Categories
युवा मानस

ईगो : जनातला आणि मनातला

ऑक्टोबर - २०१९

मानसशास्त्रातील काही संज्ञा आपल्या बोलीभाषेत चांगल्याच रुजल्या आहेत. बोलीभाषेत रुजण्याचे भाग्य ज्या थोड्याबहुत मानसशास्त्रीय संज्ञांना लाभले आहे, त्यात ईगोचा नंबर फार वरचा लागेल. आपल्या दैनंदिन वापरात अनेक वेळा ‘ईगो’ येतो. ‘त्याला जरा ईगोचा प्रॉब्लेम आहे’, ‘अमक्या-तमक्याच ईगो खूप स्ट्राँग आहे’ अशी वाक्ये आपण बोलताना सहजी वापरतो. इथे आपण ‘ईगो’ हा शब्द ‘अहंभाव’ अशा अर्थाने वापरतो. प्रत्यक्षात मानसशास्त्रातील ‘ईगो’ या बोलीभाषेतील ‘ईगो’पेक्षा वेगळा आहे. मानसशास्त्रातील ईगोची संकल्पना मुळातूनच समजून घेण्यासारखी आहे. मानसशास्त्राचा जनक मानला जाणार्‍या सिग्मंड फ्रॉईडने ‘ईगो’ ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. मानवी मनाचे त्याने तीन महत्त्वाचे भाग सांगितले. ‘ईड’, ‘ईगो’ व ‘सुपरईगो.’ व्यक्ती म्हणून स्वत:ची जडणघडण कळण्यासाठी हे प्रत्येक माणसाने समजून घेतले पाहिजे.

‘ईड’ हा मानवी मनाचा अगदी आदिम भाग मानला जातो. त्यामध्ये मनात निर्माण होणार्‍या इच्छा, वासना, भावनांचे तात्काळ समाधान व्हावे, अशी अपेक्षा असते. कोणत्याही स्वरुपाची दिरंगाई या ‘ईड’ला मान्य नसते. तात्काळ समाधान व आनंद या दोनच तत्त्वांवर हा मनाचा भाग काम करतो. जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात या ‘ईड’चे प्राबल्य असते. जगाशी बहुतांश संपर्क हा आईच्या माध्यमातून होत असल्याने हे चालून जाऊ शकते. जेव्हा स्वत:च जगाशी घडामोडी करण्याची वेळ येते, तेव्हा तात्काळ समाधान व फक्त आनंद हे तत्त्व चालू शकत नाही. वास्तवाचे भान येणे आवश्यक असते व मानवी मनाला वास्तवाचे भान देणारा जो भाग तयार होऊ लागतो, त्याला मानसशास्त्रात ‘ईगो’ असे म्हणतात. आपल्या आजूबाजूच्या वास्तवाशी होणार्‍या परस्परसंबंधांतून ईगो हळूहळू वाढत असतो. उदा. आईने आत्ताच्या आत्ता माझ्याजवळ येऊन माझी अस्वस्थता शांत करावी, अशी जर ‘ईड’ची इच्छा असेल, तर ‘ईगो’ त्याला हे दाखवून देतो की, आई आता कामात आहे आणि आता तिला बोलावल्यास कदाचित ती चिडेल. म्हणून आपण आता स्वत:ची चिंता स्वत: हाताळलेली बरी! म्हणजेच आपल्या मनातील क्रोध, काम, मोह, मत्सर अशा सर्व प्राणिमात्रांच्या जवळ जाणार्‍या भावभावना व मानवी समाज म्हणून आपले अस्तित्व त्यांच्यामध्ये मध्यस्थाचे काम ‘ईगो’ करत असतो. मला कोणाचा राग आला आणि त्याला मारावेसे वाटले, तर ‘ईगो’ म्हणतो ‘थांब’ आता त्याच्याबरोबर चार मित्र आहेत. उगाच स्वत: ‘मार खाशील’ मला एखादी मुलगी/मुलगा आवडला व वाटले ताबडतोब हिच्याशी/याच्याशी लग्न करावे. ‘ईगो’ म्हणतो ‘विचार कर!’ तुझे आताचे वास्तव व सामाजिकता याला अनुकूल आहे का? आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचा अंदाज घेणे व परिस्थितीशी जुळवून घेणे या मानवी जीवनातील दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी हा ‘ईगो’ करतो.

आपल्या बोलीभाषेतला ‘ईगो’ हा व्हिलन असला, तर मानसशास्त्रातील ‘ईगो’ हा हिरो आहे. आपण खरे तर मित्र-मैत्रिणींना सल्ला देतो. ‘तुझा ईगो जरा कमी कर, नाही तर गोत्यात येशील.’ म्हणजे आपल्याला म्हणायचे असते अहंभाव कमी करा. मानसशास्त्रीय भाषेत सांगायचे झाले, तर कौन्सिलिंग असो, सायकोथेरपी अथवा व्यक्तिमत्त्व विकास; सगळ्या गोष्टी या ईगोची निगराणी करून त्याला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करतात. कारण ‘ईगो’ जितका बळकट, तितके वास्तवाचे भान बळकट, तितके परिस्थितीशी जुळवून घेण्याचे कौशल्य अधिक!

समाजाच्या नीतिनियमांचे आपल्याला भान देणारा आणखी एक भाग ईगोतूनच प्रकट होत असतो. ‘सुपरईगो.’ ‘ईगो’ जर मला एखाद्याचा राग आल्यावर त्याच्याबरोबर चार मित्र आहेत म्हणून वास्तवाचे भान असेल, तर ‘सुपर ईगो’ अहिंसा सांगतो. प्रत्येक माणूस स्वत:च्या मनात राग आल्याने दुसर्‍याला मारू लागला, तर समाज चालणार नाही. ही समज ‘सुपर ईगो’ देतो. सुरुवातीच्या आयुष्यात पालक व नंतरच्या आयुष्यात आपले आदर्श, त्यांनी अंगी बाणवलेल्या मूल्यांच्या प्रभावातून ‘सुपर ईगो’चा जन्म होतो. ‘ईगो’ची निगराणी महत्त्वाची; पण ‘सुपर ईगो’ची निगराणी तर त्याहूनही महत्त्वाची. कारण ‘ईगो’ फक्त व्यावहारिक संदर्भ शिकवतो. जर आपली ताकद जास्त असेल, तर समोरच्या माणसाचा राग आल्यावर व्यावहारिक अंदाज घेऊन ‘ईगो’ कदाचित हात उगारण्याची परवानगी देईलही; पण ‘सुपर ईगो’ उन्नत विचार करतो. त्याला योग्य-अयोग्याचे प्रश्न पडतात. तो मानवी मनाची नैतिक बाजू सांभाळतो.

फ्रॉईडच्या या मांडणीला शंभरापेक्षा जास्त वर्षेहोऊन गेली; पण मानसशास्त्रीय ‘ईगो’ या संकल्पनेचे महत्त्व आजही तितकेच आहे किंवा वाढले आहे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. आजचे आधुनिक मेंदूविषयक संशोधनदेखील बरेचसे त्याच गोष्टी सांगते. ते ‘ईड’ला भावना म्हणते, ‘सुपर ईगो’ला विचार आणि ‘ईगो’ला जीवनकौशल्ये, निर्णयक्षमता, प्रश्न सोडविण्याची क्षमता, आस्था, संवादकौशल्य, स्वत:ची जाणीव, भावनांवर ताबा ठेवण्याचे कौशल्य अशी इतरही अनेक जीवनकौशल्ये आहेत, जी खरे तर ‘ईगो’चेच काम करतात. आनंदाची गोष्ट अशी की, एक चांगली व्यक्ती व संवेदनक्षम, कृतिशील नागरिक होण्यासाठी या जीवनकौशल्यांची वाढ व जोपासना जाणीवपूर्वक करता येते. हे करण्यातूनच तुमच्या-आमच्या ‘मनातला’ ईगो कमी होतो. स्वत:च्या ‘ईगो’ची निगराणी कशी करता येते. त्याविषयी पुढच्या भेटीत…