7 एप्रिल 2011 रोजी मुंबईत आझाद मैदानावर जादूटोणा प्रतिबंधक कायदा मंजूर व्हावा म्हणून धरणे धरण्याचा कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आहे. आपण चिंचवड शाखेमार्फत पाच-सहा जणांनी जायचं आहे असा मिलिंद देशमुखांचा निरोप होता. तुमचे सिंहगडचे तिकीट काढले आहे त्यामुळे मिलिंदला नाही म्हणण्याचा अवधीच मिळाला नाही. आता जायचेच आहे तर आदल्या दिवशी सकाळी डोक्यात कल्पना आली की, ट्रेनमध्ये नुसतेच गप्पा गोष्टी करत जाण्यापेक्षा अंनिसतर्फे काही तरी नवीन करावे. मिलिंदला म्हटलं आपण ट्रेनमध्ये ‘चालता बोलता’ कार्यक्रम घेऊ या. सर्वसामान्य लोकांना अंनिसबद्दल काय वाटतं आणि सेलिब्रिटीज उदा.धोनीने नवस बोलला व मॅच जिंकली म्हणून तिरूपतीला जाऊन केशवपन केले, जपानमधील सुनामी, दैवीकोपामुळे झाली का निसर्गातील घडून येणारे बदल इत्यादी विषय घेऊन प्रश्नमालिका आणि त्याबरोबर तीन संभाव्य पर्याय द्यायचे. मी, मिलिंद, मुरूडकर, अॅड.महाजन दांपत्य त्यांचे घराच्या गच्चीवर आदल्या दिवशी जमलो. स्वप्नीलने रातोरात टाईप करून 200 झेरॉक्स कॉपीज तयार केल्या.
मुंबईला जाताना सिंहगडमध्ये विवेक सांबरे, क्रांती पोतदार व आम्ही सर्वांनी प्रवाशांमध्ये प्रश्नपत्रिका वाटल्या. सकाळची वेळ असल्याने सर्व उत्साहात होते. प्रवाशांनी प्रश्नपत्रिका सोडवून परत दिल्या. प्रवासांत वार्तापत्रासाठी चार वर्गणीदार सुद्धा मिळाले. सकाळचा हा प्रतिसाद बघून, प्रगतीने पुण्याला परत येताना पुन्हा हाच प्रयोग केला पण खूप उत्साही प्रतिसाद मिळाला नाही. उलट काही प्रवाशांनी अंनिस ही फक्त हिंदूच्या देवधर्माविषयीच्या भावनांना छेद देणारी संघटना आहे असे म्हणून दंगा केला. लोणावळ्याला आम्हाला उतरून लोकल पकडायची होती म्हणून आम्ही वाद घालायचे टाळले. प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा घेऊन खाली उतरलो. अंदाजे 180 प्रवाशांनी आमच्या ह्या सर्व्हे मध्ये भाग घेतला. आमची जी 12 प्रश्नांची मालिका होती त्यातील निवडक चार-पाच प्रश्न जे अंनिसच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतात त्याचा खाली उल्लेख करावासा वाटतो.
प्रश्न : अंनिसचा जादूटोणा विरोधी कायदा का होत नाही?
अ) राजकीय इच्छा शक्तीचा अभाव(88 जणांचे उत्तर) ब) हिंदू जनजागरणाचा विरोध (21 जणांचे उत्तर) क) राज्यकर्तेच अंधश्रद्धाळू (50 जणांचे उत्तर)
प्रश्न : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य
अ) समाजात जागरूकता आणणे - 151 जणांचे उत्तर ब) संत महात्म्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचवणे - 10 जणांचे क) लोकांची धर्मविषयक दिशाभूल करणे - 4 जणांचे
प्रश्न : गणपतीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जनासंबंधी औरंगाबाद कोर्टाचे मार्गदर्शन
अ) हिंदू धर्माच्या भावना दुखावतील - 13 जणांचे उत्तर ब) पर्यावरणाची जपणूक करणारे - 150 जणांचे उत्तर क) या बदलाला पाच वर्षांची मुदत द्यावी - 6 जणांचे उत्तर
प्रश्न : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला होणारा विरोध
अ) फक्त हिंदू धर्माबाबतीतच प्रयत्न आहेत - 28 ब) जनतेला अंनिसच्या कार्याची पुरेपूर माहिती नाही - 107 क) भोंदूबाबांचा वाढलेला सुळसुळाट - 37
हे आहेत.
लग्नासाठी पत्रिकेत तथ्य आहे म्हणणारी 30% आहेत.
शेवटचा प्रश्न होता अंनिसच्या कार्यात सहभागी होण्याचा! 15 लोकांनी सक्रिय भाग घेण्याची तयारी दाखवली तर 147 जणांनी अंधश्रद्दांना थारा देणार नाही म्हणून मत नोंदवले. व फक्त 11 जणांनी ह्या कार्याची गरज नाही असे म्हटले. अशा प्रकारचा सर्व्हे सर्वच शाखांनी अधून मधून घेतला तर लोकांना आपल्या कामाची माहिती होईल. सभासद वाढतील, असे खात्रीने वाटते.
आम्ही तयार केलेली प्रश्नमालिका अत्यंत घाईगडबडीत केली होती. मध्यवर्ती कार्यालयातील अनुभवींकडून 2-4 प्रश्नमालिका शाखांना मिळाल्या व मोठ्या प्रमाणावर त्याचे प्रिंटींग झाले तर हा प्रकल्प परवडण्यासारखा व अधिक प्रभावशाली होईल असं वाटतं.
–विश्वास पेंडसे, चिंचवड, पुणे.