Categories
अभियान

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठीजळगाव जिल्ह्यात तरूणांची सायकलफेरी

जानेवारी - २०१४

20 ऑगस्ट उजाडला अनपेक्षितपणे. दाभोलकरांच्या खुनाची बातमी आली. ससूनला पोचलो. या अवस्थेत ‘रडायचं नाही, भिडायचं आता’ हा आवाज आतून आला. अशातच पुणे येथे राज्यकार्यकारिणीची बैठक झाली. जादूटोणा विरोधी कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे व्हायलाच हवा. यासाठी सार्‍यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे ठरविले. आणि जळगाव जिल्ह्यात डिसेंबर मध्ये ठरविलेली सायकल फेरी, कायदा लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि पाठींबा मिळविण्यासाठी काढली तर असा विचार आला. बैठक संपल्यानंतर राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी यांना विचारले ते म्हणाले, ‘करू या.’

म.अं.नि.चे जळगाव कार्याध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, सचिव प्रा. डी.एस. कट्यारे, राष्ट्र सेवा दल जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल लोहार, चंद्रकांत चौधरी यांच्याशी बोलून राष्ट्र सेवा दल व म.अं.नि.स.जळगाव जिल्ह्याच्या वतीने 15 दिवसाचा प्रवास असलेली ‘चला आवाज विवेकाचा बुलंद करू या.’ जिल्हास्तरीय सायकल फेरी निश्चित झाली. 22 नोव्हेंबर 2013 चाळीसगाव येथून प्रथम 18 युवक-युवती 15 दिवसांच्या सायकल फेरीस निघण्याचे ठरले. फेरीत येणार्‍या अडचणींना न भिता फेरी निघाली.

सकाळी 11-30 वाजता सायकल फेरीतील तरूणांना अविनाश पाटील यांनी सदिच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘तुम्ही पंधरा दिवस जादूटोणा विरोधी वटहुकुम लोकांपर्यंत पोहचवून पाठींबा मिळविणार आहात. तो कायदा काय आहे. त्या बद्दल अपप्रचार काय आहेत. हे लोकांपर्यंत पोचवताना तुमचा अनुभव समृद्ध करण्यासाठी प्रबोधनाच्या कार्याबरोबरच आनंद घ्या. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय देशमुख यांनी सद्कामना देऊन ध्वज दाखविला. शहरातील तीन चौकात कायद्याचे चित्रमय प्रदर्शन लावून रहावयाचे असे ठरले होते. त्या प्रमाणे प्रथम चौकात गेलो. घोषणा दिल्या. कायदा प्रदर्शन बघायला लोकांनी गर्दी केली. आम्ही सारे खूष. मग दुसर्‍या चौकात, बसस्थानकात थांबलो.

जळगाव जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सायंकाळी पोहचणं-सकाळी शहरात, शाळा, ज्युनिअर कॉलेज व चौकात गाणी, घोषणा व पथनाट्य या माध्यमातून लोकांशी संवाद चर्चा. या संवादात प्रश्न विचारायची. निशस्त्र माणसावर विचार मान्य नाही म्हणून गोळी घालून खून करणं चूक की बरोबर? समूहातून उत्तर मिळायचं ‘चूक.’ या संवादात पाचोरा येथे एक गृहस्थ अहिराणी भाषेत म्हणाले, ‘त्या मगं कोणले बी मारतीन’ असे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचे, साने गुरूजीच्या विचारांचे काम झाले पाहिजे. हे मनापासून सांगून मदत पेटीत जवळचे रू.10 टाकले. कार्यकर्तेबघत राहिले त्याच्या प्रामाणिक भूमिकेने कृतज्ञ वाटले.

जामनेर येथे 9 ते 12 वी या वर्गातील जवळपास 2000 मुला-मुलींसमोर पथनाट्य सादरीकरण झाले. सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तरे घेतली एका 10 वी तील मुलीने प्रान विचारला, धर्माच्या नावाने धर्माचं भलं होतं का? सर्वच संवेदनशील स्त्री-पुरूषांना पडणारा हा प्रश्न. याचे उत्तर मुलां-मुलींनाच विचारले त्यांच्याकडून आलेले उत्तर. ‘जो धर्म माणूस आणि माणुसकी मारण्याचं शिकवतो त्याला धर्म म्हणताच येत नाही. यामुळे कुठल्याही धर्माचं भलं होऊ शकत नाही.’

मुलांनी दिलेलं उत्तर धर्माची संत-समाजसुधारकांनी केलेली चिकित्सा होती. दुसर्‍या धर्माचा द्वेष करून धर्म वाढत नाही तर तो वेदनादायी ठरतो हे वास्तव समजवून घ्यायला आपल्याला अजून किती काळ जाईल असा विचार आमच्या समूहात सुरू झाला. आम्ही करीत असलेले काम योग्य वाटत असेल तर तुम्हाला शक्य असलेली मदत करा. या आवाहनाला मुलां-मुलींनी प्रचंड प्रतिसाद दिला.

रावेर येथे मुख्य चौकात सकाळी 7.30 वाजता कायद्याचे चित्रमय प्रदर्शन घेऊन उभे राहिलो. घोषणा सुरू केल्या लोकांची गर्दी झाली. यावल येथे घोषणा देत-कायदा चित्रमय प्रदर्शन घेऊन उभे राहिलो. तीन चार कार्यकर्ते जवळपास माहितीपत्रक-कायदा पुस्तिका वाटत होते. अचानक एक मुलगा चहा घेऊन आला. थोडी गर्दी कमी झाल्यानंतर एक सहकारी म्हणाला, सर चहा पाठविणार्‍या व्यक्तीला भेटू या. आम्ही तीन चार कार्यकर्ते त्यांना भेटलो, धन्यवाद म्हणालो. त्यांनी बोलायला सुरवात केली. डॉ. दाभोलकरांची हत्या झाली ही बातमी बघितली तेव्हापासून तुमचे काम, वर्तमानपत्र, टी.व्ही. यातून समजते आहे त्यात माझाही सहभाग असावा म्हणून चहा पाठविला.’ हे ऐकून सर्वच कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञतेचा भाव होता. आणि कार्यकर्त्याचं संघटनेच्या कामातील भान वाढवून गेलं. त्यांच्याशी गप्पा करतांना असे लक्षात आले की, ती व्यक्ती कुठल्याही संघटनेशी, चळवळीशी जोडलेली नाही. हे आम्हास लोकांत मिसळण्याचं, संवादाचं महत्व अधोरेखित करून गेलं. याच चौकात उभे असताना मदत पेटी प्रदर्शनाच्या समोर ठेवलेली होती. अनेक सामान्य माणसे, कष्टकरी कायदा प्रदर्शन समजवून घेऊन मदत करीत होते. गर्दीत 12-13 वय वर्षाचा एक मुलगा भीक मागीत होता, त्याने त्याला मिळालेला 1 रूपया मदत पेटीत टाकला तेव्हा आमच्यासोबत असलेले वाहन चालक म्हणाले, ‘सर तुम्ही सारे जण जे काम करता आहात त्याचं महत्व मला कळालं.’

प्रवासात धरणगाव येथे माध्य. व उच्च माध्यमिक शळेच्या 1000-15000 विद्यार्थी-विद्यार्थीनी समोर कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम संपल्याबरोबर 9 वीतील एक मुलगा जवळ आला. गळ्यात पडून रडायला लागला. माझ्यासह बाजूला उभे असणार्‍या कार्यकर्त्यांना काही कळेना. तो थोडा शांत झाला. मी विचारलं काय झालं? तो म्हणाला, माझी आई एका भगतिणीच्या आहारी गेली आहे. अंगात येणं कसं खोटं असतं हे मी तिला सांगायचा प्रयत्न खूप केला आणि दरवेळा मला मार मिळाला. तुम्ही येणार माझ्या आईला भेटायला? एका दमात त्यानं सांगून प्रश्न विचारला. अस्वस्थ करून गेलं त्याचं रडणं. त्याला पडलेला प्रश्न आईच्या प्रेमापोटी, काळजीने होणारी तडफड-त्याला करावीशी वाटणारी धडपड. डोक्यात विचार सुरू होते. तेवढ्यात सहकारी मित्रांनी जेवण्यासाठी आवाज दिला. तिकडे गेलो तेथे एक मुलगी रडून घरातील असाच काहीसा प्रश्न सांगू लागली. तिची होणारी घालमेल या दोघांची धडपड अस्वस्थ करून गेली. त्यांना भ्रमणध्वनी नंबर दिला. पुढच्या महिन्यात भेटायला येतो असे सांगितले.

संपूर्ण पंधरा दिवसांतील सर्वच अनुभव, तपशील लिहणं शक्य झाले नाही. मात्र चहा, नास्टा, जेवण, औषधाची गरज आहे असे विचारणारे, करणारे असंख्य माणसे भेटलेत. आमची ‘माणूस’ व कार्यकर्ता म्हणून कळत-नकळत जडण-घडण होत होती. उर्मी व प्रेरणा मिळत होत्या. याच प्रेरणेच्या जोरावर न थकता प्रवास व कार्यक्रम सुरू होते. लोक आपल्या सोबत आहेत. त्यांना आपण ज्या विचारांचा वारसा सांगतो आहोत तो मान्य आहे. आपणच लोकांपर्यंत जायला हवं, लोकांमध्ये मिसळायला हवं, संवाद करायला हवा हे मनावर पक्कं करीत गेलं.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर ला जळगाव येथे महाविद्यालयीन एन.एस.एस., एन.सी.सी., कन्या लुंकड शाळा येथील विद्यार्थी-विद्यार्थीनी, राष्ट्र सेवा दल व म.अं.नि.स. कार्यकर्ते जवळपास 250, 300 च्या सहाय्याने जळगाव शहरात सायकल फेरी काढून समारोप केला. समारोप कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या अध्यक्षतेत झाला. या प्रसंगी ते म्हणालो, ‘सहयोगी समाज निर्माण झाल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही.’ समाज प्रबोधन, कृती व संघर्ष यांचे महत्व सांगून त्यांनी सायकल फेरीत पंधरा दिवस फिरणार्‍या तरूणांचं कौतुक केले. प्रमुख अतिथी म्हणून म.अं.नि.स.चे राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी व पुरोगामी विचारवंत प्रा. शेखर सोनाळकर होते ते म्हणाले, ‘जादूटोणा विरोधी कायदा कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही; वाटल्यास विरोध करणार्‍या मित्रांनी खुली चर्चा करावी अपप्रचार करू नये.’

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अनिल लोहार, सूत्र संचालन दर्शना सरला अरूण व आभार प्रा. डी.एस. कट्यारे यांनी केले. संपूर्ण फेरी व कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्र सेवा दल, म.अं.नि.स., हितचिंतक, मित्र यांनी परिश्रम घेतले तर समविचारी संस्था, संघटना, व्यक्ती यांनी पाठींबा दिला.

प्रमुख मुद्दे :-

1) सहभागी युवक-युवती संख्या-23

नावे – चेतन, घोरपडे, प्रविण पवार, भरत चव्हाण, प्रशांत मोरे, संदीप पाटील, सारीन माने, सूरज कुमावत, खुशाल जाधव, कल्पतेश देशमुख, राहुल झोडगे, धिरेंद्र रावते, बीना जैतकर, जितेंद्र पाटील, प्रसाद जाने, गणेश गायकवाड, आयुध जगदीश भारती, मेधा खामितकर, श्वेता पाटील, दर्शना सरला अरूण, तुषार इधानकर, गणेश गोसावी, संदीप मांडोळे, गोपाळ नेवे.

2) रोज पाच ते सहा कार्यक्रमांतून किमान 3500 लोकांपर्यंत संवाद.

3) कायद्याच्या चित्रमय पुस्तिका 15000 प्रतींचे वितरण.

4) म.अं.नि.स. व रा.से.द.संघटन माहितीपत्रक 20,000 प्रतींचे वितरण.

5) चार मनोरूग्ण केसेस समजवून घेऊन डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला.

6) भोंदू बाबाच्या विरोधातील दोन तक्रारी मिळाल्यात.

7) कामातील सहभागासाठी-चौकशी-फोन आलेत.

8) मदतपेटी पूर्ण 5 ते 6 दिवस फिरवू शकलो त्यात रूपये 12000/- मदत मिळाली. ह्या मदतपेटी उद्घाटनाच्या दिवशी सील करून त्यावर कार्यकर्त्यांनी सह्या केल्या होत्या. समारोपाच्या दिवशी प्रमुख अतिथींनी त्यावर सह्या केल्या व सर्वांच्या उपस्थितीत रक्कम मोजण्यात आली.

9) मोठ्या प्रमाणावर वितरण केलेली कायदा पुस्तिका, माहितीपत्रक एकही रस्त्यावर पडलेले दिसले नाही.

10) रोज जवळपास 30 ते 40 किलोमीटरच्या प्रवासाने 800 किलोमीटरचा अंदाजित प्रवास झाला.

11) कायदा व्हावा म्हणून पाठींबा करणार्‍या 6347 सह्या मिळाल्यात.

12) सायकलस्वार कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनोगतात प्रबोधनाच्या कामातील आनंदाबरोबरच आत्मविश्वास वाढविणारा, विवेकी जीवनाचा प्रवास सुरू ठेवणारा वाटला असे सांगितले.

13) जेवण, चहा-नाश्ता व निवास व्यवस्था करणारे मित्र, हितचिंतक, म.अं.नि.स. व रा.से.दल जिल्ह्यातील सर्व शाखांतील कार्यकर्ते कोणतीही प्रसिद्धी नाव व्हावे या हेतूने मदत न करता मन:पूर्वक करताना भेटले असे दिसले.

14) सायकल फेरीत कुठेही स्वागत स्वीकारले नाही.

गोपाळ नेवे

मोबा. 9421702841