चर्चेला कायम तयार असणार्या, अहिंसेचं तत्त्व मनोमन मानणार्या, समाजातील वाईटाचं निर्मूलन होऊन सर्वसामान्यांचं जीवन सुखी व्हावं असं वाटणार्या माणसाची अखेर ही महाराष्ट्रातील सुजाणांना चिंता वाटावी अशीच आहे. त्याचबरोबर, एरवी गुळगुळीत वाटणारा नेमस्त पण चिवट आणि ठाम मध्यमवर्ग प्रत्यक्षात हितसंबंधीयांना ‘थ्रेट’ वाटत असतो. हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन लागलं की आश्वासनांच्या कागदपत्रांचे आणि कायद्याच्या सुधारित मसुद्याचे भारे घेऊन मंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत हेलपाटे घालणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यापुढं विधानभवनाच्या आणि मंत्रालयाच्या वास्तूला दिसणार नाहीत. त्यांचे म्हणणे बुद्धीला तर पटते आहे, मात्र राजकारणाच्या गाळात ते प्रत्यक्षात आणण्याची इच्छा नाही. अशा धर्मसंकटातून जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची किंचित सुटका झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरु नये इतकी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची आणि पर्यायाने डॉ. दाभोलकरांचीही परवड महाराष्ट्राने केली. मंगळवारी थंड डोक्याने कट रचून त्यांची क्रूर हत्या ही एकप्रकारे मनुष्यप्राण्याला माणूसपण देणार्या विवेकाच्या आतल्या आवाजाचीच हत्या म्हणावी लागेल.
1970 चे दशक हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वादळ घेऊन आलं. दलित चळवळीची झंझावाती सुरुवात झाली होती. सत्यशोधक विचारधारा प्रमाण मानत समाजपरिवर्तनाचा आग्रह धरणारे नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरु केलेल्या ‘एक गाव एक पाणवठा’ या मोहिमेने महाराष्ट्रात खोलवर रुजलेल्या जातीयतेचं विद्रुप रुप समोर येत होतं. विकासाच्या गंगेचा थेंबही न पोहोचलेल्या खेड्यापाड्यातील वंचित भूमिहिनांची गार्हाणी मुखर करणारी आंदोलनं रुजू पाहत होती. अशा स्थितीत आपली सुविद्य पत्नी शैला यांच्या हाती हॉस्पिटलचा पसारा सोपवून निश्चयानं ते समाजपरिवर्तनाच्या लढ्यात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून उतरले. ‘एक गाव एक पाठवठा मोहीम’ ही त्यांच्या विचारांच्या, अग्रक्रमांच्या, कार्यपद्धतीच्या दृष्टीने वेगळेपण आणणारी ठरली.
डॉ. आढावांबरोबर म. जोतिराव फुले समता प्रतिष्ठानचं आणि विषमता निर्मूलन समितीचं काम पुढं रेटताना प्रतिष्ठानशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना आपल्या कार्याच्या पुढील दिशा स्पष्ट झाल्या. त्यात डॉक्टरांचा कल अंधश्रद्धा निर्मूलनाकडं झुकला आणि 1983 च्या सुमारास ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च काम महाराष्ट्रात सुरू झालं. पुरोगामी चळवळीच्या शिरस्त्याप्रमाणं समितीचं विभाजन झालं आणि 1989 पासून डॉक्टरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेगळी चूल मांडली. कामाचा जोष आणि झपाटा मात्र कायम राहिला. नरबळी, भानामती, भूतप्रेत, जादूटोणा, याबरोबरीनंच आध्यात्मिक झुलीखाली झुलणारी आणि भक्तांना झुलवणारी बाबा आणि बापूगिरी यांचा पर्दाफाश समिती करत राहिली. या 25 वर्षात डॉक्टरांनी तरूण उत्साही कार्यकर्त्यांची अफाट फौज जमवली. जिल्ह्या जिल्ह्यात हे तरुण-तरुणी श्रद्धा, अंधश्रद्धा, भक्ती, कर्मकांड यांवर आज निर्भिड विचार मांडत आहेत.
हीच धर्मचिकित्सा डॉक्टरांच्या प्राणावर बेतली का? निश्चित सांगणं अवघड आहे. परंतु संशयाच्या सुया तिथंच वळत आहेत. ऑगस्ट 2002 पासून त्यांनी अंधश्रद्धांना आवर घालणारा कायदा व्हावा, या मागणीसाठी रान उठवायचं ठरवलं. कायद्याचं प्रारूप तयार करणं, तांत्रिक गरजांनुसार त्यात बदल करणं, आराखडा बनून विधेयकात त्याचं रुपांतर होईपर्यंत प्रबोधनाचे सर्व मार्ग चोखाळणं, राजकीय पक्षप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचं मन या कायद्यासाठी अनुकूल करणं हे त्यांचं जणू मिशनच बनलं होतं. या कायद्याबद्दल अनेक गैरसमज हेतूत: पसरवले गेले. विशेषत: वारकरी संप्रदायात त्याला मोठा विरोध झाला. त्यांच्याशी आणि ज्यांना ज्यांना शंका आहे त्या सवार्ंशी चर्चा करण्यात डॉक्टर कधी थकले नाहीत आणि हटलेे नाहीत.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. दाभोलकर नामोहरम झाले नव्हते. धर्म, परंपरा, कर्मकांड यांबाबत शांतपणे पण ठामपणे ते वादंगाला कायम तयार असत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सापेक्ष कल्पना आहेत आणि त्यांच्यात फारच अस्पष्ट रेघ आहे. सबब फक्त अंधश्रद्धांचं निर्मूलन हे मृगजळ आहे. असं मानणार्या पुरोगाम्यांमधील जहाल गटांनी त्यांच्या भूमिकांवर बरेचदा टीका केली आहे. त्यांच्या मध्यममार्गाची खिल्लीही उडवली आहे. त्यांचे अनेक जुने सहकारी त्यांना दुरावले. या कशानेही विचलित न होता ते आपलं म्हणणं मांडत राहिले.
मात्र ‘अंनिस’ हीच त्यांची ओळख नव्हती. राष्ट्र सेवा दल असो, महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनासाठी काम करणार्या कार्यकर्त्यांना आर्थिक आधार देणारा सामाजिक कृतज्ञता निधी असो. सातार्यातील रयत शिक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था असोत, परिवर्तन हे व्यसनमुक्ती केंद्र असो की गेली सात वर्षेत्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली ‘साधना’ साप्ताहिकाची धुरा असो, डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव त्यांच्या इतिहासात कुठं ना कुठं सापडत राहीलच. तुकड्या तुकड्यांनी चळवळी उभारत नाहीत, टिकत नाहीत, त्या समग्र प्रश्नाशी जोडून घ्यायला हव्यात, हा त्यांचा आग्रह असे. कायम खादी वापरणार्या डॉक्टरांच्या वैयक्तिक जीवनातही या आग्रहाचे प्रतिबिंब वेगळ्या पद्धतीनं पडलेलं दिसेल… त्यांच्या मुलाचं नाव हमीद आहे. हमीद दलवाईशी असलेला डॉक्टरांचा स्नेह हे त्यांच्यातील बहुमुखी कार्यकर्त्याचेच प्रतिबिंब आहे.
अशा या चर्चेला कायम तयार असणार्या, अहिंसेचं तत्त्व मनोमन मानणार्या, समाजातील वाईटाचं निर्मूलन होऊन सर्वसामान्यांचं जीवन सुखी व्हाव असं वाटणार्या माणसाची अखेर ही महाराष्ट्रातील सुजाणांना चिंता वाटावी अशीच आहे. त्याचबरोबर, एरवी गुळगुळीत वाटणारा नेमस्त पण चिवट आणि ठाम मध्यमवर्ग प्रत्यक्षात हितसंबंधीयांना ‘थ्रेट’ वाटत असतो, हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
–प्रतिमा जोशी