झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी या पर्वताच्या शिखरावरून वीस जैन तीर्थंकर मोक्षास गेले असे मानतात. हे ठिकाण जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. परंतु आज या तीर्थक्षेत्रावर अक्षरश: अंधश्रद्धेचा बाजारच भरलेला आहे. येथील पवित्र पाणी, चमत्कारिक माती, गांजाची शेती, नवसाला पावणारा पारसनाथ, विविध रंगांच्या कपड्यांचा चमत्कार आणि पवित्र पर्वतावर नक्षलवाद्यांचे बंकर्स या सार्या गोष्टींचा तेथे प्रत्यक्ष भेट देऊन लेखाजोखा घेतला आहे या लेखात…..
“जो पारस की जय बोलेगा।
वो अपने पापोंको धो लेगा॥
जो यहाँ आते है, वो तर जाते है।
मोक्ष प्राप्त कर पाते है॥”
अशा घोषणा ऐकत पहाटे साडेतीन वाजता आम्ही पारसनाथ पर्वत चढण्यास सुरवात केली. झारखंड राज्यातील गिरिडिह या जिल्ह्यात येणारा, जैनांची काशी म्हणून जगप्रसिद्ध असणारा पारसनाथ पर्वत आहे. यालाच सम्मेद शिखरजीसुद्धा म्हणतात. या पवर्ताच्या 20 शिखरांवरून(टोकावरून) वीस तीर्थंकर मोक्षास गेले आहेत असे जैन धर्मिय मानतात. वीस तीर्थंकरांच्या या पर्वतावर विविध शिखरावर पादुका बसविल्या आहेत. याचे दर्शन करण्यासाठी जगभरातील जैन बांधव येत असतात. सांगलीचे पुरोगामी जैन संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब पाटील व मी पहाटे पहाटे अनवाणी पायांनी पर्वतावर चढाई करत होतो. आधारासाठी हातामध्ये वेताची काठी घेतली होती. आमच्यासोबत शेकडो भाविक होते. सर्वाच्या हातामध्ये अंधारातून वाट काढण्यासाठी छोट्या बॅटर्या होत्या. णमोकार मंत्राचा उद्घोष सुरू होता. स्वत:ला ‘मोक्ष’ मिळविण्यासाठी सर्वजण 27 कि.मी.ची पर्वतयात्रा करण्यासाठी निघाले होते. समुद्रसपाटीपासून या पर्वताची उंची 1360 मीटर इतकी आहे. झारखंड राज्यातील सर्वात उंच पर्वत म्हणून ‘पारसनाथ पर्वत’ ओळखला जातो. पर्वताच्या बाजूला 37 चौरस कि.मी.क्षेत्रावर घनदाट जंगल आहे. हा संपूर्ण आदिवासी भाग आहे.
सुर्योदयाच्या वेळेपर्यंत आम्ही 4 कि.मी.अंतर चालून ‘गंधर्वनाला’ या ठिकाणी पोहचलो. गंधर्वदेवाचा येथे निवास होता अशी भाविकांची समजूत आहे. येथे थोडावेळ विश्रांती घेऊन पुढची यात्रा सुरू केली. ही पुढची यात्रा अवघड घाटाची होती. या अवघड घाटामध्ये(थकलेले भाविक डोलीत बसतील म्हणून) डोलीवाले बसले होते. दोन कि.मी.चा घाट चढून ‘सीतानाला’ या ठिकाणी पोहोचलो. आता चांगलेच उजाडले होते. सीता नाल्याचे पाणी पिण्यास भाविकांची तोबा गर्दी. भाविक प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाणी भरून घेत होते. आम्ही कुतुहलाने एका भाविकास विचारले, त्यांनी सांगितले, ‘यहाँ का पाणी पवित्र है। यह पाणी पिनेसे आत्मा शुद्ध हो जाता है। शारीरिक क्लेश दूर होते है। तीर्थकरोंके चरण को जलाभिषेक करने के लिए यहा से ही पाणी ले जाते है।’
सीतानाल्याचे ‘पवित्र’ पाणी पिल्यावर आत्मा शुद्ध होतो म्हटल्यावर आम्हाला तर तो नाला जैनांची ‘गंगा नदीच’ वाटली. भाविकांचे हातपाय धुण्यानी ‘पवित्र’ झालेले पाणी आम्ही तोंडात घेण्यास धजावलो नाही.
गांजाची शेती

सीता नाल्याच्या अगोदर आदिवासीच्या छोट्या छोट्या झोपड्या लागतात. तेथे बाळासाहेब पाटलांना वेगळेच दृश्य दिसले. झोपड्यांच्या मागे गांजाची शेती केली होती. बाळासाहेबांनी गांजाची झाडे बरोबर ओळखली. मी पिशवीतून कॅमेरा काढून फोटो घेण्यास पुढे सरकलो, झोपडीपुढील आदिवासी तरूणाचे माझ्या कॅमेर्याकडे लक्ष गेले. त्याने डोळे वठारले. मी कॅमेरा खाली केला. आम्ही पुढची पवित्र यात्रा सुरू केली. पारसनाथच्या पवित्र डोंगरावर गांजाची शेती बघून चक्रावलो. व्यसन करणे पाप आहे असे सांगणार्या जैन धर्माच्या पवित्र तीर्थक्षेत्रावर गांजाची शेती अजूनही कोणा मुनी-महाराजांना दिसली नाही की, ते याकडे कानाडोळा करतात हे समजत नाही. यावर बाळासाहेब म्हणाले, असा प्रश्न विचारणेसुद्धा ‘धर्मद्रोह’ आहे!
सीतानाल्याच्या पुढे गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजवीकडचा रस्ता डाक बंगल्याकडे जातो. तो परतीचा मार्ग आहे. समोरचा रस्ता पुढे तीर्थंकरांच्या टोकापर्यंत जातो. आम्ही समोरच्या रस्त्याने चालायला लागलो. समोर उंच व अवघड घाट दिसत होता. हा घाट चढण्यास सुरवात केली. दीड कि.मी.चे अंतर पार केल्यानंतर आम्हास पूर्वेकडे उंच डोंगरावर पूर्वेकडे चंद्रप्रभ टोक आणि पश्चिमेकडे पारसनाथ टोक दिसले. अवघड घाटाची चढाई केल्यामुळे थकवा जाणवत होता. दोन टोकांचे शिखरदर्शन झाल्यामुळे भाविक पूर्वेला व पश्चिमेला तोंड करून दर्शन घेत होते.
डोलीवाल्यांचे हाल
या अवघड घाटामध्ये एकट्याने चालणे कष्टाचे होत होते. तेथे डोलीवाल्याचे काय हाल होतात ते पाहून मन कळवळले. 70-80 किलोच्या व्यक्तीला डोलीमध्ये बसवून दोन आदिवासी लोक प्रत्येक पाऊल जपून, हळूवार टाकत निघाले होते. त्यांचे शरीर घामाने संपूर्ण भिजले होते. डोलीच्या आत बसलेला ‘गलेलठ्ठ शेठजी’ स्वत:स मोक्ष मिळविण्यासाठी आदिवासींचा घाम काढत होता. चालता चालता मी एका डोलीवाल्या आदिवासीला विचारले, ‘कितना रूपया मिलेगा?’ तो म्हणाला, ‘दीड हजार’, म्हणजे एकाला 750 रूपये येणार. त्या बदल्यात 27 कि.मी.चा पर्वत 80 किलो वजनाचे ओझे घेऊन 14 तास चालणार.

‘यहॉ कितनी डोलीया है?’ – मी
‘दो हजार डोलीवाले होगे साब’- तो आदिवासी
‘हर दिन काम मिलता है क्या?’- मी
‘नही, हप्तेमें मुश्कील से एक बार ही काम मिलता है।’ – तो आदिवासी.
डोलीवाल्यांना होणार्या त्रासाकडे बघून त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्यापलिकडे त्याक्षणी आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आमच्याकडे बघून तो आदिवासी तरूण म्हणाला, ‘आपकी गाडी तेल पर चलती है, पर हमारी डोली हमारे खूनपर चलती है।’ त्याच्या या वाक्याने आम्ही हादरलो! वातावरण खेळीमेळीचे करण्यासाठी मी त्याला म्हटले, ‘तुम्ही कितीतरी वेळा या पवित्र पारसनाथ पर्वताची यात्रा करत असल्यामुळे तुला नक्कीच पुण्य लागून मोक्ष मिळणार’ त्यावर तो आदिवासी लगेच म्हणाला, ‘आम्ही डोलीचे पैसे घेतो. त्यामुळे आम्हाला पुण्य लाभत नाही. पैसे देणार्या शेटजीला पुण्य लाभते.’ त्याच्या या उत्तरावर बाळासाहेब मला म्हणाले, ‘बघा, धर्माने कशी कष्टकर्यांची डोकी बाद केली आहेत.’ अडीच कि.मी.चा अवघड घाट आदिवासी डोलीवाल्याबरोबर गप्पा मारत आम्ही पार केला. अनवाणी पायी चालल्यामुळे पायांना त्रास होत होता.
आत्मा चार्जिंग
बाळासाहेबांनी अनवाणी पायी पर्वत यात्रा करण्याचे धार्मिक कारण सांगितले, “सम्मेद शिखरजी एक चमत्कारी तीर्थ आहे. या ठिकाणी 20 तीर्थकर आणि कोट्यावधी मुनींच्या चैतन्याचा विद्युत प्रवाह साठलेला आहे. या चैतन्यमयी विद्युत प्रवाहाने आपण आपला आत्मा भारीत (चार्ज) करू शकतो. त्यामुळे अनवाणी पायाने यात्रा करावी अशी जैन धर्मियांची समजूत आहे.” आत्मा चार्ज करण्याची भन्नाट आयडिया पाहून मी बाळासाहेबांना म्हणालो, “व्हॉट अॅन आयडिया सरजी”
आठ कि.मी.ची यात्रा करून आम्ही ‘चोपडा कुंड’ या ठिकाणी पोचलो. थंड पाण्याने भरलेले एक चौकोनी कुंड आहे. येथे डोलीवाले जेवणासाठी थांबतात. सोबत आणलेले कच्चे पोहे या पाण्यामध्ये बुडवून त्याचे गोळे करून हिरव्या मिरचीबरोबर हे आदिवासी खातात. चोपडा कुंडाच्या वरच्या बाजूस एक मंदिर आहे. तेथे यात्रेकरूंसाठी लवंगपाणी दिले जाते. येथील पाण्याससुद्धा धार्मिक महत्व आहे. ‘शिखरजी गाईड’ या सम्मेद शिखरजीची संपूर्ण माहिती असलेल्या राम पद पंडित यांनी लिहलेल्या पुस्तकात या चोपडा कुंडावरील पाण्याबद्दल म्हटले आहे, “हे कुंड सदानीर(पाण्याने सतत भरलेले) आहे. पर्वतशिखरावर पडलेले पावसाचे पाणी तीर्थकरांच्या चैतन्यरूपी विद्युत शक्तीतून पाझरून भूगर्भामध्ये प्रवेश करते आणि तेच पाणी प्रभूंच्या विगलित करूणेच्या धारेच्या रूपाने इथे प्रगट होते. इथल्या या शीतल, पावन जलाचा स्पर्श होताच आपला अंतरात्मा पवित्र बनतो. आणि संसारतापामुळे तप्त झालेल्या शरीरास शीतलता प्राप्त होते. इथले पाणी पोटात जाताच आपल्या मनामध्ये करूणाभाव उत्पन्न होतो.” डोलीमध्ये बसलेल्या शेठजीच्या मनामध्ये हे पाणी पिऊन आदिवासी डोलीवाल्याच्याबद्दल करूणा निर्माण झाली तरी खूप झाले असे मी म्हटले. त्यावर बाळासाहेब म्हणाले, “ती शक्यता खूपच कमी आहे. कारण डोलीतील शेठजी चोपडा कुंडाचे पवित्र पाणी पित नाहीत. तर ते खालून सोबत आणलेली ‘बिसलरी’ पितात.”
चोपडा कुंडापासून पहिले शिखर(टोक) एक कि.मी.आहे. परंतु रस्ता अवघड आहे. संपूर्ण चढाई उभी करावी लागते. हा एक कि.मी.रस्ता पार केल्यानंतर आपण पोहचतो पहिल्या शिखरावर ज्याचे नाव आहे ‘गौतम स्वामी कूट’
पहिलेच कूट खोटे
गौतम स्वामी हे भगवान महावीरांचे प्रमुख गणधर होते. असे म्हणतात की, गौतम स्वामी मोक्षास गेले ते ‘गुणावा’ या बिहारमधील गावातून. या पर्वत टोकावरून ते मोक्षास गेलेच नाहीत. परंतु भाविकांनी त्यांच्या पादुका तयार करून तेथे त्या विराजमान केल्या आहेत.

गौतम स्वामींच्या टोकावर एक चौक आहे. तेथूनच आता 20 तीर्थंकरांच्या टोकांची यात्रा सुरू होणार आहे. ही यात्रा करण्यास 9 कि.मी.फिरावे लागणार आहे. गौतम स्वामीच्या टोकावर पूर्वेकडील बाजूस काही तीर्थंकरांची टोके आहेत. तर पश्चिमेस पार्श्वनाथ टोक आहे. पूर्व बाजूनी यात्रेस सुरवात करावी लागते. येथून पूर्वेच्या बाजूला छोट्या छोट्या टेकड्यांवर छोटी मंदिरे दिसतात. ज्या जागेवरून तीर्थंकर मोक्षास गेले. तेथे एक चबुतरा बांधून त्यावर तीन-चार फुटांचे मंदिर बांधले आहे. या मंदिरास त्या तीर्थंकरांचे नाव दिले आहे. भाविक प्रत्येक टोकाच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा करतात. तांदूळ, बदाम, पैसे अर्पण करतात. ‘टोक पूजन’ नावाची एक छोटी पुस्तिका सर्वांच्या हातात असते. त्यामध्ये 24 टोकांचे 24 मंत्र दिलेले असतात. तो तो मंत्र त्या त्या टोकावर म्हणत प्रदक्षिणा मारायच्या. त्या मंत्रामध्ये या ठिकाणावरून कोणते तीर्थकर मोक्षास गेले. तेथून किती कोटी मुनींना घेऊन मोक्षास गेले याचाही उल्लेख असतो. तसेच या टोकाची वंदना केल्याने काय पुण्य मिळणार हेही सांगितलेले असते.

टोकांची निर्मिती स्वप्न दृष्टांतातून
टोकांच्या निर्मितीबद्दलचा इतिहास सुद्धा मोठा मनोरंजक आहे. म्हणे 1768 साली प.बंगालमधील मुर्शिदाबाद या गावातील एक प्रसिद्ध व्यापारी सेठ खुशालचंद यांनी पारसनाथ पर्वतावर जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. परंतु कोणत्या ठिकाणाहून कोणते तीर्थंकर मोक्षास गेले हे त्यांना समजेना. तेव्हा त्यांना स्वप्नातून असा दृष्टांत झाला की, ‘पहाडावर ज्या ज्या ठिकाणी जितकी जितकी म्हणून केशरी स्वस्तिकांची चिन्हे दिसतील तेथे त्या त्या क्रमांकाचे तीर्थंकरांचे निर्वाणस्थळ आहे. म्हणजे 12 स्वस्तिक दिसले की, 12 वे तीर्थकर तेथून मोक्षास गेले असे समजावे. तेव्हा सेठ खुशालचंदनी दुसर्या दिवशी जाऊन पाहिले तर खरोखरच त्या ठिकाणी केशरी स्वस्तिकांची चिन्हे उमटली होती. त्या चिन्हांच्या ठिकाणी त्यांनी वीस स्तूप बांधले आणि तीर्थंकरांच्या पादुकांची स्थापना केली.(संदर्भ : जैन परंपरा का इतिहास)
या इतिहासावर बाळासाहेब म्हणाले, “बघा, भगवानानीसुद्धा दृष्टांत कुणाला दिला तर श्रीमंत व्यापार्याला, एखाद्या मुनी-महाराज-साध्वी यांना देवाने का दृष्टांत दिला नाही. ‘मुनी श्रेष्ठ की श्रीमंत व्यापारी?’ पण हा प्रश्न विचारणार कोण?
प्रत्येक मंदिरावर गंडेदोरे
आम्ही प्रत्येक तीर्थकरांच्या मोक्षाच्या ठिकाणी उभारलेल्या छोट्या मंदिरांचे दर्शन घेत पुढे पुढे निघालो होतो. आम्हाला प्रत्येक मंदिराच्या दरवाजाच्या जाळीवर नवसाचे गंडेदोरे बांधलेले दिसले. लोक नवस पूर्ण व्हावा म्हणून गंडेदोरे बांधतात. खरे तर नवसाला आणि गंडेदार्यांना जैन धर्मात अजिबात स्थान नाही. परंतु तीर्थक्षेत्रावर अशा गोष्टींना उधाण आलेले असते; पण याला आवर कोण घालणार?
चला! आता आपण एका एका टोकाची माहिती घेऊन यात्रा करू या!
टोक पहिले – (ज्ञानधर कूट)- कुंथुनाथ
गौतमस्वामीच्या टोकानंतर पहिलेच टोक लागले ज्ञानधर कूट. भगवान कुंथुनाथ तीर्थकरसह या ठिकाणावरून 96 कोडाकोडी 96 करोड 32 लाख 96 हजार 742 मुनी मोक्षास गेले. या कुंथुनाथ भगवानांची वंदना केल्यामुळे सर्व पापे नष्ट होतात आणि एक कोटी उपवासाचे फळ मिळते. आता तुम्ही म्हणाल, ‘कोडाकोडी’ हा शब्द गणितामध्ये नाही. याचा अर्थ काय? जैन धर्मानुसार एक कोडाकोडी म्हणजे ‘एक कोटी गुणिले एक कोटी’. आता तुम्ही म्हणाल, ‘एवढे मुनी या टोकावरून मोक्षास गेले ते कसे कळाले. त्याचेही उत्तर धर्मच देतो. ‘वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या टोकावरून मोक्षास गेलेल्या मुनींची संख्या फक्त ‘केवलज्ञानी’ पुरूषांच्या दिव्यज्ञानाद्वारेच सांगितली जाते.’ “त्यांनी सांगायचे आपण फक्त माना डोलवायच्या” बाळासाहेब म्हणाले.
दुसरे टोक – (गिनधर कूट) – नमिनाथ
या शिखरावरून नमिनाथ तीर्थकर मोक्षास गेले असे मानतात. यांचे दर्शन केल्याने पुण्याचा उदय होतो. येथून 900 कोडाकोडी एक अरब 45 लाख 7 हजार 42 मुनी मोक्षास गेले. इतके मोठे आकडे पाहून आश्चर्य वाटले. त्यावर बाळासाहेबांचा प्रश्न, “खरंच त्या काळात संपूर्ण पृथ्वीवर एवढी लोकसंख्या होती?”
तिसरे टोक – (नाटक कूट) – अरहनाथ
या शिखरावरून भ.अरहनाथ मोक्षास गेले असे मानतात. ते हस्तिनापुरचे राजपुत्र होते. नंतर ते आपल्या पराक्रमाने चक्रवर्ती सम्राट बनले. परंतु एके दिवशी आकाशातील ढग विरळ होत असलेले पाहून त्यांना दु:ख झाले. त्यामुळे त्यांनी मुनिदीक्षा ग्रहण केली. त्यानंतर ते कठोर तपश्चर्येने तीर्थकर झाले. त्यांचे एक महिन्याचे आयुष्य उरले असता ते या पर्वतावर आले आणि येथून मोक्षास गेले असे म्हणतात. त्यानंतर या ठिकाणाहून 99 करोड 99 लाख 99 हजार मुनी मोक्षास गेले. या टोकाची भावपूर्ण वंदना केल्याने 96 कोटी उपवासाचे फळ मिळते, मी म्हटले, ‘बरे झाले, या टोकाचे दर्शन केलेल्या महिलांना आता आयुष्यभर उपवास करण्याची गरज नाही.’ त्यानंतर आपणास दिसते चौथे टोक.
चौथे टोक – (संवल टोक) – मलिन्नाथ तीर्थकर
मलिन्नाथ तीर्थकर येथून मोक्षास गेले. त्यानंतर पुढे पाचवे टोक आहे सकुंल कूट, येथून भ.श्रेयानाथ तर सहाव्या सुप्रभ कुटावरून भ.पुष्पदंत, सातव्या टोकावरून भ.पद्मप्रभ, आठव्या टोकावरून भ.मुनिसुव्रतनाथ मोक्षास गेले असे मानतात. प्रत्येक टोकावरून किती मुनी मोक्षास गेले हेही तेथे लिहिले आहे.
मंदिराची सावली न पडण्याचा चमत्कार!
आतापर्यंत आमचे सात तीर्थंकरांच्या शिखरांचे दर्शन झाले होते. आठवे तीर्थकर भ.चंद्रप्रभ यांचे शिखर पहिल्या शिखरांपेक्षा खूपच उंच आहे. या शिखराच्या खाली चहापान करण्यासाठी लहान लहान टपर्या आहेत. तेथे आम्ही नाष्टा करीत बसलो होतो. चंद्रप्रभ शिखरावर भाविकांची खूपच गर्दी झाली होती. तोवर एकच गहजब झाला. एक भाविक सांगत होता, ‘तीर्थंकर चंद्रप्रभ मंदिराची सावली कोणत्याच बाजूला पडलेली दिसत नाही.’ हा चमत्कार पाहण्यास गर्दी जमा झालेली. मी आणि बाळासाहेबांनी वेगाने चालत जाऊन मंदिर गाठले. खरंच मंदिराची सावली कोणत्याही बाजूला पडली नव्हती. सर्व भाविक मंदिराला णमोकार मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालत होते. आपणाला हा चमत्कार बघायला मिळाला म्हणून स्वत:ला धन्य धन्य मानत होते.
मी बाळासाहेबांना विचारले, ‘बाळासाहेब घड्याळात किती वाजले? बाळासाहेब म्हणाले, ‘दुपारचे बरोबर बारा’
मी म्हटले, ‘कुणाचे बारा वाजले? आपल्या विज्ञानवादी धर्माचे की भाविकांच्या डोक्याचे?’ आम्हास तेथे या चमत्काराचे रहस्य सांगण्याचे धाडस झाले नाही. एक सुशिक्षित तरूण गर्दीत उभा राहून या चमत्काराचा धार्मिक संदर्भ सांगत होता, “हा एक तीर्थंकरांच्या अतिशय वैशिष्ट्याचा चमत्कार आहे. भगवंताचे शरीर केवलज्ञान प्राप्त झालेनंतर स्फटिकाप्रमाणे अत्यंत पारदर्शक बनते. त्यामुळे त्यांच्या शरीराची सावली पडत नाही. सामान्य माणसाच्या शरीराप्रमाणे तीर्थकरांचे शरीर प्रकाश अडवत नाही. उलट ते स्वयंप्रकाशी असते, त्यामुळे त्यांची सावली पडत नाही.” त्या तरूणाचे हे धर्माचे तत्वज्ञान ऐकून आम्ही अवाक् झालो.
चंद्रप्रभ मंदिराचा चमत्कार पाहून आम्ही जलमंदिराकडे प्रयाण केले. आता उताराचा रस्ता सुरू झाला होता. दोन कि.मी.चालल्यानंतर जलमंदिर आले. एवढ्या उंच पर्वतावर एवढे विशाल मंदिर बांधण्यासाठी किती कष्ट पडले असतील? याचा विचार करत जलमंदिरामध्ये आम्ही विसावा घेतला. पुढे पुन्हा उंच घाट लागला. काठीने आधार घेत घाटाची चढाई केली. घाट संपल्यानंतर आम्ही पुन्हा गौतम स्वामी टोकावरील चौकात आलो. तेथून पश्चिमेच्या बाजूस पार्श्वनाथाचे शेवटचे टोक दिसते. वाटेत इतर टोके लागतात. खूपच दमल्यामुळे चालण्याचा वेग कमी झाला होता. वयस्कर भाविकांचे तर हाल बघवत नव्हते. डोलीवाले आता मेटाकुटीला आले होते. सरळ रस्ता आला की, डोलीतील भाविकाला ते डोलीतून उतरून थोडं अंतर चालत यायला सांगायचे. तेवढीच त्यांना विश्रांती. परंतु, भाविक त्यास नकार द्यायचे. आम्ही पैसे मोजलेत असे म्हणायचे. एका ठिकाणी असाच भाविक महिलेचा व आदिवासी डोलीवाल्यांचा वाद सुरू झाला होता. ती महिला थोडे अंतरसुद्धा चालण्यास नकार देत होती. तेवढ्यात तिचा मागून चालत येणारा मुलगा डोलीवाल्यांच्या अंगावर धावून जाऊन मारामारी करायला लागला. त्याक्षणी बाळासाहेबांनी ‘अहिंसा परमो धर्म की जय!’ अशी मोठ्याने आरोळी ठोकली. सर्वजण आमच्याकडे बघायला लागले. तो मुलगा काय समजायचे ते समजला आणि शरमिंदा झाला.
पवित्र पर्वतावर काठीची चोरी
27 कि.मी. पर्वत चढणे काठीच्या आधाराशिवाय अशक्यच असते. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात काठी असतेच. अभिनंदन भगवानांच्या टोकावर बाळासाहेब दर्शन करत असताना त्यांनी स्वत:कडील काठी मंदिराबाहेर ठेवली. दर्शन करून परत येतात तर काठी गायब. पवित्र पर्वतावर काठीची चोरी करण्याचे धाडस कोण्या एका भाविकाने केले होते. “दिल्याशिवाय दुसर्याची वस्तू न घेणे, विश्वासघात न करणे हा साधूच्या संगतीत राहणार्यांचा धर्म आहे’ असे भगवान महावीर म्हणतात. परंतु कोण्या भाविकाने येथे येऊन धर्मद्रोह केला होता. पुढची यात्रा बाळासाहेबांनी काठीचा आधार न घेता पार केली.
सुपार्श्वनाथ टोकावरील चमत्कारी माती
पारसनाथ टोकाकडे जात असतानाच वाटेत सुपार्श्वनाथ भगवानाचे टोक लागते. या ठिकाणी एक भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यातील माती भाविक पिशवीत भरून घेत होते. कोण अंगाला माती चोळत होते. या चमत्कारी अद्भूत मातीचा उल्लेख ‘सम्मेद शिखरजी महात्म्य’ या ग्रंथात मिळतो तो असा – “कौशांबी नगरीचा राजा कुष्ठरोगाने पीडित झाला होता! सर्व उपचार करून तो थकला होता. तेव्हा त्याला अरिंजय व मित्रंजय नामक मुनींनी सम्मेद शिखर पर्वताची यात्रा करण्यास सांगितले. या यात्रेदरम्यान या राजाने या सुपार्श्वनाथ टोकावर पाऊल पडताच त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला. तेव्हापासून रोगपीडित लोक या मातीचा उपयोग रोगमुक्तीसाठी करीत आहेत. भगवंतांनी आपल्या दिव्य शक्तीने हे ठिकाण जनकल्याणासाठी सिद्ध करून ठेवले आहे. या ठिकाणची माती शुद्ध पवित्र मनाने सीतानाल्यातील पाण्याने ओली करून तिचा लेप अंगावर लावावा. आणि दररोज 111 वेळा ‘ॐ श्री.सुपार्श्वनाथाय नम:’ असा जप करावा. ही माती केवळ रोगच दूर करीत नाही तर सर्व प्रकारची दु:खे व भय दूर करते. घरामध्ये सुखशांती प्रदान करते. इथली माती घर बांधताना त्याच्या पायामध्ये पसरून टाकली तर घरामध्ये शांती-समृद्धी नांदते.”

एवढे चमत्कार करणारी माती आहे म्हटल्यामुळे लोक त्यावर तुटून पडले होते. गावी गेल्यानंतर गंगेच्या पाण्याप्रमाणे मातीचा प्रसाद शेजार्यांना देता यावा यासाठी सर्व खटाटोप सुरू होता. माती जमा करण्यामुळे एक भला मोठा खड्डा त्या मंदिराखाली निर्माण झाला आहे. काही दिवसांनी तो खड्डा वाढत जाऊन वरच्या बाजूचे मंदिर कोसळू शकते. पण विचार कोण करणार? येथे तर सर्वांच्या मतीचीच माती झालेली….
नवसाला पावणारा पारसनाथ
चमत्कारी माती परिक्षणासाठी सोबत घेऊन आम्ही पार्श्वनाथ टोकाचे शिखर चढण्यास सुरवात केली. हे या पर्वतावरील सर्वात उंच शिखर आहे. या मंदिरामध्ये भाविकांची सर्वात जास्त गर्दी होती. नवसाला पावणारा म्हणून, त्याची ख्याती आहे. या तीर्थराजास वंदना केल्यामुळे गर्भाशयातील ‘मुलीचा’ गर्भ बदलून ‘मुलाचा’ होतो. असाही उल्लेख ब्र.धर्मचंदशास्त्री यांनी लिहिलेल्या पुस्तकात आढळतो. त्यामुळे या मंदिरास भाविक आपले नवस बोलतात.

पंडिताची लुटालूट
आतापर्यंत आम्ही सर्व 23 तीर्थकरांच्या मंदिराचे दर्शन घेतले होते. परंतु एकाही मंदिरामध्ये पुजारी आढळला नाही. मात्र या पार्श्वनाथ मंदिरात एक पंडित आरतीचे ताट घेऊन उभा होता. भाविक दानपेटीत पैसे टाकत असताना तो भाविकांना अडवत असे. दानपेटीच्या वरच त्याने आरतीचे ताट पकडले होते. या ताटात पैसे टाका असे तो सांगत होता. लोकही विचार न करता ताटात पैसे टाकत होते. जमा झालेले पैसे तो बनियनमध्ये कोंबत होता. नोटांनी त्याचे बनियन फुगले होते. पंढरपुरातील बडव्याप्रमाणे येथेही पुजार्याची हुकूमशाही सुरू होती. आम्ही त्याचा फोटो काढला. फ्लॅशच्या उजेडाने तो सावध झाला. दानपेटीवरील ताट त्याने मागे घेतले.
भिकार्यांना खोटे पैसे दान
शेवटच्या पार्श्वनाथ टोकाचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. मंदिराखाली चार-पाच आदिवासी भीक मागत बसले होते. त्यांच्यापुढे पाच, दहा, वीस पैशांच्या अल्युमिनियमच्या जुन्या न चालणार्या नाण्यांचा ढीग होता. एवढी खोटी नाणी पाहून मी त्यांच्याकडे चौकशी केली, त्यावर ते म्हणाले, “शेठजी लोक गावाकडील दुकानातील गल्ल्यातील न चालणारी नाणी इकडे घेऊन येतात आणि आम्हाला दान म्हणून देतात” खोट्या चलनाचे दान करणार्या भाविकांना काय म्हणावे मला सुचेना. चालणार्या नोटा देवळात द्यायच्या आणि न चालणारे नाणे गरिबांना देण्यात कोणता आला धर्म? खोटे दान देऊन पुण्य लाभेल?…
रंगीत वस्त्रांचा चमत्कार
शिखर सम्मेदजीची यात्रा करताना कोणी भगवा, कोणी पांढरा, कोणी पिवळा-काळा या रंगाचे कपडे घातलेले दिसत होते. असे वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून यात्रा केल्याने वेगवेगळी फळे मिळतात असे ‘सम्मेद शिखरजी महात्म्य’ या ग्रंथात सांगितले आहे. प्राचीन काळी अजितंजप व अमितंजप या दोन मुनींनी सम्मेद शिखरजीची यात्रा करताना ‘वस्त्रविधान’ सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे, “ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने शुभ्र वस्त्र धारण करून यात्रा करावी, पुत्रप्राप्तीसाठी लाल वस्त्र धारण करावे, काळे वस्त्र परिधान करून वंदना केल्याने सर्वप्रकारच्या असाध्य रोगापासून सुटका होते. पिवळे वस्त्र घालून शिखरजीची यात्रा केल्याने व्यापारामध्ये उन्नती धनप्राप्ती होते, आणि हिरवे वस्त्र घातल्याने चिंतासे मुक्ती.”

या रंगभक्तीमध्ये आम्ही न्हाऊन निघालो. श्रद्धेचा वेगळाच रंग आम्हास समजला. खरंच रंगात एवढी अद्भूत शक्ती असते? खरंच रंगीत वस्त्रे चमत्कार घडवतात?
पर्वताची पवित्रता
हा पारसनाथ पर्वत किती पवित्र आहे याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात आढळतो. या पर्वतावरून 20 तीर्थकरांसह एकूण 86 अरब 488 कोडाकोडी 1027 कोटी 38 लाख 50 हजार 323 मुनी कर्माचा नाश करून मोक्षास गेले. त्याप्रमाणे येथून पुढे अनंत मुनी या ठिकाणावरून मोक्षास जाणार आहेत. शेकडो मुनी चैतन्यमयी विद्युत शक्तीने या भूमीवरील प्रत्येक अणुरेणु प्रभावित करीत गेले, त्यामुळे इथल्या मातीचा कण न् कण ‘पवित्र’ आहे. म्हणून भाविक या पर्वतावर मलमूत्र विसर्जन करीत नाहीत. या पर्वतावर राहणार्या वन्य पशू-प्राणी यांची हिंसकवृत्ती नाहिशी झाली आहे असे म्हटले जाते. येथे वाघ आणि हरिण एकमेकांशी खेळतात असेही सांगतात. वाघ जर हरणांच्या बरोबर खेळत असेल तर तो जगतो कसा? हा प्रश्न आमच्या बालबुद्धीला पडला. पण याचे उत्तर विचारायचे कोणाला?
पवित्र आहे म्हणून सुरक्षित आहे
पवित्र डोंगरावर नक्षलवाद्याचे बंकर
पारसनाथ पर्वतावर दोन विरूद्ध विचारधारांनी आपली पकड बसविली आहे. एक शांतीची आणि दुसरी हिंसेची. हा भाग झारखंड मधील नंबर एकचा नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. 1972 साली नक्षलवादी(माओवादी) या पर्वतावर पहिल्यांदा आले. 1976-77 साली या संपूर्ण क्षेत्रावर त्यांचा खुला अंमल सुरू झाला. आजपर्यंत येथे 15 प्रमुख माओवादी हमले झाले. त्यामध्ये 50 हून जास्त लोक ठार झाले. हा पारसनाथ पर्वत जैनांच्या दृष्टीने अंत्यत पवित्र असल्याने तेथे सरकार पोलीसकारवाई करण्यास घाबरत होते. त्यामुळे माओवाद्यांनी या डोंगरावर सिमेंट काँक्रीटची बंकर्स बांधली होती. ही बंकर्स उद्ध्वस्त करण्याचे काम एका महाराष्ट्रीयन पोलीस अधिक्षकांनी केले त्यांचे नाव संजय लाटकर. 2000 ते 2003 सालापर्यंत ते गिरीडिह या जिल्ह्याचे एस.पी.होते. त्यानंतर 2008 मध्ये माओवाद्याने या पर्वतावर एका आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याचे धाडस केले. पोलिसांना हे समजताच त्यांनी छापे मारून कोरियन कांबळ, सुक्यामेव्याची पाकिटे आणि हत्यारे जप्त केली.
श्वेतांबर-दिगंबर वाद
जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख पंथ आहेत. पारसनाथ पर्वतावर आमचाच हक्क आहे असे हे दोन पंथ मानतात. खूप दिवसांपूर्वी बंगालच्या एका श्वेतांबर शेठजींनी पारसनाथ पर्वतच विकत घेतला होता आणि त्यामुळे त्या पर्वतावर श्वेतांबर पंथियांनी हक्क सांगितला होता. याविरोधात दिगंबर पंथीय न्यायालयात गेले. ऐतिहासिक संदर्भ देऊन दोन्हीही पंथ आपापल्या हक्कावर कायम होते. शेवटी वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने पारसनाथ पर्वत श्वेतांबर आणि दिगंबर या दोघांनाही पुजेसाठी वापरता येईल असा निकाल दिला. परंतु या दोन पंथामधील वादाची झळ आजही जाणवते. पर्वतावरील सूचनाफलकावर ज्या ठिकाणी श्वेतांबर आणि दिगंबर हे शब्द आहेत ते शब्द लोकांनी (एकमेकांच्या वैरभावामुळे) पुसून टाकलेले दिसतात.
सम्मेद(समेट) शिखरजीच्या पर्वतावर अजूनही श्वेतांबर आणि दिगंबरांची समेट घडलेली दिसत नाही. शांतीचा संदेश देणार्या या पर्वतासाठी कोर्टबाजी होणे जैन धर्मासाठी भूषणावह नाही.
धार्मिक स्थान असल्याने पर्वताची हानी करून रस्ते करण्यास इथल्या धार्मिक मंडळींचा विरोध असतो. त्यामुळे माओवाद्यांचे फावते. म्हणूनच हे ठिकाण नक्षलवाद्यांसाठी ‘पवित्र आहे म्हणून सुरक्षित आहे.’
खरं तर धर्मग्रंथानुसार हा पर्वत एवढा पवित्र आहे की, ‘येथील प्राण्यांची हिंसक वृत्ती या पर्वताच्या सान्निध्यात राहून नाहिशी होते.’ हाच नियम नक्षलवाद्यांना का लागू होत नाही? या पवित्र पर्वतावर राहून नक्षलवाद्यांची बुद्धी अहिंसक का होत नाही? असा प्रश्न एखाद्या सिद्धमुनींना विचारावा असे वाटले. पण हे मुनी या प्रश्नावर सोईस्करपणे ‘मौन’ पाळतात. आपल्या पवित्र क्षेत्राची विटंबना होत असताना एकही मुनी या विरोधात आवाज उठवित नाही. कारण त्यांनाही नक्षलवाद्यांची भीती!
सम्मेद शिखरजीची यात्रा करताना आम्हास जे दिसले ते येथे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये धर्माचा अपमान करण्याचा, कोणाची भावना दुखवण्याचा अजिबात उद्देश नाही. शेवटी भगवान महावीरांनी सांगितलेल्या एका वचनाने लेखाचा शेवट करतो.
“धर्म ही उपदेश करण्याची बाब नसून, आचरणात आणण्याची गोष्ट आहे. विरूद्ध मताचा उपहास करणे हे पाप आहे, हिंसा आहे. अनेकांताने विचार करा, हटवादी, एकांगी बनू नका. -भगवान महावीर
–राहुल थोरात