Categories
आंतरजातीय विवाह

एकशे सात आंतरजातीय विवाह लावणारे अंनिस लातूरचे आंतरजातीय विवाह सहाय्य केंद्र

वार्षिकांक – २०१२

          ‘जाती निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहहे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह करु इच्छिणार्‍या तरुण-तरुणींना पाठबळ देवू इच्छिते. महाराष्ट्र अंनिसची लातूर व कोल्हापूर ही दोन केंद्रे हे काम अत्यंत उत्साहाने आणि शिस्तबद्धपणे गेली 10 वर्षे करित आहेत. या दोन केंद्रांनी असे दोनशे विवाह लावलेले आहेत. या दोन केंद्रांच्या कार्याचा वाचकांना परिचय व्हावा यासाठी आम्ही या केंद्रांची माहिती देत आहोत.

            आंतरजातीय विवाह करणार्‍या तरूण-तरूणींना खर्‍या अर्थाने समाजाचा आधार हवा असतो, अशा जोडप्यांना आधार देण्याचं काम समाजहीत डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आहे. कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जन्मजात उच्चनीचता ठरविणारी जात मानणं हीच एका अर्थाने अंधश्रद्धा आहे असे समितीला वाटते. जात मानणं ही बाब अवैज्ञानिक वाटते. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही. जन्मलेल्या बाळाला जात नसते. ते ज्या आई वडिलांच्या पोटी जन्मते त्या माता-पित्याची जात व धर्म त्याला कायमचे चिकटते. आंतरजातीय विवाहोच्छुक अशी जोडपी अगदी जाती अंताच्या लढ्यासाठी म्हणून तरी ते आंतरजातीय विवाह करीत नसले तरी प्रस्थापित जातीव्यवस्थेला छेद देऊन दुसर्‍या जातीतील मुलाशी/मुलीशी विवाह करण्याचे त्यांनी ठरवलं हेच खर्‍या अर्थाने परिवर्तनाच्या दृष्टीने त्यांनी पुढे टाकलेलं एक पाऊल आहे, असे समजून महाराष्ट्र अंनिस अशा आंतरजातीय विवाहोच्छुक तरूण-तरूणीच्या पाठीशी आपल्या चळवळीचे पाठबळ उभे करते. त्यांचा विवाह लावून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करते. महाराष्ट्र अंनिसच हे करते असे नाही. प्राचीन काळात वर्ण आणि जात यांची बंधने लवचिक होती. आई-वडिलांची जात किंवा वर्ण हा मुलाचा असला पाहिजे असा काटेकोर नियम नव्हता. भागवत पुराण, ब्राम्हण पुराणातही आंतरजातीय विवाहाला धर्माची व समाजाची मान्यता होती. इतिहास काळातही राणोजी सिंद्याचा चिमाबाईशी झालेला विवाह, अकबर व जोधाबाईचा विवाह, व्यासानी लिहिलेल्या भगवत गीतेतही चातुवर्ण्याचा पुरस्कार करणारा श्रीकृष्ण हाही  वर्णसंस्कारातूनच यदू म्हणजे ययाती(क्षत्रिय) आणि देवयानी(ब्राम्हण) यांच्यातील आंतरजातीय विवाहातून जन्मलेला पुत्र होय. हिंदू परंपरेतील धर्मशास्त्रकार मनूनेही आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली होती. 12 व्या शतकात दक्षिण भारतात महात्मा बसवेश्वरांनीही जाती व्यवस्था व अनिष्ट रूढी प्रथांच्या विरूद्ध लढा दिला. महात्मा गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी दयानंद सरस्वती, त्यांचा आर्यसमाज, राष्ट्र सेवा दल, सुगावा मिश्रविवाह संस्था, जाती निर्मूलन संस्था, मानवलोक यांनी हे काम अनेक वर्षं चालवलं, त्याला बळ दिले. पण पुढे काही प्रमाणात हे काम थंडावलं होतं. खरे तर हे काम म्हणजे धर्म चिकित्सेचा भाग आहे. त्याला बळ देण्यासाठी कार्य केले जाते. महाराष्ट्र अंनिस हे करतेच आहे. परंतु हे कार्य अधिक गतीने वाढवण्यासाठी महाराष्ट्र पातळीवरील आंतरजातीय विवाह समर्थन व संघटन परिषद, लातूर येथे दि.12 व 13 जानेवारी 2008 रोजी घेतली. डॉ.विजयम गोरा, मधुकररराव चौधरी, सुनिती धुमाळे, सुनंदा माने, पुष्पा भावे, आ.ह.साळुंखे, डॉ.जे.एम.वाघमारे, प्रेमानंद रूपवते, विलास वाघ, अमर हबीब, द्वारकादास लोहिया, डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद घेतली.त्याला प्रतिसादही मिळाला व तेव्हापासून या कार्यास गती मिळाली.  महाराष्ट्राला संत समाजसुधारकांचा फार मोठा वारसा आहे. त्यांचा वारसा कृतिशीलपणे पुढे लोकांच्यापर्यंत पोचवण्याचे कार्य महाराष्ट्र अंनिस या माध्यमातून करीत आहे.

आजपर्यंत लातूर अंनिसने 106 आंतरजातीय सत्यशोधकी विवाह लावले आहेत. त्यात 10 विवाह आंतरधर्मिय आहेत, उर्वरीत विवाहात 1 अंध, 2 अनाथ, 2 परित्यक्ता, 1 विधवा, 2 इतर प्रांतीय, 1 राष्ट्रीय व 34 सजातीय सत्यशोधकीय अशांचाही त्यात समावेश आहे. आणि यातील 97 टक्के विवाहित जोडपे हे कुटुंबीय, समाज यांच्याकडून होणार्‍या सर्व संकटांवर यशस्वीपणे मात करून अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगताहेत. 3 टक्के विवाहात  त्या जोडप्यांचा काही प्रश्न नाही परंतु कट्टरपंथीय, धर्मांध, जात्यांध कुटुंबियांकडून होणार्‍या छळाचे ते शिकार बनले आहेत.

            अंनिसकडे विवाहोच्छुक जोडपे आले की, त्यांचे लग्न लावतोच असे नाही. प्रथमत: आलेल्या जोडप्यातील मुलाशी मुलीशी स्वतंत्रपणे बोलतो. दोघांना एकत्र करून त्यांचेशी बोलतो. त्यांचे वय, शिक्षण, उत्पन्नाचे साधन, सांपत्तिक स्थिती, वैचारिक, मानसिक, परिपक्वता, एकमेकांच्या आवडी-निवडी, ओळख कशी झाली. दोघांनीही घरी विचारले का? कुटुंबियांच्या प्रतिक्रिया काय आहेत? भावी परिणामांची जाणीव करून देऊन दोघांचीही चिकाटी, एकमेकांबद्दलची ओढ, जिव्हाळा या सर्व बाबींचा विचार विनिमय झाल्यानंतर त्यांचे वय, रहिवाशी व ओळखीचा पुरावा याची सत्यता पडताळून त्यांच्या कुटुंबियांना आम्ही बोलावे का? हे सर्व विचारून त्यांच्या दोघांच्या स्वहस्ताक्षरात अर्ज, बायोडाटा, त्यांची मुलाखत लिखित स्वरूपात घेऊन मुलाच्या व मुलीच्या नावे प्रत्येकी 100 रू.चा बाँड पेपर दोघांच्या नावे एक 100 रूपयाचा बाँड एच.आय.व्ही. तपासणीचा अहवाल घेऊन या सर्व बाबींची पूर्तता करूनच कार्यकर्त्यांना एस.एम.एस.द्वारे निरोप देऊन एस.एम.एस.मध्ये विवाहाचे स्थळ, दिनांक व वेळ दिली जाते. कोणाचा विवाह आहे हे कार्यकर्त्यांना विवाहस्थळी आल्यानंतरच समजते, भारतीय संविधान, महापुरूषांच्या प्रतिमा, वर-वधुच्या नावाचे बॅनर, सत्यशोधकी विवाहाबाबतचे बॅनर लावून हॉल सजवला जातो. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या साध्या सोप्या कमीत कमी खर्चाच्या सत्यशोधकी विवाह पद्धतीने जवळपास 20 ते 60 प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हा विवाहविधीचा कार्यक्रम पार पाडला जातो. चळवळीचे व पुरोहिताचे प्रमाणपत्र दिले जाते. विवाहाची तात्पुरती नोंदणी म्हणून नोटरी केली जाते व नंतर तो विवाह, विवाह नोंदणी अधिनियमाप्रमाणे मुलगा किंवा मुलगी ज्या गावचे रहिवाशी आहेत त्यांच्या गावी ग्रामपंचायत वा नगरपरिषदेमध्ये रितसर नोंद केली जाते. या विवाहासाठी लागणारे बाँडपेपर सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स, पुष्पहार, पुष्प, फोटो, नोटरी, कार्यकर्त्यांचा चहा-नाष्टा हा सर्व खर्च एकूण 2000 ते 2500 रूपयात हा विवाह समारंभ पार पडतो. हा खर्च वधु-वर करतात. अंनिस यासाठी करायलाही मोबदला घेत नाही.

            या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे हा विवाह अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी खर्चात होतो. वर्षाच्या 365 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी कोणत्याही सोयीच्या वेळी हा विवाह करता येतो. जन्मपत्रिका, कुंडली, भटजी, मुहूर्त या अवैज्ञानिक कर्मकांडांना येथे थारा नसतो. वधुने केलेला दागिन्यांचा त्याग, वरांने केलेला हुंड्याचा त्याग हा अत्यंत विवेकी विचार असतो. मानपान रूसवे-फुगवे याला या विवाहात स्थान नसते. विवाहात अक्षता म्हणून तांदूळ वापरला जात नाही तर फुले वापरली जातात. याचे कारण एका लग्नात अक्षता म्हणून किमान 15 ते 20 किलो तांदूळ वापरला जातो अन् महाराष्ट्रात दरवर्षी सरासरीने 3 लाख लग्ने होतात म्हणजे किती क्विंटल तांदूळ आपण पायदळीच तुडवतो आणि याच महाराष्ट्रात कुपोषणाचा प्रश्न आहे. उधळपट्टीला इथे स्थानच नाही आणि प्रत्येक लग्नाची कायदेशीर नोंदणी केली जाते त्यामुळे कायदगेशीर वैद्यता प्राप्त होते. विवाह प्रसंगी वधु-वरांना  दिलेली शपथ हे त्यांच्या भावी सुकर जीवनासाठीची एक आचारसंहिताच असते. सप्तपदी व मंगलगीते व्यक्ती स्वातंत्र्याचा एकमेकांच्या आदरातिथ्याचा अंतर्भाव त्यात असतो. त्यामुळे हे विवाह अतिशय सामंजस्याने आनंदी जीवनाचा प्रवास करणारे ठरतात.

            या विवाहासाठी वधू व वर या दोन्ही कुटुंबाकडील ज्यांची संमती त्यांच्या उपस्थितीत हा विवाह लावला जातो. ज्यांच्या दोघांच्याही कुटुंबियांकडून संमती नसते तेव्हा आमच्या कार्यकर्त्यापैकी जे ज्येष्ठ कार्यकर्ते जोडीने आलेली असतात त्यांना वधु पालक व वर पालक ठरवले जाते. अंनिसच्या कार्यकर्त्या सुनिता दिलीप अरळीकर हे विशेषत: वधुचे पालक म्हणून असतात. विवाहानंतर ते जोडपे दोघांपैकी एकाच्या घरची जरी संमती असेल तर ते घरी जातात नाही तर स्वतंत्र खोली करून राहतात. कालांतराने वेळ निघून गेल्यानंतर कुटुंबियांचा विरोध मावळतो. दोघांच्या घरच्याकडून स्वीकारले जाते. कुटुंबियांचे जाणे येणे सुरू होते. काही पालकांची अशा विवाह कार्यक्रमास संमती असते परंतु ते विवाहात उपस्थित राहत नाहीत. कारण मुलाने/मुलीने जातीच्या बाहेर जाऊन लग्न केलेले असते. त्यांच्या इज्जतीचा, प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. हुंडा बहुतांशाचे शल्य असते. जातीतील लोक बहिष्कृत करतील. घरातील इतर मुलांमुलींचे लग्न होणार नाही. नाते संबंध तुटतील या प्रसंगांना सामोरे जावे लागते म्हणून बहुतांश पालक या विवाहाला मूक संमती देऊन विवाहाला उपस्थित राहात नाहीत; असाही अनुभव येतो. तर काहींच्या बाबतीत टोकाची विरोधाची भूमिका घेतली जाते. ही भूमिका त्या मुलां-मुलींच्या व पालकांच्या द़ृष्टीनेही दुष्परिणामकारक ठरते. शंकर शिंदेचेच उदाहरण घ्या. मुलीने तिच्या इच्छेप्रमाणे तिला आवडणार्‍या दुसर्‍या जातीतील मुलाबरोबर लग्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. जात्यांध शंकर शिंदेंनी तिचा झोपेत खून केला. मुलगीही गेली आणि स्वत:ला कारागृहात शिक्षा भोगत बसावं लागलं. कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यापेक्षा अनिच्छेने का होईना मूक संमती दिली असती, तिच्या आनंदात आपला आनंद मानला असता तर मुलगी वाचली असती. तिच्या सुखदु:खाचं गार्‍हाण यांचेकडे आले नसते, विना हुंडा, विना खर्च मुलगी विवाहबद्ध झाली असती. ती तिकडे सुखात राहिली असती आणि हे इकडे सुखात राहिले असते. समाज, नातेवाईक काही दिवस बोलले असते आणि आपापल्या घरी बसले असते. जातीसाठी माती खावी म्हणणारे लोक खरंच शंकर शिंदेंना या खुनाच्या आरोपातून सोडवू शकतील काय? अशा अविवेकी विचारापासून पालकांनी दूर राहिले पाहिजे. पाल्यांशी खुला सुसंवाद ठेवून मुला-मुलीच्या आवडी-निवडी व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करून आपला अहंकार बाजूला सारून कालमानाप्रमाणे संमती द्यावी, वा तटस्थेची भूमिका घेणे सर्वांच्या सोईचे ठरू शकेल.

            अशा प्रेमात पडलेल्या विवाहोच्छुक तरूण तरूणींनीही आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून विवाहाचा विचार करताना  हे तपासून पाहणे गरजेचे आहे. 1) आपण लग्नाचा निर्णय कसा आणि कशाच्या आधारावर घेतलाय? केवळ शारीरिक आकर्षण शारीरिक भूक की काही वेगळं करून दाखवण्याची धमक ठेवून निर्णय घेतलाय? 2)आपण ज्याच्या/जिच्या प्रेमात पडलेले आहोत ते खरेच प्रेम आहे का? 3)दोन्ही कुटुंबांनी स्वीकारलं नाही तर आपण आपल्या स्वत:च्या हिमतीवर कष्टावर आपलं पोट भरू शकू का? 4)कायद्याने मुलींचे वय 18 व मुलांचे वय 21 वर्षांपेक्षा अधिक आहे? 5)एकमेकांवर एवढा दृढ विश्वास आहे का? 6)एकमेकांबद्दलची शैक्षणिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, सांपत्तिक, विवाहित/अविवाहित नोकरीविषयक खात्रीलायक माहिती आहे का? 7)एकमेकांचे विचार मानसिकता समजून घेतली आहे का? 8)प्रेम करणं आणि ते शेवटपर्यंत निभावणं ही फार मोठी जबाबदारीची बाब आहे याचा विचार केला आहे का? 9)कोणत्याही भावनिक प्रलोभनाला बळी न पडता घेतलेल्या निर्णयाप्रती शेवटपर्यंत ठाम राहणार आहेत का? 10)‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ याची आपणास जाणीव आहे का? एवढ्या सर्व बाबींवर गांभिर्याने विचार करून विवाहाचा निर्णय पक्का झाला तर मग कुटुंब, समाज, यांचेकडून प्रखर विरोध झालाच तर त्याला सामोरं जाण्यास आपण तयार आहोत का? एवढा विचार करून अशा तरूण तरूणींनी कुटुंबातील परिस्थितीचा विचार करून कुटुंबियांचे मन जिंकण्याचा वळवण्याचा प्रयत्न करावा. प्रेमात पडून केवळ घरच्यांच्या विरोधाला विरोध म्हणून नाही तर त्यांचा विरोध कशाला आहे हे समजून घ्यावे. एवढे करूनही केवळ जाती धर्मासाठी विरोध असेल तर मग, जन्मतारखेचा पुरावा(10 वी ची टी.सी. वा सनद), रहिवाशी प्रमाणपत्र व शिधापत्रिका, ओळखपत्रासाठी मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, स्वत:चे बँक पासबुक यापैकी शक्यतो मूळ कागदपत्र घेऊनच घराबाहेर पडावे. त्याअगोदर अंनिसशी संपर्क साधावा. अंनिस आपणास सल्ला देऊ शकेल. विवाह करून कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात यासाठी उपरोल्लखीत संस्था संघटना न्यायालय, प्रशासन यांची साथ मिळू शकेल.

लग्नानंतर उपस्थितांकडून दिल्या जाणार्‍या काव्यमय सदिच्छा

विवाहबद्ध झालात आज तुम्ही सर्वदा सुखी रहा।
तुमची प्रगती ही होत राहो, जीवनात यशस्वी व्हा॥
सत्कर्मरत राहून सदा साथ आणि मधुर वाणी ठेवा।
मातृपितृ ऋणाबरोबर समाजऋणातूनही मुक्त व्हा॥
सुखी, संपन्न, समृद्ध सर्वदा जीवन तुमचे व्हावे।
आयुष्यभर सदासर्वदा सत्य कर्म करीत रहावे॥
ह्याच आमच्या सदिच्छा तुम्हा या मंगलसमयी।
जीवनातील प्रत्येक वळण व्हावे तुम्हा सुखदायी॥

            आंतरजातीय विवाहाला बळकटी येण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने तरूणाईमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘जोडीदारांची निवड’ हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे सुरू केलेला असून त्यास तरूणाईचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी न्यायालयाची भूमिका सकारात्मक आहे. शासन तर ‘शासन निर्णय क्र. अजावि/2003/प्र.क्र501/मावक-2 दि.6/8/2004 नुसार खुला हिंदू जैन, लिंगायत, बौद्ध, शिख, इमाव प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीशी अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या विमुक्त जाती या प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीशी विवाह केला असेल तर तो आंतरजातीय विवाह समजून शासन निर्णय आंजावी/2007 प्र.क्र/191/मावक-2, दि.1/2/201 नुसार त्या जोडप्यास रू.50,000/- मुलगा किंवा मुलगी ज्या जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयामार्फत प्रोत्साहन रक्कम देते.’ ही बाब जमेची असली तरी पुरेशी नाही. जातीअंताच्या लढ्यासाठी किंवा जाती नष्ट करण्याचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह हाच त्यावर खराखुरा उपाय आहे, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. तेव्हा फुले, शाहू, आंबेडकर, म.बसवेश्वर यांचे सतत नाव घेणार्‍या शासनाने याबाबत खालील बाबींवर गांभिर्याने सकारात्मक विचार करून काही बदल करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

1.आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलगा किंवा मुलगी यांच्या गावी/शहरी तणावपूर्ण तावावरण असते. त्यामुळे आंतरजातीय विवाहाची जिथे विवाह झाला त्या गावी/शहरी वा अन्य त्या जोडप्याच्या सोईच्या गावी/शहरी, ग्रामपंचायत/न.प./मनपा येथे विवाहाची नोंद करता आली पाहिजे.

2. विशेष विवाह कायद्यान्वये विवाह नोंदणीसाठी एकमहिन्याची पूर्व नोटीस देण्याची अट रद्द व्हावी.

3.ग्रामपंचायत/न.प./मनपा येथे विवाह नोंदणीसाठी अडवणूक होऊ नये.

4. विवाहित जोडप्यांना पोलीस प्रशासन यांचे पाठबळ मिळावे व विरोध करणार्‍यांना समज देणेही तेवढेच गरजेचे आहे.

5. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करता आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.

6.आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांपैकी नोकरीत नसली तर किमान एकाला नोकरीसाठी राखीव जागा ठेवाव्यात किंवा उद्योग धंद्यासाठी बिनव्याजी बीज भांडवल मिळण्याची सोय करावी.

            या अशा मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तर मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होऊ शकतील. सामाजिक समतेते तत्त्व रूजेल असे आम्हास वाटते.

माधव बावगे, लातूर

वधूला द्यावयाची शपथ :-

मी मीनाक्षी गोपीनाथराव मुंगल वय 23 वर्षे रा.मु.पो.मुगट, ता.मुदखेड, जि.नांदेड
आजपासून गणेश ओंकार विठ्ठले वय वर्षे 25 रा.मु.पो.सौंदड, ता.सडक/अर्जुनी, जि.गोंदिया यांना माझा कायदेशीर पती म्हणून स्वीकारून या सर्व उपस्थित स्त्री-पुरूषांसमोर अशी प्रतिज्ञा करते की, मी गणेश यांच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाचा आदर करेन आणि त्यांच्या सर्व सुखदु:खात सहभागी राहीन. समाजपरिवर्तनाच्या कार्यात त्यांना आयुष्यभर मन:पूर्वक साथ देईन. मी घरातील सर्व वडिलधार्‍यांचा आदर करीन. व्यक्तीगत, कौटुंबिक व सामाजिक जीवनात परस्पर सहकार्याने गणेशसमवेत एकनिष्ठ राहून सदैव जीवन व्यतित करेन. आमच्यात कदापीही जातीवरून वा इतर कारणांवरून मतभेद वा मनभेद होणार नाहीत. याची मी हमी देते.

वराला द्यावयाची शपथ :-

मी गणेश ओंकार विठ्ठले वय वर्षे 25 रा. रा.मु.पो.सौंदड, ता.सडक/अर्जुनी, जि.गोंदिया
आजपासून मीनाक्षी गोपीनाथराव मुंगल वय 23 वर्षे रा.मु.पो.मुगट, ता.मुदखेड, जि.नांदेड यांना माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारून या सर्व उपस्थित स्त्री-पुरूषांसमोर अशी प्रतिज्ञा करतो की, मी मिनाक्षीच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाचा आदर करेन आणि त्यांच्या सर्व सुखदु:खात सहभागी राहीन. मी कोणत्याही व्यसनाला बळी पडणार नाही. समाजपरिवर्तनाच्या कार्यात तिला आयुष्यभर मन:पूर्वक साथ देईन. मी घरातील सर्व वडिलधार्‍यांचा आदर करीन. व्यक्तीगत, कौटुंबिक व सामाजिक जीवनात परस्पर सहकार्याने मिनाक्षीसमवेत एकनिष्ठ राहून सदैव जीवन व्यतित करेन. आमच्यात कदापीही जातीवरून वा इतर कारणांवरून मतभेद वा मनभेद होणार नाहीत. याची मी हमी देतो.