डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला ऑगस्ट 2014 ला एक वर्ष पूर्ण झालं. आता डिसेंबर 2014 पर्यंत आणखी 3 महिने उलटून गेले. अजूनही त्यांचा खुनी व खुनामागचे सूत्रधार सापडले नाहीत. हे दु:ख उरावर घेऊन महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते शिलेदार आपापल्या जबाबदार्या धैर्याने व विवेकाने पार पाडीत आहेत. यामुळेच 2014 मध्ये वार्तापत्राचे एकूण तीन अंक प्रसिद्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो. पहिला विशेषांक कायदा विशेषांक तर दुसरा दाभोलकर स्मृती विशेषांक ऑगस्ट 2014 मध्ये प्रसिद्ध झाला. या वर्षातील नोव्हेंबर-डिसेंबरचा विशेषांक हा वाचकांना सुपूर्द करताना कर्तव्यपूर्तीचा आनंद व्यक्त करतो.
परिवर्तनाची लढाई अवघड असतेच. त्यात वर्मी घाव बसतात. असा घाव महाराष्ट्र अंनिसलाही बसला. पण कार्यकर्त्यांचे मनोधैर्य अभंग राहिले. ‘घावानी केले विद्ध, तरी फुलायची जिद्द, जग बदलाचे हे युद्ध आता हटायचे नाही.’ या जिद्दीने अंनिसच्या कृती कार्यक्रमाला व प्रबोधनाला कार्यकर्ते भिडत राहिले. जात, धर्म आणि लिंग यांच्या पलिकडे जाऊन मानवतेची मशाल हाती घेतलेले कार्यकर्ते, ‘घालू हातांमध्ये हात, फुलू सारे एकसाथ, कितीही घाव पडू देत, कधी तुटायचे नाही’ या भावनेने संघर्ष व विधायक कार्य अधिक गतीमान करीत आहेत.
केवळ कार्यकर्तेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व थरातील नागरिक विचार स्वातंत्र्यावरचा घाव कधीही मान्य करणार नाहीत याचा सुखद अनुभव आम्हाला या विशेषांकाच्या प्रकाशनच्या निमित्ताने आला. सर्वच जण चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते होऊ शकत नाहीत पण आम्हाला मर्यादा असल्या तरी तुम्ही मानवतेची मशाल हाती घेतली आहे; ती तेवत रहावी म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत अशा अर्थाचा प्रेरक कृतीशील दिलासा सर्वांकडून आम्हाला मिळाला. हा विशेषांक जवळपास 600 पानांचा आहे. त्याचे कारण आहे नागरिकांनी या अंकाच्या प्रसिद्धीसाठी मुक्त हस्ते केलेली जाहिरातींची उधळण आणि या जाहिराती गोळा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी दाखविलेली चिकाटी आणि घेतलेले परिश्रम. महाराष्ट्र अंनिस या सर्व जाहिरातदारांची व अंनिसच्या कार्यकर्त्यांची कृतज्ञ आहे.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय घटनेने अधोरेखीत केलेल्या मूल्यापासून भारतीय समाज कोसो दूर आहे. जातीय हिंसाचार, धार्मिक कलह, स्त्रियांवरील अत्याचार यांचे प्रमाण चिंता वाटावी एवढं आहे. नव्या नव्या अंधश्रद्धांचे पीक फोफावत चाललं आहे. अंनिसच्या उद्दिष्टामध्ये अघोरी अंधश्रद्धांविरोधी संघर्षाचा पुकार आहेच पण धर्मचिकित्सा, जातीय हिंसेला विरोध आणि पर्यावरण जागृती हे विषय भविष्यकाळात अधिक नेटाने हाताळावे लागणार आहेत. यासाठी अंनिस जे उपक्रम करील आणि संघर्ष छेडेल त्याचे रिपोर्टिंग समस्त महाराष्ट्राला व सरकारला व्हावे याचसाठी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे आमचे प्रबोधन मासिक नियमितपणे प्रसिद्ध करण्याचा महाराष्ट्र अंनिसचा निर्धार आहे.
नेहमीप्रमाणेच या विशेषांकात वैचारिक लेख, कथा, कविता, बालविभाग, कार्यकर्ता परिचय आणि धार्मिक स्थळाची चिकित्सा अशा विषयावरील लेख समाविष्ट आहेत. अंनिसला 25 वर्षे पूर्ण झाली. अंनिसची झुंजार पंचविशी व पुढील दिशा हा परिसंवाद या अंकाचे खास वैशिष्ट्य ठरेल.
भविष्य काळात वाचक, लेखक, अंनिसप्रेमी सुजाण नागरिक व कार्यकर्ते यांचे असेच सहकार्य राहील आणि अंनिसची तिमिरातून तेजाकडे जाणारी वाटचाल अधिक गतीमान होईल याची आम्हाला खात्री आहे.