डॉ. दाभोलकरांची कल्पकता सनदशीर मार्गाने, अहिंसक चळवळीतून महात्मा गांधींना उजाळा देणारी असायची. असा उपक्रम ते लादायचे नाहीत. कार्यकर्त्यांच्या पुढे ते प्रश्न ठेवत. उपाय, उपक्रम कार्यकर्ते सुचवत. लोकशाही पद्धत रुजवण्यावर डॉ. दाभोलकरांचा भर असायचा. पुरोगामी, डाव्या, समाजवादी, मानवाधिकारकेंद्री, शोषणमुक्त समाजाची घडण हे आपल्या चळवळी व संघटनेचे उद्दिष्ट आहे, याचा ते विसर पडू देत नसत. चळवळीचा चेहरा बहुजनच नाही, तर सर्वजन हिताय व सर्वजन प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे, याचे भान ते ठेवत.

प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व या चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन सहा वर्षे पूर्ण होत आलीत. अद्याप शासन, पोलीस यंत्रणा हत्यार्यांचा शोध पूर्ण करू शकलेली नाही. धर्मश्रद्ध गोष्टी, घटनांना रोज ऊत येतो आहे, अशी समाजस्थिती आहे. हे मी निराशेने लिहित नाही. काळ प्रतिकूल असला की, कार्यकर्त्यांना तो अधिक प्रतिबद्ध होण्यास भाग पाडतो, हे तत्त्वत: खरे असले तरी व्यवहार तसा आढळत नाही. यात मीही आहेच. नाही म्हणायला या काळात महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा, जातपंचायतविरोधी कायदा झाला. कार्यकर्त्यांच्या जागरुकतेमुळे आजवर पाचशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले. काहींना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. अंनिसने नियमित ‘मॉर्निंग वॉक’द्वारे डॉ. दाभोलकरांच्या हत्यार्यांच्या शोधाचा आग्रह धरत दबाव कायम ठेवला. जनजागृतीच्या आघाडीवर नाटकांचे प्रयोग, डॉ. दाभोलकर साहित्याचा हिंदी अनुवाद प्रकल्प पूर्ण झाला. हिंदीत चार पुस्तके प्रकाशितही झाली. या स्मृतिदिनास आणखी दोन प्रकाशित होतील. या भाषांतरामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार भारतभर पोचला. वाहिन्या आणि वृत्तपत्रे अंधश्रद्धा बळीच्या बातम्या प्राधान्याने देताना दिसतात. त्यातून प्रबोधन कार्य घडते आहे, तरीही खालीलसारखे प्रसंग घडत असतात-
केरळच्या शासकीय विद्यालयातील कालडी गावच्या रजिथकुमार नावाच्या एका शिक्षकाने मध्यंतरी असे विधान केले की, ‘स्त्रिया पुरुषी पोषाख वापरतात म्हणून त्यांना तृतीयपंथी अपत्ये होतात’, यात अतार्किकता, अवैज्ञानिकता आहेच; शिवाय पुरुषी मानसिकता आहे.
झारखंडमध्ये एका मृत बालकाचा अंत्यविधी न करता त्याचे शव/पार्थिव एवढ्याचसाठी ठेवण्यात आले की, तांत्रिकाने बालक तीन दिवसांनी जिवंत होण्याचे भाकीत केले होते. (डॉक्टरांनी मृत जाहीर करूनही!)
मध्य प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंग यांचे विधान – ‘भूतबाधेमुळे शेतकर्यांच्या आत्महत्या होतात.’
जनतेची मनोधारणा बदलावी म्हणून भोपालगंजचे जिल्हाधिकारी राहुल कुमार यांनी अपशकुनी ठरवल्या गेलेल्या 36 वर्षीय सुनीता कन्वर नामक विधवेच्या हाती बनलेला पोषण आहार जाहीररित्या सेवन केला.
आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापना व कार्याची 30 वर्षे पूर्ण करत आहे. सुमारे 25 वर्षे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सातत्यपूर्ण अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. ते कार्य मी जवळून पाहिले आहे. त्यात संघटना उभारणी हे त्यांचे जीवितकार्यच म्हणावे लागेल. ते एकाच वेळी अनेक मार्गे कार्य करीत असत. एक म्हणजे महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत. जिथे अंधश्रद्धेची घटना घडेल, तिथे धावून जात. बळींना भेटत. अत्याचार करणार्यांविरुद्ध तक्रार नोंदवत. त्या काळी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नव्हता. इंडियन पिनल कोडच्या कोणत्या कलमान्वये अथवा घटनेच्या कोणत्या कलमान्वये हा गुन्हा ठरतो (म्हणजे कोणते कलम लावावे) याचे पोलीस अधिकार्यांना मार्गदर्शन करीत. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी जनमत संग्रहाचा भाग म्हणून पत्रकार परिषदा घेत. अनेक पत्रकार परिषदांचा मी साक्षीदार आहे. अत्यंत निर्भयपणे बोलत. पत्रकारांच्या खोचक, तिरकस प्रश्नांनापण समजून-उमजून भावनावश वा प्रक्षोभक उत्तरे टाळत. उत्तरे वैज्ञानिक, वैधानिक व तार्किक देण्याकडे कल असायचा. हे काम समाजहिताचे व समाजपरिवर्तनाचे असल्याने पत्रकारांनी सामाजिक दायित्व म्हणून प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन करीत. त्यात विवेक जागृतीवर भर असे; प्रसंगी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी इत्यादींना भेटत. लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न विचारण्यास प्रेरित करीत. हे सर्व अत्यंत संयमाने, पदरमोड करून करत. प्रवास बसने असायचा, उतरायचे कार्यकर्त्यांकडे. स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक सरबराई, नियोजन, संपर्क, पाठपुरावा करत. जोडीस जोड एखाद्या शाळेत, महाविद्यालयात भाषण देत. भाषणात समकालीन घटनांवर जोर असायचा. विद्यार्थ्यांना अंतर्मुख करणारे संवादकौशल्य हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य असे. कृती कार्यक्रमांवर भर असायचा. आज सहा वर्षे उलटल्यावर मी मागे वळून पाहतो, तेव्हा असा अष्टावधानी फेर कार्यकर्त्यांत अभावाने आढळतो. अशी अढळ, बांधील गोफ विणतच संघटनेची वीण घालता येते. ती उणीव भरून काढण्याचे आव्हान डॉ. दाभोलकर आठवताना लक्षात येते.
महाराष्ट्रातील सत्तरच्या दशकानंतरच्या काळात अनेक पुरोगामी चळवळी व संघटना उदयाला आल्या. दलित पँथर, युवक क्रांती दल, ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ, विज्ञान प्रबोधिनी अशी अनेक नावे सांगता येतील. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच दरम्यान उदयाला आली. आज तीस वर्षांनंतर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हणून लोकमानसात नुसती रुजली नाही, तर सक्रिय आहे. अन्य चळवळी आणि संघटना थंडावल्या असताना अंनिसचं सक्रिय राहणं हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या लोककेंद्री नि समयसूचक उपक्रमशीलतेचं प्रतीक दिसतं. आज ते अशासाठी आठवतं की, शासन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करत नाही म्हणून जाहीर थोबाडीत मारून घेण्याचा (मारण्याचा नव्हे!) उपक्रम, दारूची बाटली आडवी करण्यासाठी बाटलीला जोडे मारण्याचा कार्यक्रम अंतर्मुख करणारा एकीकडे, तर दुसरीकडे लक्षवेधी असायचा. तिसरी बाजू म्हणाल, तर अन्य पक्ष, संघटना हिंसक पद्धतीने निषेध नोंदवत असताना डॉ. दाभोलकरांची कल्पकता सनदशीर मार्गाने, अहिंसक चळवळीतून महात्मा गांधींना उजाळा देणारी असायची. असा उपक्रम ते लादायचे नाहीत. कार्यकर्त्यांच्या पुढे ते प्रश्न ठेवत. उपाय, उपक्रम कार्यकर्ते सुचवत. लोकशाही पद्धत रुजवण्यावर डॉ. दाभोलकरांचा भर असायचा. पुरोगामी, डाव्या, समाजवादी, मानवाधिकारकेंद्री, शोषणमुक्त समाजाची घडण हे आपल्या चळवळी व संघटनेचे उद्दिष्ट आहे, याचा ते विसर पडू देत नसत. चळवळीचा चेहरा बहुजनच नाही, तर सर्वजन हिताय व सर्वजन प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे, याचे भान ते ठेवत म्हणून समितीच्या 200 शाखा महाराष्ट्रभर ते आपल्या हयातीत सक्रिय करू शकले होते. आचार, विचार, सिद्धांत असा त्रिमितीय फेर धरत ते चळवळ व संघटना विकसित करत. कार्यकर्त्यांबरोबर समभाव व्यवहार हे त्यांच्या नात्यांच्या विणीचं कौशल्य. त्यात प्रदर्शनापेक्षा प्रतिबद्धतेवर जोर असायचा. चळवळीची गाणी नुसती नाही म्हणायची, तर हातात हात घालून. कृती छोटी; पण संस्कार मोठा असं सारं अनुकरणीय असायचं.
रोजच्या जीवनात बुद्धी, तर्क, सत्य या कसोट्यांवर जे उतरत नाही, ते नाकारणे काहींच्या जीवनशैलीचा भाग बनून गेला होता. फलज्योतिष, वास्तुशास्त्र, छद्मविज्ञान, भुताटकी, भानामती, अंगात येणे, अंगारे-धुपारे इत्यादींद्वारे उपचार, संततीप्राप्ती इत्यादी भ्रामक समजुती, अघोरी प्रथा, नरबळी, बुवाबाजी, डाकीण, संमोहन उपचार इत्यादीविरुद्ध व प्रतिबंधासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘महाराष्ट्र नरबळी, अमानवी चमत्कार, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन विधेयक’ 7 जुलै, 1995 ला सादर केल्यानंतर ते सर्वमताने मंजूर व्हावे म्हणून वारकरी संप्रदाय, हिंदू धर्म संघटना, अन्य विरोधमती व्यक्ती, संस्था सर्वांच्या शंका-कुशंकांना डॉ. दाभोलकरजी उत्तरे देत, त्यामध्ये आपण करतो ते व्यापक समाजहिताचे; शिवाय दीर्घकालीन मानवी समुदाय वैज्ञानिक वृत्तीचा घडावा, अशी तळमळ असायची. हा कायदा कुणा विचारधारेच्या विरोधात नसून प्रगत समाज घडवणारा आहे, हे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, विरोधक सर्वांना ते परोपरीने समजावत; पण प्रत्येक वेळी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचेच प्रत्यंतर यायचे. ‘पुढील अधिवेशनात मांडू’, ‘मंजूर करू’, असे वायदे ऐकून ते कंटाळत नसत; उलटपक्षी आणखी नेटाने प्रयत्न करताना दिसत. ही चिकाटी केवळ अनुकरणीयच असायची.
देव, धर्म, अध्यात्म इत्यादींद्वारे लोकांच्या अंधश्रद्धांचा लाभ उठवत केल्या जाणार्या शोषण, अत्याचारांविरोधातील त्यांची भूमिका ठोस असायची. कधी काही प्रसंगाने समाजात तणाव निर्माण व्हायचे. शासन, पोलीस यंत्रणा त्यांचे कार्यक्रम, भाषणे होऊ देत नसत. अशाच एकावेळी मी आणि कॉ. गोविंद पानसरे यांनी कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू स्मारक भवनात सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान भाषण योजले होते. काहीही करून भाषण होऊ द्यायचे नाही, अशी पोलिसांची योजना. आम्ही पुढच्या दारी स्वागताचा देखावा चालू ठेवून मागील दाराने डॉ. दाभोलकरांना मंचावर आणले नि भाषण सुरू केले. पोलिसांनी स्टेजवर येऊन समन्स बजावले. डॉ. दाभोलकर यांनी धीटपणे ते सभागृहास वाचून दाखवले नि म्हणाले की, ‘आम्ही सनदशीर मार्गे घटनाहक्क अमलात आणत आहोत. मी तुम्हालाच (प्रेक्षकांना) विचारतो की, ‘भाषण करू का नको?’ या पवित्र्याने पोलीस हतबल नि प्रजा आक्रमक करण्याचे डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांची जनकेंद्री प्रबोधने आज आठवतो, तेव्हा समाजाचं बोटचेपलेपण अधोरेखित होत राहतं. असंच आम्ही एकदा नाटककार विजय तेंडुलकर यांचं व्याख्यान योजले होते. त्यापूर्वी काहीच दिवस तेंडुलकरांनी एक वादग्रस्त विधान केले होते, हिंदुत्ववादी आमच्या कार्यक्रमासमोर निदर्शने करणार होते. त्यावेळीही कार्यक्रम रद्द करावा म्हणून दबाव होता. कार्यक्रम होता अॅड. पोतनीस प्रथम स्मृतिदिनाचा. विजय तेंडुलकर आले. सभागृहात जागोजागी साध्या वेषातील पोलीस भरलेले. या नि अशा अनेक आंदोलनात; विशेषत: महायज्ञविरोधी आंदोलनात आम्ही जे लोकजागर, मोर्चे, कोपरा सभा, निवेदने, पत्रकार परिषदा घेत असू त्यातून जनमत संग्रह व संघटनाद्वारे लोकजागृतीच्या खेळी यशस्वी करत असू. त्यातून शासन हतबल होत असे. डॉ. नरेंद्र दाभोलकर असो वा कॉ. पानसरे रान उठवायचं नियोजन, हाका घालणे, हाकारे जमवणे, यांचं त्यांनी विकसित केलेलं समाजतंत्र मी 1995 पासून जवळून अनुभवलं आहे. ते आज आठवताना लक्षात येतं की, कार्यकर्त्यांत ते धैर्य, चातुर्य, समयोचितता अभावाने दिसते. जनमत संग्रह नि संघटनांत वर्तमान काळ कमकुवत झाला की काय, असे वाटावे, अशी स्थिती आहे. प्रश्नाचा पूर्णवेळ ध्यान व सर्व वेळ पाठपुरावा यात आपण कमी पडत आहोत. म्हणून सनातन नि प्रतिगामी डोके वर काढत आहेत. आपण वेळीच जागे होऊन अंनिस विचार, उपक्रम हा केवळ वैचारिक प्रबोधनाने हाशील होणार नाही. कृतिशील कार्यक्रम हाच त्यावरचा रामबाण उपाय आहे, हे डॉ. नरेंद्र दाभोलकर आज परत आठवताना लक्षात येते.
आम्ही अंनिसतर्फे पोहाळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे सोडलेला मरिआईचा गाडा जाहीरपणे दहनाचा कार्यक्रम योजला नि यशस्वी केला. उद्देश स्पष्ट होता की, ही अंधश्रद्ध रुढी जनमानसात भय निर्माण करते; शिवाय प्रत्येक गाव आपल्या अंगणातला गाडा दुसर्या अंगणात सोडत प्रथा चालू ठेवते; पण मोडत नाही. आम्ही गावच्या सरपंचांच्या हस्ते व शाळेतील सर्व मुले-मुली, शिक्षक, पालकांसमोर पूर्वजागृती, प्रबोधन करून कृती केली. सनातन्यांनी धर्मभावना दुखावल्याची फिर्याद केली; पण आमच्या या वैज्ञानिक कृतीची ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दखल घेतल्यावर सचित्र नि विस्तृत वृत्त देऊन प्रशंसा केल्यावर यंत्रणा नि विरोधक दोन्ही नंतर हात बांधून राहिलेले आम्ही पाहिले आहे. तीच गोष्ट गणेशमूर्ती दान, निर्माल्य दान, ‘होळी लहान, पोळी दान’ सारख्या उपक्रमांत करत राहिलो. आज समाजचित्र बदलले आहे. विरोधकच ‘अंनिस’चे कार्य पुढे येऊन करताना आज पंचवीस-तीस वर्षांनी पाहतो, तेव्हा डॉ. दाभोलकरांची समाजदृष्टी ही दीर्घपल्ल्याच्या समाजपरिवर्तनार्थ फार अगोदर ठोकलेली आरोळी होती, हे ध्यानात येतं नि त्यांच्या कल्पक समाजबदलाचं कौतुक वाटतं.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ‘अंनिस’ मार्फत जे-जे केलं, त्याची पुस्तकं केली. ‘भ्रम आणि निरास’ त्यांचं पहिलं पुस्तक; आता ते हिंदीतही आपण आणलं. त्यातून अंधश्रद्धांच्या सर्व प्रकारांची माहिती समाजाला दिली. ‘तिमिरातून तेजाकडे’ पुस्तक ‘अंनिस’चा विचार, सिद्धांत, आचार समजावते. ते हिंदीत तीन भागांत प्रकाशित करून व्यापक/राष्ट्रीय स्तरावर हा विचार नेला. आपण यावर्षीही 20 ऑगस्ट 2019 रोजी ‘आओ, विवेकशील बने!’ आणि ‘विवेकवादी डॉ. नरेंद्र दाभोलकर’ ही दोन पुस्तके हिंदीत प्रकाशित करीत आहोत. त्यातून समाज डोळस करण्याचा नि लोकांच्या शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न होईल. हत्येनंतर वर्षाला एकेक पुस्तक येणं, हा सुद्धा आपला प्रतिबद्ध असा कृती कार्यक्रमच आहे. मी याला श्रद्धांजली न मानता ‘कार्यांजली’ मानतो. अशा छोट्या कृतीतून व्यापक आकाश कवेत घेणे आपण डॉ. दाभोलकरांचाच कार्यसंस्कार मानतो.