आंधळी (ता. पलूस, जि. सांगली) येथील नाईक मळा याठिकाणी अनुप मोहन माने यांच्या शेतात मातीची काळी बाहुली, हिरवे कापड, बांगड्या व पुजेचे साहित्य जमा करून तेथे बोकड बळी दिला होता. हे सर्व अघोरी साहित्य पाहून परिसरातील लोकांच्या मनामध्ये करणी, भानामतीची भीती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसांपासून हे सर्व साहित्य शेतातच पडून होते.
याबाबतची तक्रार शेतमालक अनुप मोहन माने यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगलीकडे फोनद्वारे केली. या प्रकाराबद्दल माहिती घेण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह राहुल थोरात हे पलूसला आले. पलूस तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी डॉ. अमोल पवार, कॉ. मारुती शिरतोडे, विशाल शिरतोडे, रोहित पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी पलूस पोलीस स्टेशनला गेले. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी त्वरित या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. याबाबत खातरजमा करण्यासाठी अंनिस कार्यकर्त्यांच्या समवेत पोलीस फौजफाटा देऊन करणी, भानामतीच्या घटनास्थळाला भेट दिली. यावेळी तेथे मातीची बाहुली, हिरवे कापड, बांगड्या आणि रक्ताचे डाग, दगडाची चूल, जळण इत्यादी साहित्य आढळून आले. यावेळी पोलीस व अंनिसचे कार्यकर्ते पाहून गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती.
हा सर्व प्रकार या शेताशेजारी राहणार्या एका पवार नामक इसमाने केल्याचे पोलीस तपासात आढळून आले. त्या इसमाला पोलिसांनी घटनास्थळी बोलावून घेऊन या प्रकाराबाबत जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, आमच्या घराण्यामध्ये नातवांच्या जावळविधीसाठी बोकड बळी देण्याची प्रथा आहे. जावळाचा विधी करताना आम्ही मातीची बाहुली तयार करून तिला हिरवे कापड नेसवून एका छोट्या काटेरी झुडपाखाली तिची पूजा करतो. आम्ही हा विधी करणी भानामतीसाठी केला नाही, तर तो आमचा जावळविधी आहे. पोलिसांनी त्याचे म्हणणे लेखी जबाब घेऊन नोंदवून घेतले. तक्रारदार अनुप माने यांना करणी भानामतीची वाटत असलेली भीती हा उलगडा झाल्यानंतर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन केले नंतर दूर झाली. ही काळी बाहुली, हिरवे कापड, हे सर्व साहित्य पवार नामक इसमाने स्वतः उचलून नेले व ती जागा शेतमालकाला स्वच्छ करून दिली.
आमच्या शेतामध्ये येऊन अघोरी पूजा केली, बोकड कापले, काळी बाहुली ठेवली म्हणून जे पुढे भविष्यात मोठे वाद होणार होते ते वाद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पलूस पोलीस स्टेशन यांच्या मध्यस्थीने थांबले गेले. काळी बाहुली, बोकडबळीबद्दलची गावकर्यांच्या मनातील भीती अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करून दूर केल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.