Categories
कथा

नशा

वार्षिकांक – २०११

            खालच्या गल्लीला बाई बोंबलल्याचा आवाज आला. नवराबायकोचे भांडण झालं असेल, असं समजून मी माझं काम करू लागलो. नाही तरी मला सवयच झाली होती. दिवस असो किंवा रात्र असो बोंब मारल्याचा आवाज नेहमी ऐकायला यायचा. कोणाच्या भानगडीत पडायला नको, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करीत असे. मात्र, फार तर जवळचे कोणी असेल, तर मी भांडण सोडवायला जात होतो. अशी काही भांडणं मी सोडवलीही होती. भांडणाला तोटा नसायचा.

            “अहो, दंगा कुणाचा ऐकायला येतो बघा” आतनं मला बायकोचा आवाज आला.

“काम बघ पुढचं.”

“काम करतेय, पण कान जागं ठेवून. बाईचा आवाज येतोय. बघा काय झालं ते.”

“असेल नवराबायकोचं भांडण. मिटेल आपोआप.”

“तुम्हाला तर माणुसकीच कमी. शेजारधर्म म्हणून भांडण सोडवायला नको?”

            “बघितलीस ही आकाळावरची खूण? पवाराच्या पोरांची भांडणं सोडवायला गेल्यावर पांड्या समजून माझ्याच डोक्यात काठी मारली त्या इस्न्यानं. रात्रीची वेळ. मला पण समजंना, कोण मला मारतंय, खॉक फुटली. तेव्हापासून कानाला खडा लावलाय, भांडाण एवढं सोडवायला जायाचं न्हाय.” जखमेची खूण दाखवत मी बायकोला बोललो.

            पण माझंही मन थांबेना. जागेवरून उठलो. शर्ट घालून अंगणात गेलो. बघतोय तर वरच्या गल्लीची माणसं घरासमोरून जात असलेली दिसली. गोदाआजी अनवाणीच तरातरा निघाली होती. तिचं माझ्याकडं लक्ष नव्हतं. सावळा ढेंगा टाकत बंडीवरच निघाला होता. बारकी चिल्ली पिल्ली पोरंही पळत निघाली होती. लहान पोरांना भांडणं बघायची लई हौस. त्या नादात ती पळत होती. पांगळा नरसू पायानं आधू असून तोही चालला होता….

            “ए नरसू!” चाललेल्या नरसूला मी आवाज दिला.

            “काय?”

            “जरा थांब! मी त्याच्याजवळ जाऊन पुन्हा विचारलं, “माणसं का पळायला लागल्यात?”

            “शाम्यानं बायकूच्या हातावर कोयत्यानं वार केलाय. वरच्या आळीपर्यंत सगळीकडं झालंंय. तिची बाँब ऐकायला आली म्हणूनच मीबी चाल्लुय!” असे बोलून नरसू गेला. मी मात्र त्या दिशेनं बघत उभा राहिलो.

            मला राहवेना. पायात चप्पल घालून मीही तिकडे निघालो. खालची गल्ली जशी जवळ येईल तसा माणसांचा गोंगाट मला ऐकायला येऊ लागला. शाम्याच्या घरासमोर माणसांची गर्दी जमली होती. त्याची बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली हेाती. केस विस्कटलेले हेते. अंगावरचं लुगडं रक्तानं भिजलं होतं. कोयत्याच्या जोरदार घावामुळं चार पाच इंच लांबीची आणि इंचभर खोलीची तरी जखम झाली होती. जखमेजवळचं ब्लाऊजही फाटलं होतं. हे दृश्य बघून माझं काळीज फाटल्यासारखं झालं. तिलां सावरणार्‍या बायकांच्या डोळ्यांतून पाणी पडत होतं. शाम्याची पोरं ‘आई आई’ करून रडत होती. शाम्याचा बाप तोंडात येईल ती शिवी शाम्याला देत होता. शेजारच्या बायका शाम्याच्या बायकोला कशी तरी घेऊन दवाखान्यात गेल्या. माणसांनी शाम्याला झाडाखाली नेलं होतं, पण त्याची बसण्याची अवस्था नव्हती. तेथे तो पाय पसरून पडला होता, इतकी तो दारू प्याला होता. त्याची आई मरून महिना होतोय ना होतोय तोपर्यंत हा प्रकार घडलेला होता. शाम्या म्हणजे नमुनाच होता. दररोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्याचं भांडण असायचं. कधी बापाला, कधी बायकोला तर कधी पोरांना मार मार मारायचा.

            शाम्याच्या चौकटीला चौकट लागून असलेल्या नानाच्या घरासमोर मी गेलो. नाना कपाळाला हात लावून बसलेला मला दिसला.

            “नाना काय झालं? आँ?”

            “ये आतल्या अंगाला ये” माझा आवाज ऐकताच नानानं मला बोलावलं. मी नानाजवळ जाऊन बसलो.

            “मरणाचं भोग हायत. भोगाय लागल्यात. शाम्या कसा हाय, हे सगळ्या गावाला म्हायत हाय. कैंगटी आलाय जीव! मूत पिऊन आल्याबिगार एक दिवस जात न्हाय.”

            “आज दारू प्याला होता?”

            “आरं बाबा त्येला हुबा र्‍हायला येत नव्हतं.”

            “नाना, माणसाला घोटभर घेऊन तमाशा करायची लय सवय. येणारं पैसं गाठीला बांधून ठेवावं असं वाटत नाही. पैसं आलं की, आक्काबाई त्याला गप्प बसून देत नाही. जातोय गुत्त्यावर. कशी त्याची प्रगती होणार? आज का शाम्यानं बायकुला मारलं?” मला सहन न झाल्यामुळं बोललो.

            “शाम्याला बायकू मजी खेळणं वाटतंय. दीड दमडीचं काम न्हाय. ती बिचारी सासर्‍याकडं अन् पोरांकडं बघून राबतीया. कवा बांद सुटला न्हाय तिचा. रातध्याड काम करायचं अन् वर ह्येचा मार खायचा. मला पोरीचा मार बघवना. इतका त्यो मारतोय.” नानाचं डोळं भरलेलं मला दिसलं. आवाज दाटून आला होता. त्यातूनही तो मला म्हणाला,

            “पैकं मागत हुता दारूसाठी. तिनं कुठनं आणायचं? पॉटपाणी बघल का त्येला दिल?” नाना बोलत होता.

            “शाम्याचा बाप आडवायला गेला न्हाय?”

            “बाचं चालतंय त्येच्या म्होरं? त्यो भांडण सोडवायला गेला म्होरं. पर दिला शाम्यानं ढकलून. कोपर्‍यात मुरगाळून पडला त्यो.”

            “म्हातार्‍या माणसाचं काय चालतंय त्याच्या पुढं?” मी बोललो.

            “त्येची आय तर हाय खाऊन मेली बिचारी. महिना झाला. तिनंबी लय सोसलं. म्हातारीला पण त्येनं सोडलं न्हाय. झिंज्या धरून मारायचा तिला. मेली तवा तिचा कार सपला.”

            “एक दोन रूपये हातात टेकवून, शाम्याला त्याच्या बायकोनं बाहेर काढायला पाहिजे होतं. आता हे केवढ्याला पडलं. हात जायबंदी झाला का न्हाय?”

            “हाताचं काय हुतंय परमीसराला माहीत. कोयत्यानं उसावर घाव घालावं तसं हातावर घातलं. ‘आयला मारू नका, आयला मारू नका’ असं पोरं बोंबलत हुती. पण त्येनं ऐकलं न्हाय.”

            सांगता सांगता नानाचा घसा कोरडा झाला. ते सर्व ऐकून मी सुन्न झालो होतो.

            “नाना, मी जातो आता. शाम्याचं भारूड संपायचं नाही. दारूनं शाम्याचं घर बरबाद केलंय. तुमचा शेजार आहे त्यांना. तुम्हीच लक्ष ठेवा जरा.”

            “व्हय बाबा! ती आवदसा शिरलीय घरात,” नाना बोलले. थोड्यावेळानं मी तेथून निघालो.

            माझं लक्ष झाडाखाली गेलं. शाम्याला कशाचीही शुद्ध नव्हती. त्याची पोरं कावरीबावरी उभी होती. म्हातारा बाप सुनेबरोबर दवाखान्यात गेला होता. माणसं आपापल्या घराकडं निघून गेली होती. मीही घर जवळ केलं.

            मी घरात पोहोचताच बायको म्हणाली,

            “एवढा वेळ का?”

            “शाम्या!”

            “त्याचं काय?”

            “त्याचं नेहेमीचं, दारूच्या नशेत बायकोचा हातच कलम केलाय.”

            “जळली मेली दारू! दारू कुणाला पण माराय सांगती? दारूड्यास्नी बायकांची काय खातरच न्हाय. दारूड्या नवर्‍याबरोबर बायनं कसं र्‍हायाचं?” माझ्या बायकोनं उपस्थित केलेला प्रश्न मला योग्यच वाटला होता. दारूनं माणसं आणि माणुसकी संपत चालल्याली मला दिसायला लागली.

            घरात बसून बसून मला कंटाळा आला होता. ताजं तवानं व्हावं म्हणून माझ्या मित्राला घेऊन मी फिरण्यासाठी बाहेर पडलो. परंतु शाम्यानं त्याच्या बायकोच्या हातावर केलेल्या वाराचा प्रसंग अजूनही माझ्या नजरेसमोरून जात नव्हता.

            “वसंता कोणत्या विचारात आहेस आज? नेहमीप्राणे तू बोलत नाहीस.” मित्र बोलला.

            “गावात घटना वाईट वाईट घडायला लागलेत. त्यामुळं मन अस्वस्थ झालंय.”

            “आणखी काय झालं?”

            “दारूच्या नशेत शाम्यानं बायकोवर वार केला.”

            “वार? गंभीर मुद्रेनं मित्र माझ्याकडं बघू लागला.

            “मला सांग, केवळ दारूमुळं हे सर्व घडत असेल तर दारू पिणं थांबलं पाहिजे. दारूमुळं स्त्रियांच्या अत्याचाराच्या घटना वाढायला लागलेत.”

            “परवाचा प्रसंग सांगतो तुला” मित्र सांगू लागला.

            “चटपटीत आहे काय?”

            “मामाच्या गावी गेलो होतो.”

            “मग, त्यात काय विशेष? मी ही जातो. तू गेला होतास, वेगळा विचार आहे काय?” मी.

            “एक दिली तेवढी बस. पण अजून धाकटी एक आहेच खरं.”

            “काय सांगतो? पण सावध हं. बायकोपेक्षा मेव्हणी बरी म्हणून सरकशील धाकटीजवळ.” मी विनोदाने बोललो तसा तो लाजून हसला.

            “तुला विनोद कोणत्यावेळी सुचेल सांगता येत नाही. विनोद थांबव आणि मी सांगतोय काय ते ऐक.”

            “बरं सांग बाबा!” मी हसायचे बंद करून बोललो.

            “मामाचा चुलत भाऊ. इंजिनियरचं शिक्षण घेतलं होतं. इलेक्ट्रॉनिक विषय घेऊन तो बी.ई. झाला होता.”

            “हुशार दिसतोय हं तुझ्या मामाचा चुलत भाऊ. म्हणूनच एवढं शिकला. पुढं काय झालं?”

            “बापानं हाडाची काडं केली. कामं करून रक्ताचं पाणी झालं त्याच्या, पण मुलाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही.”

            “मुलं म्हणजे बापाची संपत्ती असते बाबा. मुलांसाठी कष्ट घेतलंच पाहिजे. तुला नाही असं वाटत?”

            “हो, नाही कोण म्हणतं? परंतु कष्टाच्या झाडाला फळं लागली न्हाय.”

            “का? काय झालं?” मी.

            “त्यांचा मुलगा पुण्याला चांगल्या कंपनीत नोकरीला लागला.”

            “पगाराचं काय?” माझी उत्सुकता वाढत गेली.

            “त्याला चांगलं पॅकेज होतं. पण….”

            “पण काय?”

            “नोकरीवर हजर झाला. पगारही मिळू लागला. मनिऑर्डरने गावी पैसेही पाठवत होता. सगळं काही ठीक होतं.”

            “त्याच्या आई वडिलांना खूपच आनंद झाला असेल?”

            “हो, पण काही काळच!”

            “का? पैसे पाठविणं बंद केलं त्यानं?” मी.

            “पैसे राहु दे, पण गावी तोंडही दाखवलं नाही त्यानं.”

            “असं का केलं त्यानं? गावी आलाच नाही तो?”

            “आला. पण बरबाद होऊन!”

            “चांगली नोकरी, पगार मिळत असताना. बरबाद कसा झाला?”

            “पैसा कारणीभूत झाला.”

            स्वत:च्या घरात घडल्याप्रमाणं, माझा मित्र दु:खी होऊन सांगत होता. आम्ही दोघेच रस्त्याने चालत होतो. हवेची झुळूक चाटून जात होती. मध्ये पक्षी ओरडल्याचे आवाज कानावर पडत होते. मजूर स्त्रिया डोक्यावर जेवणाचं गठळं अन् हातात खुरपं घेऊन चाललेल्या. पाठीमागे शेळी आणि आईच्या ओढीनं कोकरू पळत होतं. हे दृश्य दिसत होतं. मात्र, मित्र सांगत असलेल्या घटनेमुळं माझी उत्सुकता वाढली होती. मी पुन:पुन्हा विचारायला लागलो,

            “पैसा का कारणीभूत झाला?”

            “पैशानं त्याला गप्प बसून दिलं नाही. त्याचा मित्रपरिवार वाढत गेला. मित्रांच्या वाईट संगती लागल्या. हळूहळू त्यांच्यात पार्ट्या सुरू झाल्या.”

            “पार्टी म्हटली की दारू आलीच.” मला माहीत असलेलं त्याला सांगून टाकलं.

            “चांगलं की रं पोरगं! दारू आणि व्यसन त्याला माहीतच नव्हतं. पण मित्रांच्या आग्रहानं त्यानं दारू प्यायला सुरवात केली आणि दारूनंच त्याला गिळलं!”

            “म्हणजे अंगापुरती पेला न्हाय.”

            “पुढे पुढे तर तो इतका व्यसनी झाला, की मित्रांना सोडून वेळीअवेळी बारमध्ये जाऊन बसू लागला.”

            “कामावर तर वेळेवर जायचा का?”

            “डोंबलाचं काम करतोय. एक दिवसाचं काम अन् दहा दिवस घरात.”

            “तरीही कंपनी कशी गप्प बसली?”

            “कंपनीचा मॅनेजर त्याचा काय सासरा आहे? दिल्या ढुंगणावर लाथा. हाकलून लावला.”

            “म्हणजे बापाचा स्वप्नांचा चुराडा” मी बोलतच होतो.

            “पोराच्या काळजीमुळं बाप आत आला. शुगर, ब्लड प्रेशरसारख्या आजारानं त्याला गाठलं.”

            “मग काय खरं न्हाय! मुलगा जन्माला आला म्हणून त्यावेळी उड्या मारल्या असतील. सर्वांनी पेढं खाल्लं असतील, वंशाला दिवा आला म्हणून. वंशाच्या त्या दिवट्यानं कसं दिवं लावलं बघितलंस?” माझी तळमळ मी बोलून दाखविली. पुन्हा मी बोललो, “आता कुठे आहे तो?”

            “आलाय गावात. दिसेल त्याला पैसे मागतो. दारू पिऊन नेहमी झिंगत असतो. यंदा लग्न करायचं होतं त्याचं” मित्राचे मामाकडे जाणे येणे नेहमी असल्यामुळे त्याला सर्व माहीत होतं. छळ होणार्‍या स्त्रियांबद्दल मला फार करूणा वाटत होती. म्हणून मी ताबडतोब बोललो, “म्हणजे एक बिचारी वाचली. लग्न झालं असतं तर उद्ध्वस्तच झाली असती. दारूमध्ये बुडलेल्या माणसाबरोबर कसा संसार करणार ती?” अनेकींचे संसार उद्ध्वस्त झाले होते, हे मला माहीत होतं.

            आम्ही दोघे एका मोठ्या चौकात आलो. पानाच्या आणि चहाच्या टपर्‍या गिर्‍हाईकांची वाट बघत उभ्या होत्या. पानाची टपरी तर नव्या नवरीसारखी नटल्याली दिसत होती. स्टारच्या आणि गुटख्याच्या पुड्या समोर अडकवलेल्या दिसत होत्या. मुंडावळ्या बांधलेल्या नवरीसारखी ती दिसत होती. चहाच्या टपरीजवळ चहाचा खमंग वास सुटला होता. मोह आवरेना म्हणून आम्ही दोघे चहा प्यालो. मुख्य चौक असल्यामुळं वाहनांची आणि माणसांची वर्दळ दिसत होती.

            सुताराच्या बोळातून पुढं गेलं, की परटाच्या शिवाचं घर लागतं. आम्ही बोळातून पुढं गेलो तर तो समोरच उभा होता.

            “वसंताऽऽ ये” मला बघताच त्यानं हाक मारली.

            “शांता, बाहेर पाणी दे. वसंत आलाय.” चौकटीतून आत बघत शिवा बोलला.

            “वहिनी कुठं दिसत नाहीत, शेतात गेल्या?”

            “कापडं धुयाला गेलीय वड्याला. तशीच माळाच्या शेतवटीला जाणार हाय. पायलीभर तुरी होतील, एवढी तूर हुबा हाय. येताना कापून आणती म्हणालीय.” शिवानं मला सगळं सांगून टाकलं.

            शांतानं पाण्याचं दोन तांबे भरून आमच्यासमोर ठेवलं. पाण्याचा तांब्या उचलून मी दोन घोट घेतलं. शांताचं लग्न झालेलं मला माहीत होतं. पण ती माहेरी का? मला प्रश्न पडला. शिवाय हे कसं विचारायचं ह्या कोड्यात मी पडलो.

            “शांता कधी आली सासरहून आणि जावायबापू नाही आलं?” मी जरा धाडसाने बोललो.

            काय बोलावं हे शिवाला सुचत नव्हतं. तो गोरामोरा झाला. त्याचवेळी आतल्या खोलीतून कपबशीचा आवाज आला. त्यावरून आमच्यासाठी चहा केला असेल असे मला वाटले. आणि काही वेळातच आमच्या समोर चहाचे कप आले. शांताकडे मी पाहिले, जराही ती टवटवीत दिसत नव्हती. गालाची हाडं वर आली होती. हात पाय काडीसारखं दिसत होतं. कपाळावरचं कुंकू विस्कटलेलं होतं. अंगावर फाटकं जुनेर होतं. त्यावरून तिची आणि तिच्या सासरकडील मानसिक स्थिती मला समजून आली. मला मुलगी नाही. पण असती तर तिची अवस्था कशी झाली असती, चांगली की वाईट? उगीचच मला प्रश्न पडला. आम्ही तिघांनी चहा घेतला.

            “बाय शांता, कप न्ही आत” शिवाने असे सांगताच नाकासमोर बघत शांता आली आणि कप घेऊन गेली.

            “वरीस झालं. शांता हिकडंच हाय” शिवानं मनात साठल्यालं उघडं करायला सुरवात केली.

            “शिवा, तुला एक सांगू” मी.

            “सांग.”

            “माझ्या पोटाला मुलगी नाही. पण माझी मुलगी काय आणि तुझी मुलगी काय, फरक काय नाही. मुलगीला माहेरी एवढं ठेवून घ्यायचं नाही. तिला इथं ठेवून घेतलंस, तर नवरा, सासू, सासरा ह्यांच्याबद्दलचं प्रेम कधी वाटणार तिला? सणासुदीला तेवढीच आणायची अन् लगेच परत पाठवायची.” मी सांगत होतो.

            “वसंता, शांताला सुखानं ठिवून घेतलं न्हाय!”

            “सासर चांगलं न्हाय तिला?”

            “सासू, सासरा, दीर, नणंदा घर भरल्यालं हाय. त्यास्नी मी दोष न्हाय देणार. पर जावयाची रीत न्हाय चांगली.” शिवाचं डोळं पाणावलेलं मला दिसलं. डोळ्याच्या कडा पुसून घेत तो बोलला,

            “माझ्या एकुलत्या एका लिकीचं वाटुळं झालं.”

            “सोन्यासारखी कष्टाळू शांता. तिला सांभाळता आलं नाही त्यांना.” मी बोललो.

            “सुदीवर असल तर संभाळंल.”

            “म्हणजे दारू पितोय?”

            “थोडथोडकी न्हाय. आय, बा, पावणंपयानी सांगून बघितलं. पर दारू सुटंना. वर पोरीवर हात टाकायचा.”

            “अरं अरं! हे बरं नव्हं. दारू पेणारी आम्ही बघतोयं. त्या पोरीनं कसं नांदायचं त्या घरात. नवराच बेवडा म्हटल्यावर कसं मिळणार समाधान तिला.”

            “म्हणूनशान आम्ही नवराबायकोनं इचार केला. तिच्या सासू सासर्‍याला सांगून आणली इकडं.”

            “शांताचा काय विचार आहे?”

            “काल सांच्याला आम्ही सगळ्यांनी तिला इचारलं. “माझं नशीब माझ्याबरोबर. मला पाठवा सासरी, दारू पिणारा नवरा असला तरी तिथंच रहावं लागणार. तिथंच राहून मला नवर्‍यात सुधारणा करावी लागंल. सासू, सासरा देवाच्या गुणाचा आहे. सगळी बोटं सारखी कुठून आणायची? मला पाठवा. माहेरला मी किती दिवस राहणार?” असं शांता सारखं बोलतीय.”

            “तुझा विचार काय?” मी शिवाला विचारले.

            “तिचं पण खरंच हाय. ती किती दिवस अशी र्‍हाणार. परत निघालेल्या माघारणी बघून माझ्या शांताचं कसं होणार असं वाटतंय. तिचं म्हणणं हाय तर पाठवून येतू एक दिवस. पण वसंता, काळजी वाटतीय. पोरीच्या काळजीनं जीव तुटतुया. दारूच्या नशेत पोरीचं बरं वाईट केलं तर? दारूनं काय काय घडतंय आम्ही ऐकतोय नव्हं सारं.” शिवा बोलत असताना तो प्रसंग पुढे उभा रहायचा.

            “हे बघ शिवा, शांता म्हणतीय ते खरंच आहे. तिला जाऊ दे सासरी. जावयाला त्याची चूक कळंल. दारू सोडल आणि संसार करंल. शांताला ठेवून घेऊ नकोस. पाठवून दे. खुशाली ऐकायला मधनं तू जात जा. दोघांचा संसार बघ. जावयाला समजून सांग. होईल बदल. प्रत्येकानं तुझ्या जावयाला सांगितलं की सुटंल दारू. नाही र्‍हायाचं हेच दिवस. दे पोरीला पाठवून.” माझ्या मित्राची आणि शिवाजी ओळख नसल्यामुळे तो फक्त ऐकून घेत होता. तो कंटाळला होता. मित्राची अवस्था बघून मी शिवाचा निरोप घेतला आणि पुढे निघालो.

            सायंकाळचे सहा वाजले होते. सूर्य पश्चिमेकडे दिसेनासा झाला. पश्चिम दिशेचे गाल मेकअप केलेल्या पोरीसारखे दिसत होते, ती लाल पिवळसर रंगामध्ये रंगली होती. आकाशातील ढगांना वेगवेगळे आकार प्राप्त झाल्यामुळे मेंढ्यांचा कळप थांबावा असे ते दिसत होते. शिवारात मजुरीला गेलेले लोक गावाकडं येत होते. कुणाच्या हातात खुरपं तर कुणाच्या डोक्यावर गवताचा भारा होता. मित्राला सोडून मी घराच्या दिशेने वळलो. संध्याकाळच्या चुली पेटल्यामुळं कौलाच्या पाकाड्यातून बाहेर पडणारा धूर वार्‍याबरोबर खेळत होता. उकिरड्यावर फिरणार्‍या कोंबड्या आपल्या घरासमोर ठेवलेल्या खुराड्यावर उभ्या होत्या, तर काही कोंबड्या आत बसल्या होत्या. मी चाललो होतो. तोपर्यंत संभा पाटलानं मला हाक दिली. मी त्याच्याजवळ जाऊन बसलो.

            “ये बस. पान खा. सांच्यापारी कुठं गेला हुतास?” संभानं बटव्यात हात घालत बोलायला सुरवात केली.

            “सकाळपासून मी असा बाहेरच फिरतोय.”

            “काम काय केलंस?”

            “कुठलं काम करतोय? शाम्यानं बायकोला मारलं. रक्तबंबाळ केलं तिला. तेव्हापासून बाहेरच आहे मी.”

            “त्यो श्याम्या? दारूडं?”

            “हां. तोच!”

            “मर्दा, मीपण दिसभर ह्याच कामात हुतू.”

            “कुठलं काम?”

            “वाळव्याला हीच भानगड सोडवायला गेलो होतो.”

            “ती कुणाची?”

            “दारूची. अन् कुणाची.”

            “काय झालं?”

            “आमच्या आक्काचा नवरा दारू पिऊन धुडगूस! पोरं मोठी झाली. चांगलं शिक्षण घेत्यात. अन् ह्यो म्हातारपणी इस्कोट करायला लागलाय.” संभा म्हणाला.

            “जिथं पोरं चांगली आहेत, तिथं बाप चांगला नाही. आणि बाप चांगला आहे, तिथं पोरं चांगली नाहीत बघ. स्वभावाला औषध नाही.”

            “आक्काच्या आमचं हाल चालल्यात.” संभा स्वत:शी बोलल्यासारखं बोलला. आणि माझ्याकडं बघून म्हणाला, “नुसत्या दारूसाठी बागायत जमीन विकली आमच्या भावजीनं.”

            “पोरं मोठी झाल्यावर माणसानं जरा शहाण्यासारखं वागलं पाहिजे. पण कशाचं काय? दारूनं माणसांना खुळं केलंय” मी बोलून गेलो.

            “दावणीची म्हस विकायला पण त्या माणसानं मागं पुढं बघितलं न्हाय.”

            “पैशाचं काय केलं?”

            “पैसा हातात आल्यावर माणूस गप्प बसतोय? म्हस विकल्यावर तिकडनंच फुल्ल होऊन आला. हातात पिशवी, पिशवीत म्हशीचा कासरा आणि किलोभर मटण.”

            “दारू पिणाराला दारू आणि मटण झालं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटतं”, मी म्हणालो.

            बहिणीच्या उद्धवस्त झालेल्या संसारामुळं संभाचं दु:ख मला त्याच्या बोलण्यावरून समजत होतं. त्याच्या मनात जे जे येत होतं, ते सर्व मला सांगत होता. आम्ही दोघे फार वेळ बोलत बसलो होतो. तरीही मला तो म्हणाला, “घर होत्याचं नव्हतं करून ठेवलंय भावजीनं. एकुलता एक आणि जमीन जुमला बघून आक्काला दिली. दहा वर्षे चांगला राहिला. दारूचं नाव नव्हतं. पण…..”

            “पण काय?” मला पुढचं जाणून घ्यायचं होतं म्हणून मी विचारलं.

            “गावातला त्याचा मित्र मिलट्रीतून रिटायर होऊन आला. दोघं मित्र झालं. मित्राची संगत नडली. आणि आज हे दिवस आलं.”

            संभा आणि मी बोलत बसलो होतो. तोपर्यंत संभाची आई चहा घेऊन आली. मी तिला मावशी म्हणायचो. तिनं माझ्यासमोर कप धरला.

            “मावशी चहा नको आता. जास्त झालाय” मी चहा टाळायचा प्रयत्न केला.

            “घे. तू काय रोज चहा प्यायला येतूस?” खणखणीत आवाजात मावशी बोलली.

            संभाच्या आईनं आग्रह केल्यावर मी चहा घेतला. संभानंही चहाचा कप रिकामा केला.

            “सांज करून आला हुतास?” मावशीनं मला विचारलं.

            “घराकडं चाललो होतो. संभानं हाक मारली. बसलोय दोघं बोलत. तुमच्या जावयाचा विषय निघाला.”

            मी मावशीजवळ जावयाचा विषय काढताच माझ्याजवळ बसतच मी म्हणाली, “माझ्या पोरीचं नशीब धड न्हाय. पोरगं चांगलं म्हणून पोरीला दिली. पण जावाय आता भुतासारखा दारू पियाला लागलाय.”

            “मावशी, बघताना आपण चांगलंच बघतोय. पण पुढं तो कसा राहील हे आपल्याला माहीत आहे का?”

            “दारू होत्याचं नव्हतं करतीया. आता तर म्हणं धान्यापासून दारू तयार करणार हायत. खरं हाय ते?” मावशीनं मला विचारलं. तोपर्यंत संभा मला म्हणाला, “वसंत आईला मी पेपरातलं सगळं वाचून दाखवतोय. म्हणून तिला सगळं माहिती हाय.”

            “मावशी खरं आहे तुमचं.”

            “पण कसं हुयाचं गरिबाचं? काय पोटाला खाईल त्यो? केलाय विचार कुणी?”

            “गरिबाला वाली कोणी नाही. आता जे चाललंय ते भांडवलदार आणि श्रीमंतासाठी!”

            “पण आपुण काय श्रीमंत हाय? चार काकर्‍या हायत. त्या फक्त पिकवतोय” संभा आपली गरिबी पुढे करत बोलला.

            “दुसकाळात काळं जुंधळं पण मिळत नव्हतं गरिबास्नी. कण्या-कोंड्याच्या भाकरी आणि घोळंचं मुटकं करून घातलं पोरास्नी. तवा पोरं जगली.” मावशीनं माझ्यासमोर दुष्काळ उभा केला.

            “कोण आडवणार त्यांना? तुमच्या माझ्या हातात नाही राहीलं ते.”

            “पर धान्याची दारू बनवून, पोटाला काय खायचं?” मावशीनं मला पुन्हा प्रश्न केला.

            संभाच्या आईला तिच्या मुलीचं दु:ख माहीत होतं. जावयाच्या करणीमुळं पोटात भाकरीचा तुकडाही पडत नव्हता. म्हणूनच मावशी तळमळीनं बोलत होती. तिच्या प्रश्नाला उत्तर देणं मला भाग होतं म्हणूनच मी तिला म्हणालो, “कसं तरी जगायचं आपण.”

            “पण पोटाला भाकरी लागतीया. दारू नव्हं!”

            “बघ माझ्या आईचं ज्ञान. त्या माझ्या आयलाच जावाय दारूडा मिळाला” संभा बोलला.

            “आता जुंधळ्याची, गव्हाची दारू होणार म्हणजे गरिबाच्या तोंडचा घास जाणार. पुन्हा बारकं पॉर पण ‘आई भाकरी दे’ म्हणण्या परास ‘आई दारू दे’ असं म्हणणार. एक एक नवल बाई!”

            “मावशी, दारू बनविणारे आणि त्याला परवानगी देणारे तो विचार करत नाहीत.”

            “कदमाच्या हातभट्टीवर पोलीस कशापाई येत्यात रं?”

            “हातभट्टीला परवानगी न्हाय म्हणून” संभानं आईला सांगितलं.

            “सरकारी आणि हातभट्टीची दारू, शेवटी दारूच नव्हं? मग कदमाला दारू काढून दियाची न्हाय. आणि त्यांनी मोठ्या शहरात अन् रूबाबात मोठ्या कारखान्यात दारू काढायची. ह्यो कुठला न्याय? कदम पोटासाठी करतुया नव्हं? बंगला न्हाय बांधला त्येनं. छप्पराला चौकट बसवायची त्येला झाली न्हाय!” मावशी म्हणाली.

            मावशीचं तत्त्वज्ञान ऐकून मी चाट पडलो. समाजाबद्दल ही म्हातारी एवढा विचार करत असेल, असे मला वाटलं नव्हतं. कदम माझ्या नजरेसमोर उभा राहिला. अनेकवेळा पोलीस त्याच्या हातभट्टीवर जात होते. हप्ता गोळा करायचे. त्यानंतर कारवाई होत नसायची. केव्हा केव्हा हातभट्टी उद्ध्वस्त व्हायची. तेव्हा कदमाच्या घराचं आडं खाली पडल्यासारखं व्हायचं. दारू काढण्यातून फक्त त्याचं पोट चालायचं. आता तर धान्यापासून दारू तयार होणार. पिणारे पीत राहणार. लहानापासून मोठ्यांपर्यंत. मुलांपासून बापापर्यंत. दोघेही एकत्र बसून पिणार. बाळाचा वाढदिवस असो, पार्टी असो, किंवा नातेवाईकाचा मृत्यू असो, जेवणाच्या प्रसंगी प्रेमाचा आग्रह राहणार दारू पिण्याचा. जेवण कमी खा. पण दारू अधिक प्या. किंवा जेवणानंतर पाणी पिऊ नका फक्त दारू प्या. अगोदर चहा किंवा कॉफी मिळायची. नंतर दारूचा ग्लास पुढे येईल. पाहुण्यांच्या घरी गेल्यावर ‘मी तुमच्यासाठी चहा बनविते’ असे उद्गार ऐकायला यायचे. पुन्हा मात्र ‘मी तुम्हाला दारूचा ग्लास देते’ असे पाहुणे म्हणतील. पाहुण्याला, पाहुणीला कोणालाच त्याचे काहीही वाटणार नाही. एक दिवस सर्वांच्याच सवयीचे होईल. आणि काही वर्षे अधिक जगण्याऐवजी काही वर्षे लवकरच त्यांचा मृत्यू होईल. हा सर्व विचार करताना मला ‘जीवन उद्ध्वस्त होत आहे’ असे वाटायला लागले. मावशी आणि संभाजवळून मी उठलो. मी दारू पीत नसतानाही केवळ ऐकल्यामुळं मला नशा चढली आहे, असं वाटायला लागलं. त्या नशेतच मी घराकडं चालू लागलो.

प्रा. डॉ. मनमोहन राजे