बदलत्या जीवनपद्धतीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून कुटुंबातील एखादा सदस्य तरी अपघातामुळे मृत्यु पावलेला आढळतो. यात शहरी भागातील अपघात जास्त व वा ग्रामीण भागातील अपघात कमी असे काही नसून अपघाती मृत्युच्या प्रमाणात अजिबात फरक नाही, अशी स्थिती आहे. एवढे अपघाती मृत्यु होत असूनही आपण त्यातून कुठलाही बोध न घेता बेफिकिरीने वाहनं चालवत असतो व स्वतःच्या बरोबर इतरांचेही जीव धोक्यात घालत असतो. स्पीडब्रेकर्स, ठिकठिकाणचे वाहतूक नियंत्रक सूचनांचे फलक यासारखे तात्पुरते उपाय अपघातानंतर केले जातात. परंतु ‘पुढच्याला ठेच मागचा शहाणा’ हा प्रकार येथे लागू होत नाही असे म्हणावेसे वाटते. मूळ प्रश्नाचा सखोल व नीटपणे विचार करून त्या प्रमाणे कृती होत असताना दिसत नाही.
इतर विकसित राष्ट्रातील आकडेवारी तपासल्यास तुलनेने त्या देशातील अपघाती मृत्युचे प्रमाण फारच कमी आहे. कदाचित दुसऱ्या युद्धामुळे बेचिराख झालेल्या युरोपखंडात रस्ते, वीज यासारख्या पायाभूत सोई-सुविधांसाठी प्रचंड प्रमाणात पैसा ओतला असेल. म्हणूनच चार – आठ पदरी रस्ते, निर्जन प्रदेशातील चौकाचौकातसुद्धा २४ तास काम करणारे वाहतूक नियंत्रक दिवे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे वाहनचालक, नियमांचे उल्लंघन केल्यास होत असलेल्या जबर शिक्षेची भीती, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, संगणक व संपर्क तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर इत्यादीमुळे या राष्ट्रातील वाहतूक व्यवस्था परिणामकारी झाली असेल.
आपल्या देशातील वाहतूक व्यवस्था निकृष्ट दर्जाची आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु विकासाच्या अग्रक्रमावर इतर अनेक क्षेत्रे असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही, हे वास्तव आपण समजून घ्यायला हवे. सर्व महामार्ग सहा – आठ पदरी करावयाचे ठरविल्यास हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रचंड प्रमाणात पैसा ओतावा लागेल. दीर्घकालीन उपाय म्हणून आठ पदरी रस्ते, उड्डाण पुलांचे जाळे, ठिकठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, परिणामकारी संपर्क व्यवस्था, इत्यादींचा जरूर विचार व्हायला हवा. हे सर्व करण्यावाचून गत्यंतर नाही, हेही तितकेच खरे. टप्प्याटप्प्याने आर्थिक तरतूद करत गेल्यास अर्थव्यवस्थेवर ताण पडणार नाही. परंतु हे सर्व होईपर्यंत आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणे, उपाय शोधून जीव वाचविणे हेही गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून विचार करू लागल्यास अपघाताचे प्रमाण व तीव्रता कमी करण्यासाठी काही कॉमन सेन्सचे उपाय सुचवावेसे वाटतात.
*वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती करावी लागेल.
*संदिग्ध, अव्यावहारिक व कालबाह्य नियमात सुधारणा करावी लागेल.
*वाहतूक नियमातील दोष दूर करून भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
*नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडण्यासाठी परिणामकारक शोधयंत्रणा उभी करावी लागेल. त्यांच्यावर त्वरित कारवाई करून जबरदस्त शिक्षा – दंड ठोठावण्याची तरतूद करावी लागेल. यासाठी आवश्यक असलेली न्यायालयीन यंत्रणा सक्षम करावी लागेल.
*गाड्यांचा वापर साहसी खेळ, मनोरंजन वा चैनीसाठी होत नाही याची काळजी घ्यावी लागेल. धोका पत्करून भरधाव वेगाने ओव्हरटेक करताना होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे.
*वाहतुकीतील वेगाचे सातत्य टिकविण्यासाठी रस्ते लोकवस्तीपासून लांब असायला हवेत. त्यासाठी गावाच्या मध्यातून जाणाऱ्या रस्त्यांची पुनर्रचना करावी लागेल.
*मार्गाच्या शेजारी असलेले हॉटेल्स, परमिट रूम्स, गॅरेज वा इतर प्रकारची दुकानं असू नयेत. त्यांच्यासमोर गाड्या उभ्या केल्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. भरल्या पोटी वा दारू पिऊन वाहन चालविणे व वाहनावर नियंत्रण ठेवणे कठिण होऊन जाते.
*रस्त्याच्या परिस्थितीचे वेळोवेळी निरीक्षण करून देखभाल करणारी यंत्रणा उभी करावी लागेल. अशा दुरुस्त होत असलेल्या रस्त्यावरील वाहनांचे वेग नियंत्रित करण्यासाठी पूर्वसूचना द्यायला हवी.
*घाटाच्या दोन्ही बाजूला व धोक्याच्या वळणावर सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करणारी यंत्रणा हवी.
*रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे आयुष्य निर्धारित करायला हवे. आयुष्य संपलेली वाहने रस्त्यावर धावता कामा नयेत यासाठी सक्षम यंत्रणा हवी.
*वाहन क्षमतेची पाहणी करणारी यंत्रणा हवी. ब्रेक निकामी होणे, टायर फुटणे यामुळे अपघातात भर पडते.
मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या जडवाहनांचे चालक व त्यांना मदत करणारे क्लीनर्स सामान्यपणे अर्धशिक्षित वा अशिक्षित असण्याची शक्यता जास्त आहे. व हे कामगार अत्यंत गरीब वर्गातून आलेले असतात. कामचलावू प्रशिक्षण घेवून ते वाहन चालवण्याचा परवाना मिळवून चालकाची नोकरी पत्करतात. कामाच्या अनियमित वेळा, तुटपुंजे पगार, मालकांची अरेरावी, पोलीसांचा ससेमिरा, खराब रस्ते, इत्यादीमुळे हा वर्ग भावनाशून्य झालेला असतो. सतत १० – १५ दिवस घराबाहेर असल्यामुळे अनेकदा व्यसनांच्या आहारी जातो. यासाठी मालवाहतूक मालकांनी व मालकांच्या संघानी याकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक चार – पाच तासाच्या ड्रायव्हिंग नंतर चालकांना किमान चार तास विश्रांतीची गरज आहे. मार्गापासून काही अंतरावर ठिकठिकाणी गॅरेज, पेट्रोल पंप, वैद्यकीय सुविधा व हॉस्टेल्स युक्त संकुल असल्यास या वर्गाच्या किमान गरजा भागविणे सुलभ होईल. चालक क्लीनर्सना विश्रांती मिळेल. शारीरिक गरजा भागवता येतील व प्रसन्न चित्ताने गाडी चालवता येईल. त्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होईल.
संगणक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून जडवाहनांची वाहतूक व त्याचे नियंत्रण करणे सहज शक्य आहे. चालकांना दर चार तासांनी सक्तीने विश्रांती घ्यायला लावून बदलीच्या चालकाच्या हातात वाहन चालवण्यास दिल्यामुळे वाहतुकीचा वेग कायम ठेवता येईल. चालकाला घरापासून जास्तीत जास्त ४८ तासापेक्षा बाहेर राहण्याची गरजसुद्धा या सुधारणेमुळे भासणार नाही. त्यामुळे चालकांच्या बाहेरख्यालीला आळा बसू शकेल. वेश्याव्यवसाय वस्त्यामधून उद्भवणाऱ्या एड्ससारख्या जीवघेण्या रोगावर नियंत्रण आणता येईल.
वरील उपायांची काटेकोरपणे, प्रामाणिकपणे अंमलबजावणी केल्यास अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल. जगातील मृत्युच्या कारणांचा शोध घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मृत्युला जबाबदार ठरणाऱ्या ३० कारणांपैकी अपघाती मृत्युचा नववा क्रमांक लागतो. दर तीन मिनिटाला एक याप्रमाणे आपल्या देशात अपघाती मृत्यु संभवतो. अत्यंत तुरळक अपवाद वगळता सर्व अपघातांना माणूस जबाबदार असतो. व त्याच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडलेले असतात. थोडीशी काळजी व सरकारी यंत्रणेवर दबाव टाकून काम करून घेतल्यास या प्रकारचे मृत्यु टाळणे शक्य होईल.
प्रभाकर नानावटी, पुणे
संपर्क : मोबा. ९५०३३३४८९५