Categories
ज्योतिष

जगाच्या अंताची फसलेली भाकिते

मे - २०१९

मानवजातीचा शेवट पृथ्वीचा शेवट; तसेच विश्वाचा विनाश हा भविष्यवेत्त्यांचा आवडता विषय. या मंडळींपैकी काहीजण अशा विनाशाची तारीख, त्यांच्या मृत्यूच्या पुढची देण्याची अक्कलहुशारी बाळगतात. भाकीत चुकले तरी यांना लोकांनी जाब विचारण्यापासून सुटका मिळावी म्हणून ही नामी चलाखी ही मंडळी करतात. काहीजण अंधश्रद्धाळू मंडळींना आपली धनसंपत्ती व स्थावर मालमत्तेचा त्याग करण्यास उद्युक्त करतात. भाकीत चुकले तर त्याचे कारण अगोदरच तयार ठेवतात आणि लोकांच्या रोषापासून आपला बचाव करतात; पण कोणत्याही परिस्थितीत हे हट्टी वेडे आपला दावा सोडून देण्यास तयार होत नाहीत. ते आपल्या भविष्यवाणीचे स्वरूप बदलून नवा तपशील देऊन जगाच्या विनाशाकडे मोठ्या आत्मविश्वासाने डोळे लावून बसतात.

बायबलमधील भाकितापासून ते आजपर्यंतच्या माकितांचा संक्षिप्त परिचय खाली दिला आहे. या सर्व तपशिलाचा विचार केला, तर आपली पृथ्वी अजून बराच काळ विनाशाविना वाटचाल करेल, याचीच शक्यता जास्त.

बायबलनुसार भाकिते

(1) बायबलप्रणित नव्या कराराप्रमाणे येशूच्या 12 प्रेषितांपैकी शेवटच्या प्रेषितांच्या मृत्यूपूर्वी जगाचा अंत होईल. एकापाठोपाठ सगळे प्रेषित केव्हाच संपले; पण जग पुढे चालायचे थांबले नाही.

(2) बायबलनुसार येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 1 हजार वर्षांनी शेवटचा निवडा (The Last Judgement) होईल. शेवटचा निवाडा याचा अर्थ त्यावेळी जगाचा शेवट होईल असा होतो. तो दिवस येतो 31 डिसेंबर 999. त्या वर्षात लोकांनी शेतजमिनीत पेरणी व मशागत थांबविली होती. कारण जगबुडी झाली, तर पिके काढून काय करायचे?

इ.स. 999 मध्ये काहीच घडले नाही. मग धर्मचिंतकांनी 1 हजार वर्षेयेशूच्या जन्मतारखेपासून न मोजता ती त्याच्या मृत्यूच्या दिनापासून (3 डिसेंबर 99) मोजावीत, असे मत मांडले. ते वर्ष इ.स.1033 केले. यावेळी पण काही घडले नाही. यामुळे या मंडळींच्या अकलेचे दिवाळे दुसर्‍यांदा निघाले.

(3) बायबलमधील नव्या कराराचा काळजीपूर्वक अभ्यास करून जर्मनमधील गणिती मायकेल स्टीफेन या ज्योतिषाने ऑक्टोबर 1533 ची सकाळ जगाच्या अंतासाठी घोषित केली. मात्र त्या दिवशी काही घडलेच नाही. लोकांच्या भावनांशी खेळ खेळला असे समजून खवळलेल्या लोकांनी मायकेलला चाबकाने झोडपले. त्याला आपले धार्मिक पदही गमवावे लागले.

(4) विल्यम गिलर हा मिलेराईट चर्चचा संस्थापक होता. त्याने 15 वर्षेधार्मिक वाङ्मयाचा सखोल अभ्यास करून 1843 मध्ये जगाचा अंत होईल, असे भाकीत वर्तवले. 1831 मध्ये प्रसिद्ध केलेल्या भाकितात त्याने ‘मध्यरात्रीचा आक्रोश’ असे नाव दिले. 1833 मध्ये अवकाशात तेजस्वी असा उल्कावर्षाव दिसला, तेव्हा मिलरचे भाकीत खरे ठरणार, अशी खात्री होऊन त्याच्या अनुयायांनी आपली मृत्युपत्रे तयार करून ठेवली. त्याने जाहीर केलेल्या तारखेला काहीच घडेना, तेव्हा तो तारखा थोड्या पुढे ढकलीत राही. प्रत्येक वेळी त्याचे हजारो अनुयायी उंच टेकडीवर चढून प्रलयाची वाट पाहत. शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 1844. या दिवशी सुद्धा काहीच न घडल्याने मिलरच्या अनुयायांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर पाच वर्षांनी मिलर वारला; पण शेवटपर्यंत त्याच्या अनुयायांची त्याच्यावरची श्रद्धा तशीच राहिली. माणसांना सामुदायिक मरणाची ओढ वाटावी आणि त्याबद्दल माहिती देणार्‍या खोटारड्या ज्योतिषाला जाब विचारला जाऊ नये, या मूर्खपणाला काय म्हणावे?

(5) बायबलनुसार देवाला जग निर्माण करायला सहा दिवस लागले. बायबलचे अभ्यासक असे म्हणतात की, देवाचा एक दिवस म्हणजे मानवाची 1 हजार वर्षे. सहा दिवसांनी देवाने थकून चिरविश्रांती घेतली. मग माणसाला पृथ्वीतलावर आपल्या करामती करायला फक्त 6 हजार वर्षेएवढाच वेळ असणार. म्हणजेच माणूस निर्माण झाल्यापासून 6 हजार वर्षांनी मानवजातीचा शेवट होईल, असा निष्कर्ष निघतो. या युक्तिवादानुसार बायबलमधील मानवाच्या निर्मितीच्या कालापासून 1996 पर्यंत 6 हजार वर्षेपूर्ण होतात. जगाचा अंत झालाच नाही.

नॉस्ट्राडॅमसचे भाकीत

नॉस्ट्राडॅमस या पाश्चात्य भविष्यवेत्त्याचा संदर्भ जगभरचे ज्योतिषी देतात. आपल्याकडे त्याच्या भविष्य वर्तवण्याच्या अचूकतेबाबत विविध माध्यमांतून चर्चा चालू असते.

नास्ट्रडॅमसच्या एका काव्यपंक्तीनुसार 1999 चा 7 वा महिना म्हणजेच जुलै 1999 मध्ये जगाचा अंत होईल, असे सूचित केले आहे. आपल्याकडे काही धार्मिक बुवा-महाराजांनी याच भविष्याचा बोलबाला करून लोकांमध्ये भीतीची लाट पसरविली होती. ‘आमचे शिष्य असतील तेवढेच वाचतील’ अशी बकवास ते करीत होते. खरं तर अशी खोटी विधाने करणार्‍या बुवा-महाराजांना वेड्यांच्या इस्पितळात पाठवायला हवे.

भूकंपाचे भाकीत

सैनिकपेशा असलेल्या विल्यम बेल या धर्मवेड्याने 5 एप्रिल 1761 या दिवशी संपूर्ण मानवजात मोठ्या भूकंपात नष्ट होईल, असे भाकीत केले होते. त्याचा तर्क असा होता की, 8 फेबु्रवारी 1761 ला व त्यानंतर बरोबर 28 दिवसांनी 8 मार्चला असे दोन भूकंप ज्या अर्थी लंडनच्या परिसरात झाले, त्या अर्थी बरोबर एक महिन्याने तिसरा व अखेरचा महाभूकंप 5 एप्रिलला होणार. लंडनमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने घरेदारे सोडली व थेम्स नदीतील बोटीवर आसरा घेतला; पण हा भूकंप झालाच नाही. चिडलेल्या लोकांनी 6 एप्रिल रोजी बेलला पकडून लंडनमधील वेड्याच्या इस्पितळात पाठविले. आपल्याकडे 1990 मध्ये भूकंप व अतिवृष्टी होऊन कोयना धरण फुटणार, असे भाकीत पुण्याच्या ज्योतिषाने वर्तवले होते. ‘कोयना’काठच्या लोकांनी त्यावेळी घरे सोडली होती.

जलप्रलयाचे भाकीत

1 फेबु्रवारी 1524 या दिवशी जगबुडी होईल, हे जलप्रलयाचे नोंद झालेले पहिले सनसनाटी भाकीत. इ.स.1523 च्या जूनमध्ये एका ब्रिटीश ज्योतिषाने या जलप्रलयाची सुरुवात लंडनमध्ये होईल, असे भाकीत केले. या भविष्याने लंडन शहरात खळबळ उडवून दिली. सुमारे 20 हजार लंडनवासीयांनी आपली घरे सोडली. संत बार्थालोम्युच्या मठाधिपतीने या निमित्ताने एक किल्ला बांधून त्यात दोन महिने पुरेल एवढा अन्न व पाण्याचा साठा केला; पण जाहीर केलेल्या काळात लंडनमध्ये पावसाची एकही सर कोसळली नाही; मग पूर तर बाजूलाच राहिला. ज्योतिषाने परत गणित केले, तेव्हा प्रलयाची तारीख एक वर्षाने चुकल्याचे घोषित करण्यात आले. नवी तारीख 1 फेबु्रवारी 1525 सांगितली गेली. या दिवशीपण लंडन कोरडे ठणठणीत राहिले.

जलप्रलयाच्या या भविष्यवाणीचा प्रभाव संपूर्ण युरोप खंडात पसरला होता. निकोलस मेरी या भविष्यवेत्त्याने सर्व प्रमुख ग्रहांची युती मीन राशीत होईल, असे निदान केले आणि ती घडण्याचा काळ 7 फेबु्रवारी 1524 असेल, असे प्रसिद्ध केले. त्यामुळे लोकांचा महाप्रलयावरचा विश्वास दृढ होण्यास मोठा हातभार लागला.

जोहान्स स्टोफलर या ज्योतिषाने मांडलेल्या आकडेमोडीनुसार 20 फेब्रुवारी 1524 मध्ये महापुराने जगबुडी घडणार होती. हे भाकीत त्याने 1499 मध्ये वर्तविले. त्याच्या भविष्यवाणीवर लोकांचा एवढा विश्वास होता की, त्यांनी अनेक पत्रके वाटून या प्रलयाची वार्ता सगळीकडे प्रसृत केली. या भविष्यवाणीनुसार जर्मनीमध्ये लोकांनी जलप्रलयातून वाचण्यासाठी खास होड्या बांधायला सुरुवात केली. व्हान इग्ली होम हा उमराव स्टोफलरवर अतिश्रद्धा बाळगून होता. त्याने तीन मजली मोठी होडी उभारायला सुरुवात केली. फ्रेंच बादशाह ऑरियल याने देखील प्रचंड मोठी होडी बांधली. युरोपमधील बंदरामध्ये लोकांनी नांगरून ठेवलेल्या बोटीवर निवारा घेण्यास सुरुवात केली. त्या तारखेला व्हान इग्ली होमच्या होडीनजीक फक्त हलकासा पाऊस पडला; पण प्रलयाच्या धास्तीने भयकंपीत लोकांनी सैरावैरा पळत होडीवर तुफान दगडफेक केली, त्यात हा उमराव ठार झाला. चेंगराचेंगरीत शेकडो लोक ठार झाले. या घटनेवेळी स्टोफलर मात्र चिडलेल्या समुदायाच्या तडाख्यातून बचावला. त्याने महाप्रलयाच्या तारखेबाबत पुन्हा भविष्य ताडून आता 1528 साली प्रलय घडेल असा पुकारा केला. यावेळी मात्र लोकांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. कधी-कधी लोक शहाण्यासारखे वागतात खरे!

वर वर्णन केलेल्या अनेकविध फसव्या भाकितांसाठी 50 च्या आसपास भाकिते मांडली गेली. भरीत भर म्हणून 2012 सालच्या फेबु्रवारी महिन्यात आणखी एक जगाच्या विनाशाचे भाकीत मांडले गेले. एका अमेरिकन कंपनीने नोव्हेंबर 2009 मध्ये ‘2012’ हा सिनेमा प्रदर्शित केला. ‘माया’ कॅलेंडरनुसार जगाचा विनाश डिसेंबर 2012 रोजी होणार, असे या चित्रपटात सूचित केले आहे. भारतामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये जसे पंचांग आहे, तसे उत्तर अमेरिकेच्या दक्षिण टोकाला असलेल्या मेक्सिको या देशात ‘माया’ संस्कृतीचे पंचांग वापरले जाते. या पंचांगामध्ये मांडलेल्या सांकेतिक लिपीमधून विपर्यास करून तथाकथित विद्वानांनी 2012 मध्ये जगाचा अंत होणार, असे भाकीत केले होते. हेही भाकीत खोटे ठरले. कारण आपली पृथ्वी आणि त्यावरील मानवजात अजूनही अस्तित्वात आहे.

तर अशी ही फसलेल्या भाकितांची अवस्था आहे. जोतिषांना जगाच्या अंताचे भविष्य कळत नाही, हे सत्य स्वीकारून लोकांनी अशा भविष्याचा नाद सोडून दिलेला बरा.

पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे कदाचित मानवप्राणी नष्ट होतील, कदाचित एखादा मोठा धुमकेतू पृथ्वीवर आदळून मोठा प्रलय होईल; पण हे घडेल की नाही. याबाबत आपल्याला विज्ञानाचेच मार्गदर्शन घ्यायला हवे. प्रदूषण किंवा धुमकेतू सारख्या संकरात पृथ्वी सापडली नाही, तरी भविष्यात तिचा अंत निश्चित आहे. कारण पाच अब्ज वर्षांनंतर सूर्य विझणार आहे. त्यावेळी मात्र पृथ्वीचा विनाश अटळ आहे; पण तोपर्यंत माणसाने विवेकाचा वापर करून पृथ्वीवर आनंदाने राहावे, हेच खरे.