Categories
कायदा

जादूटोणा विरोधी कायदा मंजुरी निर्धार मोहीम

जानेवारी - २०१४

जादूटोणा विरोधी कायदा मंजुरी निर्धार मोहीम ही मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला महाराष्ट्राच्या सामाजिक इच्छाशक्तीचे पाठबळ देण्यासाठी राबविली गेली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना क्रांतीदिनी 8 ऑगस्ट 1989 ला झाली. सर्वत्र जादूटोणा, करणी, भानामती, देवी अंगात येणे, भुताने झपाटणे, बुवाबाजी, नरबळी या अनिष्ट, अमानुष, अघोरी बाबींची चलती होती. दुसर्‍या बाजूला लोकांचं अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा यात जखडलेलं समाज मन. अशावेळी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून डॉक्टरी पेशा करणारे नरेंद्र दाभोलकर यांना दवाखान्यातून आपण दिवसागणिक किती पेशंट तपासून बरे करू त्यापेक्षा एकूण ग्रासलेल्या समाजावरच उपचार करण्याची निकड दिसून आल्याने त्यांनी अंनिस चळवळीची सुरवात केली. एकूण समस्यांचे स्वरूप लक्षात घेता प्रचलित कायदे या कामासाठी कमी पडतात म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कार्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज लक्षात घेऊन त्यातील तज्ञ जबाबदार व्यक्तींना सोबत घेऊन महाराष्ट्र शासनाने तसा कायदा करावा म्हणून सुरवातीपासूनच पाठपुरावा सुरू केला. सतत 18 वर्षेपाठपुरावा करूनही या ना त्या कारणाने कायदा करण्यास शासनाने वेळकाढू भूमिका घेतली. तरीपण डॉक्टर हिम्मत न हारता संयमाने निर्धारपूर्वक शासनाकडे पाठपुरावा करीत राहिले. डॉक्टरांना कायद्यासाठी शहीद व्हावं लागलं त्यानंतर जो जनप्रक्षोभ उसळला त्यामुळे शासनाने जादूटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम लागू गेला तो 180 दिवसांच्या आत दोन्ही सभागृहात अधिवेशनात चर्चेला घेऊन मंजूर होणे गरजेचं होतं. शासनाने तशी भूमिका घेतली होती.

उलट विरोधकांनी विरोधाची तीव्रता वाढवली होती अशावेळी याच अधिवेशनात कायदा झाला तर होऊ शकतो अन्यथा अशक्य. त्यामुळे अंनिसने 20 ऑक्टोबर रोजी डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्या पुलावरूनच “चला विवेकाचा आवाज बुलंद करू या” हे अभियान 20 नोव्हेंबर 2013 पर्यंत राज्यभर राबवण्याचे जाहीर केले. पुढे 20 डिसेंबर पर्यंत त्याची मुदत वाढवली. परंतु एवढ्यावर भागणार नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छा शक्तीला महाराष्ट्रातील सामाजिक इच्छा शक्तीचे बळ देण्यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबर 2013 पासून ते 6 डिसेंबर 2013 डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनादरम्यान महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून “जादूटोणा विरोधी कायदा मंजुरी निर्धार मोहीम” सुरू करण्याचा निर्णय पुण्याच्या राज्य कार्यकारिणीत घेतला. सात गु्रपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांतून ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली.

दि.14 नोव्हेंबर 2013 रोजी नागपूर येथील सेवादल शिक्षण संस्थेच्या सहकार्याने सेवादल महाविद्यालयाच्या सभागृहातून मा.केशवराव शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात झाली. दि.15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा हा पहिला गु्रप अविनाश पाटील, माधव बावगे, गजेंद्र सुरकार यांनी पूर्ण केला. दि.20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर हा दुसरा गु्रप मिलिंद देशमुख, हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, संजय बनसोडे यांनी पूर्ण केला. दि.22 ते 25 नोव्हेंबर 2013 दरम्यान कोकण विभागातील सिंधुदूर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे हा तिसरा गु्रप नितीन राऊत, मुक्ता दाभोलकर, नंदकिशोर तळाशीलकर यांनी पूर्ण केला.

दि.26 ते 28 नोव्हेंबर 2013 दरम्यान बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ हा विदर्भाचा उर्वरित भाग गु्रप क्र.4 चे माधव बावगे, शहाजी भोसले, गजेंद्र सुरकार यांनी पूर्ण केला. दि.26 ते 29 नोव्हेंबर 2013 दरम्यान उत्तर महाराष्ट्रचे नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार हा भाग गु्रप 5 चे डॉ.हमीद दाभोलकर, विनायक सावळे, ठकसेन गोराणे यांनी पूर्ण केला. दि.3 ते 6 डिसेंबर 2013 दरम्यान मराठवाड्यात 6 व्या गु्रपचे मिलिंद देशमुख, शहाजी भोसले यांनी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली तर आठव्या गु्रपचे अविनाश पाटील, माधव बावगे, हमीद दाभोलकर यांनी बीड, उस्मानाबाद, लातूर दौरा केला. दि.6 डिसेंबर 2013 रोजी जि.प.यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार कपील पाटील यांचे अध्यक्षतेखाली परिषदेचा समारोप झाला. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यक्रमासाठी शाम निलंगेकर यांनी समारोपाच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या मोहिमेत जवळपास 1,00,000 लोकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे महाराष्ट्रातून पाठवण्यात आले. याच दरम्यान अ‍ॅक्ट नाऊ वेब मोहीम महाराष्ट्र अंनिसतर्फे सुरू करण्यात आली. यासाठी डॉ.शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त अतिष दाभोलकर यांनी पुढाकार घेतला. त्यावर मिस कॉलने 26000 पेक्षा जास्त व वेबसाईटवर 2000 पेक्षा जास्त पाठींब्यांच्या सह्या कायदा होईपर्यंत मिळाल्या त्यात सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे 600 शास्त्रज्ञांनी आणि 2500 वारकर्‍यांनी सह्या देऊन पाठींबा दर्शविण्यात आला. चळवळीच्या दृष्टीने ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. या मोहिमेत जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक मेहनत घेऊन परिषदांचे नियोजन केलेले होते. सर्वच ठिकाणी, पुरोगामी परिवर्तनवादी पक्ष संस्था, संघटना, चळवळी, समविचारी सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेऊन आपला सक्रीय पाठींबा व सहभाग दर्शविला. एकूण सर्वच ठिकाणी प्रिन्ट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी भरभरून साथ दिली. त्याचबरोबर ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी कायद्यासाठी मदत केली त्या सर्वांचे चळवळीच्या वतीने हार्दिक आभार!

माधव बावगे

मोबा.9422469564