Categories
फसवे विज्ञान

केंद्रिय शिक्षणमंत्र्यांची डिजिटल अंधश्रद्धा

ऑक्टोबर - २०१९

भारत सरकारच्या मानव संसाधन (एच. आर. डी.) मंत्रालयाच्या वेबसाईटवर उच्च शिक्षणाच्या सर्व संस्थांनी भारतात नवज्ञानाच्या निर्मितीवर भर द्यावा व विद्यार्थी संशोधनाचा भुकेला व नव संकल्पनांचा निर्माता व्हावा या अनुषंगाने भारतातील शिक्षणाची दिशा असावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे व ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019’ च्या पहिल्याच पानावर ‘भारताचे शैक्षणिक धोरण हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने व्हावे व भारत हा ज्ञानपूर्ण समाज व्हावा,’ असे ध्येय दिलेले आहे. याचसाठी येत्या काळात भारतात एक राष्ट्रीय संशोधन संस्था असावी व तिचे वार्षिक बजेट वीस हजार कोटींच्या आसपास असावे; जेणेकरुन भारतातील संशोधन जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल.

अतिशय महत्त्वाचे व भारतातील लोकांचे जीवन नियंत्रित करणारे मानव संसाधन मंत्रालय हे एक महत्त्वाचे मंत्रालय आहे; पण गेल्या काही वर्षांत या मंत्रालयाचे मंत्री अवैज्ञानिक व अंधश्रध्देला पूरक विधाने करताना दिसत आहेत. देशाच्या वेगवेगळ्या उच्च व विद्यापीठ शिक्षणाच्या धोरणांच्यामध्ये वारंवार हे सांगण्यात येते की, भारतात संशोधनाचे नवे युग आणायचे आहे, गुणवत्तापूर्ण संशोधन करण्याबरोबरच भारताचे संशोधन जागतिक पातळीवर टिकेल व जागतिक संशोधनात भारताची मान उंचावेल, असे धोरण एका बाजूला सरकार आखत आहे; तर दुसर्‍या बाजूला या विभागाचे मंत्रीच एका मागून एक धडाधड अवैज्ञानिक व संशोधनाला मारक विधाने करत आहेत. एवढेच नाही, तर त्यांची ही विधानं देशात अंधश्रध्दा वाढवण्यासाठी मदत करत आहेत. माजी मनुष्यबळ खात्याचे मंत्री आणि मुंबईचे माजी पोलीस कमिशनर असे म्हणाले की, ‘डार्विनचा सिद्धांत चुकीचा आहे आणि माणूस माकडापासून जन्माला आला, हे सत्य नाही. आपल्या पूर्वजांनी माणसाला माकडापासून विकसित किंवा उत्क्रांत होताना पाहिलेले नाही. त्यामुळे डार्विनचा हा सिद्धांत भारतीय संस्कृतीच्या विरोधी असून तो शाळा-कॉलेजमध्ये शिकवणे बंद केले जावे.’ मनुष्य कसा जन्माला आला, याचे जगात वेगवेगळ्या धर्मांनी वेगवेगळे सिध्दांत मांडले आहेत. गेल्या हजारो वर्षांपासून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम सुरू आहे. याबद्दल वेगवेगळी गृहितकं मांडली आहेत. आधुनिक विज्ञानाच्या विकासानंतर आता मनुष्य नेमका कसा जन्माला आला, याचे नेमके उत्तर मिळत आहे आणि यात डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिध्दांताचा सिंहाचा वाटा आहे; पण आमच्याकडील सिध्दांतच बरोबर आणि वैज्ञानिक सिध्दांत खोटे असे म्हणायचे किंवा मग ते जे म्हणत आहेत ते अगोदरच आमच्या ग्रंथात व धर्मात सांगितले आहे, त्यांनी आमचाच सिध्दांत चोरला आहे, असे म्हणायचे.

गेल्या काही वर्षांमध्ये अशी विधानं करण्यात सरकारी मंत्र्यांची किंवा शासनकर्त्यांची संख्या वाढली आहे. याचाच पुढचा भाग आत्ताचे देशाचे मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी गेल्या काही दिवसांत चालू केला आहे. त्यांची काही विधानं व विज्ञानाबद्दलची मतं याने भारताच्या शिक्षण व संशोधन व्यवस्थेपुढे संशोधनाला आवश्यक असलेल्या सत्यतेवर व निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या देशाचे मनुष्यबळ विकास मंत्री हे अगोदर आर. एस. एस. च्या सरस्वती शिशुमंदिर या शाळेत एक शिक्षक होते. नंतर त्यांनी पीएच. डी. सुध्दा केली आहे. भारतात सर्व ज्ञान होते आणि भारताला जगापासून काही शिकण्याची गरज नाही, तर जगानेच भारताकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. भारतीयांचे अधिक नुकसान हे युरोपीय आधारित आधुनिक विचारांच्यामुळे; तसेच गेल्या सत्तर वर्षांत देशाचे शैक्षणिक धोरण पाश्चात्य विचारांशी पाईक राहिल्यामुळे झाले आहे, या आर. एस. एस.च्या विचारांचे पोखरीयाल हे एक शिष्य आहेत. त्याचा पुढचा भाग म्हणजे प्राचीन भारतात आजचे आधुनिक म्हणवले जाणारे सर्व शोध लागले होते. विमान, रसायनशास्त्र, अणुसंशोधन, शस्त्रक्रिया व आधुनिक वैद्यकशास्त्र यामधील आज मान्यता पावलेल्या सर्व गोष्टी भारतात यापूर्वीच होत्या. भारतीयांनी अगोदर आपल्या भारतीय ज्ञानाची चांगली ओळख करून घ्यावी व त्यांनी याचा अभिमान बाळगावा आणि नवीन भारतीय युगात या सर्व गोष्टी ज्ञान म्हणून शिकाव्यात हा याचा पुढील भाग. ‘भारतात सर्व होते,’ हे वाक्य तर गेल्या काही वर्षांपासून भारतातील उच्च व शालेय शिक्षणाचे ब्रीदवाक्यच झाले आहे आणि या वाक्याची मोहिनी देशाचे पंतप्रधान ते शिक्षण खात्याचे मंत्री ते अगदी काही वेळेला काही शास्त्रज्ञांवरसुध्दा दिसते.

पोखरीयाल यांनी या खात्याचे मंत्री झाल्यावरच नाही, तर या अगोदर सुध्दा अशी विधानं केली आहेत. मागे एकदा लोकसभेत भारतीय स्थापत्य संस्थांच्या कायद्याच्या चर्चे दरम्यान ते म्हणाले होते की ‘वास्तुशास्त्राच्या समोर विज्ञान ही अतिशय क्षुल्लक गोष्ट आहे आणि वास्तुशास्त्र हे विज्ञानाच्या खूप पुढे आहे किंवा वास्तुशास्त्रच विज्ञान आहे.’ आणि हे विधान त्यांनी लोकसभेत केले होते. ‘कणाद ॠषींनी अणुचाचणी हजारो वर्षांपूर्वीच घेतली होती,’ हे त्यांचे आणखी एक विधान; तसेच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत पोखरीयाल यांनी ‘रामाने पहिले विमान उडवले’ असे विधान केले होते. दिल्लीत आर.एस.एस.च्या कार्यक्रमात बोलताना ‘गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या ग्रंथात आहे.’ इतकेच नव्हे, तर ‘संपूर्ण फिजिक्सचा पाया असणार्‍या अ‍ॅटम आणि मॉलिक्यूल ही संज्ञाही ॠषी प्रणव यांची’ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या विधानांच्या मालिकेतील त्यांची आयआयटी मुंबई व आयआयटी खरगपूर येथील सध्याची विधाने आहेत. त्यांनी आता नासाच्या हवाल्याने असे विधान केले की, ‘नासा’ने सुध्दा असे सांगितले आहे की, संस्कृत ही एक वैज्ञानिक भाषा आहे आणि जर भविष्यात बोलणारे संगणक तयार झाले, तर ते फक्त संस्कृत भाषेत होतील. कारण संस्कृत ही जगातील एकमेव अशी भाषा आहे, जी जशी लिहिली जाते, तशीच बोलली जाते. चरक ॠषींनी अणू आणि परमाणूचा शोध लावलेला आहे आणि राम सेतू हा जगातील वास्तुकलेचा एक अलौकिक नमुना आहे,’ असे म्हटले आहे.

पोखरीयाल यांनी ‘नासा’च्या नावाने संस्कृत भाषेसंबंधात जे विधान केले आहे, ते चुकीचे आहे किंवा खोटे आहे. ‘नासा’ने संस्कृत भाषेचा असा कोणताही अभ्यास केला नाही किंवा बोलणारे संगणक बनवण्यासाठी संस्कृत उपयोगी पडेल, असे म्हटलेले नाही. यावरून वाद झाल्यावर पोखरीयाल यांनी एका प्रसिद्धिपत्रकातून असे सांगितले आहे की, त्यांचे विधान अमेरिकेच्या नासा संस्थेतील रीक ब्रिग यांच्या संशोधन निबंधावर आधारित आहे. ते असे म्हणतात की, ‘नासा असे म्हणते असे मी म्हणालोच नाही.’ पण पोखरीयाल यांचा या भाषणाचा व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. तो पाहिला तर लक्षात येते की, त्यांनी ‘नासा’च्या नावानेच वरील विधान केले आहे. त्यांनी आपल्या भाषणात ‘नासा’नेही संस्कृत भाषेची महानता मान्य केली आहे व बोलणारे संगणक संस्कृत भाषेत शक्य आहे,’ असे म्हटले आहे. रीक ब्रिग यांनी 1986 साली लिहिलेल्या आपल्या एका पेपरमध्ये नैसर्गिक भाषा ही एक कृत्रिम भाषा असू शकते आणि संस्कृत अशा भाषांपैकी एक आहे, असे म्हटले आहे. वाक्याचा अर्थ लावण्यासाठी युरोपीय पध्दत आणि संस्कृत पध्दत यांची त्यांनी तुलना करून वाक्याचा अर्थ संस्कृत भाषेत अधिक चांगल्या पध्दतीने लागतो, असे मत मांडले आहे; पण ब्रिग यांनी जी पध्दत अवलंबली आहे, तिचा वापर केला तर भारतातील संस्कृतच नव्हे तर सर्वच भाषांत अर्थ लावण्याची हीच पध्दत आहे, हे सिध्द होईल. त्यांनी त्यांच्या संशोधन निबंधामध्ये कोठेही संस्कृत ही एकमेव वैज्ञानिक भाषा आहे आणि याच भाषेत बोलणारे संगणक शक्य होतील, असे म्हटलेले नाही. रीक ब्रिग यांचा हा निबंध संस्कृत भाषेचे अभ्यासक नागेश भट्ट यांच्या पुस्तकांच्यावर आधारित आहे. ब्रिग यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी जी पध्दत अवलंबली आहे, तिचा उपयोग करून भारतातील जवळपास सर्वच भाषा संस्कृतसारख्या आहेत, असे म्हणता येईल.

भाषा म्हणून संस्कृत ही जगातील एक प्राचीन भाषा आहेच. प्राचीन भारतीय ज्ञान आणि माहिती संस्कृत भाषेतील ग्रंथांत उपलब्ध आहे; पण म्हणून जगातील सर्व काही याच भाषेत उपलब्ध आहे आणि यापेक्षा कोणतीही भाषा वैज्ञानिक नाही, असे म्हणता येणार नाही. मुळात एखादी भाषा वैज्ञानिक असते किंवा अवैज्ञानिक असते, असे म्हणता येणार नाही. पोखरीयाल यांचे संस्कृत भाषेबद्दलचे हे विधान आता आले, याला आधार आहे भारतातील काही विशेष मोहिमा. हल्ली या मोहिमा सोशल मीडियावरून चालवल्या जातात. उदा. पोखरीयाल यांच्या विधानाचा संबंध 2015 मध्ये 15 ऑगस्ट या दिवशी ञ्च्ळपवळररपर्विीेीव या ‘हॅशटॅग’वर असाच एक मेसेज फिरत होता, त्याच्याशी जोडता येईल. हजारो लोकांनी याला ‘टॅग’ केले होते. यावर संस्कृत ही भाषा संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा आहे आणि याचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि तुम्हाला असला, तर ‘टॅग’ करा असा तो मेसेज होता. याचा आधार सुध्दा असाच एक खोटा मेसेज होता. फोर्बस मासिकाच्या 1987 सालच्या एका अहवालानुसार संस्कृत ही संगणकासाठी एकमेव योग्य भाषा आहे, हे सिध्द झाले आहे असा एक दुसरा मेसेज याचदरम्यान सोशल मीडियावर फिरत होता. ‘नासा’च्या नावाने आणखी एक बातमी गेल्या काही वर्षांपासून फिरत असते की, ‘नासा’ने रामसेतू हा मानवनिर्मित आहे, हे जाहीर केले आहे आणि हे बांधकाम पावणेदोन लाख वर्षांपूर्वीचे आहे, हे सिध्द झाले आहे. या मेसेजची एवढी चर्चा झाली की, शेवटी ‘नासा’ला हे जाहीर करावे लागले की, आम्ही असे काही जाहीर केलेले नाही. ‘सोशल मीडिया देशात माहिती देत नाही, तर संपूर्ण देशात वेगवेगळे भ्रम निर्माण करतो,’ असे मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पत्रकार रवीश कुमार यांनी नुकतेच त्यांच्या भाषणात सांगितले, ते काही खोटे नाही. अधिक भर म्हणून अशा मेसेजबरोबर राष्ट्रीयत्वाच्या अभिमानाची किंवा भारतीय परंपरांच्या अभिमानाची एक ‘टॅग लाईन’ असतेच असते.

सध्या आपल्या देशात डिजिटल अंधश्रध्दांचे एक युग चालू झाले आहे. त्याची सुरुवात ‘गणपती दूध पितो’ या पहिल्या डिजिटल अंधश्रध्देच्या मेसेजपासून झाली. यात नंतर अशा हजारो अंधश्रध्दांची भर पडत गेली. आपल्या विरोधकांबद्दल गैरसमज पसरवणे, त्यांच्या नावाने राष्ट्रविरोधी मेसेज पसरवणे, त्यांची जनमानसात बदनामी करणे, पुरोगामी व समाजपरिवर्तनाच्या चळवळींना बदनाम करणे, त्यांच्याबद्दल चुकीचे मेसेजेस पसरवत राहणे, महात्मा गांधींपासून ते गौरी लंकेश यांच्या खुनांचे गैरमार्गाने समर्थन करत राहणे आणि सतत खोट्या बातम्या पसरवायच्या असल्या डिजिटल अंधश्रध्दांनी भारतीय सामाजिक अवकाश व्यापला आहे. तो इतका भयानक आहे की, बघता-बघता एखाद्या गावात प्रचंड मोठी दंगल पसरवली जाऊ शकते, एखादे राज्य जातीच्या आणि धर्माच्या भांडणांच्या रणांगणात परावर्तित होते. ‘मुले लुटणारी टोळी आली आहे,’ असे मेसेज ‘व्हायरल’ झाल्यामुळे महाराष्ट्र आणि बिहार राज्यात मागील वर्षात वीसएक लोकांचे जीव गेले आहेत. संगणक, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, किंवा इतर सोशल मीडियावरून देश, परंपरा, धर्म, भाषा याबद्दल असले काहीतरी खोटे दावे प्रसिध्द करायचे आणि त्यालाच सत्य म्हणून मान्यता मिळते. गोबेल्स म्हणाला होता, एक असत्य हजार वेळा सांगा, ते सत्य होईल. डिजिटल युगात एक असत्य हजार लोकांनी ‘फॉरवर्ड’ केले की, ते सत्य होते. हा डिजिटल गोबेल्स आहे. सत्याला असत्य आणि असत्याला सत्य करण्याची ‘किमया’ यात आहे. वर्षभर एखादी गोष्ट सोशल मीडियात फिरत राहिली की, देशाचे शिक्षणमंत्रीही यालाच सत्य मानायला लागतात. सत्याची चाड असलेल्या आपल्या या देशात असत्याचा एवढा बोलबाला विवेकाला आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोनाला मारक आहे. देशात निर्माण होणार्‍या या डिजिटल अंधश्रध्दा येत्या काही वर्षात उग्र रूप धारण करतील, असे वाटते. दुर्दैवाने सरकार नावाची यंत्रणा यावर काहीही उपाय करताना दिसत नाही, हे याचे पुढचे दुर्दैवी स्वरूप आहे.