व्यवसायाने वास्तुरचनाकार असलेले प्रकाश देशमुख ‘असोसिएटेड स्पेस डिझायनरस् प्रा.लि.’ या कंपनीचे संचालक आहेत. पुणे येथील मगरपट्टा सिटी व नांदेड सिटी या प्रकल्पाचे काम त्यांनी पाहिले आहे. त्यांच्या या कामामध्ये त्यांना बरे-वाईट अनुभव आले. याचेच संचित म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी बोलताना ते म्हणाले की, “माणसाच्या मानसिक गुलामगिरीचे लक्षण म्हणजे अंधश्रद्धा. दैववाद, कर्मविपाकाचा सिद्धांत याही अंधश्रद्धाच आहेत. हे मत पुण्यातील प्रथितयश वास्तुरचनाकार प्रकाश देशमुख यांनी मांडले.” वास्तुशास्त्र या विषयाच्या मुलाखतीची सुरवात करताना मी त्यांना विचारले की,
प्रश्न : वास्तुरचना/ Architecture म्हणजे नक्की काय?
उत्तर : तसे पाहायला गेले तर वास्तुरचना हा बांधकाम तंत्रज्ञानातील एक भाग आहे. मानवी स्वभाव, मानसशास्त्र, सोय, सुरक्षा आणि सौंदर्य यांचा प्रमाणबद्ध व सर्वांगाने विचार वास्तुरचनेत होतो. मानवाच्या सोयीची घराची रचना म्हणजे वास्तुरचना.
प्रश्न : तुम्ही म्हणता सोय, सुरक्षा आणि सौंदर्य यांचा मिलाप वास्तुरचनेत असतो. मग घर लाभत नसेल तर तोडफोड करा अथवा एखादे यंत्र घरात ठेवा, या भंपकपणाबद्दल तुम्हाला काय वाटते?
उत्तर : हे फक्त लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणं चाललं आहे. मुळात जे वास्तुरचनाशास्त्र भारतीयांनी साडे तीन हजार वर्षांपूर्वी तयार केले ते कश्यप मुनींच्या काळात. त्यांनी याविषयी काश्यप शिल्प हा ग्रंथ लिहिला. पूर्वी राजा किंवा पुरोहित वास्तु बांधत. म्हणजे राजवाडा(किल्ला) किंवा मंदिरे(प्रार्थनास्थळे) यांची सूत्रबद्ध मांडणी वास्तुरचनेत होती. इथूनच हे शास्त्र विकसित झाले. त्यामुळे या शास्त्राचा विकास देव-देवता, पूजा, सुरक्षा, सौंदर्य या अंगाने जाणारा होता. साडेतीन हजार वर्षांपूर्वींची असलेली ही मार्गदर्शन तत्वे आज पाळणं अजिबात शक्य नाही.
पूर्वेला घराचं/वास्तुचं प्रवेशद्वार असावं म्हणजे घरात व्यवस्थित सूर्यप्रकाश यावा. त्याकाळी विजेचा शोध न लागल्यामुळे सूर्य प्रकाशाला खचितच महत्व होतं. दक्षिणेला प्रवेशद्वार असू नये कारण भारत हा उत्तर गोलार्धात असल्यामुळे दक्षिणेकडून कायम सूर्यप्रकाश घरात येणारच. अचानक खूप उन्हातून घरात आल्यावर डोळ्यावर अंधारी येते. म्हणूनच दार दक्षिणेला नको असं मूळच्या वास्तुरचना शास्त्रात आहे. इतक्या साध्या सोप्या व आकलनीय गोष्टीत आजकालच्या भंपक वास्तुतज्ञांनी खूप ढवळाढवळ केली आहे. यमाला/दैत्याला दक्षिणदिशा देऊन त्याची भीती म्हणून दक्षिणेला दार नको असा कावेबाजपणा हे लोक करतात. आता मला सांगा, संपूर्ण पृथ्वीची दक्षिणदिशा एकच आहे ना? मग भारतीय वास्तुशास्त्रात दक्षिण अशुभ तर चिनी फेंगशुईत दक्षिण शुभ हे कसं? भारतात आर्य लोक उत्तरेतून आले. इथले स्थानिक द्रविड यांनी त्यांच्यावर हल्ले केले. द्रविड दक्षिणेला होते, म्हणून दक्षिण दिशा अशुभ. हेच तत्व चीनच्या बाबतीत लावल्यास उत्तर दिशा अशुभ ठरते. कारण मंगोलियन टोळ्यांचा हल्ला/उपद्रव चिन्यांना उत्तरेकडून होता.
आता अजून एक गंमतीशीर गोष्ट सांगतो. वास्तुरचनेत घरातील झोपायची खोली नैऋत्येला असावी. कारण भारतात वारा हा नैऋत्य मौसमी आहे. या भंपक लोकांनी नैऋत्येला झोपायची खोली नसेल तर नवरा-बायकोचं पटत नाही, विवाहसुख मिळत नाही असा कांगावा केला आहे. पण मला सांगा, आज कोणतीही खोली वातानुकुलित(Air conditioned) करून गारवा आणता येतो. अहो, या वास्तुशास्त्रानुसार घरात संडास निषिद्ध होता. पण आज आपण Master Bedroom with attached Toilet ही संकल्पना घेतलीच ना! एवढं जुनं वास्तुशास्त्र अजूनही लोक त्याच मानसिकतेतून पाळत आहेत. आणि हे भंपक वास्तुशास्त्री त्यांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन फक्त आपल्या झोळ्या भरून घेत आहेत. लोकांच्या कमकुवत मानसिकतेचा गैरफायदा घेण्याचाच हा प्रकार आहे. त्याचबरोबर असलेल्या घराची तोडफोड करून संसाधनाची हेळसांड, पैशाचा व वेळेचा अपव्यय, अवैज्ञानिक विचारांचा प्रसार हाही मोठ्या प्रमाणात होतो. म्हणूनच याकडे दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालणार नाही. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून जगायचं की अशा भ्रामक अंधश्रद्धांवर विसंबून कर्तृत्वहीन जीवन जगायचं, ही विचार करायची गोष्ट आहे. वास्तुशास्त्रातून फलप्राप्ती होते हे चुकीचे/भ्रामक आहे. मी तर म्हणतो की, हे वास्तुशास्त्र नसून वास्तुज्योतिष विकण्याचा धंदा आहे. हे लोक असंही म्हणतात की, इंग्रजांनाही भारतीय वास्तुज्योतिष कळत होतं. म्हणून त्यांनी पूर्वेला- East आणि पश्चिमेला – West असं म्हटलं आहे. संस्कृत इष्ट म्हणजे इंग्रजी East आणि मराठी टाकाऊ (Waste) म्हणजे इंग्रजी West असा बादरायण संबंध हे लोक जोडतात.
प्रश्न : हे वास्तुज्योतिष भ्रामक आहे, असं तुम्ही म्हणता, मग प्रसार माध्यम त्यांना खतपाणी घालतातच ना? याबद्दल..
उत्तर : प्रसारमाध्यमं काय फक्त टी.आर.पी.च बघतात. जे प्रेक्षकांना आवडेल, ते मोठं करून दाखवायचं, आपला प्रेक्षकवर्ग वाढवायचा अन् नफा कमवायचा, बस्स. वर्तमानपत्रे वास्तुशास्त्रावर पुरवण्या काढतात. वास्तुरचनाकार आपली जाहिरात करून शकत नाही. असं व्यावसायिक बंधन आहे. पण या पुरवणीत मोठे मोठे(?) वास्तुज्योतिष जाहिरातबाजी करतात. मला सांगा यात खरोखरच वास्तुरचनेबद्दल काय असतं हो? भारतामधल्या किती वास्तू अशा आहेत की, ज्याच्याबद्दल खूप रोचक व ऐतिहासिक माहिती आज उपलब्ध आहे. पण ती छापली जात नाही. भारतातील वास्तू ह्या जगात प्रसिद्ध आहेत. अजंठा-वेरूळची लेणी, कार्ले-भाजे लेणी विजयनगर साम्राज्यातील(हंप्पी) मंदिरे ताजमहाल, फत्तेपूर सिक्री, दिल्लीचा लाल किल्ला, जामा मशिद, कुतुबमिनार अशोकस्तंभ अशा कित्येक वास्तुची नावे सहजच सांगता येतील. दगड फोडण्याची कला भारतीयांना अवगत होती. यातूनच या लेण्याची, मंदिराची बांधणी झाली. याबद्दल काहीच माहिती दिली जात नाही.
देश किती विकसित आहे? देशातील मानसिकता किती प्रबळ आहे, हे सर्व वास्तुकलेत प्रतिबिंबीत होते. प्रत्येक देशाची सशक्त संस्कृती त्यात दिसते. ग्रीक, रोमन वास्तुकला ही त्यांच्या संस्कृतीत डोकावते. नव्या युगात या कलेचा विकास कसा झाला, याबद्दलही ही माध्यमं काही बोलत नाहीत. तर आम्ही फार ग्रेट होतो. आमच्याकडे विमाने होती, अशा प्रकारच्या गोष्टींना पुराणातील दाखले द्यायचे आणि नको तितके महत्व द्यायचे. याला मी छद्म विज्ञानच म्हणेन. या सर्वांकडे आपण दुर्लक्ष करायचं ठरविले तरी होत नाही. यामुळे माणूस अवैज्ञानिकच बनतो. दैववादाकडे झुकतो आहे. म्हणूनच याविषयी बोललं पाहिजे. लिहिलं पाहिजे.
प्रश्न : वास्तुशास्त्र/फलज्योतिष असे फोल विषय आज विद्यापीठातून शिकवले जातात. पदव्या देतात. तुम्हाला याविषयी काय वाटतं?
उत्तर : पुराणातील वास्तुरचना न शिकविता चार्तुवर्णावर आधारित समाजातून तयार झालेलं. वास्तुज्योतिष हे लोकांना शिकवत आहेत. या वास्तुज्योतिषात असं म्हटलं आहे की, ब्राम्हणाने पांढर्या मातीवर, क्षत्रियाने लाल मातीवर, वैश्याने पिवळ्या मातीवर तर शूद्राने काळ्या मातीवर घर बांधावे. आता मला सांगा, आजच्या युगात हे शक्य आहे का? जातीसंस्था भारतीय समाजात फार खोलवर रूतली आहे. जन्मावरून तुमची योग्यता ठरावी ही गोष्ट अंंधश्रद्धाच आहे. अवैज्ञानिक आहे. आजही पांढर्या मातीने गावातील लोकांनी घर बांधावे आणि गावकुसाबाहेर(दलितांनी) काळ्या मातीचे घर बांधावे, अन् रहावे, हे आहेच ना!
प्रश्न : या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला आलेले अनुभव ऐकायला आम्हाला फार आवडेल.
उत्तर : तसे बरेच आहेत. अगदी उच्चविद्याविभूषित लोकही याला बळी पडतात. घर लाभत नाही? मग तोडफोड कर, काही यंत्र ठेव हे करतातच.
एक अनुभव सांगतो, एक वडील व त्यांचा मुलगा गडगंज श्रीमंत, सुस्थितीतील व्यवसाय, सुंदर बंगला. पण वडील व मुलगा यांचे आपसातले संबंध बिघडलेले. कोणा थोतांड ज्योतिषाने सांगितले की, वास्तुदोष आहे म्हणून घरात वाद आहे. अन् शांती नाही, पूर्ण बंगला या वास्तुज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे पाडून नव्याने बांधला. पण तरीही फरक पडेना, ज्योतिषी म्हणाला, तुमच्या पूर्वजन्माचे पाप आहे. मी काहीही करू शकत नाही. पण यामागची खरी गोष्ट अशी. वडील वय वर्षे 70, मुलगा 45 वर्षे. वयानुसार वडीलांनी निवृत्ती स्वीकारून मुलाला सर्व व्यवसाय दिलाच नाही. सर्व आपल्याच हातात ठेवले. कोणताच निर्णय मुलगा स्वतंत्रपणे घेत नसे याची मुलाला खंत. त्यामुळे रोजचीच वादावादी. या गोष्टीचा आणि बंगल्याच्या रचनेचा काडीमात्र संबंध नाही. पण मानसिकता अशी तयार झाली की, ही गोष्ट मानायलाच तयार नाहीत.
प्रश्न : अशी कुणाची फसवणूक झाली तर कायदेशीर कारवाई करता येते का?
उत्तर : प्रत्येक माणसाला आपण स्वत: कमावलेला पैसा कसाही व कुठेही खर्च करण्याचं स्वातंत्र्य आहे. जसे इतर वस्तू/सेवा घेतल्यावर फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करता येते, तशी इथे सोय अजिबात नाही. जर एका वास्तुज्योतिषाने आपल्याला सांगितले की, घरातील सर्व समस्येवर माझ्याकडे उपाय आहे. अमुक-अमुक यंत्र घरात ठेवले तर घरात सुबत्ता येईल, समृद्धी येईल आणि तसे नाही झाले तर त्याचे प्रत्युत्तर तयार असते. की, हे सर्व पूर्वसंचित आहे. प्राक्तन आहे. नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या सकारात्मक उर्जेपेक्षा प्रभावी आहे.
प्रश्न : शेवटी जाता-जाता आमच्या वाचकांना काही संदेश वगैरे.
उत्तर : दैववादामुळे, कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे आज वैज्ञानिक युग येऊनही माणूस अधिकाधिक मागे चालला आहे. या सर्वांमुळे मानवाची शोषणाविरूद्ध बंड करण्याची नैसर्गिक मानसिकताच संपुष्टात आल्यासारखी वाटते आहे. यामुळे त्याच्या मेंदूचा भेद झाला आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून की काय तो निष्क्रीय बनला आहे, असे वाटते.
आज यासाठीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती या काळ्याबाजारात एक दिशादर्शक बनून आपल्याला वाट दाखवित आहे. या वाईट, चुकीच्या, भ्रामक गोष्टीच्या चक्रीवादळात एक आधारस्तंभ म्हणून उभी आहे.
आज अशा वैचारिक भूमिकेला धरून काम करणार्या सर्व कार्यकर्त्यांना मी यासाठीच धन्यवाद देईन.
याच भेटीबरोबर मगरपट्टा सिटीचे डेव्हलपर्स सतिश मगर यांचीही भेट झाली.
“Architecture means optimum utilization of light & vantilation” & “”Maximum use of place & air”
वास्तुरचना म्हणजे उजेड व हवा यांचा पुरेपूर वापर अन् जागेचा अधिकाधिक उपयोग, आम्ही बांधलेल्या घरात कोणी तोडफोड करायला सांगितली तर आम्ही ती करत नाही व परवानगीही देत नाही. जर या कारणामुळे कोणी घराचा ताबा घेण्यास नकार देत असेल तर आम्ही त्याला घरही विकत नाही. असं मत त्यांनी व्यक्त केलं.
मुलाखतकार : क्रांती पोतदार