Categories
नाट्य-चित्र परिक्षण

हिंदू कोड बिल – एक नाटक

एप्रिल - २०१९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष लेख!

सध्या रंगभूमीवर हिंदू कोड बिल हे नाटक गाजते आहे. हिंदीतील सुप्रसिध्द नाटककार राजेश कुमार यांनी लिहिलेले प्रमोद नवार यांनी अनुवादित केलेले; तसेच संजय खिलारे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक निर्माते मनोहर एस. पवार यांनी आपल्या ‘स्पंदन थिएटर’ तर्फे रंगभूमीवर आणले आहे. आजकाल समाजप्रबोधनपर गंभीर आशय असलेल्या नाटकांना सहसा कोणी हात घालत नाही. मनोरंजनप्रधान, धंदा करतील अशी नाटके निवडली जातात. त्यामुळे मनोहर एस. पवार यांचे या नाट्यनिर्मितीबद्दल अभिनंदनच करायला हवे; शिवाय हे अनुवादित नाटक आहे. अर्थात अनुवादित नाटके मराठी रंगभूमीला नवीन नाहीत; उलट असे म्हणता येईल की, जागतिक दर्जाच्या अनुवादित रुपांतरित नाटकांनीच मराठी रंगभूमी समृद्ध केली आहे. पु. ल. देशपांडे नाटककार म्हणून ओळखले जातात. अर्थात ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. परंतु त्यांनी रुपांतरित केलेल्या नाटकांनीच मराठी रंगभूमी गाजविली आहे. ‘तुझे आहे तुजपाशी’ हे त्यांचे स्वत:चे नाटक सोडले, तर त्यांची सर्व नाटके ही अनुवादित-रुपांतरित केलेली आहेत.

हिंदू कोड बिल हे एक दर्जेदार नाटक आहे. भारतीय समाजातील संस्कृती संघर्षाचे ते प्रतिनिधित्व करते. अर्थात, आपल्या जातिग्रस्त समाजातील कुठल्याही कलाकृतीला एक ‘जातकुळी’ असते आणि प्रेक्षकही त्या जातकुळीला अनुसरूनच वागत असतात. अर्थात, काही कलाकृती या सर्व भेदाभेदांच्या पलिकडे जाऊन यशस्वी होतात. पण सर्वसाधारणपणे आपल्या कलाविश्वात जातकुळीचा प्रश्न असतो. ‘हिंदू कोड बिल’ असे नाव असलेले हे नाटक अपरिहार्यपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी जोडले जाते. कारण या प्रश्नावर जो अटीतटीचा संघर्ष झाला, ज्याच्या केंद्रस्थानी बाबासाहेब होते. त्यामुळे ‘हिंदू कोड बिल’ म्हटले की सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आठवतात. त्यामुळे हे दलित नाटक असावे, अशी एक समजूत रूढ होते आणि या जातकुळीमुळे त्याचा प्रेक्षक ठरतो. अर्थात, हे नाटक तसे नाही. भारतीय स्त्रिया या दलित वर्गातच गणल्या जातात. या अर्थाने पाहिले तर मग हे ‘दलित’ नाटक आहे. कारण हिंदू कोड बिल हे भारतीय स्त्रियांच्या मुक्तिगाथेचा आरंभ आहे.

स्त्री दास्याचा प्रश्न हा कोणा एका देशाचा नाही, तर तो अवघ्या मानवजातीचा आहे. आदिम समाजाच्या विघटनानंतर मानवी समाजाच्या विकासप्रक्रियेत इतर अनेक प्रश्नांसारखाच या प्रश्नाचा जन्म झाला, ज्यामुळे अर्धी मानवसंख्या गुलामीत लोटली गेली. या प्रश्नावर जगभर विपुल लेखन झाले आहे. त्यातून स्त्रीमुक्तीचे तत्त्वज्ञान आकाराला आले आहे. या सर्वांचे सार सांगायचे तर खासगी मालकीच्या उदयाबरोबरच आपल्याला स्त्रीदास्याचा आरंभ आणि पुरुष सत्तेचा उदय झालेला दिसतो. आजही हा प्रश्न संपलेला नाही. आजही त्याची तीव्रता जाणवते. जरी देशोदेशींच्या स्त्रियांना त्यांच्या संघर्षामुळे काही अधिकार मिळाले असले, तरी स्त्रीदास्याचा प्रश्न प्रत्यक्ष व्यवहारात आजही कायम आहे. त्यामुळे हिंदू कोड बिल हे नाटक जरी ऐतिहासिक असले, तरी ते आजच्या वर्तमानकालीन प्रश्नांना भिडणारे आहे. ते आजचेच नाटक आहे.

भारतीयसंदर्भात जेव्हा आपण स्त्रीदास्याचा विचार करतो, तेव्हा आपणास भारतीय तत्त्वज्ञानाच्या संघर्षाचा मागोवा घेणे गरजेचे आहे. हा संघर्ष सनातन वैदिक संस्कृती आणि अवैदिक संस्कृती या स्वरुपात ठळकपणे दिसून येतो. सनातनी वैदिक हे नेहमीच पुरुष सत्तेच्या बाजूने उभे राहिले आहेत. मनुस्मृती त्याचे जिते-जागते उदाहरण आहे, तर अवैदिकांनी नेहमीच स्त्रियांच्या अधिकाराची भूमिका घेतलेली आहे. हाच धागा आपल्याला या नाटकात पाहायला मिळतो. इथे स्त्रियांच्या अधिकारासाठी लढणार्‍या अवैदिक तत्त्वज्ञानांना आधुनिक तत्त्वज्ञानाची जोड मिळाली. पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तत्त्वज्ञानाचे नवे भाष्यकार होते, ज्यामध्ये स्त्री-पुरुष समतेचा नवा विचार पुढे आणला गेला होता. या दोघांबरोबरच देशात उदयास आलेले कम्युनिस्ट पक्ष स्त्री अधिकाराच्या स्त्री-पुरुष समतेच्या बाजूने उभे होते. या पार्श्वभूमीवर आपण ‘हिंदू कोड बिल’कडे पाहिले पाहिजे.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्त्रियांच्या सहभागाची गरज निर्माण झाली. त्या बरोबरीने स्त्रियांच्या अधिकाराचीही चर्चाही सुरू झाली होती. ज्यामुळे 1936 पासूनच हिंदू कोड बिलाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंनी कायदा मंत्री असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे हिंदू कोड बिलाचे काम सोपविले आणि त्यांना आश्वासन दिले की, वाट्टेल त्या परिस्थितीत मी हिंदू कोड बिल पास करून घेईन. त्यासाठी सत्ता गमवावी लागली तर चालेल. प्रकृती बरी नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम अंगावर घेतले. त्यांना माहीत होते की, यातील कायदेशीर तरतुदीमुळे स्त्रियांना दिल्या जाणार्‍या अधिकारांमुळे अजूनही धर्म-रुढींच्या प्रभावाखालील हिंदू समाज मुळापासून हादरेल. खूप मोठा विरोध सनातन्यांकडून होईल. परंतु दलितमुक्ती लढ्याइतके महत्त्व त्यांनी स्त्री मुक्तीच्या प्रश्नाला दिले होते. म्हणूनच हे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि हिंदू कोड बिलाची संहिता तयार केली. अपेक्षेप्रमाणे आगडोंब उसळला. धर्मवादी व्यक्तींनी एकच गदारोळ माजवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळले, त्यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर डगमगले नाहीत. पंडित नेहरूंनी पक्षातील विरोधकांपुढे मान तुकवली; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नावर ठाम राहिले. त्यांनी माघार घेतली नाही. ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही। न मानले बहुमता॥’ या संतश्रेष्ठ तुकारामांच्या बाण्याने त्यांनी आपली संपूर्ण ताकद या हिंदू कोड बिलासाठी उभी केली. हे सर्व पैलू अगदी समर्थपणे या नाटकात उभे केले आहेत. खरे तर हे एक चर्चक नाटक आहे. महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेत चर्चक नाटकाची सुरुवात गो. पु. देशपांडे यांनी केली. नंतर काही हाताच्या बोटावरील सोडली तर ही चर्चक नाटकांची परंपरा गायबच झाली आहे.

‘हिंदू कोड बिल’ हे चर्चक नाटक असले तरी ते केवळ गंभीर चर्चांच्या पातळीवर बेतलेले नाही. या गंभीर चर्चांच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माई आंबेडकर यांच्यातील प्रगल्भ नात्याचा एक भावनिक पदर या नाटकाला आहे. कधी-कधी मध्यबिंदू म्हणून तोच समोर येतो. त्यामुळे केवळ एक सुटी चर्चा, गंभीर चर्चा असे या नाटकाचे स्वरूप बनत नाही, तरीही ते चर्चक नाटक आहे. कारण नाटककाराला ‘हिंदू कोड बिल’च्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री अधिकाराच्या लढ्याला जे महत्त्व दिले ते पुढे आणावयाचे आहे. खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित समजल्या जाणार्‍या समाजात जन्मले. त्यांच्या कामाकडे एका विशिष्ट मर्यादेत पाहण्याची सवय आपल्या जातिग्रस्त समाजाला आहे. त्यामुळे संपूर्ण समाजासाठी, देशासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे, त्याची फार कमी दखल घेतली जाते. त्यांचे अनुयायी त्यांना हितसंबंधांच्या मर्यादेत पाहतात आणि सवर्ण आपल्या सवर्ण मानसिकतेतून बाहेर पडत नाहीत. हिंदू कोड बिलसाठी त्यांनी दिलेला लढा याच स्वरुपाचा होता. त्यासाठी सर्व भारतीय स्त्रियांनी त्यांना सलाम करायला हवा आणि आज पुन्हा जेव्हा धर्मवादी सत्तेवर आहेत, पुन्हा स्त्रियांच्या अधिकारावर आक्रमण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी स्त्रियांच्या अधिकारासाठी लढणारे हे नाटक रंगभूमीवर आणल्याबद्दल लेखक, अनुवादक, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे आभार मानायला हवेत.

या नाटकातून आपल्याला भेटणारे बाबासाहेब खूपच वेगळे आहेत. त्यांच्यातील अस्सल मानवी गुणांचे दर्शन या नाटकातून घडते. सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन उभे राहिलेले निखळ माणूस म्हणून ते आपल्या समोर येतात. त्यांचे विशिष्ट आग्रह आहेत; पण ते देशहिताला समोर ठेवणारे आहेत. एक कुटुंबवत्सल; तसेच आपल्या बरोबर काम करणार्‍या लोकांना समानतेने वागविणारे बाबासाहेब; तसेच आदर्श पती हा स्त्रीचा आदर्श मित्र असतो, याचीही जाणीव करून देणारे बाबासाहेब या नाटकात आपल्याला भेटतात. आपल्या विरोधकांशीही ते अतिशय सहृदयतेने व्यवहार करतात. त्यांच्याबद्दल एकांगी भूमिका घेत नाहीत, चर्चेची भूमिका घेतात. कारण त्यांचा व्यासंग त्यांना आत्मविश्वासाच्या अशा जागी घेऊन जातो की आपण जे करतो आहोत, ते सत्य तर आहेच; पण आपला स्वत:चा म्हणून त्यात तिळमात्र स्वार्थ नाही. त्यांच्या महानतेने अशी उंची आधीच गाठली होती. त्यामुळे हिंदू कोड बिलामुळे ते आणखी महान ठरतील, असे नव्हते. म्हणजे त्यांचा या बिलामागील हेतू सर्व स्त्रियांचे भले व्हावे, त्यांच्या दास्यमुक्तीची सुरुवात ठरावी हाच होता आणि हे सर्व या नाटकातून प्रभावीपणे पुढे आणले गेले आहे.

या नाटकाची कमतरतेची बाजू सांगायची तर अभिनयाची सांगता येईल. कारण कोणतेही ऐतिहासिक पात्र उभे करताना त्या पात्राची जनमानसातील प्रतिमा महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्टेजवर येताना ते छत्रपती शिवाजी महाराज वाटले पाहिजेत. त्यांची जी जनमानसातील प्रतिमा आहे, ती उभी राहिली पाहिजे. तीच गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लागू आहे. स्टेजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्तिमंत उभे आहेत, अशी भावना होणे गरजेचे आहे. त्यामुळे वैचारिक पातळीवरील प्रगल्भ आशय प्रेक्षकांना त्वरित जाऊ शकतो. कला शेवटी पुनर्प्रत्ययाचा आनंद देणारी असते. आपल्या मनातील अमूर्त प्रतिमेला आणि आशयाला ती जिवंत स्वरूप देते. ज्यामुळे आपण एकतर त्या पात्राच्या जागी आपणास पाहू शकतो अथवा त्या पात्रात विलीन होऊन जातो. ऐतिहासिक नाटकाच्या जागी ती गोष्ट पाळली गेली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर अशी पात्रे उभी करताना ही काळजी घेतली गेली पाहिजे.

असे असले तरी दिग्दर्शक संजय खिलारे यांनी हे नाटक खूप छान बसवलेले आहे. प्रत्येक प्रसंग चढत्या भाजणीने मनात ठसत जातो. सहजपणे नाट्य रंगत जाते. शिवाय या नाटकाचा अभिनय करणारा संच नवखा म्हणावा, असा आहे. मोठ्या नाटकाचा त्यांना फार अनुभव नाही, तरी ते खूप ताकदीने हे नाटक पेलतात, खूप कष्ट घेतात. त्यामुळे प्रत्येक प्रयोगागणिक त्यात सुधारणा होत आहे. तरी दिग्दर्शकाने अभिनयाच्या पातळीवर आणखी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण नाट्यमय घडामोडी नसलेले चर्चक नाटक हे अभिनयाच्या आणि आशयाच्या जोरावरच उभे राहते, याचे भान ठेवले पाहिजे.

आजवर मराठी रंगभूमीला अनेक उत्तमोत्तम नाटकांनी समृद्ध केले आहे. भारतीय स्त्रियांच्या मुक्तिगाथेच्या आरंभाची कथा सांगणारे हिंदू कोड बिल हे नाटक या समृद्धीत नक्कीच भर घालणारे आहे.