चारशे पन्नास कोटी रूपये खर्च करून दि. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळावर पाठवलेले मंगळयान तब्बल तीनशे दिवसानंतर २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत पोहचले. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे यान पाठवणारा पहिला देश आणि मंगळमोहिम यशस्वी करणारा जगातील चौथा देश अशी बिरुदावली लावण्यात भारतीय वैज्ञानिक यशस्वी ठरले. या घटनेमुळे पंतप्रधान मा. नरेंद्र मोर्दीसहित तमाम भारतीयांचा उर अभिमानाने निष्चितच भरून आलेला होता. तब्बल सात कोटी किलोमिटर अंतरावर असलेल्या मंगळावर पोहचण्यासाठी या यानाला ७८ कोटी किलोमीटर अंतर पार करावं लागल. दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता यान मंगळाच्या कक्षेत पोहचल्यानंतर पंतप्रधानांनी इस्त्रोच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहून वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आणि समस्त भारतीयांना वैज्ञानिकांचे विशेष कौतुक करण्यास सागितले. या घटनेला दोन महिने होत नाहीत तोपर्यंत पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी आणि महत्वाच्या खात्याचे मंत्री आपलं भविष्य ज्योतिषाकडून पाहून घेत राष्ट्रपती होण्याची स्वप्न रंगवतात अनाकलनीय वाटतं. सामान्य नागरीकाने ही कृती केली असती तर लिहीण्याची तसदी घेण्याची बिलकुल गरज नव्हती परंतू ज्यांच्याकडे भारतीय मनुष्याच बळ उंचावण्याची धुरा देण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने तरूणाईच्या स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी ज्या उच्च षिक्षणाचा प्रचंड हातभार लागतो अशा ‘मनुष्य बळ विकास खात्याच्या मंत्री मा. स्मृती इराणी यांनी ही कृती करावी याच नवल वाटत. ती ज्योतिष परंपरा वर्णव्यवस्थेचं, जातीव्यवस्थेचं, आणि स्त्री पूरूष असमानतेच समर्थन करत स्त्रीला दुयम स्थान देते त्या व्यवस्थेचं आपण उदात्तीकरण करत आहोत याची यत्किंचतही खंत मा. स्मृती इराणी यांना नाही. आजही राजकीय मानसिकता कशाप्रकारे वाटचाल करत आहे याची झलक यानिमित्ताने अनुभवयास मिळत आहे.
मा. स्मृती इराणी यांनी नुकतेच राजस्थान येथील ज्योतिषाकडून आपले भविष्य पाहील्याचे वृत्त फोटोसहीत प्रसारमाध्यमामध्ये आलेल होतं. पुराव्यासाहीत आलेली बातमी मा. इराणी यांनी नाकारली नाही पण ज्योतिषाकडे हात दाखवून भविष्य पाहण्यात काहीच गैर नाही आणि वैयक्तिक बाबीमध्ये इतरांनी लक्ष घालू नये हा त्यांचा तकलादू बचावात्मक पवित्रा म्हणावा लागेल. कारण वैयक्तिक बाबींनाच सोशल मिडियावर टाकून निवडणूकीमध्ये निवडूण येण्यात अनेकांना मदत झालेली आहे. आणि मंत्री झाल्यावर मात्र या बाबींना दूर सारण बरोबर नव्हे. मा. स्मृती इराणी हे कोणी ऐ गैरे व्यक्तीमत्व नाही तर भारताच्या मंत्रिमंडळातील मनुष्यबळ विकास मंत्री आणि त्या खात्याअंतर्गत येणा-या उच्च शिक्षणाची पर्यायाने युजीसीची. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून आपल भविष्य उंचावण्याची केवळ स्वप्न न रंगवता त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असलेल्या वर्गाच चिंतणार हे भलबुर खात ज्योतिषाच्या दावणीला लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
एका बाजूला मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी इतरांच्या बरोबरीने वैज्ञानिक अहोरात्र परिश्रम करत असतात. मंगळावर यान पाठवून भारताची मान जगामध्ये उंचावण्याचा प्रयत्नात ते आहेत. मंगळावर यान पाठवून स्वतः श्रीमंत होण्याची आस न ठेवता भविश्यात नैसर्गीक संकटातून पृथ्वीचा विनाश झाल्यास मानवाला दुसर हक्काच ठिकाण असाव यासाठी ते खटाटोप करत आहेत. आणि दुसरीकडे हातावरच्या रेषेच्या माध्यमातून राष्ट्रपतीपदाला गवसणी घालण्याचा प्रकार सुरू आहे. पोलीस खात्याला आता या प्रकाराचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे कारण ज्या आरोपीचें ठसे घेतले जातात त्यामध्ये भविष्यातील अनेक उच्च पदस्थ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्योतीषाकडून तपासणी केल्याशिवाय आरोपी ठरवू नये असा जीआर शिक्षण खात्याकडून निघालाच तर आश्चर्य वाटायला नको. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे’ अस म्हटलेल होतं आणि ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्श करा’ असा नारा दिलेला होता. त्याच शिक्षणाच्या उपलब्धतेमुळे डॉ. आंबेडकर शिकले, उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले, बॅरीस्टर झाले आणि तद्नंतर मंत्रीही झाले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकाला त्यांनी विकासाच्या प्रक्रियेपर्यंत नेल आणि तमाम बहुजनांना महत्वाचा असलेला घटनादत्त अधिकार प्राप्त करून दिला. क्षणभर अशी कल्पना केली की त्याकाळी डॉ. आंबेडकर शिक्षण न घेता केवळ ज्योतिषाला हात दाखवत फिरत राहीले असते तर डॉ. आंबेडकरांच काय झाल असत यापेक्षा तमाम बहुजन समाजाच काय झाल असत याची कल्पनासुध्दा काळजाचा ठोका चुकवते. आणि त्याच शिक्षण विषयक खात्याचा डोलारा सांभाळणाऱ्या केंद्रीय मंत्री मा. स्मृती इराणी ज्योतिषाला आपला हात दाखवून भविष्यकथन करवून घेतात. याला काळाचा उलटा महिमा म्हणायचा की आणखी काय याचा सुज्ञानी निश्चितच विचार करण्याची गरज आहे.
मानवी जीवन सुखी आणि समृध्द करण्यामध्ये मानवानेच निर्माण केलेली व्यवस्था कारणीभूत आहे. शिक्षण हा त्यातील फार महत्वाचा घटक आहे. मानवाने स्वत:हून निसर्गामध्ये हस्तक्षेप केला आणि असाध्य बाबी साध्य करून घेतल्या. राष्ट्रपती होणं अथवा न होणं हे पुर्णता मानवनिर्मीत परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामध्ये हातावरच्या रेषा अथवा ग्रह तारे यांचा संहभाग असण्याची सुतराम शक्यता नाही. परंतू भारतीय समाजावर परंपरा, संस्कृती, आणि धार्मिकतेचा प्रचंडा पगडा असल्यामुळे तो वस्तूस्थितीपेक्षा संस्कृती आणि परंपरेतून आलेल्या बाबींचा अंगिकार करतो. शिकलेला वर्ग आपमतलबीपणे स्वार्थी झाल्यामुळे तो शिक्षणाचा उपयोग समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा दूर करणे आणि समाजाला एका चांगल्या उंचीवर घेउन जाणे यापासून पूर्णपणे अलिप्त राहीलेला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दांपत्याने जर चुकीच्या प्रथा परंपरामध्ये हस्तक्षेप केला नसता तर आज आलेले हे अच्छे दिन पाहण्याची संधी आपणाला मिळाली असती काय? याचा विचार करण्याची गरज आहे. परिस्थतीमध्ये माणूसच हस्तक्षेप करू शकतो आणि तो बदलवू शकतो हे वारंवार समाजसुधारकांनी पुराव्यानिशी सिध्द केलेल आहे. हा केवळ भारताचा इतिहास सांगत नाही तर संपूर्ण जगाचा इतिहास सांगतो. हातावरच्या रेषाच जर भविष्य ठरवत असतील तर ज्यांना हातच नाही त्यांच्या भविष्याच काय ! त्यांना भविष्यच नाही काय ? हो आहे ना त्यांना भविष्य. कारण भविश्य ठरवणाऱ्या व्यवस्थेनच त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण केली. सरकारच्या माध्यमातून अपंगासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. शिष्यवृत्ती, नोकरीमध्ये राखीव जागा, प्रवासामध्ये सवलत, शाळा महाविदयालयामध्ये सवलत आदिंच्या माध्यमातून अपंगांना मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी निश्चितच मदत झालेली आहे. अपंगाची परिस्थिती बदलण्याच श्रेयही परिस्थिती निर्माणकर्त्या मानवाकडेच जात. ज्यांच्या हातावर रेषाच नव्हत्या त्यांच भविष्य ज्योतिषाच्या दृष्टीने अंधःकारमय होत ते मात्र शिक्षणव्यवस्थेनं आणि राजसत्तेनं बदललं. याचा अर्थ एवढाच होतो की परिस्थितीत बदल करता येतो आणि तो बदल करण्याचा अधिकार हातावरच्या रेषेत, कपाळावरच्या आठयात किंवा आकाशातील ग्रह ताऱ्यांना नसून परिस्थिती निर्माण करणाऱ्या मानवालाच आहे.
मा. स्मृती इराणी यांनी जे केल ते दुर्लक्षित निश्तिच नाही. कारण भारतीय समाज हा अनुकरणप्रिय आहे. तो समाजातील प्रमुख नेते आणि महनिय व्यक्तींच त्यांच्या संबधीत क्षेत्रातील मोठेपणाबरोबरच इतर क्षेत्रातील त्यांच्या वावरण्यावर दृढ विश्वास ठेवतो आणि इथेच आपण आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला तिलांजली देतो. व्यक्ती कितीही मोठी असली तरी सर्वच क्षेत्राबद्दल तिला माहिती असेलच असे नाही हे तो विसरून जातो. मा. स्मृती इराणी यांनी चित्रपटातील अभिनयाबाबत धडे देणं किंवा निवडणूकीमध्ये निवडून येण्यासाठी काय करण्याची गरज आहे. आणि मंत्री झाल्यानंतर कामकाज कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन निश्चितच अनुकरणीय ठरले असते. परंतू ज्योतिषाबद्दलचे त्यांचे संबंध निश्चितच अनुकरणीय नाहीत.
पूर्वीच्या काळी विज्ञानामध्ये आजच्या एवढी प्रगती झालेली नव्हती त्यामुळे ज्योतिषवाले राजे रजवाड्यांचे मन जिकण्यासाठी ज्योतिषाचा गैरवापर करत होते. परंतू जसजस विज्ञानामध्ये प्रगती होत गेली तसतस खगोलशास्त्र, गणित यांना शास्त्राचा दर्जा मिळत गेला. परंतू ज्योतिषाला शास्त्र म्हणून तसा कोणताचा आधार मिळाला नाही. त्यामुळे ज्योतिषांची पंचाईत झाली. पण तोपर्यंत ज्योतिषांनी समाजमनाची पकड घट्ट केलेली होती. त्याचबरोबर दुबळ्या मनाला सतत लागणारा आधार पुरवण्यासाठी आभास निर्माण करण्यामध्ये ज्योतिषी यशस्वी झाले होते. यासाठी त्यांना संस्कृती, परंपरा, धर्म, आणि राजसत्ता यांच अधिष्ठान मिळत गेल. काही लोक स्वतःला ज्योतिर्विद्याविशारद, ज्योतिर्भास्कर, ज्योतिष्मती समजत गेले. काहीजण कुंडलीवरून, काहीजण हातावरून, काही अंगठ्याच्या ठशावरून, काही आकडेमोड करून, काहीजण स्फटिकाच्या लोलकात तर काहीजण काजळाच्या डबीत बघून भविष्य सांगू लागले. वेगवेगळया प्रकारे ज्योतिष सांगण्याची कला निर्माण झाली आणि कालांतराने तिने आर्थिक फायदा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ज्योतिष शास्त्र नाही पण ती एक कला आहे अस जर कोणी म्हणत असेल तर त्याला आमचा विरोध नाही. परंतू ही कला तपासून घेण्याची गरज आहे. ही कला माणसाला आधाराच स्वप्न विकते की अडचणीत आणते! प्रत्येकाला एक आधार पाहिजे असतो. माणूस ज्यावेळी आगतिक असतो, त्यावेळेला अधिक काही तरी मिळेल आणि अत्यंत सुस्थितीत असेल तर ती आयुष्यभर तशीच कशी टिकून राहील यासाठी आधार शोधत असतो. खरेतर ही माणसाच्या मनाची कमजोरी आहे. ह एक मानवी व्यक्तीमत्वातील दोष आहे. स्वप्न विकत घेण्यासाठी ज्योतिषी मदत करतात आणि बहुसंख्य वेळेला ते जीवावरसुद्धा बेतल्याची उदाहरण आहेत. ज्योतिषवाले स्वप्न विकण्याच्या नावाखाली एक गोष्ट अधोरेखीत करत असतात की अदृश्य नियतीच्याव्दारे तुमच्या जीवनात बऱ्या वाईट घटना घडत असतात. त्यामुळे माणूस स्वतःला अज्ञाताच्या हातातल बाहुलं समजायला लागतो. याचा एक अत्यंत वाईट परिणाम होतो तो म्हणजे माणसाचा स्वत:च्या सामर्थ्यावरचा आणि कर्तृत्वावरचा विश्वास उडून जातो. ज्योतिषाचा पांगुळगाडा आपल्या हातामध्ये येतो की जो पुर्णपणे अशास्त्रीय आणि निरूपयोगी असतो. हाच पांगुळगाडा कालांतराने दैववाद रूजवतो, नशिबाची कल्पना पेरतो आणि परिवर्तन कुजवतो.
मा. स्मृती इराणी यांचा ज्योतिषाला शिक्षणव्यवस्थेमध्ये सामिल करून घेण्याचा आणि काळाची पावल उलट्या दिशेत टाकण्याचा एक डाव असण्याची सुद्धा या घटनेमागे शक्यता आहे. केवळ सत्ता आली तर आपण काहीही करू शकतो अस वाटणाऱ्यांनी मात्र भारतीय समाजमन अजून बधिर झालेल नाही हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.
– डॉ. नितीन शिंदे
संपर्क : मो. ९८६०४३८२०८