गडी माणसांचं जेवण घेऊन त्या छावणीत यायच्या. दिवसभर आपल्या जनावरांची उसाबर करायच्या आणि संध्याकाळी घरी जायच्या. छावणीवर बायकोनं आणलेलं जेवण घेऊन गडी माणसं जवळच्याच रोजगार हमीच्या कामावर जायची. दिवसभराचं काम संपवून ती संध्याकाळी जेवून छावणीत यायची. अशा रीतीने दिवसभर बायामाणसं आणि रात्री मुक्कामाला गडी माणसं छावणीवर असायची. अशी परिस्थिती त्यांच्या बोलण्यातून आली. एक लाख रूपये किंमत असलेली एक खिलार खोंडांची जोडीही रांजणीच्या छावणीत बघायला मिळाली.
रांजणीची छावणी बघून आल्यावर कवठेमहांकाळ येथे मा.विजय आण्णा सगरे यांच्या घरी दुपारचे जेवण करून आम्ही आटपाडी तालुका गाठला. आटपाडी थेट माणदेशात. कवठेमहांकाळपेक्षाही भयाण दुष्काळी परिस्थिती. सलग तीन वर्षेपावसानं त्यांना हुलकावणी दिलेली. गावात माणसंच नाहीत. तरणी ताठी बाया आणि बापय माणसं सगळी एकतर चारा छावणीवर नाहीतर पाण्याच्या टँकरची वाट पहात ताटकळत बसलेली. सरकारनं बरीच रोजगार हमीची कामं काढलीत, पण जनावरं आणि पाण्याचा टँकर सोडून रोजगार हमीवर जाणार कसं हाच त्यांच्या समोरचा मुख्य प्रश्न. आटपाडी तालुक्यात बर्याच चारा छावण्या. त्यापैकी जवळच मापटे मळ्यात एक चारा छावणी असलेचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणं त्या चारा छावणीत गेलो. भोंड्या माळावर कशीबशी सावली करून जत्रेत बांधल्याप्रमाणं लहान मोठी जनावरं बांधली होती. सगळ्या छावणीभर उसाचा वाळला पाला अस्ताव्यस्त पडलेला दिसत होता. अंगावरची रया गेलेली जनावरं आणि तोंडावरची रया गेलेली, रापलेली, करपलेली माणसं बघून आपण स्वतंत्र भारतातच राहतो काय अशी शंका यायला लागली. आपल्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा अभिमान वाटण्याऐवजी त्याची लाज वाटू लागली. अभिमानानं छाती फुगण्याऐवजी चिंतेनं ती फाटून जायची वेळ आली. बाबांनी त्यांच्या पद्धतीनं माणसांना बोलतं केलं. बाया माणसांना विचारलं की, तुम्ही दिवसभर छावणीत असता तर तुमच्या घरच्या म्हातार्या माणसांचं आणि लहान मुलांचं काय. त्यावर एक वैतागलेली बाई ताडकन म्हणाली, हे बघा दिवसभर मी छावणीत असते आणि नवरा रोजगार हमीवर असतो. म्हातारे सासू सासरे आणि लहान मुलं सकाळी घरात टाकून येतो आणि संध्याकाळी जाऊन मरल्यात की जित्ती हाईत हे बघतो. त्या महिलेचे उद्गार ऐकून सगळी अवाक् झाली.
त्या ठिकाणी काही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही होते. बाबांनी त्यांना बोलते केले. माध्यमिक शाळेतली पोरं म्हणाली की, त्यांची परिक्षा सुरू आहे. सकाळी पेपर देऊन आम्ही दुपारी छावणीत येतो. तर महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणाले की, परिक्षा येत्या आठ तारखेपासून सुरू होणार आहेत. परिक्षेपेक्षा आम्हाला जनावरांना चारा, टँकरनं येणारं पाणी, रोजगार हमीची कामं याचीच चिंता आहे. या चारा छावणीवरच्या कष्टकर्यांच्या पोरांचं पेपर तपासणार नाही म्हणून संपावर जाणार्या गलेलठ्ठ पगाराच्या प्राध्यापकांची सर्वांनाच मनस्वी चीड आली. आपण कुणाचं नुकसान करतोय याचं भान प्राध्यापकांना का येत नाही याची खंत वाटली. त्याच छावणीमध्ये आणखी एक महिला म्हणाली की, आमची एकूण तीन जनावरं होती. एक मागच्या महिन्यात विकलं. आता दोन हाईती. पाऊस पडला नाही तर ही दोनबी विकून कुठं तरी रोजगाराला जाण्याशिवाय आमच्या पुढं दुसरा मार्गच नाही.
एकूण दुष्काळग्रस्तांना स्वत: जगणं, जनावरं जगवणं, चारा छावणीमध्ये राहाणं, पाण्याच्या टँकरची वाट बघणं, रोजगार हमीवर जाणं, घरची म्हातारी कोतारी माणसं आणि लहान मुलं सांभाळणं इतकी कामं एकाच वेळी करावी लागत असल्यामुळं त्यांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळं जनावरं सांभाळणं हे कामच रोजगार हमीचं समजण्यात यावं आणि स्वत:ची जनावरं चारा छावणीमध्ये सांभाळणार्या दुष्काळग्रस्तांना रोजगार हमीचा पगार देणेत यावा अशी मागणी डॉ.बाबा आढाव यांनी केली. तसा सरकारशी पत्रव्यवहार करण्याची हमी त्यांनी दोन्हीही चारा छावण्यांमध्ये दिली. दुष्काळग्रस्तांशी बोलताना एक बाब स्पष्टपणे पुढे आली की, दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो शासन निर्मित आहे. दुष्काळाचे काही लाभार्थी आहेत आणि ते लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी मात्र दुष्काळाचा बराच लाभ उठवला आहे. ताकारी, म्हैशाळ, टेंभू योजना पूर्ण होणे हा दुष्काळावर एकमेव उपाय आहे असं सर्वांच्याच तोंडून येत होतं. आणि ते खरं आहे. सिंचन योजना पूर्ण करणं हाच दुष्काळावरचा उपाय आहे आणि सिंचन योजना रखडवत ठेवून त्याच्या निधीत उभा आडवा हात मारणं हे शासनकर्तेआणि सरकारी अधिकारी यांच्या फायद्याचं असल्यानं योजना पूर्ण होत नाहीत. हे या दुष्काळाचं कारण आहे. आटपाडीला पाणी पुरवठा करणारा तलाव स्वातंत्र्यानंतर लगचेच बांधलेला आहे. गेल्या वर्षअखेरपर्यंत तो कधीच आटला नव्हता. यावर्षी मात्र तो कोरडा झाला. मंत्री, आमदार, विरोधी पक्षवाले, शासकीय अधिकारी यांनी त्याचं पर्यटन स्थळ बनवलंय. जो तो उठतो त्या तलावाला भेट देतो. फोटो काढून घेतो. पण त्यातला गाळ काढावा व पाण्याची साठवण क्षमता कुठे तरी वाढवावी यासाठी आबा सागर आणि संपतराव पवार सोडले तर कोणी काहीच करीत नाही. त्या कोरड्या तलावालाही बाबांनी भेट दिली. त्या तलावाच्या काठावरच पत्रकारांशी ते बोलले. त्यांनी सांगितलं की, “दुष्काळ हटवणे आता सरकारला शक्य नाही. त्यासाठी जनतेचे मदतीचे हात पुढे आले पाहिजेत.” महात्मा फुलेंच्या काळात महाराष्ट्रात 118 तालुके दुष्काळी होते. आज 123 तालुके दुष्काळी आहेत. हीच पुरोगामी महाराष्ट्राची प्रगती आणि हाच आमचा विकास म्हणायचा काय?
-अॅड. के. डी. शिंदे