Categories
व्यक्तिविशेष

हाडाचा कार्यकर्ता!

ऑगस्ट २०१९

नरेंद्र एक बहुगुणी कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याला आवश्यक असणारी संवादाची, युक्तिवादाची विशिष्ट शैली त्याच्याकडे होती. उपजत असेल-नसेल; पण अनुभवानं ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली; पण नुसत्या बोलण्यानं, आवाजानं काय होणार? त्यासाठी अभ्यासाचा भक्कम पाया नितांत महत्त्वाचा असतो. तो त्याच्याकडे होता. मला त्याचं एक हे वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की, तो अनेकदा आपले विचार मांडताना, संतांच्या अभंगांचा अतिशय नेमका उपयोग करत असे.


विद्या बाळ

डॉ. देवदत्त दाभोलकरांपासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंतची दहाही भावंडं आणि त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं महत्त्वाचं योगदान ही महाराष्ट्रासाठी एक गौरवाची गोष्ट आहे. देवदत्त सर्वांत मोठे आणि नरेंद्र सर्वांत धाकटे. या सगळ्यांच्या कर्तृत्वात विविधता आहे. कोण लहान, कोण मोठा हा हिशोब गैरलागू आहे. ते सगळे आपापल्या परीने मोठेच होते.

नरेंद्राच्या खुनापूर्वी कित्येक वर्षांपासून त्याची माझी ओळख होती. अंधश्रद्धाविरोधी काम ही त्याची महत्त्वाची ओळख होतीच. पुढे त्याला ‘साधने’च्या संपादकत्वाची जोड मिळाली. नरेंद्राचा खून झाला त्या दिवशी सकाळी-सकाळी माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ‘आधी टीव्ही लावा. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला आहे.’ ‘आधी’ या शब्दांचा अर्थ मेंदूपर्यंत पोचायलाच वेळ लागला. त्यानंतर जवळपास दिवसभर, मला माझं रडणं आवरता आलं नाही. गेल्या काही वर्षांत, जवळची, दूरची कितीतरी माणसं सोडून गेली; पण हा मृत्यू जेवढा जिव्हारी लागला, जखमेतून भळाभळा रक्तस्राव व्हावा तसा, यापूर्वी कधी झाल्याचं आठवत नाही. एवढंच नाही, तर त्यानंतर कितीतरी दिवस त्याच्या आठवणीनं गळा भरून येतच राहिला; न बोलूनही त्याच्या माझ्या नात्यात किती जवळीक आणि आपलेपणा होता, याची मला त्यावेळी जाणीव झाली. महाराष्ट्रात, पुरोगामी विचारांची, आगरकरांच्या विवेकवादाची केवढी खंबीर परंपरा आहे, आता होती, असं खेदानं म्हणावंसं वाटतं. रूढ परंपरा आणि व्यवहार यांच्या विरोधात परिवर्तनाचं काम करणारे महात्मा आणि सावित्रीबाई, शाहू महाराज, लोकहितवादी, महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, पंडिता रमाबाई अशी कितीतरी माणसं इथे होऊन गेली. त्या सगळ्यांना समाजाने या-ना-त्या प्रकारे प्रखर विरोध केला. कर्व्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला गेला, जोतिबांवर मारेकरी घातले गेले, आगरकरांची तर जिवंतपणी प्रेतयात्रा काढली गेली. मात्र एकविसाव्या शतकात समाज याही पुढे गेला आहे, ‘सुधारला’ आहे. त्याने विवेकाची बीजे पेरणार्‍या आणि लोकांच्या डोळ्यांवरची अविचाराची झापडं ओढून काढू बघणार्‍या दाभोलकर, पानसरे यांच्यासारख्यांना थेट मारूनच टाकलं. धर्मांध विचारधारा, जातीय-धर्मीय अस्मिता आज या हत्याकांडानंतर अधिकच तीव्र आणि उग्र झालेल्या दिसतात. म्हणून दाभोलकर, पानसर्‍यांसारख्या अभ्यासू आणि समतोल सांभाळत विचार समाजापुढे ठेवणार्‍यांची उणीव अतिशय जाणवते आहे.

नरेंद्र एक बहुगुणी कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याला आवश्यक असणारी संवादाची, युक्तिवादाची विशिष्ट शैली त्याच्याकडे होती. उपजत असेल-नसेल; पण अनुभवानं ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली; पण नुसत्या बोलण्यानं, आवाजानं काय होणार? त्यासाठी अभ्यासाचा भक्कम पाया नितांत महत्त्वाचा असतो. तो त्याच्याकडे होता. मला त्याचं एक हे वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की, तो अनेकदा आपले विचार मांडताना, संतांच्या अभंगांचा अतिशय नेमका उपयोग करत असे. याचा एक विशेष परिणाम श्रोत्यांवर होत असावा. विशेषतः शहरांपासून दूर असलेल्या श्रोत्यांना हा माणूस भले शहरातून आलेला, डॉक्टर असलेला, असा शिकला-सवरलेला असूनही जवळचा वाटत असणार, त्याच्या मातीची खूण त्यांना पटत असणार. नरेंद्राच्या अंधश्रद्धाविरोधी कामात, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली रेषा सांभाळणं हे काम नाजूक होतं. साम-दाम-दंड-भेद-नीती हे सांगते की, लोकांच्या मनावर जोरदार आघात हा शेवटचा मार्ग आहे. म्हणूनच डॉ. लागू सांगत असत, ‘तसं नरेंद्र स्वतः ‘देवाला रिटायर करा’ म्हणत नसे. देव माना, विठूची भक्ती करा; पण योग्य वेळी. नाठाळाचे माथा हाणू काठी हेही तो लोकांपर्यंत पोचवत असे. अंधश्रद्धेतून होणारं शोषण आणि फसवणूक यावर त्याचा रोख असे. अशा प्रकारे चालणार्‍या भोंदूगिरीचा भांडाफोड करण्याचं काम त्याने जीव ओतून; प्रसंगी जीव धोक्यात घालून केलं. या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांच्या पलिकडे परिषदा, व्याख्याने, कार्यशाळा, अं.नि.स.चं भरगच्च वार्तापत्र या सार्‍या साधनांचा त्यानं जबरदस्त उपयोग केला.

परिवर्तनाच्या कामात अनेक प्रकारचे प्रश्न सतत विचारले जातात. त्यामुळे कार्यकर्त्याला सतत जागं राहावं लागतं. नरेंद्र याबाबतीत एकदम तयार झाला होता. मुळात त्याचा विवेकवादाचा पाया मजबूत होता. अतिशय शांतपणे, तर्कनिष्ठ स्वरुपात उत्तरं देत तो शंकानिरसन करीत असे. त्याच्या प्रश्नोत्तराच्या व्हिडीओ सीडीमध्ये आणि त्याच्या सर्व पुस्तकांत याची साक्ष पटते. अंधश्रद्धेच्या संदर्भात काम करणार्‍या प्रत्येकाला ही साधनं महत्त्वाची रसद पुरवतात.

कामासाठी नरेंद्र महाराष्ट्राभर जेवढा हिंडला असेल, तेवढे फार कमी लोक हिंडले असतील, असं मला वाटतं; शिवाय ही सारी भ्रमंती प्रामुख्याने सरकारी एस.टी.मधून. हाडाचा कार्यकर्ता म्हणूनही नरेंद्र जरा वेगळाच होता. कामापायी त्याचा दिनक्रम कितीही अनियमित असला, तरी आपला व्यायाम, आपलं सकाळचं फिरणं, चालणं याबाबत त्याचा कटाक्ष असे. आजच्या अनेक नामवंत कार्यकर्त्यांसाठी त्याचं उदाहरण मार्गदर्शक आहे. आपणच स्वीकारलेलं काम आपल्याला इतकं सतत खेचत आणि हाका घालत असतं की बस्स. त्याचवेळी हे काम महत्त्वाचं आहे म्हणूनच आपल्याला आपली ऊर्जा आणि उत्साह आणि आरोग्य सांभाळायला हवं, याची जबाबदारी तो समजून असावा. वाईट याचंच वाटतं की, नरेंद्रचं आयुष्य फार-फार लवकर आणि अवेळी संपवलं गेलं; अन्यथा विवेकवादाची आणि परिवर्तनाची पताका खांद्यावर घेऊन रात्रंदिवस झटणारा हा आमचा बिनीचा शिलेदार हकनाक मरून गेला नसता.

सुस्थापित प्रवाहाविरुद्ध काम, परिवर्तनाचं काम करणार्‍यांविरुद्ध अनेकांचा राग असतो. कधी-कधी असणारा हा मतभेदाचा राग मी समजू शकते. पण काही राग, विरोध हे कट्टर धार्मिक संस्था, मठ यांचे असतात. त्यांची दुकानंच अंधश्रद्धा आणि शोषण यावर भरभराटत असतात. त्यांच्याजवळ पैशाचं आणि मनगटाचं बळ भरपूर असतं; मात्र विचारांचा मुकाबला करण्याची ताकद अजिबात नसते. ते त्यांना परवडणारं नसतं. म्हणून तर ते या सेना सांभाळत असतात. त्यांचे ‘पराक्रम’ आपण अलिकडे चाललेल्या अनेक भोंदू, बाबा, महाराज यांच्यावर चाललेल्या खटल्यात बघितले. नरेंद्राचा खून हे त्याचं एक जळजळीत उदाहरण आहे.

लोकांबरोबरच्या प्रत्यक्ष कामाबरोबरच अंधश्रद्धा निवारणासाठी कायद्याची गरज आहे, याची नरेंद्रला पूर्ण जाणीव होती. त्यासाठी त्यानं किती वर्षं, किती रक्त आटवले असेल, त्याचा हिशोब नाही करता येणार; पण इथेही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र कणखरपणे पावलं उचलण्यात कमी पडला. ‘जशी प्रजा तसा राजा’ बहुसंख्य शहरी, उच्चशिक्षित आणि श्रीमंत माणसंसुद्धा बुवा-बाबांना नवस करतात, तथाकथित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य जगतात, तिथे राजकारणी लोक वेगळे काय वागणार? आणि आजकाल तर विवेकवाद, विज्ञानवाद याकडे पाठ फिरवून मागच्या काळातल्या अवैज्ञानिक गोष्टीच प्रमाण मानाव्यात, अशी अलिखित सक्ती होताना दिसते आहे. यामुळेच हा कायदा खूपसं पाणी घालून एकदाचा मंजूर झाला आहे. मूळ पायाभूत विचारांवर विश्वास कमी असलेल्या यंत्रणेकडून कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आनंदच आहे.

नरेंद्राच्या मृत्यूनंतर निघालेल्या अनेक मोर्चात, आंदोलनात, ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’ असा एक अतिशय अर्थपूर्ण नारा होता. या नार्‍याने, नारा देणार्‍या प्रत्येकावर एक जबाबदारी टाकली आहे. ती अशी की, नरेंद्रने एक ध्यास घेऊन वर्षानुवर्षे मांडलेले विवेकवादी विचार आता आपणच जपत, जोपासत राहायचे आहे. त्या नार्‍याचा हा सांगावा आहे. आपण काही दाभोलकर नाही हे खरं असलं, तरी त्याच्याविषयी आदर आणि प्रेम असणार्‍या प्रत्येकानं या सांगाव्याला जागले पाहिजे, तरच त्याच्या कामाचा धागा आपण पुढे नेत, ओढत राहिलो, असं म्हणता येईल.